Saturday, 1 October 2011

मोबाईल सॅव्ही किड्स

सकाळी जाग आली की बहुतांशी माझा हात उशाशी असलेल्या माझ्या  मोबाईलकडे जातो. जगाच्या पाठीवर माझ्या आधी उठून कामाला लागलेल्या प्रियजनांपैकी कुणाचा तरी एखादा ‘गुड मॉर्निग’ मेसेज आलेला असतो. अशाच एखाद्या मेसेजला रिप्लाय करण्यानं माझा दिवस सुरू होतो. खरं तर सकाळी उठल्यापासून सगळेच आपापल्या व्यापात.. पण ‘गुड मॉर्निग’ या दोन साध्या शब्दांनी का होईना, कुणीतरी आपल्याला ‘नोटीस’ केलंय हे फिलिंग खरंच छान असतं. कदाचित त्या छान फिलिंगमधूनच आपला आजचा दिवससुद्धा छान जाणार अशी खात्री वाटते.
छोटय़ा-छोटय़ा गोष्टी असतात. एखादी लाडकी मैत्रिण जीवघेण्या आजारातून उठलेली असते. रोज तिच्याशी एक तरी फोन व्हावा असं वाटत असतं. पण प्रत्यक्षात मात्र राहून जातं. अशावेळी मग तिचाच मेसेज येतो, जाब विचारायला.. आणि मग छान संवाद रंगतो. आम्हा दोघींना जोडायला तेवढाही पुरेसा, असा तो संवाद! परीक्षेच्या मोसमात आपण सगळेच आपली संपर्क यंत्रणा तात्पुरती  थांबवून स्वत:ला अभ्यासाला जुंपून घेतो. सात-आठ तासांच्या 'break‘' नंतर सहज मोबाईल पाहिला तर कुणीतरी मेसेज केलेला असतोच- 'work hard, study well, but Take care!' मी लांबच्या प्रवासात असेन आणि वाटेत २/३ तास नेटवर्क नसेल तर मी अस्वस्थ होते. पण मग नेटवर्क आल्यावर तिकडनं कुणाचा तरी मेसेज मिळतो- ‘कुठे पोचलीस? लवकर ये, वाट बघतोय..’ हा असा मेसेज मला मनापासून सुखावतो.

कॉलेजमधला जुना ग्रुप अख्खाच्या अख्खा भेटणं आजकाल दुरापास्तच झालंय. पण क्वचित कधी तरी योग येतो. सगळे मिळून भेटणं, गप्पा- दंगा-मस्ती आणि मग अलविदा.. घरी पोहोचण्याच्या आधीच कुणीतरी मेसेज केलेला असतो 'Had a great time...' अनेकदा तासनतास गप्पा मारूनही सांगता येत नाही इतकं काही हा एक छोटासा मेसेज बोलून जातो!! म्हणूनच मोबाईल मला जीवापाड प्रिय आहे.
नुकतेच फेसबुकवर काही फोटोज अपलोड केले. त्यापैकी एका फोटोमध्ये मी तल्लीन होऊन मोबाईलवर काही ‘चाळे’ करत होते. आणि कुणीतरी ते नेमकं ‘क्लिक’ केलं होतं.. ते फोटोज पाहून एका मित्राचा मेसेज आला- 'Hi, Mobile savvy Kid छान आलेत फोटो..!’ त्यातला ‘मोबाईल सॅव्ही किड’ हा उल्लेख खरं तर सुरुवातीला नाकाला मिरच्या झोंबल्यासारखा मला झोंबला होता. पण नंतर तोच मला खूप मागे घेऊन गेला...
कोकणात जिथे मी लहानाची मोठी झाले तिथे साधा लँडलाईन फोनसुद्धा एकेकाळी  इतकी दुर्लभ गोष्ट होती की घरी फोन आला तेव्हा काही तरी आश्चर्य पाहिल्यासारखी माझी परिस्थिती होती. त्या परिसरात तो एकुलता एक फोन असल्यामुळे आजूबाजूच्या चार लोकांसाठीसुद्धा आमच्याकडे फोन येई. फोनची रिंग वाजली की तो कुणी उचलायचा यावरून माझी आणि माझ्या भावाची वादावादी व्हायची. पुण्या-मुंबईत कुणाला फोन करायचा झाला तर एक तर ‘ट्रंककॉल’ बुक करायचा किंवा मग त्यापेक्षा सोयीस्कर म्हणून बाहेरच्या लांबच्या ‘एसटीडी बुथवर’ जाऊन फोन करायचे..! त्यामुळे तेव्हा जर कुणी म्हणालं असतं की तू कॉलेजला जाशील तेव्हा तुझ्याकडे तुझा एकटीचा स्वतंत्र फोन असेल तर विश्वास ठेवणं शक्यत नव्हतं.. आणि आता तर काय, माणशी दोन मोबाईल असणंसुद्धा 'used to' झालंय..
मोबाईलमुळे जग जवळ आलंय हे खरं.. मी शिक्षणासाठी घर सोडलं आणि मग मोबाईल असणं ‘अपरिहार्य’ म्हणून मोबाईल मिळाला. पण घरच्या लँडलाईनचा ‘फील’ मोबाईलला नाहीच! लँडलाईनवर फोन आला की, सगळं घर त्या फोनभोवती कोंडाळं करायचं.. मी-मी करत सगळ्यांना एकमेकांशी बोलायचं असायचं. आईची मैत्रीण, बाबांचा मित्र यांच्याशीही ‘ए मावशी’, ‘ए काका’ असं म्हणून गप्पा चालायच्या! ‘आज जेवायला काय केलंयस’, असं विचारायला म्हणूनसुद्धा आई-मावशीचे फोन व्हायचे आणि ते तासन्तास चालायचे! बरं, आत्ता लागलेला फोन कट झाला तर तो पुन्हा लागेलच याची शाश्वती नसे! त्यामुळे माझ्या बाबांच्या भाषेत एकदा फोन लागला की यांना ‘गावगप्पा’ मारायच्या असतात!

आजकाल या गावगप्पा खरंच हरवत चालल्या आहेत.. फक्त लँडलाईन हा एकमेव ऑप्शन असताना सगळ्या मित्र-मैत्रिणींचे फोन पण तिथेच यायचे. त्यामुळे कुणाचा फोन, काय बोलतायत हे सगळ्यांना माहिती असायचं.. त्यामुळे तो फोन म्हणजे अख्ख्या घराशी संवाद असायचा.
हे चित्र आता इतकं बदलत चाललंय की कुणाचाही फोन आला की आपण पटकन उठून गॅलरीत जाऊन बोलतो.. आणि मग दोन्हीकडे शेजारच्यांच्या भुवया उंचावतात.. खरं तर लँडलाईनवर जे बोलायचो तेच आपण मोबाईलवर बोलतो, पण तरी आपण काय बोलत असू ही शंका सगळ्यांच्या मनात येतेच!
मोबाईल ‘परवडणं’ हासुद्धा एक भाग असतो. मोबाईल अगदी नवीन असताना, ‘नाईट पॅक’, ‘फ्रेंड्स प्लॅन’, असलं काहीही हाताशी नसताना एका साध्या मिस्ड कॉलमधूनही जोडलं राहाणं व्हायचं! माझा एक जिवलग  मित्र दुपारी आई झोपली की तिच्या फोनवरून मला फोन करायचा आणि मग आमच्या गावगप्पा चालायच्या. अशावेळी आमच्या मोबाईल मॅनियावर समस्त घराने केलेल्या टीका हा एक नवीन आणि स्वतंत्र चर्चेचा विषय... पण माझी आई जेव्हा तिच्या मैत्रिणींशी, बहिणींशी तासन्तास बोलते तेव्हा मी फक्त तिच्याकडे बघून हसते, तिला समजायचं ते समजतं..

आजच्या धकाधकीत, प्रत्येकाच्या ‘बिझी’ टाईमटेबलमध्ये, आपल्याला कुणाशीच बोलायला आणि कुणालाच भेटायला वेळ नसतो.. डेडलाईन्स, प्रेझेंटेशन्स, सेमिनार आणि मीटिंग्सच्या भाऊगर्दीत नात्यांवरचा मुलामा कमी होऊ नये यासाठी असा एखादा तासनतास चालणारा फोन, एखाद्या वीकएंडला  झाला किंवा रोज कुणालातरी एखादा मेसेज करायला काही सेकंद दिले तर  त्यात मला काहीच गैर वाटत नाही.. जिव्हाळ्याचा आणि मायेचा तो मुलामा जपला जाणार असेल तर ‘मोबाईल सॅव्ही’ म्हणवून घ्यायला माझी काहीच हरकत नाहीये..!

(प्रथम प्रकाशित : लोकसत्ता)

No comments:

Post a Comment