Tuesday 20 December 2011

जिंगल बेल, जिंगल बेल...


डिसेंबर येतो तोच मुळी चैतन्य घेऊन... नवीन वर्षाच्या स्वागताचे प्लान्स ठरत असतात आणि त्या आधीच सगळ्या उत्साहाला चार चांद लावायला जिंगल बेलची गोड किणकिण घेऊन ख्रिसमस दाखल होतो! ख्रिसमस ट्री, रेनडीअर च्या  गाडीतून बर्फाची वाट तुडवत भेटायला येणारा लालचुटुक कपडे घातलेला गुबगुबीत सांताक्लॉज... त्याच्या पोतडीतल्या त्या मस्त मस्त गिफ्ट्स... हे कल्पनेतलं विश्व सुद्धा किती गोंडस!

ख्रिसमसचं लहानपणापासून मला अपार आकर्षण! मी लहान असताना शेजारी एक ख्रिश्चन कुटुंब राहायचं. आता इतक्या वर्षांनी खरं तर त्या घरातला एकही चेहरा मला आठवत नाही. पण त्यांच्या देव्हार्यातली मदर मेरी आणि जीझसची तसबीर आणि जपमाळ मात्र लख्ख आठवते. जीझसच्या चेहऱ्यावर दिसणारे कमालीचे गोड, शांत आणि सात्विक भाव... कदाचित त्यामुळेच मला सगळे देव सारखे वाटत असावेत... दिवाळीला जसे आपल्या घरातून लादू, चकल्या, चीवड्यांचे वास दरवळतात. ख्रिसमस आला की त्या घरातून केक्स आणि डोनटस बेक केल्याचा सुवास येई. ते घर आणि तो शेजार मागे पडून एवढी वर्ष झाली तरी ख्रिसमस इव्हला मला ते सगळं आठवतं! आमच्या कोकणात मालवण, वेंगुर्ले भागात भरपूर ख्रिश्चन कुटुंब राहतात. एका ख्रिसमस च्या सुट्टीत तिकडे गेले असताना तिथल्या घरांच्या अंगणात किंवा कौलांवर बांधलेले 'गोठे' पाहिल्याचं आठवतंय मला अजून... कारण जीझसचा जन्म गोठ्यात झाला होता!  आपण नाही का दिवाळीत किल्ले करत? आपल्या सगळ्या सण समारंभातली, त्यांच्या सेलिब्रेशन मधली ही साम्यस्थळ दिसायला लागली की खूप छान वाटतं मला! या सणांच्या आणि संस्कृतींच्या नव्याने प्रेमात पडावं असं वाटतं... आणि मग दिवाळी, ख्रिसमस, रमजान, बैसाखी, नवरोज या सगळ्यांकडे पाहण्याचा नजरिया एकदम स्वच्छ आणि अर्थपूर्ण होऊन जातो...


... आणि मग, दिवाळी इतक्याच उत्साहाने मी ख्रिसमसची वाट बघते! आजूबाजूची केकशॉप्स बेल्स आणि ख्रिसमस ट्रीजनी सजतात... रस्त्यावर सांताक्लॉजच्या टोप्या विकायला येतात... टीव्हीवर परदेशात सेलिब्रेट होणारा ख्रिसमस बघताना मला पण ख्रिसमस फिव्हर चढायला लागतो! मला पण तो ख्रिसमस तसंच सेलिब्रेट करायची इच्छा होते! चर्चमध्ये जावं, 'प्रेयर्स' ऐकाव्यात... आपल्याही घरी सांताक्लॉजने यावं, आपल्यासाठी गिफ्ट्सची पोतडी ठेऊन जावं... वगैरे वगैरे...


पण अजूनतरी हे सगळं 'स्वप्न' आहे! यावर्षीही हे सगळं असंच होईल... माझी मी उठून आर्चीज किंवा तत्सम गिफ्टशॉप मध्ये जाईन. एखादं ख्रिसमस कार्ड किंवा बेल घेईन... एखादी पेस्ट्री खाईन... माझ्याच विश्वात रमताना मनातल्या मनात अगदी असोशीने सांताक्लॉजची वाट बघेन... शेवटी झोपताना म्हणेन, ''यावर्षी नाही आलास, पण पुढच्या वर्षी तरी नक्की ये...'' आणि, मी डोळे मिटले, की 'जीझस' चा 'एन्जेल' बनून 'तो' येईल, माझा सांताक्लॉज... रेनडीअरच्या गाडीतून, बर्फाची वाट तुडवत, लालचुटुक कपडे ल्यालेला... माझ्या कपाळाला 'किस' करून तो ''God bless you my child ...!!!'' म्हणेल...


त्या एका क्षणासाठी मी अक्षरशः जीव ओवाळून टाकेन...!!! मेरी ख्रिसमस!!! 

Wednesday 7 December 2011

कॅलिग्राफीच्या निमित्ताने...

खूप वर्ष मनात असलेली एक इच्छा नुकतीच पूर्ण झाली.
जगप्रसिद्ध कॅलिग्राफीकार अच्युत पालव यांच्या कडून कॅलिग्राफी शिकण्याची... 
कॅलिग्राफी या प्रकाराशी ओळख नेमकी कधी झाली आठवत नाही.
पण, पाटी-पेन्सिलची साथ सुटली आणि हाती आलं ते शाई पेन!
पहिल्या भेटीतच 'शाई पेन' या भन्नाट गोष्टीच्या मी अक्षरशः प्रेमात पडले...
तेव्हा धरलेलं शाई पेनचं बोट अगदी शाळा सुटेपर्यंत सोडलं नाही... शाई पेन वापरलं की अक्षर छान येतं हे ऐकलं होतं. माझं अक्षर मुळातच बरं होतं, आपण शाई पेन वापरलं तर अक्षर सुंदर होईल म्हणून माझी शाई पेन वरची निष्ठा ढळली नाही.
तर असंच कधी तरी शाई पेन वापरताना त्याचं निब तुटणे हा प्रकार घडला... आणि त्या अद्भुत क्षणी हे निब कापून त्याचं टोक जाड करून लिहून पहावं हे डोक्यात आलं... तोच तो नेमका क्षण, ज्याने माझी कॅलीग्राफिशी ओळख करून दिली. त्या नंतर बाजारातून खंडीभर निब्स आणून विविध angle मध्ये त्यांना कापून वेगवगळ्या  टायीप मध्ये लिहिण्याचा छंद लागला...
शेवटी माझ्या मम्मीने कुठूनसा मला 'कॅलिग्राफी सेट' आणून दिला... ''कर काय उद्योग करतेस ते!!!''
आणि मला दिसेल ते सगळं कॅलिग्राफी मध्ये लिहिण्याचा नाद लागला...
अशातच कधी झी मराठी वर (तेव्हा ते अल्फा मराठी होतं...) पावसावरच्या गाण्यांवरचा 'नक्षत्रांचे देणे' पहात होते. एकाबाजूला पावसावरची गाणी सुरु असताना दुसर्या बाजूला एक कुणीतरी अवलिया एका मोठ्या कॅनव्हास वर त्या गाण्यांचे शब्द अशा पद्धतीने चितारत होता, जणू पाहताना वाटावं, त्या पावसाच्या सरी कॅनव्हास वरच कोसळताहेत... माझ्या तोंडून ''वा... सही!! हे काय आहे? कोण आहेत हे?'' वगैरे आनंदाचे चित्कार ऐकून पप्पांनी मला सांगितलं, ते अच्युत पालव आहेत... आणि ते जे करताहेत, त्याला 'कॅलिग्राफी' म्हणतात...
थोडक्यात, ''तू जे करतेस ते नव्हे...'' असं त्यांना सुचवायचं असावं... :)
पण, त्या क्षणीच माझ्या मनात आलं, ''अच्युत पालव... या माणसाकडून हे शिकायला मिळालं तर किती भारी...!!!''
माझी ती इच्छा एवढ्या वर्षांनी पूर्ण झाली!!
एम ए च्या अभ्यासानंतर पुन्हा एकदा 
वर्गात बसून 'शिकण्याचा' अनुभव घेतला. खरंच खूप मजा आली! पालव सरांनी स्वतः 'कॅलिग्राफी' साठी पेन हातात कसं धरायचं इथपासूनच सुरुवात केली.
तीन दिवस, रोज तीन तास शाळेत गेले... कैक वर्षांनी!
गृहपाठ केला. मी अटेंड केलं ते वर्क शॉप फक्त रोमन अक्षरांचं होतं, मला देवनागरी  पण शिकायचं आहे... ''देवनागरी साठीही वर्क शॉप घ्या'' असं म्हटल्यावर सरांनी, ''आधी हे पक्कं येउदे... तरंच त्या वर्क शॉप ला प्रवेश मिळेल..'' असं बजावलं!  त्यातला अधिकार मनोमन सुखावणारा होता...
आता जबाबदारी आहे. नेहमीच्या धबडग्यातून थोडं वेळ कॅलिग्राफी ला देणं खरंच केवढं छान आहे!
नवीन शिकण्याची प्रेरणा नेहमी आपल्याला जिवंत ठेवते, नाही...??
सध्या मी यादी करतीये. नवीन काय काय करायचंय, शिकायचंय...
ज्यातून नवीन आनंद मिळेल... अनुभव मिळतील... माणसं जोडली जातील.
आणि जगण्याची प्रक्रिया निरंतर सुरु राहील...

Sunday 23 October 2011

मु. पो. कुसुमाग्रज आणि यादगार गुलजार

" मराठी मेरी मादरी जबान नही, लेकिन उस जमीन की बोली है जिसने पिछले पचास बरसोंसे मेरी परवरिश की है. पंजाब से निकली मेरी जडों को पनाह दी है. महाराष्ट्र की समन्द्री हवाओं का नमक खाया है. इस लिए उस जबान का मजा जानता हूँ... कर्जदार भी हूँ, कर्ज चुका रहा हूँ... '' अशी विनम्र कृतज्ञता मनात ठेवून गुलजारांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे हिंदी अनुवाद केले. गाणी आणि कवितांवर प्रेम असणाऱ्या रसिकांसाठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि गुलजार ही दोन्ही नावं नवीन नाहीत. म्हणूनच "मु. पो. कुसुमाग्रज ः भाषांतराचे पक्षी' हा नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेला कार्यक्रम रसिकांना एक अपूर्व अनुभव देऊन गेला.

कुसुमाग्रजांची मूळ मराठी कविता वाचून नंतर तिचा हिंदी अनुवाद वाचणे असं या कार्यक्रमाच्या सादरीकरणाचं स्वरुप होतं. कुसुमाग्रजांची कविता सादर करायला गुलजारांच्या साथीला होता मराठीतला सिद्धहस्त कवी सौमित्र! ( जो कवितेतल्या शब्द, अर्थ, भावनांना न्याय देत कवितेचं अफलातून सादरीकरण करतो ) "सौमित्र, तुम कोई भी नज्म पढते हो, तो ऐसा लगता है, जैसे वो हर एक नज्म तुम्हारी खुदकीही है...'' असं म्हणत दस्तुरखुद्द गुलजार त्याला पसंतीची पावती देतात! सौमित्रच्या पाठोपाठ गुलजार, त्यांनी हिंदीमध्ये अनुवादित केलेली कुसुमाग्रजांची "नज्म' त्यांच्या उर्दू मिश्रित हिंदी जबान मध्ये सादर करतात तेव्हा डोळे मिटून शांतपणे त्यांना ऐकणं हा अनुभव शब्दांत मांडणं निव्वळ अशक्‍य!

कुसुमाग्रजांच्या कवितांची सौंदर्यस्थळं, त्यांच्या शब्दांची ताकद, त्या कवितांचे सामाजिक संदर्भ हे सगळं गुलजारांना भावलं. त्यातूनच कुसुमाग्रजांच्या (अधून मधून गुलजार त्यांचा ""तात्यासाहाब'' असा अस्सल मराठमोळा, आदरपूर्वक उल्लेख करतात! ) निवडक शंभर कवितांचा अनुवाद करण्याकडे ते वळले. मराठी बोलता येत नसलं तरी गुलजारांना मराठीची उत्तम समज आहे. शिवाय त्यांचे जवळचे स्नेही अरुण शेवते आणि मराठी अभिनेत्री अमृता सुभाष यांनी या कविता समजून घ्यायला मदत केली. "अरुण की तो मैं जान खाता था...'' असं ते अगदी मोकळेपणाने सांगतात.

हा कार्यक्रम म्हणजे नुसत्या मराठी आणि हिंदी कवितांचं वाचन एवढंच नाही. कवितांच्या मध्ये मध्ये सौमित्रने गुलजारांना विचारलेले प्रश्‍न आणि उत्तरादाखल कधी हलकीफुलकी टोलवाटोलवी तर कधी त्यांनी केलेलं "सिरियस लाऊड थिंकिंग' हा या कार्यक्रमाचा आणखी एक सुंदर पैलू!! या प्रश्‍नोत्तरांच्या निमित्ताने समोर सुरू असलेला संवाद म्हणजे गुलजार साहेबांच्या चाहत्यांसाठी एक आगळी वेगळी इंटलेक्‍चुअल ट्रीट होती! त्यांच्या "इजाजत' मधली गाजलेली गझल "मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है' मधल्या "एकसों सोला चॉंद की राते' या ओळीचा दाखला देत "हे एकसो सोला चॉंद की राते काय प्रकरण आहे?'' या सौमित्रच्या प्रश्‍नावर "अरे भाई, वो असल में एकसो सतरा था, गिनती में गलती हो गई...'' असं मिस्कीलपणे ते उत्तरतात. मात्र what is death according to you? या प्रश्‍नाचं उत्तर म्हणून एक "नज्म' ते ऐकवतात. मृत्यू कसा यावा? हे ती नज्म सांगते. रुग्णशय्येवरचा मृत्यू नको. रस्त्यावर अपघात होऊन देहाला छिन्नविछिन्न करणारा मृत्यूही नको. "मुझे ऐसे मरना है, जैसे लिखते लिखते सियाही खतम हो जाएँ...'' हे म्हणताना त्यांचा स्वर किंचित ओला होतो, आपल्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाहीत...

केकचा तुकडा, कलोजस, असाही एक सावता, अखेर कमाई, कणा, रद्दी यांसारख्या अनेक कवितांचे अनुवाद ऐकताना कुसुमाग्रजांच्या मूळ कवितेशी एकरूप झालेले गुलजार पहायला मिळतात. कवितांमागून कविता सादर होतात. लहानपणापासून ऐकलेल्या, वाचलेल्या कुसुमाग्रजांच्या कविता गुलजारांच्या उर्दू शब्दांचे लिबास लेवून येतात तेव्हा त्या दोघींत उजवं डावं करता येत नाही. अशातच कधीतरी कार्यक्रम संपतो. आपण गुलजार साहेबांना भेटायला बॅक स्टेज गाठतो. त्यांच्याशी बोलायला म्हणून घाबरत घाबरत पुढे जावं तर ते स्वतःहून मायेने आपली चौकशी करतात. आपल्या डोक्‍यावर त्यांचा वडिलधारा हात ठेवतात. आपलं सगळं जगणं सार्थकी लागल्याचं समाधान त्याक्षणी मिळतं. एक यादगार दिवस घेऊन आपण बाहेर पडतो... पण तिथला कैफ मात्र काही केल्या मनावरुन उतरत नाही...!!!

Wednesday 12 October 2011

क्या खोया क्या पाया जग में...

जानेवारीच्या १७ तारखेला माझी मोठी मावशी गेली. त्या धक्क्यातून बाहेर येतोय न येतोय तोपर्यंत एप्रिलच्या १३ तारखेला आजोबा गेले. आजोबांना कॅन्सर होता. त्यातल्या त्यात समाधान एकच की कॅन्सर असूनही त्यांना वेदना फारश्या झाल्या नाहीत आणि अतिशय शांत, सुसह्य मृत्यू आला...
आजोबांच्या मृत्यूने सगळ्यात मोठी हानी जर कुणाची झाली तर आदित्यची. तो त्यांना 'आबा' म्हणायचा. आबा गेले तेव्हा तो साधारण सव्वादोन/अडीच वर्षांचा होता. पण त्याला माणसं ओळखता यायला लागली तेव्हापासून त्याचे 'आबा' त्याच्यासाठी सर्वस्व होते. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी लुटू लुटू चालत 'आबांकडे' जाणे हा त्याचा नेम होता. आबा जवळ असले की त्याला तासंतास अगदी आई सुद्धा भेटली नाही तरी चालत असे. शिवाय कमालीचे शिस्तप्रिय असलेल्या आबांच्या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवणं हे फक्त आदित्यच करू जाणे. सकाळी ८ चं ऑफिस म्हणून वर्षानुवर्ष पहाटे उठायची त्यांची सवय. त्यामुळे अर्थातच रात्री ९/९.३० ला ते झोपायला जात. त्यानंतर आम्ही सगळे घरात दबक्या पावलांनी आणि खालच्या आवाजात  वावरत असू, न जाणो चुकून त्यांची झोप मोड झाली तर... पण आदित्य रात्री ११/११.३० ला सुद्धा आबांकडे जायचंय म्हणून हटून बसे.  सुरुवातीला आम्ही तो रडला तरी त्याला रमवून आबांकडे जाण्यापासून रोखत असू, पण दुसर्या दिवशी त्यांना कळलं की ते उलट आमच्यावरच चिडायचे, त्याला का नाही पाठवलं?
पुढे पुढे आम्हाला न जुमानता त्याला वाटलं की तो जाऊन त्यांना उठवायचा आणि मग आबा त्याला गोष्ट सांगत किंवा चित्रांची पुस्तकं दाखवत बसायचे, त्याला झोप येईपर्यंत... दर गुरुवारी आबा बाहेर गेले की त्याला बुंदीचा लाडू आणायचे. पण पठ्ठ्या त्यांच्या शिवाय कुणाहीकडून लाडू भरवून घ्यायचा नाही. रोज सकाळी पेपर आले की त्यातल्या गाड्यांच्या जाहिराती बघणे या कार्यक्रमात आबा जायच्या दिवसापर्यंत खंड पडला नाही.
आणि अखेर १३ एप्रिल ला आजोबा गेले. उत्तरक्रीयेसाठी निघण्यापूर्वी आदित्यला त्याच्या बाबाने ''आबांना बाउ झालाय, म्हणून झोपलेत, डॉक्टर कडे नेतोय, तू एकदा नमस्कार कर'' असं सांगितलं. त्याप्रमाणे त्याने नमस्कार केला. शहाण्या मुलासारखं पहिले एक दोन दिवस त्याने आबांची चौकशी केली नाही. पण नंतर मात्र त्याने ''आबा कुठेत?'' हे विचारायला सुरुवात केली. ''डॉक्टर काकांकडे आहेत, बरं वाटलं की येतील'' किंवा ''तू शहाण्यासारखा वाग, मग येतील..'' ह्या उत्तरांनी थोडा वेळ त्याचं समाधान झालं. पण थोडाच वेळ...
पुढे आबांच्या दहाव्या दिवशी त्यांचा फोटो फ्रेम करून आणला. तो नजरेला पडताच त्या फोटोला पोटाशी धरून हा एवढासा मुलगा हर्षवायू झाल्यासारखं आरडा ओरडा करून नाचला. खाली लिहिलेलं त्यांचं नाव आम्हाला दाखवून, ''आदूचे आबा डॉक्टरांकडे आहेत'' असं लिहिलंय म्हणाला. तेव्हाचं त्याचं रूप बघून सगळ्यांचे डोळे पाणावले.. त्या दरम्यान घरी भेटायला येणाऱ्या  माणसांचा महापूर लोटला होता. त्याला सतत प्रश्न पडे, एवढी लोकं येतात, तरी आबा का येत नाहीत? पण त्याच्या प्रश्नाला कुठल्याही भल्या माणसाकडे उत्तर आहे का?
मध्ये एकदा त्याची आई (माझी मावशी) त्याला माझ्याकडे ठेवून कुठेशी बाहेर गेली होती. आता काही झालं तरी त्याला रडू न देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. म्हणून त्याला जमेल त्या पद्धतीने रमवत होते. आणि अचानक जवळ येऊन तो मला म्हणाला, ''दीदी, आबा कधी येनाल गं?  आता ते आले नाही तल मी ललेन हां...'' मी निरुत्तर झाले. असं त्याने आम्हाला सगळ्यांना अनेकदा निरुत्तर केलंय... परवा एकदा कशावरून तरी त्याचं डोकं फिरलं होतं, हमसून हमसून रडत होता. मावशीने जवळ घेऊन शांत केलं, तर हा म्हणाला, ''मला माहितीये, माजे आबा आता येनालच नैत, तुमी त्यांना आनायला पन नाई जात...''
तसं आबा येणार नाहीत हे त्याने मनोमन केव्हाच जाणलंय हे आम्हीही ओळखलं होतंच. पण शेवटी एकदाचं त्याने स्वतःच हे आम्हाला स्पष्ट सांगून टाकलं.
आता रोज सकाळी उठल्यावर पेपर मधल्या गाड्या तो स्वतःच बघतो. बुंदीच्या लाडवाची आठवण आली की आम्हाला कुणाला तरी फर्मान सोडतो, ''घेऊन या'' म्हणून. अगदीच आबांची आठवण असह्य झाली की त्यांचा फोटो घेऊन बसतो. त्या फोटोशी गप्पा मारत... ''आबा मला आवडतात'' असं सांगतो. कुणी डॉक्टर कडे जायला निघालं की मात्र त्याचं तोंड अगदी एवढंसं होतं. डॉक्टर कडे जाणे या गोष्टीचा त्याने धसका घेतलाय. वयाच्या  अवघ्या तिसर्या वर्षी त्याने त्याच्या सगळ्यात लाडक्या माणसाला गमावलंय. मृत्यू या एकमेव सत्याशी एवढ्या लहान वयात अशी जवळून ओळख होणं चांगलं की वाईट ते मला माहित नाही...
गेल्या वर्षभरात अशी खूप माणसं गमावली. मोठी मावशी आणि आबा तर गेलेच. पण पंडित भीमसेन जोशी गेले, जगदीश खेबुडकर, खळे काका गेले. पाठोपाठ गौतम राजाध्यक्ष मग नवाब पतौडी, Apple चा  स्टीव्ह जॉब्ज आणि अगदी परवा जगजीत सिंग...
या सगळ्यांची आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास जागा होती. ही माणसं जरी गेली, तरी ती जागा राहणार... तशीच. या नंतरही आपण जगतोच आहोत. ही माणसं जातानाच आपल्याला त्यांच्याशिवाय जगायचं बळ देऊन जातात. कणखर बनवून जातात.
जगजीत गेले. जाताना त्यांच्या गझलांची पुंजी आपल्यासाठी मागे ठेवून गेले. ते सगळं संचित घेऊन पुढे जायचंय... कुणास ठाऊक अजून काय काय गमवायचंय... कागज की कश्ती, बारीश का पानी नुसतं आठवत मोठं व्हायचंय. आत्ता वाजपेयींची जगजीत साहेबांनी गायलेली ती कविता सतत ओठांवर येतेय... ''जनम मरण का अविरत फेरा, जीवन बंजारोन्का डेरा.. आज यहाँ कल कहाँ कूच है, कौन जानता किधर सवेरा... क्या खोया क्या पाया जग में, जीवन एक अनंत कहानी... ''

Thursday 6 October 2011

ही कनेक्टेड द लास्ट डॉट... :(


स्टीव्ह जॉब्स गेल्याचं सकाळी एका मित्राने फोनवरून कळवलं. त्याक्षणीच महिन्या दीड महिन्यापूर्वी लोकसत्ताच्या शनिवारच्या  अंकात गिरीश कुबेरानी स्टीव्ह वर 'अन्यथा' मधून लिहिलेला लेख आठवला.  तो लेख म्हणजे स्टीव्ह ने स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ प्रसंगी केलेल्या भाषणाचा अनुवाद होता.
आपलं महाविद्यालयीन शिक्षण 'मन रमत नाही' या कारणासाठी सोडून दिलेला हा माणूस... पुढे स्टॅनफोर्ड सारख्या जगद्विख्यात विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिला. त्याने तिथल्या विद्यार्थ्यांना सांगितलेल्या तीन गोष्टी विद्यार्थीदशेतल्या प्रत्येकानेच आवर्जून लक्षात ठेवाव्यात अशा आहेत...
त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, त्याचं महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण झाले नाही. रीड कॉलेजमध्ये स्टीव्हने प्रवेश घेतला. हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या तोडीचं कॉलेज. मात्र, तिथल्या शिक्षणात मन न रमल्यामुळे लवकरच त्याने तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने  तिथून कॅलिग्राफीचे धडे गिरवले होते. त्या धड्यांचा उपयोग पुढे कॉम्प्युटर बनवताना त्याला झाला. "रीड कॉलेजमधील शिक्षणाला कंटाळलोच नसतो तर कॅलिग्राफीकडे वळलोच नसतो,'' हे स्टीव्हचं  म्हणणं महत्वाचं आहे.
दुसरी गोष्ट त्याच्या उद्योगाची. वयाच्या विसाव्या वर्षी वॉझ नावाच्या एका मित्राच्या मदतीने  स्टीव्हने पहिला  कॉम्प्युटर तयार केला. त्याला नाव दिलं "ऍपल'. पुढे या वॉझबरोबरच त्याने "ऍपल' ही कंपनी सुरू केली. पुढच्या दहा वर्षांत "ऍपल' ने चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कंपनीचा पसारा 200 कोटी डॉलरचा झाला. त्यांनी पहिला मोठा कॉम्प्युटर "मॅकिंतॉश' तयार केला. पुढे याच कंपनीतून स्टीव्ह ला काढून टाकलं. स्वतःच सुरू केलेल्या कंपनीतून काढून टाकणं हा खरं तर केवढा मोठा अपमान. पण त्याचा सल बाजूला ठेवून त्यांनी काहीतरी नवीन करायचं ठरवलं आणि "नेक्‍स्ट' ही कंपनी सुरू केली. पाठोपाठ "पिक्‍सर' नावाची कंपनी सुरू केली. "टॉय स्टोरी' ही जगातली पहिली ऍनिमेटेड फिल्म स्टीव्हने तयार केली. या कंपन्यांचं काम एवढं मोठं झालं  की पुढे "ऍपल'ने "नेक्‍स्ट' आणि "पिक्‍सर' या कंपन्या विकत घेतल्या. आणि स्टीव्ह पुन्हा "ऍपल'मध्ये आला. या दोन कंपन्यांच्या जोरावर "ऍपल'चा आताचा विस्तार झाला. "ऍपल'मधून हकालपट्टी झाली नसती, तर "नेक्‍स्ट' आणि "पिक्‍सर' या कंपन्या सुरू झाल्या असत्या का, आणि आज "ऍपल' जिथे आहे तिथे असती का असा प्रश्‍न तेव्हा स्टीव्हला  पडला.
तिसरी गोष्ट मृत्यूविषयी. येणारा प्रत्येक दिवस हा आपला शेवटचा दिवस म्हणून जगलो, तर एक दिवस त्या सगळ्या जगण्याचा अर्थ कळतो, असं त्याने  कुठेतरी वाचलं होतं. कर्करोगाचं निदान झालं तेव्हा डॉक्‍टरांनी फक्त तीन महिने शिल्लक आहेत असं सांगितलं होतं. मात्र, शस्त्रक्रिया झाली आणि पुढे तो आज पर्यंत जगला...
''मृत्यूचा तो स्पर्श खूप काही शिकवून गेला. आपल्या हातातला बहुमूल्य वेळ आपण वाया घालवतो. पण आपल्या मनाचा कौल ऐकला तर त्यापेक्षा मोठं जगात काहीही नसतं... स्टे हंग्री, स्टे फूलीश!!'' असा साधा सोपा कानमंत्र त्याने  स्टॅनफोर्ड च्या विद्यार्थ्यांना दिला...
स्टीव्ह जॉब्स गेला आणि जगभर त्याचे चाहते हळहळले. सगळ्या वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांनी त्याच्या कर्तृत्वाचा आढावा घेत त्याला श्रद्धांजली अर्पण केली.
शिक्षणावर माणसाचं मोठेपण ठरत नाही हे दाखवून द्यायला स्टीव्हचं एकमेव उदाहरण किती पुरेसं आहे ना? निव्वळ कॉलेज मध्ये मन रमत नाही म्हणून तो शिक्षण सोडू शकला. शिवाय त्यासाठी त्याला कुणाला उत्तरंही द्यावी लागली नाहीत. कदाचित म्हणूनच तो त्याला जे हवं ते करू शकला...
जगभरातल्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही यातून बोध घ्यायला हवा. समस्त पालक आपल्या मुलांना 'खूप शिकून मोठे व्हा' असं सांगतात. स्टीव्ह च्या पालकांची पण तशी इच्छा होतीच...
तो खूप शिकला नाही, पण खूप मोठा मात्र झाला!!

Steve, we will miss you... Rest In Peace.

Saturday 1 October 2011

मोबाईल सॅव्ही किड्स

सकाळी जाग आली की बहुतांशी माझा हात उशाशी असलेल्या माझ्या  मोबाईलकडे जातो. जगाच्या पाठीवर माझ्या आधी उठून कामाला लागलेल्या प्रियजनांपैकी कुणाचा तरी एखादा ‘गुड मॉर्निग’ मेसेज आलेला असतो. अशाच एखाद्या मेसेजला रिप्लाय करण्यानं माझा दिवस सुरू होतो. खरं तर सकाळी उठल्यापासून सगळेच आपापल्या व्यापात.. पण ‘गुड मॉर्निग’ या दोन साध्या शब्दांनी का होईना, कुणीतरी आपल्याला ‘नोटीस’ केलंय हे फिलिंग खरंच छान असतं. कदाचित त्या छान फिलिंगमधूनच आपला आजचा दिवससुद्धा छान जाणार अशी खात्री वाटते.
छोटय़ा-छोटय़ा गोष्टी असतात. एखादी लाडकी मैत्रिण जीवघेण्या आजारातून उठलेली असते. रोज तिच्याशी एक तरी फोन व्हावा असं वाटत असतं. पण प्रत्यक्षात मात्र राहून जातं. अशावेळी मग तिचाच मेसेज येतो, जाब विचारायला.. आणि मग छान संवाद रंगतो. आम्हा दोघींना जोडायला तेवढाही पुरेसा, असा तो संवाद! परीक्षेच्या मोसमात आपण सगळेच आपली संपर्क यंत्रणा तात्पुरती  थांबवून स्वत:ला अभ्यासाला जुंपून घेतो. सात-आठ तासांच्या 'break‘' नंतर सहज मोबाईल पाहिला तर कुणीतरी मेसेज केलेला असतोच- 'work hard, study well, but Take care!' मी लांबच्या प्रवासात असेन आणि वाटेत २/३ तास नेटवर्क नसेल तर मी अस्वस्थ होते. पण मग नेटवर्क आल्यावर तिकडनं कुणाचा तरी मेसेज मिळतो- ‘कुठे पोचलीस? लवकर ये, वाट बघतोय..’ हा असा मेसेज मला मनापासून सुखावतो.

कॉलेजमधला जुना ग्रुप अख्खाच्या अख्खा भेटणं आजकाल दुरापास्तच झालंय. पण क्वचित कधी तरी योग येतो. सगळे मिळून भेटणं, गप्पा- दंगा-मस्ती आणि मग अलविदा.. घरी पोहोचण्याच्या आधीच कुणीतरी मेसेज केलेला असतो 'Had a great time...' अनेकदा तासनतास गप्पा मारूनही सांगता येत नाही इतकं काही हा एक छोटासा मेसेज बोलून जातो!! म्हणूनच मोबाईल मला जीवापाड प्रिय आहे.
नुकतेच फेसबुकवर काही फोटोज अपलोड केले. त्यापैकी एका फोटोमध्ये मी तल्लीन होऊन मोबाईलवर काही ‘चाळे’ करत होते. आणि कुणीतरी ते नेमकं ‘क्लिक’ केलं होतं.. ते फोटोज पाहून एका मित्राचा मेसेज आला- 'Hi, Mobile savvy Kid छान आलेत फोटो..!’ त्यातला ‘मोबाईल सॅव्ही किड’ हा उल्लेख खरं तर सुरुवातीला नाकाला मिरच्या झोंबल्यासारखा मला झोंबला होता. पण नंतर तोच मला खूप मागे घेऊन गेला...
कोकणात जिथे मी लहानाची मोठी झाले तिथे साधा लँडलाईन फोनसुद्धा एकेकाळी  इतकी दुर्लभ गोष्ट होती की घरी फोन आला तेव्हा काही तरी आश्चर्य पाहिल्यासारखी माझी परिस्थिती होती. त्या परिसरात तो एकुलता एक फोन असल्यामुळे आजूबाजूच्या चार लोकांसाठीसुद्धा आमच्याकडे फोन येई. फोनची रिंग वाजली की तो कुणी उचलायचा यावरून माझी आणि माझ्या भावाची वादावादी व्हायची. पुण्या-मुंबईत कुणाला फोन करायचा झाला तर एक तर ‘ट्रंककॉल’ बुक करायचा किंवा मग त्यापेक्षा सोयीस्कर म्हणून बाहेरच्या लांबच्या ‘एसटीडी बुथवर’ जाऊन फोन करायचे..! त्यामुळे तेव्हा जर कुणी म्हणालं असतं की तू कॉलेजला जाशील तेव्हा तुझ्याकडे तुझा एकटीचा स्वतंत्र फोन असेल तर विश्वास ठेवणं शक्यत नव्हतं.. आणि आता तर काय, माणशी दोन मोबाईल असणंसुद्धा 'used to' झालंय..
मोबाईलमुळे जग जवळ आलंय हे खरं.. मी शिक्षणासाठी घर सोडलं आणि मग मोबाईल असणं ‘अपरिहार्य’ म्हणून मोबाईल मिळाला. पण घरच्या लँडलाईनचा ‘फील’ मोबाईलला नाहीच! लँडलाईनवर फोन आला की, सगळं घर त्या फोनभोवती कोंडाळं करायचं.. मी-मी करत सगळ्यांना एकमेकांशी बोलायचं असायचं. आईची मैत्रीण, बाबांचा मित्र यांच्याशीही ‘ए मावशी’, ‘ए काका’ असं म्हणून गप्पा चालायच्या! ‘आज जेवायला काय केलंयस’, असं विचारायला म्हणूनसुद्धा आई-मावशीचे फोन व्हायचे आणि ते तासन्तास चालायचे! बरं, आत्ता लागलेला फोन कट झाला तर तो पुन्हा लागेलच याची शाश्वती नसे! त्यामुळे माझ्या बाबांच्या भाषेत एकदा फोन लागला की यांना ‘गावगप्पा’ मारायच्या असतात!

आजकाल या गावगप्पा खरंच हरवत चालल्या आहेत.. फक्त लँडलाईन हा एकमेव ऑप्शन असताना सगळ्या मित्र-मैत्रिणींचे फोन पण तिथेच यायचे. त्यामुळे कुणाचा फोन, काय बोलतायत हे सगळ्यांना माहिती असायचं.. त्यामुळे तो फोन म्हणजे अख्ख्या घराशी संवाद असायचा.
हे चित्र आता इतकं बदलत चाललंय की कुणाचाही फोन आला की आपण पटकन उठून गॅलरीत जाऊन बोलतो.. आणि मग दोन्हीकडे शेजारच्यांच्या भुवया उंचावतात.. खरं तर लँडलाईनवर जे बोलायचो तेच आपण मोबाईलवर बोलतो, पण तरी आपण काय बोलत असू ही शंका सगळ्यांच्या मनात येतेच!
मोबाईल ‘परवडणं’ हासुद्धा एक भाग असतो. मोबाईल अगदी नवीन असताना, ‘नाईट पॅक’, ‘फ्रेंड्स प्लॅन’, असलं काहीही हाताशी नसताना एका साध्या मिस्ड कॉलमधूनही जोडलं राहाणं व्हायचं! माझा एक जिवलग  मित्र दुपारी आई झोपली की तिच्या फोनवरून मला फोन करायचा आणि मग आमच्या गावगप्पा चालायच्या. अशावेळी आमच्या मोबाईल मॅनियावर समस्त घराने केलेल्या टीका हा एक नवीन आणि स्वतंत्र चर्चेचा विषय... पण माझी आई जेव्हा तिच्या मैत्रिणींशी, बहिणींशी तासन्तास बोलते तेव्हा मी फक्त तिच्याकडे बघून हसते, तिला समजायचं ते समजतं..

आजच्या धकाधकीत, प्रत्येकाच्या ‘बिझी’ टाईमटेबलमध्ये, आपल्याला कुणाशीच बोलायला आणि कुणालाच भेटायला वेळ नसतो.. डेडलाईन्स, प्रेझेंटेशन्स, सेमिनार आणि मीटिंग्सच्या भाऊगर्दीत नात्यांवरचा मुलामा कमी होऊ नये यासाठी असा एखादा तासनतास चालणारा फोन, एखाद्या वीकएंडला  झाला किंवा रोज कुणालातरी एखादा मेसेज करायला काही सेकंद दिले तर  त्यात मला काहीच गैर वाटत नाही.. जिव्हाळ्याचा आणि मायेचा तो मुलामा जपला जाणार असेल तर ‘मोबाईल सॅव्ही’ म्हणवून घ्यायला माझी काहीच हरकत नाहीये..!

(प्रथम प्रकाशित : लोकसत्ता)

Saturday 10 September 2011

बोल...

(सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला चित्रपट परीक्षण वगैरे बिलकुल लिहिता येत नाही. आणि पडद्यावर जे दिसतं त्या व्यतिरिक्त मला सिनेमा फारसा कळतही नाही. गेले दोन आठवडे बघायचा राहिलेला एक सिनेमा फायनली आज सकाळी पाहून झाला, आणि वाटलं जे वाटतंय ते शब्दात मांडून पाहावं, म्हणून हा प्रयत्न...)
शोएब मन्सूर हे नाव रानडे मध्ये जर्नालिझम करत असताना नखाते सरांच्या तोंडून ऐकलं होतं. मन्सूर च्या 'खुदा के लिये' चं सरांनी भरपूर कौतुक केलं होतं. त्यामुळे त्याचं नाव विशेष लक्षात राहिलं. खुदा के लिये मिळवून पहायचा होता, पण कालांतराने विषय मागे पडला तसा तो बघायचाही राहून गेला. त्यानंतर `बोल` च्या जाहिरातीमधून पुन्हा एकदा शोएब मन्सूर हे नाव नजरेस पडलं. ३१ ऑगस्ट ला रमजान ईद च्या मुहूर्तावर हा सिनेमा भारतात रिलीज होणार होता. आणि यावेळी मला हा सिनेमा अजिबात चुकवायचा नव्हता. पण तरी आज उद्या करता करता शेवटी आज मला सोयीच्या वेळी आणि सोयीच्या ठिकाणी शो मिळाला. आणि सोबत हा विषय नक्की आवडेल अश्या संवेदनशील मैत्रिणीची कंपनी मिळाली. त्यामुळे आज `बोल` पाहून झाला.
एक हादरवून सोडणारा अनुभव होता. माझ्या इतर सिनेमा प्रेमी मित्र मंडळींत  मी अगदीच 'odd girl out ' आहे खरं म्हणजे. केवळ नाईलाज म्हणून मी त्यांच्या बरोबर काही सिनेमे पहातेही. पण सिनेमा हॉल मधून बाहेर पडल्यावर पाचव्या मिनिटाला मी त्या सिनेमातूनही बाहेर पडलेली असते. पण आज तसं झालं नाही. सिनेमा संपवून ऑफिस मध्ये पोचले, कामाला लागून हाताखालच्या काही गोष्टी संपवल्या. पण अजूनही 'बोल' मधले हुंकार, हुंदके आणि उसासे माझी पाठ सोडायला तयार नाहीत.
बोल ही जैनब ची गोष्ट आहे. ती फाशीच्या फन्द्यावरून आपली कहाणी प्रसार माध्यमांना ऐकवते आहे...
जैनब पाकिस्तानी मुस्लीम कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. आई-वडील आणि सात बहिणी हे तिचं कुटुंब. वडील हकीम. हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबात परंपरेने चालत आलेला... पण आता डॉक्टर चं प्रस्थ वाढल्यामुळे हकीम कडे फारसं कुणी येत नाही. त्यामुळे त्यांची कमाईसुद्धा बेतास बात... तेवढ्या कमाई वर अख्खं घर चालवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. पण तरी कुटुंबाचा पसारा उत्तरोत्तर वाढत चाललेला... अशातच जैनब ची आई एका मुलाला जन्म देते. तिचे वडील खुश होतात. पण लवकरच लक्षात येतं, मुलाचं शरीर आणि त्यात वाढतेय एक मुलगीच. हकीम साहेब त्या एवढ्याशा जीवाचा गळा घोटायला धावतात, पण बायकोच्या आकान्तामुळे त्यांचा नाईलाज होतो. ते मुल मोठं झाल्यावर जैनब आणि तिच्या बहिणी मुस्तफाच्या मदतीने त्याला आवडीचं पेंटिंग चं काम मिळवून देतात. पण तिथे त्याला अमानुष छळ सोसावा लागतो. एका रात्री हकीम साहेब आपल्या या मुलाचा जीव घेतातच... त्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी मस्जिद ट्रस्टने सांभाळायला दिलेली मोठी रक्कम ते लाच म्हणून देऊन टाकतात. या दरम्यान जैनबचं लग्न होतं, पण नवर्याची आर्थिक परिस्थिती बघता त्यातून मार्ग निघेपर्यंत मुल जन्माला न घालण्याचा निर्णय ती घेते. तिचा हा निर्णय न पटल्याने नवरा तिला माहेरी परत पाठवतो. वेळोवेळी हकीम साहेबांच्या निर्णयांवर ती आक्षेप घेते आणि त्यांच्या मनातली तिच्या विषयीची अढी वाढत जाते. मस्जिद ट्रस्टचे पैसे लाच द्यायला वापरून टाकल्यावर जेव्हा ते ट्रस्टला परत करायची वेळ येते तेव्हा एवढी मोठी रक्कम कुठून उभी करायची असा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा गावातल्या एका माणसाला तवायफ म्हणून नाच गाण्यात धंद्याला लावायला मुली हव्या असतात. तो त्याच्या कडे असणार्या मीना नावाच्या मुलीशी निकाह करून मुलीला जन्म देण्यासाठी हकीम साहेबाना तयार करतो. बदल्यात मस्जिद ट्रस्टला द्यायची सगळी रक्कम एकहाती द्यायचं कबूल करतो. हकीम साहेब तयार होतात. त्यातून हकीम साहेब आणि मीनाला मुलगीही होते. त्या मुलीला मीना जैनब च्या घरी आणून सोडते. जैनब, तिची आई आणि बहिणी यांना हे समजतं तेव्हा  धक्का बसतो. त्या दुसर्या दिवशी सकाळी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. या गोष्टीची बभ्रा नको म्हणून हकीम साहेब त्या छोट्या बाळाचा जीव घ्यायला जातात, तेव्हा संतापून जैनब त्यांच्या वर हल्ला करून त्यांचा जीव घेते.  आणि त्याबद्दल तिला सजा-ए-मौत फर्माव्लेली असते. आपल्याला मुल जन्माला घालून त्याला सुखकर आयुष्य देता येत नसेल तर ते जन्माला घालावं का? आणि जसं हत्या हा गुन्हा आहे, तसं असा जीव जन्माला घालून आयुष्य भर त्याला मरणप्राय जगायला लावणं हा गुन्हा नाही का असा प्रश्न अत्यंत आर्तपणे ती विचारते. जैनबची गोष्ट ऐकणारी वृत्तवाहिनीची एक रिपोर्टर हे ऐकून सुन्न होते. जैनब गुन्हेगार नाही, तिची फाशी थांबवून, हा खटला पुन्हा सुरु करावा यासाठी ती पाकिस्तानच्या पंतप्रधानांना संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. मात्र त्यांची झोपमोड नको म्हणून संबंधित अधिकारी तिला पंतप्रधानांपर्यंत पोचू देत नाहीत. अखेर जैनबला फाशी होतेच...
नंतर आपल्या आईला सांभाळून जैनबच्या बाकीच्या बहिणी जैनब्स कॅफे सुरु करतात. आयेशा या जैनबच्या बहिणीचा मुस्तफा म्हणजे आतिफ अस्लमशी निकाह झालेला असतो. तोही अत्यंत खंबीरपणे  आयेशा आणि तिच्या कुटुंबाला आधार देतो. मीनाने सोडलेली हकीम साहेबांची मुलगीपण या कुटुंबाची लाडकी होते. तिला सगळे प्रेमाने सांभाळतात... इथे सिनेमा संपतो!

हा सिनेमा पाकिस्तान मध्ये तयार झाला आणि तिथे लोकप्रियतेचे सगळे उच्चांक या सिनेमाने निव्वळ एक आठवड्यात मोडले. हे कळलं आणि मन थक्क झालं...
आपल्या शरीराची थरथर क्षणा क्षणाला वाढत जाते. हृदयाचे ठोके वाढतात. पोटात खड्डा पडतो. तृतीय पंथीयांची समाजाकडून होणारी परवड, लोकसंख्या वाढीची समस्या, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, मुलगी नको असल्याची भावना, मुलगी म्हणून तिला भेडसावणारे वेगळे प्रश्न हे सगळं एकत्रितपणे आणि तरीही इतकं स्पष्टपणे हाताळलं गेलंय या सिनेमात. जैनबच्या इच्छेप्रमाणे आता तिच्या आई-बहिणी मोकळा श्वास घेतं आणि नवीन आयुष्य सुरु करतात... एका बाजूला जैनबच्या लढ्यापुढे मान झुकते... डोळ्यातलं पाणी निकराने गालावरून ओघळत असतानाच गाण्याच्या सुरावटी कानावर पडतात... 'मुमकिन है, बहार मुमकिन है...' 

Monday 5 September 2011

गुरु साक्षात परब्रह्म...!!!

आज शिक्षक दिन! मला आठवतंय, लहान असताना घरी आई आणि शाळेत बाई या दोघींनी आपलं अवघं जग व्यापलेलं असायचं! या दोन व्यक्तींना जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाही याची पक्की खात्री असायची. घरी जसं आपल्या गुणांचा पाढा बाकी कुणीही वाचला तरी आईकडून दाद मिळेपर्यंत आपण खुश नसतो, तसं शाळेत बाई छान म्हणेपर्यंत चैन नसायचं... नवीन फ्रॉक, छान अक्षर, वेळच्या वेळी पूर्ण केलेला गृहपाठ या सगळ्याला बाई जोपर्यंत खुशीची पावती देत नाहीत तोपर्यंत चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं! बाई म्हणजे केवढा भक्कम  आधार असायच्या!
नंतरच्या प्रवासात वेळोवेळी असे अनेक शिक्षक मिळाले. त्यांनी पुस्तकं वाचायला शिकवलीच, पण त्या सोबतच जगण्यासाठी आवश्यक असलेले इतरही अनेक अनिवार्य पाठ सुद्धा शिकवले. पुसाकातल्या अभ्यासावर परीक्षा होते, तेव्हा येत नसलेले प्रश्न ऑप्शन ला टाकता येतात. पण आयुष्याच्या परीक्षेत असे प्रश्न येतात तेव्हा त्या प्रश्नांना धैर्याने भिडणे हाच एकमेव ऑप्शन असतो! आणि त्यासाठी लागणारं साहस त्यांनी दिलं... ठेच लागली तेव्हा उठून उभं राहायला हात दिला... भीती वाटली तेव्हा पाठीवर आधाराचा हात ठेवला... प्रयत्न करण्यावरची इच्छा उडाली तेव्हा सोबत उभं राहून आपली बाजू बळकट  केली... अपयश पचवायला शिकवलं, तसे  यशाच्या आनंदात भरभरून सहभागी झाले... आणि कुठल्याही कठीण वाटणाऱ्या परीक्षेसाठी निघताना नमस्कारासाठी वाकल्यावर तोंड भरून आशीर्वाद दिले! त्या आशीर्वादाचं संचित  नेहमीच बाकी कशाहूनही मोठं आहे! आणि जोपर्यंत ते आशीर्वाद आहेत, तोपर्यंत कुठलीच वाट अवघड नाही याचं समाधान तर जन्मभर पुरून उरणारं...!!!
त्या सर्व आदरणीय आणि सन्माननीय गुरुजनांना मनापासून नमस्कार...!!!

Thursday 1 September 2011

गणपती : एक आनंदनिधान

कोकणात गणपतीची धमाल वेगळीच. गणपती आले की शाळेला अगदी भरभक्कम आठ/दहा दिवस सुट्टी...  त्यामुळे सुट्टी सुरु झाली की उठून कोर्ल्याच्या घराची वाट धरायची हा नेम गेली कित्येक वर्ष चुकला नाही. कोर्ल्याला माझा मामा राहतो. भर पावसात गणपतीची मूर्ती घेऊन घरी पोचलो, की आजी दारातच पायावर दुध, पाणी घालून आणि औक्षण करून सगळ्यांना घरात घेते... तिथून सगळं घर गणपतीमय होऊन जातं... आणलेल्या मूर्तीला तात्पुरतं एखाद्या चौरंगावर ठेवायचं आणि मग पाहिला अर्धा पाउण  तास त्या मूर्तीला सगळीकडून न्याहाळून भरपूर कोडकौतुक करायचं.  की मग मोर्चा दुसर्या दिवशीच्या पूजेच्या तयारी कडे. ओटी, पडवी, माजघर असलेल्या जुन्या घराचं रंगरूप बदलून आता पोर्च, हॉल, किचन झालं तरी गणपतीचा उत्साह आणि रंगरूप मात्र तसंच आहे. पूर्वी ओटीवर असलेलं गणपतीचं डेकोरेशन आता हॉल मध्ये आलं.  पण अजूनही गणपतीच्या आदल्या दिवशी मध्य रात्रीपर्यंत मनासारखं डेकोरेशन पूर्ण होत नाही. किंवा त्यावर पोटभर उहापोह केल्याशिवाय ते पूर्ण झाल्यासारखं  वाटत नाही हे जास्त खरं आहे!! शिवाय ही तयारी फक्त डेकोरेशन पुरतीच नाही. पूजेचं ताट, त्यात गंध, अक्षता, गूळ खोबरं, कापूर, निरांजनं, अत्तर आणि काय आणि काय...  सकाळी लवकर उठून  फुलं, दुर्वा, पत्री काढणं... एक ना हजार गोष्टी करायच्या असतात. इतकी वर्ष आक्का होती, तोपर्यंत फुलं काढणं हे तिचं काम होतं. आक्का गेली कैक वर्ष आमच्याकडे कामाला यायची, पण ती घरातलीच! अगदी आजोबांपेक्षाही मोठी असल्यामुळे ती त्यांनाही बिनधास्त एखादं फर्मान सोडू शकायची! आणि मग आम्ही पोरं ''आक्का, तू ग्रेट गं!'' असं म्हणत तिला शाबासकी द्यायचो!तर काय सांगत होते, रोज सकाळी देवपूजेला फुलं काढायचा मान आक्काचा होता!  ती सकाळी सातला यायची आणि सगळ्यात आधी फुलं काढायला जायची. ताट भरून फुलं काढायची त्यात सुद्धा किती नजाकत होती! जास्वंद एका बाजूला, तगर, अनंत, दुर्वा, तुळशीच्या मंजिर्या असं सगळं बघूनच प्रसन्न व्हायचं मन! माझी मां  तर म्हणायची पण, आक्का सारखी शिस्तीत आणि सुंदर फुलं काढून दाखवा, मागाल ते बक्षीस देईन... आता आक्का नाही म्हणून फुलं काढायची राहत नाहीत. पण फुलांचं ताट पाहिलं की ही फुलं अक्काने काढलेली नाहीत हे लगेच जाणवतं!
स्वयंपाक घरात उकडीच्या मोदकांची तयारी सुरु होते.
एका बाजूला ही लगबग आणि आपल्याला दूरवरच्या एखाद्या वाडीत लाउड स्पीकर वर 'अशी चिक मोत्याची माळ होती गं, तीस तोळ्याची...' किंवा 'बंधू येईल माहेर न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला...' अशी गाणी ऐकू यायला लागतात. घराला उत्साहाचं उधाण येतं.

यावर्षी सुट्टी नाही म्हणून गणपतीला माझा मुक्काम पुण्यातच. गणपतीला घरी नाही अशी ही पहिलीच वेळ... त्यामुळे घरातल्या गणपतीची जबरदस्त  आठवण येतेय. गणपतीची पूजा सांगायला येणारा नेहमीचा काका, त्याला आजचा एकाच दिवस  आम्ही पोरं गुरुजी गुरुजी म्हणून चिडवतो! खरं तर त्याच्या अंगा- खांद्यावर खेळत लहानाचे मोठे झालो आम्ही. त्यामुळे पूजा, आरती झाली की नमस्कारासाठी वाकल्यावर पाठीवर एक थाप (की धपाटा?) मारून तोंड भरून आशीर्वाद देणारा हा आमचा एकटाच गुरुजी! पूजा झाली की मोदक... प्रत्येकाने एक तरी मोदक करायचाच हा जणू नियमच! त्यामुळे प्रत्येक जण आपलं कला कौशल्य त्या मोदकांवर अज्माव्णारच! दर वर्षी बसक्या नाकाचा, किंवा वेडा वाकडा झालेला पहिला मोदक, मग त्यावर झालेली चिडवा चिडवी... आणि मग ''यावर्षीचा पहिलाच आहे ना, आता दुसरा बघ मस्त करते की नाही...'' असं म्हणत मनासारखा मोदक जमला की आनंदाने माझं पण नाक त्या मोदका सारखंच वर होतं... दरम्यान ''नैवेद्य दाखवायला चला'' अशी आजोबाना order येईपर्यंत हॉल मध्ये कॅरम चे डाव रंगतात. चीटिंग होते, हाणामारी होते... शेवटी जिंकणार्याला एक जास्तीचा मोदक कबूल करून आजोबा उठतात. मग नैवेद्य... पंच पक्वानांनी भरलेलं हिरवं गार केळीचं पान, साजूक तुपाने माखलेला मोदक, त्यावरच्या दुर्वा गणपती बाप्पाला दाखवून झाल्या की हसत खेळत उठलेल्या पंगती... हे सगळं म्हणजे आनंदनिधान असतं!

लहान असताना काजू मोदकाच्या त्रिकोणी पाकिटातल्या आरती संग्रहाचं केवढं अप्रूप होतं... शिवाय संध्याकाळच्या आरत्यांसाठी शेजारी पाजारी जाताना पावसात निसरड्या झालेल्या पायवाटेवर घसरायला होऊ नये म्हणून मामा उचलून घ्यायचा ते सगळं विसरणं कदापीही शक्य नाही... तास दीड तास आरत्या म्हणून आणि टाळ्या वाजवून शेवटी हातांचे तळवे लालेलाल व्हायचे. हे असं अगदी आठ दिवस दणक्यात सुरु असायचं! तो गणपती सगळ्या गावाचा असायचा. इथे शेजारी कोण राहतात  हेही आपल्याला माहित नसतं, आणि तिथे मात्र तुम्ही वर्षातून एकदा गेलात तरी मी कोण हे सांगावं लागत नाही!

आत्ता मी ऑफिस मध्ये बसलीये. नुकताच  मला मामाचा फोन येऊन गेला. ''तुझी आठवण येतेय, गणपती पण विचारत होता, तू कुठेयस असं?'' माझ्या लाडक्या मामाचा आवाज ऐकून मला इथे क्षण भर काही सुचलं नाही. नकळत माझाही आवाज ओला झाला. मला तो अत्तराचा सुवास आणि केळीच्या पानावरचा नैवेद्य, प्राणप्रतिष्ठा केल्या नंतर अजूनच तेजाळलेली गणपतीची मूर्ती... जिवंत भासणारे त्याचे डोळे... हे सगळं इथे माझ्या समोर दिसतंय... आणि मी मनोभावे त्याला हात जोडलेत!  

Monday 29 August 2011

याद आएँगे ये पल..

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना हे  आम्हाला दोघींना बघूनच लिहिलंय की काय असं  वाटावं इतकं ते आम्हाला लागू पडायचं! खरं तर ती माझ्याहून चार वर्षांनी मोठी. सी.ए. झालेली. एका मोठय़ा कंपनीत छानशी नोकरी करणारी आणि माझं कॉलेज नुकतंच सुरू झालेलं. ती कायम ऑडिट्स आणि फायलींच्या गठ्ठय़ात बुडालेली आणि माझी प्रत्येक असाईनमेंट तिच्या मदतीसाठी रेंगाळलेली. ‘लवकर निजे लवकर उठे’ हा तिचा दिनक्रम आणि ‘चहा झालाय, आता तरी उठ!’ असं म्हटल्यावर ‘काय गं तुझी कटकट’ हे उलटं तिलाच ऐकवत डोळे चोळत उठणारी मी...
मी लिहिलेल्या प्रत्येक वाक्याची वाचक आणि ‘क्रिटिक-सुद्धा ती! शनिवार-रविवार पुस्तक प्रदर्शनं, शॉपिंग स्ट्रीट, नवीनच ऐकलेल्या एखाद्या कॉफी जॉईंटला चक्कर यासाठी गावभर हुंदडायला आम्हा दोघींना फक्त आम्ही दोघीच! आणि सरतेशेवटी दिवसभर फिरून पुढच्या आठवडय़ाभरासाठी मॅगी आणि सूपची पॅकेट्स, कुठे नेसकॉफीचे पाऊच, उगाचच आवडला तर एखादा टी-शर्ट असा पसारा घेऊन आम्ही घरी... सकाळच्या चहापासून रात्री झोपतानाच्या कंपल्सरी दुधाच्या मगपर्यंत तिचं माझ्यावर लक्ष... तिच्या ‘लंचब्रेक’मध्ये तिने ‘जेवलीस का?’ विचारायला केलेला एसएमएस! कुणी आम्हाला विचारलं की, तुमच्या आयुष्यातले सर्वात धमाल दिवस कुठले? I'm sure, आम्हा दोघींसाठी- ‘आम्ही रुममेट्स होतो ते दिवस’ हे एकमेव उत्तर आहे...
शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जेव्हा ‘आपलं घर’ सोडून बाहेर राहायची वेळ येते तेव्हा साहजिकच आपल्याबरोबर राहणारे लोक कसे असतील हा प्रश्न असतोच. हाताची पाचही बोटं सारखी नसतात. आपल्या स्वत:च्या घरातसुद्धा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतोच. तिथे आपल्याच माणसांशीही आपले वादविवाद होतात. मग ‘रुम’वर तर दूर दूर तक संबंध नसलेल्या चार मुलींबरोबर एकत्र राहायचं म्हटल्यावर टेन्शन येणं स्वाभाविक आहे. एखाद्या रुममध्ये ऑलरेडी दोन-तीन मुली ‘रुममेट्स’ म्हणून मस्त सेटल झाल्या असतील तर कुणीही नवीन येणारी मुलगी त्यांना नको असते. आणि अर्थातच ते स्वाभाविक आहे! आपलं सगळं छान लागी लागलेलं असताना कुणीतरी चौथंच माणूस आपल्याबरोबर येऊन राहणार असेल तर आपण नाही का वैतागत? मग आपल्या सगळ्या सवयी, आपला दिनक्रम यात नाही म्हटलं तरी थोडा फरक पडतोच... पण एकदा का घराबाहेर राहायचं ठरलं की, अनेक ‘अ‍ॅडजस्टमेंट्स’ करायची  प्रत्येकीची तयारी असतेच.. त्यामुळे सुरुवातीची थोडीशी ‘नको’पणाची भावना, रुसवे-फुगवे मागे पडले की नवीन-जुन्या सगळ्याजणी एकमेकींत मस्त मिसळून जातात! आणि मग एक नवीन ‘रुटीन’ सेट होतं...
दिवसभर आपापले कॉलेज, क्लास, ऑफिसचं वेळापत्रक उरकून संध्याकाळी रुमवर आलं की ‘मेस’मध्ये जाणं... मेसमधून आल्यावर चहा किंवा कॉफी प्यायची लहर आली तर कुणा एकीच्या मागे लागून तिला ‘चहा कर ना गं..’ म्हणून मस्का मारणं.. कधी अचानक मनात आलं म्हणून आपल्या आपल्या गाडय़ा काढून आईस्क्रीम खायला जाणं.. ‘रुम’वर लाईट गेले असतील तर नेमक्या त्या दिवशी आपल्या स्वत:च्या गावात वर्षांनुवर्ष चर्चिला गेलेला भुता-खेतांचा किस्सा आठवणं.. आणि मग अंथरुणात पडल्या पडल्या मध्यरात्र उलटून जाईपर्यंत आजी-आजोबांकडून, आई-बाबा, काका-मामांनी ऐकवलेले ‘भूत एपिसोड’ डिस्कस करणे.. मग ‘आता उठून लाइट कोण बंद करणार?’ म्हणून एक दिवस ढळढळीत उजेडात झोपून जाण... कॅन यू इमॅजिन? शिवाय अजून एक धम्माल प्रोग्रॅम म्हणजे रोज झोपायला आडवं झाल्यावर दिवसभरात आपल्याला आलेले एसएमएस वाचून दाखवणं! जिला जो आवडेल तिला तो 'forward' करणं.. ‘रूम’वरचे वाढदिवस तर.. Very Very special! आयुष्यात पुढे जाऊन कितीही ‘exclusive’ वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करण्याएवढे आपण मोठे झालो तरी रूमवर रात्री बाराच्या ठोक्याला रूममेटने कुठेतरी लपवलेला ‘ब्लॅकफॉरेस्ट’ समोर आणल्यावर होणारा आनंद.. त्यानंतर आरडा-ओरडा दंगा-मस्ती करून कापलेला केक.. चेरी आणि चॉकलेटसाठीची ‘तू-तू-मैं-मैं’ मग ‘विश’ करायला आलेल्या फोन्स, मेसेजेसना केक आणि क्रिमने माखलेल्या चेहेऱ्याने तसंच बसून ‘रिप्लाय’ करणं.. आणि मग ‘ब्लॅकफॉरेस्ट’च्या तुकडय़ांबरोबर आणि गरम कॉफीबरोबर पहाटेपर्यंत रंगलेल्या गप्पा.. वीक-एन्डला ‘ट्रीट’साठी कुठे जायचं यावर झालेल्या ‘चर्चा!’ या सगळ्या गोष्टी कायम मनाच्या तळाशी जपलेल्या.. आणि म्हणूनच मोबाईलवर ‘रूममेट्स’साठीची ‘असाईन्ड टय़ून’ म्हणून केकेचं गाणं- ‘हम रहें या ना रहे कल, कल याद आएँगे ये पल..’
घरी असताना कुणी कौतुकाने एखादा पदार्थ आपल्यासमोर ठेवला आणि आपण नाक मुरडलं की हमखास ऐकायला लागणारा शेरा म्हणजे- ‘‘तुम्हाला मिळतंय ना, म्हणून किंमत नाहीये. घराबाहेर पडाल आणि घरच्या अन्नाच्या आशेला याल तेव्हा कळेल..’’ खरंच जेव्हा रूमवरच्या हॉटप्लेटवर चहा, कॉफी आणि मॅगीशिवाय इतर काहीही जन्माला आणता येत नाही तेव्हा घरी मारलेले हे शेरे आठवतात!
संध्याकाळी काही तरी खाणं झालं असेल आणि रात्री जेवायची इच्छा नसेल तर मेसला जायचा आळस केला की, साडेदहा अकरानंतर हटकून भुकेची जाणीव होते. तेव्हा फक्त आणि फक्त ‘मॅगी’ आपल्या हाकेला धावून येते.. आणि आपल्या नशिबाने आपली ‘रूममेट’ फारच गोड असेल तर मॅगी करायचे ते ‘टू मिनिट एफर्ट्स’ पण आपल्याला घ्यावे लागत नाहीत.. मग आपल्यासमोर आयता आलेला मॅगीचा वाफाळता ‘बाऊल’ आपल्याला जास्तच ‘टेस्टी आणि हेल्दी’ वाटायला लागतो..
पण रूममेट्सच्या रिलेशन्सचे हे जसे ‘मीठे’ अनुभव असतात तसे काही ‘खट्टे’ अनुभवसुद्धा असतातच.. खाण्या-पिण्याच्या सवयी, घरात वावरतानाच्या सवयी, शिस्त यांच्यात जमीन-अस्मानाचं अंतर असतं. घरात वावरताना स्वयंपाकघरात बाहेरच्या सँडल्स घालणं वगैरे गोष्टी आपल्या सवयीच्या नसतात. पण आपली रूममेट तशीच वावरत असेल तर आपल्याला सवय करून घ्यावी लागते. माझी एक मैत्रिण पक्की शाकाहारी-प्युअर व्हेजिटेरियन आणि तिची रूममेट एक बंगाली मुलगी- प्युअर नॉनव्हेजिटेरियन.. एरवी एकमेकींशिवाय पान न हलणाऱ्या या दोघी खाण्याच्या बाबतीत मात्र एकमेकींच्या प्रांतात कधी नसतात.
एखाद दिवशी कॉलेजच्या सेमिनारसाठी किंवा ऑफिसच्या मीटिंगसाठी म्हणून आपण एखादा लाडका कुर्ता किंवा ड्रेस मस्त ड्रायक्लिन करून ठेवावा आणि आपली रूममेट आपल्याला न सांगताच तो घालून जावी.. मग फोन करून आपण तिला झरझरावणं असले प्रसंग येतात. तेव्हा मग एरवीचे सगळे गळ्यात गळे विसरून मनसोक्त भांडणंही होतात.. लेकीन उतना तो चलता है.. शेवटी आपलं हक्काचं रागवायचं माणूस म्हणजे आपला जवळचा मित्र किंवा मैत्रीण... सो, तेवढे खटके उडणं ही पण मजा असते...
पण हे रुसवे-फुगवे, किरकोळ मतभेद जरी असले तरी मी म्हणेन की, its one of the best relationships in the world... आपल्या रूममेटस्ना आपण त्यांच्या 'the best' आणि 'the worst रुपात पाहिलेलं आणि अनुभवलेलं असतं.. त्यामुळे कधी तुम्हाला एकमेकींची सगळ्यात जास्त गरज आहे हे माहिती असतं तसं कधी अजिबात वार्तेला जाण्यात अर्थ नाही हेसुद्धा माहिती असतं.. अशातच नेमका आपल्या रूममेटचा मेसेज मोबाईलवर फ्लॅश होतो-  If you can not handle me in my worst, you don't deserve me at my  best...
आणि मग आपल्याही नकळत आपण गुणगुणतो- तीच specially assigned tone!'

हम रहे या ना रहे कल,
कल याद आएँगे ये पल...

(प्रथम प्रकाशित : लोकसत्ता, ३ नोव्हेंबर २०१०) 

Wednesday 17 August 2011

गुलजार...

गुलजार... ही चार अक्षरंच केवढी जादू करून जातात... गालावर फिरलेल्या मोरपिसाचा स्पर्श जसा सुखद असतो, तसं माझं ''गुलजार'' हे नाव ऐकलं की होतं! सिनेमाच्या फारशी कधी वार्तेला नं जाणारी मी गाणी ऐकण्यात मात्र नेहमीच रमत आलेय... रेडियो, टेप, एमपीथ्री, सीडीज, आणि आता मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतलेली गाणी हा माझ्या रोजच्या जगण्यातला एक अविभाज्य भाग आहे. याच गाणी ऐकण्याच्या वेडामुळे गुलजार साहेबांच्या शब्दांशी ओळख झाली आणि आता त्यांचे शब्द म्हणजे गळ्यातला ताईत बनलेत...   ''लकडी की काठी, काठी पे घोडा'' पासून मला मिळालेली त्यांच्या शब्दांची सोबत ही माझ्यासाठी नेहमीच बेस्ट 'कंपनी' आहे असं मला वाटतं! असंख्य वेळा ऐकूनही त्यांच्या शब्दांचा कंटाळा येत नाही. रिकामा वेळ मिळाला की इतर कशातही वेळ वाया घालवण्यापेक्षा कविताकोश वर जाऊन त्यांच्या कविता वाचण्यात वेळ जास्त छान जातो! आता हे मैत्र नक्की केव्हा जुळलं हे आठवणं तसं कठीण. पण कदाचित त्या शब्दांचे अर्थ कळतही नसण्याच्या वयापासून त्या शब्दांच्या आणि अर्थातच गुलजार साहेबांच्या प्रेमात पडले एवढं मात्र अगदी खरं...

'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' मधून विजय पाडळकर यांनी गुलजार साहेबांच्या कविता मराठीमध्ये आणल्या. त्याआधीही 'गंगा आये कहासे' आणि 'रावीपार' मधून गुलजार आणि पाडळकर हे समीकरण परिचयाचं झालेलं. शिवाय अरुण शेवतेंच्या ऋतुरंग मधून गुलजार अगदी नित्यनेमाने भेटलेले... त्यामुळे ते साहजिकच खूप जवळचे...  किशोर कदम, अर्थात कवी सौमित्रने 'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. न्यूयॉर्क मधला.  नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत त्यांना प्रश्न केला, '' आपको तैरना आता है?'' गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है...'' गुलजार या व्यक्तिमत्वाच्या कैफात आकंठ बुडालेल्या मला 'डूबना' ही कल्पना नव्याने उमगली ती इथेच!

गुलजार साहेबांनी त्यांच्या आईला पाहिलं नव्हतं. आई म्हणून त्यांना गावच्या बाजारात पाहिलेल्या एका वेगळ्याच स्त्रीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ''देख, ऐसी लगती थी तेरी मा...'' असं कुणी म्हणालं होतं... निमिषार्धाच्या नजरा नजरीमध्ये त्या स्त्रीचा सोन्याचा दात त्यांनी पाहिला... पुढे त्यांनी अनेक लोकांकडे चौकशी केली, ''माझ्या आईचा दात सोन्याचा होता का...?'' जगातल्या कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या या कलावंताच्या आयुष्यात ही केवढी मोठी पोकळी... का कुणास ठाऊक पण तेव्हा पासून सोन्याचा दात असलेली ती स्त्री गुलजार साहेबांइतकीच माझ्या मनाच्या एका कोपर्यात घर करून बसली ती बसलीच... अशी खोलवर रुतून बसलेली दुखणीच अशी संवेदनशीलता देतात का माणसाला? कदाचित...

ऋतुरंग मधल्या एका लेखामधून गुलजार आणि त्यांची लाडकी बोस्की अर्थात मेघना गुलजार यांच्यातलं बाप- लेकीचं नातं खूप छान उलगडून समोर आलं... एक व्यक्ती म्हणून माझं वय कितीही असलं तरी तिच्या जन्माबरोबरच माझ्यातल्या बापाचा जन्म झाला आणि तिच्या बरोबर तिच्याच वयाचा होत गेलो असं ते सांगतात! हे असं काही फक्त गुलजार साहेबांनाच सुचू शकतं ना?  सध्या माझ्या अनेक  नात्यांचं  वय मी गुलजार साहेबांच्या या हिशोबा प्रमाणे मोजते... आणि अनेक गोष्टी केवढ्या सोप्या होऊन जातात...

गुलजार साहेबांनी त्यांचा एक कविता संग्रह (बहुदा पुखराज) बोस्कीला अर्पण केलाय. त्या अर्पण पत्रिकेतल्या काही ओळी अशा-

नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए...

त्यांनी शब्दांच्या लिफाफ्यात बांधून दिलेले तजुर्बे आणि दुंवाए आपल्यालाही 'नसीब'  आहेत हेच केवढं मोठं आहे... ना??
गुलजार साहेब, वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम!!!!

Sunday 7 August 2011

मिस यू... लाईक यू... आणि हॅप्पी फ्रेंडशिप डे!!!

हाय... यावर्षी फ्रेंडशिप डे साजरा करायला आपण दोघं एकत्र नाही हे जेव्हा मी तुला सांगितलं तेव्हा तुझा चेहरा पडला आणि मला खरंच गम्मत वाटली. आता साताठ वर्ष झाली आपल्या मैत्रीला. एरवी मी भेटले नाही की, "वा, आज केवढा शांततेत गेला माझा दिवस!!'' हे मला फोन करुन ऐकवणारा तू आज चक्क चेहरा पाडून बसलायस!
तुला आठवतंय, माझं ज्युनियर कॉलेज संपत आलेलं असताना तू भेटून, लाल रंगाची रिबिन बांधून मैत्रीचा हात पुढे केला होतास. आणि एवढा समोर आलेल्या माणसाचा अपमान कसा करायचा म्हणून मी ती रिबीन बांधूनही घेतली होती.


पण नेहमी कपाळावर सौम्य आठ्या आणि "मी म्हणजे कुणीतरी ग्रेट' असा जन्मजात ऍटिट्यूड घेउन वावरणारा तू माझ्या डोक्‍यातच जायचास. त्यामुळे आपली मैत्री वगैरे होणं शक्‍यच नव्हतं. पण ती झाली आणि मला वाटतं तेवढा उर्मट आणि मग्रुर तू नाहीस हे माझ्या लक्षात आलं. आणि मग हळू हळू ट्‌वेंटी फोर बाय सेव्हन फोनवर बोलणे, एकमेकांशी मनसोक्त भांडणे आणि पुन्हा गळ्यात गळे घालणे हा सिलसिला सुरु झाला त्यात आपण आज पर्यंत फारसा खंड पडू दिलेला नाही. पण काही म्हण, आपली ओळख आणि पुढे आजच्या एवढी गुळपीठ मैत्री व्हायला फक्त तूच कारणीभूत आहेस... सॉरी, तुला आरोपी वगैरे असल्यासारखं वाटतंय का? मला तसं नव्हतं म्हणायचं... पण माझ्याशी स्वतःहून तू मैत्री केलीस. नंतर जरा संधी मिळाली की आई- बाबांना थापा मारुन इथे येउन मला भेटलास... एवढंच कशाला, इथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी बाबांना मस्का मारलास! ऍडमिशन घेऊन कॉलेजमध्ये किती गेलास आणि माझ्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसण्यात किती वेळ "सार्थकी' लावलास तो भाग अलाहिदा... पण आज मला आपले सगळे वेडेपणाचे किस्से आठवून हसायला येतंय... आपल्या एका लाडक्‍या मैत्रिणीच्या भाषेत सांगायचं तर सिर्फ तूही मेरा दोस्त है, बाकी सब नालेका पानी...!!!एवढ्या वर्षात खूपशा गोष्टी बदलल्या. मित्र म्हणून आपण थोडे मॅच्युअर्ड झालो. पूर्वीसारखी भांडणं होत नाहीत आपली. पण पूर्वीसारखे भेटतही नाही आपण नियमित. आता तुलाही इथे येऊन तीन वर्ष होऊन गेली, त्यामुळे तुला तुझे भरपूर मित्र आहेत. तेव्हासारखं आता तुझं जग माझ्याभोवती सामावलेलं नाही. मात्र काहीवेळेला तुला फक्त मीच लागते. जसं की, पीसी बिघडला, गेमची सीडी सापडली नाही किंवा पिझ्झा खायला गेलास आणि बकवास पिझ्झा मिळाला की फोन करुन ""माझं नशिबच किती फाल्तू आहे'' हे ऐकवायला तुझ्या जगात दुसरं कुणीही नाही... जणू काही मला फोनवर "तीन-तेरा करुन दाखवले' की सगळं एकदम आलबेल होणार असतं!! जे असेल ते असेल, पण आपण एकमेकांचे मित्र आहोत तसे एकमेकांची सपोर्ट सिस्टिमसुद्धा आहोत हे तू मान्य करायलाच हवंस... आपल्या परिक्षा, नोकरीचे इंटरव्ह्यू, आई- बाबांशी झालेली भांडणं, आजारपणं, ऍक्‍सीडेंटस असे कुठलेही कसोटीचे क्षण आपण एकमेकांच्या जीवावर आरामात निभावून नेलेत. प्रसंगी टोकाची भांडणंही ""जाऊदेत, मरुदेत'' असं म्हणून सोडून देत एकमेकांच्या "सोबत' असण्याला प्रेफरन्स दिलाय. I think thats more than enough to describe how good friends we are!!
सो, फ्रेंडशिप डे ला आपण एकत्र नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण मित्र आहोत हे आपण नेहमी प्रमाणे फोन वर बोलून सेलिब्रेट करुया. आणि हो, गेल्या कित्येक महिन्यात तू मला चॉकलेट्‌स आणि कॅडबरीजचा माझा हक्काचा खुराक दिला नाहीयेस... तू आलास की तो मी दामदुपटीने वसूल करणार आहे हे लक्षात असुदे... बाय, मिस यू... लाईक यू... आणि हॅप्पी फ्रेंडशिप डे!!!

Tuesday 2 August 2011

ती गेली तेव्हा...

आयुष्यात सगळीच माणसं  नाही उलगडत आपल्याला. काही माणसं खूप थोड्या सहवासात अगदी अंतर्बाह्य  कळतात. तर  काही मात्र इतकी आपली असतात तरी शेवट पर्यंत त्यांचा थांग लागत नाही. तिच्या बाबतीत असंच झालं. ती आमची होती.  पण तरी आम्हाला कुणालाच ती नीटशी समजलीच नाही कधी.. एखादं माणूस चटका लावून अचानक निघून जातं तशीच ती गेली. तिचं घर-दार, एकुलती एक मुलगी, नवरा यांना वार्यावर सोडून. आणि आम्हालाही...
अचानक असं निघून जाऊन तिनं तिच्या समोरचे प्रश्न चुटकी सरशी संपवून टाकले. आता का, कशासाठी वगैरे सगळे प्रश्न आयुष्यभर आमच्यासाठी निरुत्तरीत ठेऊन. शिवाय ''ज्या व्यक्तीचे सगळेच निर्णय आणि सगळीच गणितं आज पर्यंत चुकत आली त्या व्यक्तीचं हे एकमात्र गणित इतकं अचूक सुटावं? हे कुठलं दैव म्हणायचं?'' हा विचारही आमच्या बरोबरच संपणार...
आजही तो दिवस लख्ख आठवतो. आता विसरून जावसं वाटलं  तरी शक्य होणार नाही. सकाळी नेहमी प्रमाणे सगळं आवरून ऑफिस ला पोचतानाच तिच्या नवर्याचा ती 'गेल्याचा' फोन आला आणि सर्द झाले.  आता या नंतर आपण काय करायचंय हे मला सुचत नव्हतं. सुचणं शक्यच नव्ह्तं.  त्यामुळे नंतर  येणाऱ्या फोन वरून मला मिळणाऱ्या सूचना ऐकून बधीरपणे मी  हालचाली करत होते. नेहमीचा घरी यायचा रस्ता त्यादिवशी संपता संपत नव्हता. तातडीने तिच्या शहरात जाण्यासाठी निघालो. वाटेत अनेक आठवणीनी डोळे नुसते पाझरत होते.
नोकरीच्या आकर्षणापायी तिनं ते शहर स्विकारलं. पण तिथे आपलं म्हणून हक्काने जावं असंही कुणी नव्हतं. पंचवीसेक  वर्ष तिनं तिथे कशी काढली असतील हे तिचं तिलाच ठाऊक. अनेकदा आर्थिक चणचण आली. तिच्या नशिबाने तिचे आई-बाबा आणि भावंडं खमकी होती. त्यामुळे तिनं नं सांगता आणि नं मागताही तिला त्यांचा भक्कम आधार होता. पण तिचा नवरा मात्र कधीच तिचा मानसिक आधारही बनू शकला नाही. अनेकदा तिच्या मनात येई या लग्नाचं बंधन  तोडून  एकटीने सुखात राहावं... पण मग तीच म्हणायची, नको, कसाही असला तरी तो असल्यामुळे माझ्याकडे नजर वाकडी करून बघायची तरी कुणाची हिम्मत नाही इथे... हेही नसे थोडके! आणि म्हणून ती शेवट पर्यंत त्याच्याशी लग्नाच्या नात्याने बांधली राहिली. आज आत्ता हे सगळं आठवतानाही डोकं भणाणून जातं...
तशी ती आम्हाला  फार कमी भेटायची. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत यायची तेव्हा घर कसं गजबजून जायचं. सगळ्यांचीच, खास करून आम्हा पोरांची ती विशेष लाडकी होती. मी खूप लहान असताना तिने माझ्यासाठी आणलेला स्वेटर मला अजूनही अंधुकसा आठवतोय. पुढेही आखूड झालेला तो स्वेटर मा ने जपून ठेवला  होता कित्येक दिवस... तिचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त... वाक्या-वाक्याला ती असे काही जोक पेरायची कि धमाल व्हायची. आणि मी ''काय गं, सारखी पीजे मारतेस?'' असं म्हणून तिच्या जोकला दाद द्यायचे. पण आता मनात येतं, इतकं वैराण आयुष्य जगून पण इतकी विनोदी आणि खेळकर जगायची उर्मी तिच्यात यायची कुठून?
एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मा- पापांच्या मागे लागून तिच्याकडे राहायला गेल्याचं आठवतंय. ती येईलच, मग तुम्हाला का जायचंय, इकडे आली कि भेटेल नं... असं म्हणून त्यांनी जुजबी विरोध केला पण आम्हाला मात्र जायचंच होतं! त्याप्रमाणे पापा सोडून आले. तिचं यायचं तिकीट काढून तयार होतं, मग आम्ही दोन-तीन दिवस राहून तिच्याबरोबर परत आल्याचं आठवतंय... त्यानंतर एकदा तिने काडी काडी जमवून उभ्या केलेल्या छोट्याशा घराच्या वास्तुशांतीला गेलो होतो. नववीत असेन मी तेव्हा.  ते घर तिच्या मागून फिरून बघितल्यावर '' मस्त घर!!'' असं म्हणून तिच्या गळ्यात पडले तेव्हाचा तिचा तृप्त चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. या दोन्ही भेटीत दूरवर वसलेल्या तिच्या जगातली अनेक गोष्टींची पोकळी जाणवलीच... वय लहान असूनही काही ठळक फरक नजरेतून सुटले नाहीत. त्यावरून ''कशी राहते गं ती तिथे?'' असं विचारून  मा ला हैराण केल्याचं आठवतंय... नाही म्हणायला एक दिवाळी आम्ही सगळ्यांनी तिच्याकडे जाऊन साजरी केली होती नुकतीच. तिनंच हौसेने बोलावलं होतं. पण त्यानंतर मात्र हे असं, तिच्या शेवटच्या दर्शनासाठीच जावं लागलं. आज पर्यंत कधीही दिसली नाही एवढी सुंदर ती त्या शेवटच्या दिवशी दिसत होती. आयुष्यभराचे कष्ट आणि यातायात संपल्याचं जणू समाधान विलसत होतं तिच्या चेहऱ्यावर... एके काळी शर्थीने आयुष्याशी झगडून आता तिचे दिवस बरेच पालटले होते. सोसायचे दिवस संपले होते खरं तर... आता सगळं छान होईल याची तिला आणि आम्हालाही खात्री होती. पण इतकं सरळ साधं असेल तर ते आयुष्य कसलं?
माझं शिक्षण पूर्ण होत आल्यावर ती मला एकदा म्हणाली  ''माझ्याकडे राहायला ये, तिथल्या एखाद्या पेपरमध्ये नोकरी शोधू तुला!!" तेव्हा मी तिला म्हणाले होते ''मी तिकडे येऊन राहू शकेन याची अजिबात शक्यता नाही, त्यापेक्षा मला नोकरी लागली कि तू नोकरी सोड आणि निवांत रहा आमच्या सगळ्यांच्या जीवावर, खूप यातायात केलीस... '' त्यावर ''मी फक्त रिटायर्ड होईपर्यंत राहीन गं, नंतर येईन सगळं विकून तिकडेच, तुम्हा सगळ्यांच्यात..'' म्हणायची. पण सगळं सोडायचं ठरवल्यावर तिने रिटायर्ड व्हायचीही वाट बघितली नाही, आणि गेली... सगळ्या कटकटी टाळून मार्ग काढायचा म्हणून तिनं स्वीकारलेला पर्याय अत्यंत चुकीचा होता... पण आता हे सांगायलाही ती या जगात नाही.
ती गेली तेव्हा मी अतोनात रडले... तिच्या आयुष्यात घडलेल्या चित्र- विचित्र गोष्टींमुळे तिची सगळ्यांनाच खूप काळजी होती. तिचं घर पाहिलं आणि चौथ्या दिवशी तिचे वडील गेले. जणू ते घर पाहायलाच  ते थांबले होते. तिच्या आईला  मात्र स्वताच्या लेकीचा हा असा मृत्यू पाहावा लागला आणि पचवावाही लागला... तिच्या जाण्याने मृत्यू या प्रखर सत्याशी माझी जवळून ओळख झाली. ज्या घरात तिने सकाळी शेवटचा श्वास घेतला, त्या घरात तिन्हीसांजेला आम्ही सगळे जमलो होतो. आम्ही पोचलो तेव्हा तिने स्वताला फास लावायला जवळ केलेली साडी पडली होती. आमचा आक्रोश आता तिला ऐकू जाणार नव्हता... ज्या हॉस्पिटलमध्ये तिनं गेली २५ वर्ष अनेक रुग्णांची सेवा केली, त्या हॉस्पिटलच्या शवागारात ठेवलेला तिचा देह आम्ही पोचल्यावर घरी आणला. तिच्या शेवटच्या प्रवासासाठी तिचा निरोप घ्यायला असंख्य माणसं जमली. तिथे एवढी माणसं तिनं जोडली होती हे आम्हाला आज कळलं, ती गेल्यावर... तिच्यावर अंत्यसंस्कार करून घरातले पुरुष परत आले तेव्हा रात्रीचे २ वाजले होते. आम्ही सगळे विमनस्कपणे बसलो होतो. आदल्या रात्री ती याच खोलीत, याच पंख्याखाली झोपली असेल... आज त्याच पंख्याने तिला तिच्या शेवटच्या एकमात्र यशस्वी मिशन साठी मदत केली होती... त्याच पंख्याकडे बघत मी  तिला आठवत बसले होते...  तिच्या आईचे  डोळे रडून रडून कोरडे झाले होते. त्या घरात स्मशान शांतता होती... एक अध्याय संपला होता.

Tuesday 26 July 2011

एक स्पर्श, आठवणीतला...

स्पर्शांनाही अर्थ असतो हे कळल्यावर
माझं बालपण मला सोडून गेलं,
जाताना नव्या स्वप्नांशी
नातं माझं जोडून गेलं
अशी चंद्रशेखर गोखलेंची एक चारोळी आहे. खूप नकळत्या वयात वाचली होती खरं तर. पण सम हाऊ, अगदी काल-परवा एका प्रसंगाने तिची आठवण जागी करून दिली. एक स्पर्श दहा शब्दांपेक्षाही जास्त बोलका असतो, जेव्हा तो तितकाच उत्कटपणे आपल्या पर्यंत पोचतो.. आता बराच काळ गेला  तरी त्या स्पर्शाची आठवण अजूनही तेवढीच ताजी आहे.
एका दुपारी काश्मीरहून येणाऱ्या माझ्या चिमुकल्या मैत्रिणींना भेटायला  स्टेशन वर पोचले.  त्यातल्या काही जणींना मी तब्बल एक वर्षानंतर भेटणार होते. शिवाय यावर्षी मला भेटायला काही नवीन चिमण्याही असणार आहेत हे माहिती असल्यामुळे मी कमालीची खुशीत होते. त्यांच्यासाठी  काही गमती-जमती घेऊन मी पोचले. झेलम एक्स्प्रेस वेळेत आली. आणि स्टेशन वर एकच किलबिलाट झाला. ट्रेन थांबली आणि मुलीनी फलाटावर उतरल्या उतरल्या अक्षरशः  गिलका केला... वर्षभर मला भेटायला आसुसलेलं माझं एक पिल्लू ''दीदी...'' म्हणून माझ्या गळ्यात पडलं. गेल्या वर्षी भेट झालेल्या सगळ्याच मुलींशी गळामिठी झाली. सुरुवातीचा हाय- हेलो चा संवाद झाला आणि मी नवीन मुलींकडे वळले. हजारो मैलांचा प्रवास करून दमून-भागून आलेल्या त्या मुलींशी संभाषण कसं सुरु करावं या विचारातच  मी लहान मुलींच्या घोळक्यात जाऊन पोचले. अनोळखी शहर, अनोळखी चेहरे आणि प्रवासाचा शीण यामुळे सगळ्याच थोडयाशा भेदरून एका बाजूला उभ्या होत्या.  '' हाय बेटा, आपका सफर कैसा रहा?'' फुला-फुलांचा सलवार कमीज आणि पिस्ता कलरचा दुपट्टा  चेहऱ्याभोवती गुंडाळलेल्या एका छोट्याशा मुलीला मी विचारलं.  आणि अगदीच  अनपेक्षितपणे त्या मुलीने उत्तरादाखल म्हणून माझ्या भोवती हात टाकले, ती मला बिलगली... क्षणभर मला फक्त तिचा स्पर्श जाणवला. काही सुचलंच नाही. मग  वाटलं आपण हिची हरवलेली बाहुली तर नसू? जिला शोधायला हि एवढ्या लांब आली? मी तिची हरवलेली बाहुली होते कि नाही माहिती नाही, पण त्या दिवशी तिच्या रुपात मला मात्र एक गोड परी मिळाली.  त्या क्षणापर्यंत अनोळखी असलेल्या त्या परीच्या स्पर्शात  असलेला विश्वास आणि उब आज इतक्या दिवसांनीही मला विसरता येत नाही. नुसती आठवणही अंगावर शहारा आणते.  काल-परवा पर्यंत जरा कुठे खुट्ट झालं कि जाऊन माझ्या मा- पपांच्या गळ्यात पडणार्या मला त्या मिठीने अचानक मोठं आणि जबाबदार  झाल्याची जाणीव करून दिली.  मा- पापांसाठी  जरी अजून मी त्यांची २२ / २३ वर्षांची  'लहान' मुलगी असले तरी ह्या आठ वर्षांच्या गोड आणि अजाण मुलीसाठी त्या क्षणी मी जगातली सर्वात भक्कम आधार होते. आणि तिचा तो विश्वास हि माझ्यासाठी जगातली सर्वात मोठी पावती... त्या क्षणाने मला एक न विसरण्या सारखा आनंद दिला...  मोठं झाल्याचा आनंद! ''तुला काय कळतंय? तू गप्प बस...'' असं सांगणारी खूप मोठी लोकं आहेत माझ्या जगात. पण आता मात्र एक छोटीशी परी आहे!! तिच्या मते, तिच्या दीदीला सगळं कळतं... दीदी म्हणेल ती पूर्व दिशा... दीदी सांगेल ते कधीच चुकीचं असणार नाही याची खात्री... इतकंच नाही तर, ''दीदी, मुझे आप जैसे बनना हैं...'' असंही येता-जाता  मला सांगणं... तिच्या या भरवशा मुळे आता मला माझ्या जबाबदार्या वाढल्याची जाणीव झालीये.  एखादी गोष्ट करताना आपलं अनुकरण कुणीतरी करतंय  हे माहिती असलं कि आपोआप आपण जास्त सजग पणे वागतो ना, तसं झालंय माझं... त्यानंतर च्या प्रत्येक भेटीत तिचं हे असं येऊन माझ्या गळ्यात पडणं हा शिरस्ताच होऊन गेला. जणू तिच्या इतर छोट्या मैत्रिणींचा माझ्यावर काही हक्कच नसावा. इथे मला लळा लाऊन  ती काश्मीर ला परत गेली. पण फोनवर बोलतानाही तिचं हे पझेसिव होणं मी अनुभवलंय... तिच्या शिवाय इतर कुणाशी मी आधी बोलत बसले तर बाईसाहेब फुरंगटून बसल्याच म्हणून समजायचं. आणि मग तिला समजावताना माझ्या नाकी नऊ हि ठरलेलेच... पण तरी तिच्याशी नातं जडलंय तेव्हा पासून दिवसेंदिवस मी शिकत आणि मोठी होत चाललेय एवढं खरं...

Tuesday 19 July 2011

मुश्कील नहीं है ये सफर..

गेले तीन महिने काश्मीर पुन्हा पेटलंय. दगडफेक, संचारबंदी आणि सततचा खूनखराबा यामुळे या नंदनवनात राहणाऱ्या सामान्यांचे हाल होताहेत. सततच्या अस्थिरतेला लोक कंटाळलेत. तरीही ते हतबल आहेत, कारण अशा परिस्थितीत स्वत:ला घरात कोंडून घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. वर्षांनुर्वष भिजत घोंगडय़ासारख्या राहिलेल्या काश्मीर प्रश्नावर अजूनही निर्णय होत नाहीए. अत्यंत पिचलेल्या आणि गांजलेल्या परिस्थितीत काश्मिरी लोक मागच्या पानावरून पुढे आयुष्य रेटत आहेत. जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या भारताच्या काश्मीरमध्ये मात्र ‘भय इथले संपत नाही..’ असा प्रकार आजही आहे.
संजय नहार यांचा काश्मीरवरील लेख (‘लोकसत्ता’- रविवार, ८ ऑगस्ट) वाचला. काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही मोजके प्रामाणिक प्रयत्न होत आहेत त्यामध्ये संजय नहार आणि त्यांच्या ‘सरहद्द’ संघटनेचा वाटा मोठा आहे. काश्मिरी मुलांना पुण्यात निवारा देऊन त्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने झटणाऱ्या संजय नहार यांचा काश्मिरी तरुणांना मोठा आधार वाटतो. असे आधारस्तंभ पावलोपावली उभे राहिले तर काश्मीरमधली परिस्थिती लवकरच पालटेल अशी आशा वाटते. काश्मीरमधील जनतेच्या मनात भारताविषयी आश्वासक चित्र उभं करण्यात भारतीय जनतेने- विशेषत: महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, हा पर्याय खरंच स्वागतार्ह आहे. कारण प्रेम व विश्वास पेरला तर प्रेम आणि विश्वास उगवतोच, याचा अनुभव मी सध्या घेत आहे. पुण्यातील ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था सीमारेषांचे सगळे बंध झुगारून गेली आठ र्वष काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी काम करते आहे. मी या संस्थेशी जोडली गेल्याला आता दोन र्वष होऊन गेलीत. या अनाथ मुलींशी जुळलेले प्रेमाचे आणि मैत्रीचे बंध दिवसेंदिवस दृढ होत आहेत.
‘दिव्याने दिवा लागतो’ असं म्हणतात. संजय नहार यांनी मराठी युवकांना काश्मीर प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. पुण्यातून इथल्या तरुणांना त्यांनी काश्मीरला नेलं. तिथलं आयुष्य डोळसपणे पाहायला शिकवलं. अशाच एका दौऱ्यात पुण्याचा अधिक कदम हा तरुण काश्मीरला गेला आणि तिथलं भीषण वास्तव पाहून तो स्वतंत्रपणे काश्मीरला जातच राहिला. तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली- काश्मीरमधील एकटय़ा कुपवाडा जिल्ह्यात २४,००० पेक्षा जास्त अनाथ मुलं होती. त्यापैकी मुलींची परिस्थिती अत्यंत वाईट होती. ज्या कुपवाडा जिल्ह्यात अक्षरश: राजरोसपणे दहशतवादी कारवाया चालतात, तिथे या दहशतवादापायी हजारो लहान मुली बेघर झालेल्या आहेत. अडनिडय़ा वयात त्यांना दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागले. माणुसकीचा विसर पडलेल्यांनी या मुलींचा पुरेपूर वापर केला. या आघातांमुळे हादरलेल्या या मुलींनी काश्मीरच्या रस्त्यांवर दिशाहीन भटकायला सुरुवात केली. त्यांचे भावनाशून्य डोळे पाहून तो उद्विग्न झाला आणि त्या कमालीच्या उद्विग्नतेतूनच बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या ‘बसेरा-ए-तबस्सुम’ या कल्पनेचा जन्म झाला. ‘बसेरा-ए-तबस्सुम’चा अर्थ ‘खुशीयोंका घर’! आज काश्मीरमधील कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाममध्ये, तसेच जम्मूमध्ये अशी चार ‘खुशियोंका घर’ आहेत. पैकी काश्मीरमधील घरं मुस्लिम मुलींसाठी आणि जम्मूमधील घर काश्मिरी पंडित- अर्थात हिंदू मुलींसाठी आहे! महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम आणि हिंदू यांच्यासाठी एकत्रपणे काम करणारी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन ही एकमेव संस्था आहे.
‘खुशियोंका घर’मध्ये २० महिने ते २० र्वष वयापर्यंतच्या १३३ मुली राहतात. एवढं मोठ्ठं कुटुंब आहे अधिक कदमचं! गौरव कौल, बिपीन ताकवले, अजय हेगडे, प्रिया घोरपडे, सलिमा, रजनी, आकांक्षा अशी तरुण ‘टीम’ अधिकसोबत आहे. आणि या यंग ब्रिगेडला वेळोवेळी अनुभवाचा हात देणारे मोहन अवधी, सुधा गोखलेंसारखी ज्येष्ठ मंडळीही आहेत. शिवाय या प्रवासात भारतीदीदी, तन्वीरभय्यांसारखे लोकही संस्थेत सामील आहेत. काही वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे ते आज या प्रवासात नाहीत, तरी त्यांच्या कामाचं योगदान आणि शुभेच्छांचं पाठबळ आहेच सोबत.
या १३३ अनाथ मुलींसाठी ‘खुशीयोंका घर’ हे आज सर्वस्व झाले आहे. रूढार्थाने जरी ते अनाथाश्रम असले तरी त्यांना अनाथाश्रम म्हणणं मुलींनाच मान्य नाही. यापैकी ३० मुली गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी सहलीसाठी पुण्यात आल्या होत्या तेव्हा माझं त्यांच्याशी घट्टमुट्ट गुळपीठ जमलं. मी त्यांची ‘दीदी’ झाले. दोन-तीन तासांतच त्या इतक्या मोकळेपणी बोलायला लागल्या, की माझी आणि त्यांची कित्येक वर्षांची जुनी ओळख असल्यासारखं मला वाटलं.
या मुलींचं काश्मीरमधलं आयुष्य आपण पुण्या-मुंबईतले लोक कल्पनाही करू शकणार नाही इतकं बिकट आहे.  'A For AK-47'  आणि 'B For Blast'  हेच लहानपणापासून मनावर ठसलेलं. कुणाचे वडील त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडलेत, तर कुणाच्या वडिलांनी परिस्थितीला कंटाळून स्वत:च AK-47 हातात घेतलीय. कुणाचं कुटुंब दहशतवादी आणि लष्कराच्या क्रॉस फायरिंगला बळी पडलंय. प्रत्येकीची कथा आणि व्यथा वेगळी! आणि अशा सगळ्या मुली ‘खुशियोंका घर’मध्ये गुण्यागोविंदाने नांदताहेत. त्या पुण्यात आल्या तेव्हा मी त्यांना जवळून अनुभवू शकले. इथे त्यांच्यासाठी आखलेल्या सगळ्या कार्यक्रमांत त्यांनी हौसेने भाग घेतला. वेळोवेळी त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांचं चौकसपण दिसत होतं. इतकी र्वष काश्मीरमध्ये राहिल्यामुळे आणि अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रसंगांतून तावूनसुलाखून निघाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, पण या मुली अकाली प्रौढ झाल्यासारख्या भासतात. त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करतानाही त्यांची परिपक्वता थक्क करणारी आहे. ही परिपक्व समज जर मोठय़ा माणसांकडे असती, तर असं आयुष्य या मुलांच्या वाटय़ाला आलं नसतं, ही टोचणी आपल्याला लागून राहते.
त्यांना भेटल्यावर आणि त्यांच्या सहवासात आठ दिवस काढल्यावर एक गोष्ट अगदी प्रकर्षांने जाणवली- शिस्त! लहान मुलींची जेवणं झाल्यावर मोठय़ांनी जेवायचं, ही ‘घर’ची शिस्त इथेही पाळली जात होती. जेवायची वेळ झाल्यावर आधी लहान मुलींना खायला घालून मग मोठय़ा मुली आपली पानं वाढून घेत. ‘घरी’सुद्धा कामाच्या समान वाटण्या आहेत. त्यामुळे कुणा एकीवर कामाचा ताण पडत नाही. म्हणूनच प्रत्येकीला स्वत:च्या जबाबदाऱ्यांचं पुरेपूर भान आहे. आजकाल इन-मिन-तीन माणसांच्या घरातही न सापडणारी शिस्त या १३३ मुलींच्या कुटुंबानं मात्र पुरेपूर जपलीय.
पुण्याहून मुंबई, मुंबईहून कोकण, मग नाशिक, दिल्ली या ठिकाणी या मुली गेल्या. या संपूर्ण सहलीत आपला देश, त्याचा इतिहास, भूगोल आणि संस्कृती याबद्दलची माहिती त्यांनी मनापासून घेतली. प्रत्येक नवीन शिकलेल्या गोष्टीचं अप्रूप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यांचा पुण्याचा मुक्काम संपत आला तसा ‘दीदी, आप हमारे साथ चलो,’ असा लकडा त्यांनी लावला. पण माझं कॉलेज बुडवणं शक्य नसल्यामुळे त्यांचा हा हट्ट पुरवणं शक्य नव्हतं. मात्र, तरी रोजच्या रोज फोनवर मला माहिती मिळत होती. ‘खुशियोंका घर’मधल्या चार मुली उत्तम फोटोग्राफर आहेत. दिल्लीत एनसीईआरटीने घेतलेल्या स्पर्धेत पहिली चारही बक्षिसं आमच्या या मुलींना मिळाली, तेव्हा तर आनंदाची परमावधी झाली! त्यांच्या फोटोग्राफीचं दिल्लीत प्रदर्शन भरवलं होतं. त्याच्या उद्घाटनाला आणि मुलींना बक्षिसं द्यायला खुद्द किरण बेदी आल्या होत्या. त्यांनी या मुलींशी छान गप्पा मारल्या. त्यांचं भरपूर कौतुक केलं आणि प्रोत्साहनही दिलं. त्या आनंदात चिंब भिजून आणि आयुष्यभर जपता येईलसं संचित सोबत घेऊन मुली काश्मीर घाटीत परत गेल्या. मात्र, त्या परत गेल्या तरी मनानं मात्र दूर गेल्या नाहीत. माझं नियमितपणे त्यांच्याशी फोनवर बोलणं होत असतं. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी त्या मला सांगतात. आणि काही कारणानंफोन करणं राहून गेलं तर हक्काने रुसूनही बसतात. शिवाय प्रत्येक फोनमध्ये ‘दीदी, कश्मीर कब आओगे?’ हा प्रेमळ प्रश्न असतोच. वर- ‘कम से कम दो महिने की छुट्टी लेकर आओ दीदी. वहाँ अपने चार घर है, तो चारो घरों में रहने के लिए उतना वक्त तो आपके पास होना ही चाहीए..’ असा आग्रहही! इतकी र्वष मला माझ्या आई-बाबांचं एकच घर होतं, पण आता मात्र ‘अपने चार घर’ म्हणून त्यांनी मला आपल्या मोठय़ा कुटुंबात सामील करून घेतलंय. या घराचं वर्णन करताना मुली एक गाणं म्हणतात..
‘क्यूँ ना हो हमको ये प्यारा
इसके हम है, ये हमारा
भैय्या के मेहेर नजर है ये घर..’
भैय्या म्हणजे ‘अधिकभैय्या’! तो सगळ्यांचाच जीव की प्राण आहे! गेल्या दोन वर्षांत ‘खुशियोंका घर’ व ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ आणि या मुलींबद्दल भान हरपून बोलणारा अधिक मी अनेकदा पाहिलाय. त्याच्या आयुष्याची सगळी स्वप्नं आता या मुलींच्या भोवती गुंफलीयत. या सगळ्या चिमण्यांना त्याने तळहाताच्या फोडासारखं वाढवलंय. त्यांच्या वेण्या घालण्यापासून ते त्यांना खाऊपिऊ घालण्यापर्यंत सगळं अधिकने केलंय. त्यांच्या अडनिडय़ा वयात तो त्यांची ‘आई’ झाला. कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाम हे काश्मीरचे तिन्ही जिल्हे अगदी बॉर्डरजवळ. शिवाय तिथं औषधालाही हिंदू माणूस सापडणार नाही. उघडपणे दहशतवाद्यांना आसरा देणारे गावकरी. अशा परिस्थितीत केवळ आपल्यासाठी अधिकभैय्याने जिवाची बाजी लावून इथे राहायचा धोका पत्करलाय, हे मुलींना माहीत आहे. अतिरेक्यांनी त्याचा केलेला ‘पाहुणचार’ही त्यांना माहीत आहे. रोजच्या रोज त्याच्या विरोधात फतवे निघत होते. असंख्य वेळा लोक त्याला मारायला उठले होते. आणि तरीही आपला भैय्या आपल्याला सोडून गेला नाही, याची मुलींना जाणीव आहे. त्याचबरोबर गावकऱ्यांना जशी अधिकच्या निरलसपणाची कल्पना आलीय, तशीच सर्वानी त्याला कशी मदत केलीय, हेही मुलींनी पाहिलंय. आणि म्हणूनच अधिकभैय्या हा त्यांच्यासाठी ‘फरिश्ता’ आहे!
गेले दोन महिने काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. संचारबंदी, हरताळ, बंद यामुळे शाळा-कॉलेज, ऑफिसेस बंद पडलीयेत. मुलांचं प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होतंय. शिवाय सुरक्षेचा प्रश्न आहेच. आजही काश्मीर घाटीत असंख्य निराधार मुली आहेत. त्यांच्या तुलनेत ‘खुशियोंका घर’मधल्या आमच्या मुलींची परिस्थिती निश्चितच जास्त सुरक्षित आहे. ‘भारत बंद’च्या दिवशी पुण्यात फक्त एक दिवस मला घरी बसून काढावा लागला तेव्हा संध्याकाळी मी किती सैरभैर झाले होते, ते मला आठवलं. मग ही लहान मुलं काय करत असतील? घरात कोंडून घेतलंय सगळ्यांनी- हे फोन केला तेव्हा समजलं. भीती आणि नैराश्याचं सावट सगळीकडे भरून राहिलंय. ‘दीदी, सिर्फ स्कूलही है, जो हमारी जिंदगी में entertainment है.. वो भी बंद रहे, तो हम क्या करे?’ या त्यांच्या प्रश्नावर माझ्याकडे खरंच उत्तर नव्हतं. तरीही काही बोलायचं म्हणून मी केविलवाणा उपाय सुचवला- ‘कोई बात नहीं अगर स्कूल बंद है तो.. आप लोग घरपे बैठके पढाई करो.. खेलो!’ यावर असहायपणे उत्तर आलं- ‘दीदी, हर रोज आजूबाजू में कोई मरता है, सुबह-शाम पुलिस किसी ना किसी को उठाके लेके जाती है. जी नहीं लगता दीदी..’ हे अनुभवाचे बोल! माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एवढय़ा- एवढय़ाशा मनांवर हे एवढे मोठे आघात झालेत! हे सारं आपल्या विचारांच्या कक्षेपलीकडचं आहे, याची जाणीव झाली. रोज निदान दोन मिनिटं तरी मी त्यांना फोन करायचा, असं शेवटी आमच्यात ठरलं. त्यांच्या होरपळलेल्या आयुष्यात माझ्या फोनने जर त्यांना थोडा गारवा मिळणार असेल तर माझीही हरकत नव्हती. इथल्या वर्तमानपत्रांत किंवा अगदी वृत्तवाहिन्यांवरही आपल्याला फक्त श्रीनगरच्या बातम्या बघायला मिळतात. पण अतिसंवेदनशील असलेल्या कुपवाडा, अनंतनागबद्दल आपण साफ अनभिज्ञ असतो. माझ्या काश्मिरी मैत्रिणींकडून मला तिथल्या परिस्थितीचा ‘ऑंखों देखा हाल’ समजत असतो. सरतेशेवटी आपल्या मुली-मैत्रिणी सुरक्षित आहेत म्हणून ‘खुदा का लाख लाख शुकर’ म्हणून गप्प बसायचं, की काश्मीरचा दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत जाणारा प्रश्न ‘रामभरोसे’ सोडून मोकळं व्हायचं, हा प्रश्न आहेच.
राजकीय हेवेदावे आणि मत्सर यांच्या कचाटय़ात सर्वसामान्य जनता आणि लहान मुलं यांची नेहमीच वाताहत होते, हे आपण वर्षांनुर्वष पाहतो आहोत. काश्मीर तरी याला अपवाद कसा असेल? संजय नहार आणि त्यांची ‘सरहद्द’ मिळून काश्मिरी युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिवाचं रान करताहेत आणि दुसऱ्या बाजूला ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून अधिकने काश्मिरी मुलींना शिक्षण आणि संस्कार देण्याचं असिधाराव्रत घेतलंय. या मुलींना पुण्यात आणून त्यांना इथे शिकवणं, हे आमच्यासाठी तुलनेनं सोपं आणि कमी जोखमीचं आहे. पण आम्हाला त्यांची काश्मीरशी असलेली नाळ तोडायची नाहीये. कारण त्यांची खरी गरज काश्मीरमध्ये आहे. एक मुलगी शिकली की कुटुंब शिकतं आणि गावाला शिकवतं, असं म्हणतात. आज आम्ही फक्त १३३ मुलींना शिकवतोय आणि सांभाळतोय. पण बुलंद आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर आम्ही ही संख्या नक्की मोठी करू, असा विश्वास वाटतो. आमच्या मुली हे गाणं नेहमी म्हणतात-
‘मुश्कील नहीं है ये सफर,
तेरा साथ मिल जाए अगर..
मैं मोहब्बत की मंजिल को पा लूँ,
प्यार से देख ले तू मुझे इक नजर..’
हाच आशावाद मला काश्मीरबद्दल वाटतो. आपण प्रेमाचा हात पुढे केला तर खरंच- मुश्कील नहीं है ये सफर..
(प्रथम प्रकाशित- लोकसत्ता चतुरंग, १८ सप्टेंबर २०१०.)

Saturday 16 July 2011

जावे त्यांच्या वंशा...

आता जवळ जवळ ५ वर्ष होऊन गेली  मी पुण्यात राहतीये... मा- पापा आणि घरा- दारापासून लांब. एकटी. त्यामुळे मोबाईल नावाच्या गोष्टीचं मला असलेलं व्यसन मी कधीही नाकारलं नाही... उलट मला असलेल्या माझ्या माणसांच्या व्यसनामुळेच  मला हे फोनचं व्यसन ओघाने आलंय असं म्हणायला हरकत नाही. वेळ मिळेल तेव्हा मा- पापांशी, किंवा मामा किंवा मित्र- मैत्रिणींच्या गोतावळ्याशी  फोन करून बोलत बसलेल्या मला पाहिलं की '' हां, आता पंधरा मिनिटांची निश्चिंती! '' हे सुज्ञास सांगणे न लगे... शिवाय मला सगळ्यांनी अगदी आठवणीने, नं विसरता फोन करायलाच हवा असं मला वाटतं. (अजूनही !!) जणू हे वाटणं म्हणजे माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि माझ्या माणसांना जर मला फोन करावासा वाटत नसेल तर त्यांना माझी गरज, किंमत आणि आठवण यातलं काहीही नाहीये... हे असं सगळं मला 'वाटतं...'
आता माझी नोकरी सुरु होऊन सहा महिने झाले आणि लोक नोकर्या करायला लागले की कसे बिझी होतात त्याचा अनुभव मलाही यायला लागला... म्हणजे ज्या चार- पाच लोकांशी दिवसातून निदान दोन- तीन वेळा बोलल्याशिवाय आधी माझं पान हलत नव्हतं, त्या सगळ्यांशी एकतर सकाळी ऑफिसला येण्याआधी किंवा रात्री घरी गेल्यावर बोलावं लागतं... अधे- मध्ये संधी मिळाली तरी, ''काय चाललंय? ठीक ना?'' या चार शब्दांपलीकडे जाता येत नाहीच. आपल्याला वेळ असेल तर पलीकडच्या व्यक्तीला नसणार आणि त्या कुणाला असेल तर आपल्याला नसणार हे अलिखित... त्यामुळे पाठशिवणीचा खेळ चालूच... चक्क एखाद दिवशी दोघानाही वेळ असेल तर योगायोगच! आणि तो नसेल तर मात्र नेहमी गोड, प्रेमाने बोलणारं आपलंच माणूस आपल्याशी काय बोलेल सांगता येत नाही!  म्हणजे एरवी अगदी फोन डिस्चार्ज होईपर्यंत बोलणारी मा '' हं, काय गं, पटकन बोल...'' म्हणाली की ओळखावं, हिला मान वर करायलाही सवड नाहीये... किंवा काय जेवलीस, कुठे गेली होतीस, कुणाला भेटलीस हे सगळं ऐकायला उत्सुक असलेले पापा '' बर बर, मजेत आहेस ना म्हणजे?'' असं म्हणून संभाषण आटपायला लागले की आपणच, '' चला मग, बोलते नंतर!'' म्हणावं हे उत्तम... प्रसंगी आपली 'अनावश्यक बडबड' सुद्धा कमालीच्या शांतपणे ऐकून घेणारा आपला एखादा मित्र जेव्हा ''एवढं काय बोलायचं असतं गं तुला सारखं?'' असं विचारतो तेव्हा आपण प्रचंड काम समोर वाढून ठेवलेलं असताना याला फोन केलाय हे वेळीच ओळखून शांतपणे फोन ठेवून द्यावा नाहीतर कानावर पडेल ते गपचूप ऐकून घ्यायची तयारी ठेवावी! हे आणि असे काही धडे शिकल्यामुळे शक्यतो मी कामात बुडालेली असताना मला कुणी फोन केला तर अतिशय प्रेमाने '' मी नंतर फोन करू प्लीज...?'' असं म्हणायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि आपण उडवून लावले जातो तेव्हा कसा वाटतं याचा अनुभव असल्यामुळे माझा हा प्रयत्न ९९ % यशस्वीही होतो... पण हातातल्या गोष्टी संपवून तो फोन करायला किती वेळ जाईल हे मात्र नक्की सांगता येत नाहीच... त्यामुळे आता ''तेव्हा'' आपल्याला कुणी फोन करत नसायचं तेव्हा त्यांच्या समोर काय ''पेटलं'' असेल याची थोडी थोडी जाणीव व्हायला लागली आहे... त्यामुळे '' आता कळतंय ना? गरज, किंमत, आठवण असली तरी कसं शक्य होत नाही ते? '' असं म्हणून कुणी टोलवल तर तो टोलाही हसत हसत झेलावा लागतो... लहानपणी आजी जेव्हा ''जरा आईला फोन लाऊन मला दे गं, बोलायचंय  मला...'' असा हुकुम द्यायची आणि आई '' अगं आईला सांग मी नंतर करते फोन, आत्ता इथे मला श्वास घ्यायलाही वेळ नाहीये...'' असं सांगायची तेव्हा आजीची लगेच प्रतिक्रीया - ''ऑफिसमध्ये कसले एवढे दिवे लावतात कोण जाणे!'' आता कळतंय, दिवे वगैरे कुणी काही लावत नसलं तरी श्वास घ्यायला वेळ नसतो हे खरं! शिवाय रुटीन... त्याला तर काही अर्थच नाही राहिलेला. म्हणजे एके काळी कधी एकदा लेक्चर्स संपतात आणि आम्ही उनाडक्या करायला मोकळे होतो याची वाट बघायचे दिवस आता गेले ते कायमचे! त्यामुळे आता भेटायचं असेल तर अगं येत्या शनिवारी मला लवकर निघता येईल, तू पण बघ ना जमलं तर, निदान कॉफी प्यायला तरी भेटू! असं दोन- तीन आठवडे म्हणू तेवा चौथ्या आठवड्यात भेटू हेच खरं... किंवा तेव्हा घरची आठवण आली की लेक्चर्स गेली खड्ड्यात असं म्हणून चार कपडे भरून वाटेला लागायचे दिवसही निसटले ते निसटलेच... दिवसभर ऑफिस मध्ये राबून रात्री परतलेली माझी रुममेट अक्षरशः मेल्यासारखी झोपायची, आणि हिला माझ्याशी चार शब्द बोलायलाही वेळ नाही म्हणून माझ्या नाकावर राग यायचा, मग त्याची भरपाई म्हणून आम्ही शनिवार-रविवार गप्पांचा पाऊस पाडायचो हा भाग वेगळा! पण तरी माझी बडबड ऐकता ऐकता ती झोपून गेली की ''मी बोलत असताना झोप लागूच कशी काय शकते? '' (थोडक्यात हिम्मत कशी होते झोपायची) या विचाराने माझा पापड मोडलेला! पण आता दिवसभर ऑफिस संपवून घरी आल्यावर मा- पापांशी फोन वरची बोलणी उरकून कधी एकदा झोपून जाते असं होतं. सो, नो लेट नाईट कॉल्स, एसेमेस... ज्यांनी कोणत्याही वेळी फोन केला तरी माझी हरकत नसते अशा जवळच्या मोजक्या मित्र-मैत्रिणींचे मिस्ड कॉल, एसेमेस सकाळी पहिले की अनेकदा मलाही वाईट वाटतं... अरे, कशासाठी केला असेल फोन? तितकंच तातडीचं तर काही नसेल? मग मी फोन करते, ''काय रे, सगळं ठीक आहे ना? मी आत्ता पहिले मिस्ड कॉल्स... '' आणि मला पलीकडून उत्तर मिळतं, ''अगं, म्हणजे काही ठीक नसेल तरच फोन करायचा का तुला? सहज, आठवण आली, बोलावसं वाटलं म्हणूनही  आपण अनेकदा एकमेकांना फोन केलेत याआधी... हल्लीच तुला वेळ नसतो म्हणून, किंवा तू दमतेस म्हणून... पण फोन निदान सायलेंट वर तरी नको ठेवू, म्हणजे फोन केला तर उचलून, झोपलीये, सकाळी बोलू एवढं तरी सांगत जा ना... ''  हे असं सगळं  ऐकलं, आठवलं  की  पुन्हा एकदा माझी तेव्हा आणि आता अशी ओढाताण सुरु होते. जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे...  दिवस बदलतात हेच खरं...

Thursday 14 July 2011

संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले...

काल पुन्हा एकदा मुंबईत  बॉम्ब स्फोट झाला.  नेहमी प्रमाणे बातम्या वाचून आणि बघून आज डोकं आणि मन सुन्न झालं... वाईट वाटलं... हं, फक्त वाईट वाटलं इतकंच... कारण कितीही वाईट वाटलं तरी मूग गिळून गप्प बसण्याशिवाय आपण काय करणार आहोत? बॉम्ब स्फोटाचे धक्के याआधी काय कमी वेळा पचवलेत मुंबईने? किंवा तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी? १२ मार्च १९९३ पासून हे चालू आहेच... आज कुठे मुंबईत... उद्या कुठे हैदराबादेत... परवा काय तर बेंगलोर... जयपूर... दिल्ली... अहमदाबाद... स्फोट होतात. आपण हादरतो. गांगरून जातो. पावलं अडखळतात. पण नाईलाजाने परत उठून चालायला लागतो... कारण पर्याय नसतो... हे असंच चाललंय गेली कैक वर्ष... मंत्री येतात. घटना स्थळाची पाहणी करतात. जखमींची, मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस करतात... पत्रकार परिषद घेतात. ''आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो. या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जाईल. हल्लेखोरांना ताब्यात घेऊन कारवाई करू... यापेक्षा अधिक आत्ताच सांगणं शक्य नाही...'' अशी ठरीव साच्यातली statement करतात. आणि आल्या वाटेने परत जातात. माध्यमांना खुराक  दिला आणि जखमी, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली की बहुदा त्यांची कर्तव्य संपत असावीत.
आता आपणही कोडगे झालोय, नाही? काही फरकच नाही पडत आपल्याला. मुंबईत झाला ना स्फोट? मी पुण्यात आहे ना? मग झालं तर...  माझे जे कोणी चार लोक आहेत मुंबईत, त्यांना Hope you all are fine असा एक एसेमेस केला आणि त्यावर त्यांचा Yes , Thanks ! असा रिप्लाय आला की आपण पुन्हा आपल्या उद्योगांना लागतो... कारण बाकीचे गेलेले किंवा दुखावलेले आपले कुणी नसतात ना... मुंबई पुणेच कशाला? स्फोट दादर ला झाला, मी बोरिवलीत राहते... मग मला कशाला फरक पडला पाहिजे? मग तसं तर कुणीच आपलं नसतं. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मागे टाकून आई गेली तरी ते बाळ होतंच की लहानाचं मोठं...
अजून एक नेहमीचा अनुभव... काल स्फोट होऊन गेला, त्याक्षणी तातडीच्या असलेल्या बातम्या संपल्या की दुसर्या दिवशी सलामीचा ससेमिरा मागे लागतो. मुंबईकरांच्या धैर्याला सलाम. हिमतीला सलाम. etc etc ... अरे कसला डोंबलाचा सलाम करताय? धैर्य? कसलं आणि कुठलं धैर्य? बरं धैर्य तरी कितीदा आणतील एकवटून? दर सहा महिन्यांनी आणि वर्षभराने कुठून आणतील धैर्य? त्यांच्या असहाय्य अगतिक पणाला धैर्य असं गोंडस नाव दिलं की झालं. पण दुसर्या दिवशी घरातून बाहेर पडताना पोटात भीती असतेच... काल तो अमका गेला, परवा तो तमका गेला... आज कदाचित मी??? छे छे... कल्पना नाही करवत... पण रिकामपणी हेच येतं डोक्यात... म्हणून मग नाईलाज म्हणून हे विचारांचं काहूर बाजूला सारून निघायचं आपापल्या उद्योगाला हेच बरं... काय माहित अजून किती वेळा हे असं घडणार? किती जीव मरणार? आणि आपल्यासारखे किती नं मरताही कणा-कणाने मरणारच?
anyways ... तसं मी स्वताला सावरलंय, पण तरी हे सगळं थांबावं असं मनापासून वाटतं खरं...