Tuesday, 27 August 2013

मी मुलगी आहे, म्हणून...

रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी ऑफिसला परत येताना एक मस्त फ्रेशनेस असतो नेहमी. पण मागच्या संपूर्ण आठवड्यातल्या एकापेक्षा एक धक्कादायक घटनांचा परिणाम म्हणून की काय कुणास ठाऊक, यावेळी अजिबात ताजंतवानं वाटत नाहीये... आधी दिवसाढवळ्या पुण्यातल्या शनिवार पेठेत झालेला डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून आणि त्या बातमीवर विश्वास ठेवण्याइतपत आपण सावरतोय म्हणेपर्यंत मुंबईत एका फोटोजर्नलिस्ट मुलीवर झालेला गॅंगरेप... पत्रकारितेत काम करत असुन, रोजच्या वर्तमानपत्रात आणि बुलेटिनच्या हेडलाईन्स मध्ये खून आणि बलात्कारांच्या बातम्या वाचून आणि पाहून सुद्धा, खून आणि बलात्कार हे शब्द लिहिताना आज मात्र माझ्या हाताला सुटलेला कंप जात नाहीये... आणि बधीर झालेलं डोकं ताळ्यावर यायला तयार नाहीये.

काही महिन्यांपूर्वी दिल्लीत निर्भया वर असाच सामुहिक बलात्कार झाला. देश संतापला, आंदोलनं, कॅंडल मार्च, काळ्या फिती लावून मूक मोर्चे सगळं झालं... पण पाशवी निघृणपणाचं सत्र काही थांबलं नाही. आणि परवा तर जवळजवळ माझ्याच सारखं काम करणार्या मुलीवर बलात्कार झाला, मुंबईत... म्हणजे, तसे तर भारताच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अगदी रोजच होतायेत बलात्कार आणि खून... पण तरीही परवाच्या घटनेनंतर हादरायला झालंय हे नक्की. मी मुलगी असले म्हणून काय झालं, मी सेफ आहे आणि माझ्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही अशी खात्री वाटत होती मला, काल परवा पर्यंत... पण आता मात्र, ती खात्री किती पोकळ आहे असं वाटायला लागलंय... 


खरं सांगू, तर पुरुष आपल्या आसपासच्या मुलींशी असे वागू शकतात, यावर विश्वास ठेवणं जड जातंय मला. ती अॅड आठवते...?? आयसीआयसीआय ची, बंदे अच्छे है वाली...??? पहाता क्षणी त्या जाहिरातीच्या प्रेमात पडले होते मी. रात्रभर प्रवास करुन मी घरी जाणार असेन तर रात्रीत दोन तीनदा फोन करुन मी ठीक आहे याचीखात्री करुन घेणारे बाबा, मित्र-मैत्रिणींच्या कट्ट्यावर रंगलेल्या गप्पा आवरुन घरी निघायला साडेनऊचे पावणेदहा झाले तर गाडी जपून चालवा, पोचल्यावर एसेमेस टाका असं आम्हा मुलींना बजावून सांगणारे किंवा अगदी वाट वाकडी करुन आम्हाला आपापल्या बाईक्स वर फॉलो करणारे मित्र... अर्थात आमची काळजी हेच या गोष्टींचं कारण. आताही रिपोर्टिंगच्या निमित्तानं आम्ही फिरतो. अजून तरी भिती वाटतीये असं कधी झालं नाही... पण एखाद्या गर्दी किंवा जमावाच्या ठिकाणी जाताना अलर्ट रहा, जपून जा अशा खबरदारीच्या सूचना देणारे सहकारी... हे सगळे अच्छे बंदे आठवले मला तेव्हा आणि आताही... असे सगळे जेंटलमेन आजूबाजूला असताना पुरुष वाईट असतात असा ग्रह करुन घ्यावा असं वाटलंच नाही कधी.  

पण मग या नाण्याची दुसरी बाजू दिसायला लागली. किंवा खरं तर अनेकदा दिसलेली ती बाजू कधी नव्हे ती ठळकपणे जाणवायला लागली... मी मुलगी आहे म्हणून माझी काळजी करणारे बंदे आहेत तसे मी मुलगी आहे म्हणूनच माझ्यावर नजरा रोखणारे ही आहेत... मी नीटनेटके, डिसेंट आणि छान कपडे घातले काय आणि मळखाऊ जीन्स आणि तसलाच मळखाऊ टीशर्ट घातला काय... केसांचा छानसा लेयर कट असो नाहीतर बेफिकिर टॉमबॉईश मशरुम कट... रस्त्यावरुन चालताना एकाच वेळी असंख्य त्रासिक नजरा माझ्यावर खिळलेल्या मला जाणवतात... साधं रोजचं घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हे टू व्हिलर वरुन कापायचं अंतर असेल, मी मुलगी आहे म्हणून माझं ओव्हरटेक करणं ही अनेकांच्या पचनी पडत नाही... मुलगी असून ओव्हरटेक करते...??? गाडी चालवणार्या 'त्याच्या' नजरेतला विखार सहज वाचता येणारा असतो... रस्त्यावरच्या गर्दीत हात लावायला, घाणेरड्या नजरेचे कटाक्ष टाकायला या सगळ्यांना सापडते, फक्त मीच... कारण, मी एक मुलगी असते.

माझ्या अपार्टमेंट मध्ये रहाणारी, आयटी सेक्टरमध्ये काम करणारी, गॅझेट्स सॅव्ही मॉडर्न मावशी आहे. जाता येता कधीतरी लिफ्ट मध्ये ती भेटते. तिला एकच खंत आणि ती म्हणजे, तिला मुलगी नाही... मुलाला लहानाचं मोठं करताना त्याची हौसमौज पुरवणं एंजॉय करता येत नाही ही तिची नेहमीची कंप्लेंट... पण आता म्हणते, बरंय मला मुलगी नाहीये... असल्या जगात मुलगी सांभाळायची म्हणजे जीवाला घोर. मी फक्त एक हताश सुस्कारा सोडते. मी, माझ्या अनेक मैत्रिणी आम्ही एकेकट्या फिरतो. शॉपिंग ला जातो, प्रवास करतो, मूव्हीज ना जातो... आम्हाला नाही लागत कुणाची सिक्युरिटी. पण आता भिती वाटायला लागलीये. अस्वस्थ आणि अगतिक व्हायला झालंय... मारुतीच्या शेपटासारखे प्रश्न वाढत चाललेत. पण, उत्तर मात्र दृष्टीपथात नाही...   

दोनच दिवसांपूर्वी मिशेल क्रॉस नावाच्या अमेरिकन मुलीचा एक ब्लॉग वाचण्यात आला. ट्रॅव्हलर्स हेवन म्हणून ओळखल्या जाणार्या भारतात यायला मिळणं हे म्हणजे तिच्यासाठी ड्रीम कम ट्रू... पण इथल्या वास्तव्यात एक मुलगी, त्यात आणि परत गोरी अमेरिकन मुलगी म्हणून तिनं जे जे सोसलं त्यानंतर या ट्रॅव्हलर्स हेवन ला ती वुमेन्स हेल म्हणते... पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यावर ढोल ताशांच्या तालावर नाचायचा मोह आवरला नाही तेव्हा विसर्जन वगैरे विसरुन नाचणार्या गोर्या अमेरिकन मुलीभोवती कोंडाळं करुन आपल्या मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ आणि फोटो घ्यायला टपलेले पुरुष तिला आठवतात... भारत भरात फिरतानाचे रेप, सेक्शुअल हरॅसमेंट आणि शोषणाचे असे असंख्य अनुभव ती लिहिते. तीन महिन्यांचं इथलं वास्तव्य संपवून परत गेल्यावर तिला पोस्ट ट्राऊमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर वर उपचार घ्यायला लागतायेत... हे सगळं वाचताना पुन्हा तीच चीड, संताप, असहाय्यता, हताशपण दाटून येतं... एरवी सारे जहॉं  से अच्छा म्हणताना जे काही भरुन बिरुन येतं, ते सगळं क्षणात उडून जातं अशा वेळी. 

एक मुलगी म्हणून माझ्या बाबतीत थोडी जास्त काळजी करणं या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टींची सवय मला ना माझ्या कुटुंबानं लावलीये, ना माझ्या समाजानं... एका बाजूला शाळेत मूल्यशिक्षण शिकवणं, स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गाणं किंवा महिलांना पन्नास टक्के आरक्षणं देणं बिणं हे सगळं ठीक आहे, पण त्या पेक्षा जर थोडीफार आमच्या सुरक्षिततेची हमी घेऊ शकलात तर बघा हे सगळ्यांना जीवाच्या आकांतानं ओरडून सांगावंसं वाटतंय मला, एक मुलगी म्हणून... दॅट्स इट. 

Monday, 15 April 2013

संतोष मानेच्या निमित्तानं...


दोन हजार बाराच्या जानेवारीतली एक सकाळ... मी पुण्याहून घरी जायला निघाले होते. सकाळी सव्वाआठच्या दरम्यान स्वारगेट वरुन विजयदूर्ग गाडी निघते... त्या गाडीनं निघायचं होतं... मी स्वारगेटला पोचले, गाडी वेळेत आली आणि सुटलीही... स्वारगेट सोडलं की माझं आवडीचं काम म्हणजे मोबाईलवर हेडफोन लावून गाणी ऐकत निवांत खिडकीच्या बाहेर बघत बसणं... किंवा मस्तपैकी झोपून देणं... त्यादिवशी झोपायचा मूड होता... कंडक्टर कडून तिकीट घेईपर्यंत वेळ काढला. तो येऊन तिकीट काढून चार ख्यालीखुशालीच्या गप्पा मारुन झाल्या तसं मी मस्त झोपून गेले... बरं गाडीत बसल्या बसल्या पुण्यातल्या घरी मावशीला आणि तिकडे मम्मी पप्पांना सांगून झालं होतं, की गाडीत जागा मिळालीये, दहा मिनिटांत पुणं सोडेन... शिवाय आता पाच सहा वर्ष झाली पुणे ते घर असा जवळजवळ तीनेकशे किलोमीटर प्रवास अगदी मध्यरात्रीही एकटीनं करायची सवय... त्यामुळे कुणी दर अर्ध्या तासानं काळजीचा फोन करेल अशी शक्यताही नव्हती, त्यामुळे फोन सायलेंट ला करुन मी निवांत झोपले...

बहुदा सातार्यात पोचले आणि स्टँडवरच्या कलकलाटानं जाग आली... उठले. तोंड हलवायला म्हणून वेफर्सचं पाकिट घेतलं. आणि सहज फोन काढला... तर फोन वर पंधरा वीस तरी मिस्ड कॉल्स. मी एखादा फोन नाही उचलला तर काळजी वाटून मला अर्ध्या तासात सत्तर ऐंशी फोन करणारा एक अवलिया मित्र होता, त्यामुळे हे फोन त्यानेच केले असतील असं वाटलं... प्रत्यक्षात मात्र एकाच वेळी पप्पा, मामा, काका आणि काही मित्र मैत्रिणींचे फोन पाहिले आणि डोकंच चालेना... घरी कुणाचं काही बरं वाईट झालं असेल का अशी एक शंका आली... पण मग तसं काही असेल तर मित्र मैत्रणी का फोन करतील या विचारानं थोडं हलकंही वाटलं... अशा परिस्थितीत ज्या माणसाशी काहीही बोलू शकेन आणि काहीही ऐकू शकेन असा माणूस म्हणजे मामा... मामाला फोन केला आणि काय झालंय एवढा एकच प्रश्न विचारला... माझा आवाज ऐकून त्याला वाटलेलं हुश्शपण मी त्याच्या आवाजातून सहज ओळखू शकले... पुढे त्याने मला सगळा प्रकार सांगितला...

सकाळी सव्वाआठच्या दरम्यान स्वारगेट एसटी स्टँडवर एका ड्रायव्हरने अक्षरशः धुमाकूळ घातला होता... स्वारगेट मधून काढलेली गाडी आजुबाजूच्या परिसरात वाट्टेल तशी अंदाधूंद चालवून त्याने मध्ये आलेल्या वाहनांना, माणसांना धडक दिली होती... त्यात काही माणसं गेली होती... गंभीर जखमीही झाली होती... मी बराच वेळ फोन न उचलल्यामुळे मी सकाळी स्वारगेटवरुन निघणार आहे हे माहिती असलेली घरातली माणसं आणि मित्र मैत्रिणी यांच्या मनात माझ्याबद्दल सगळं वाईट ते येऊन गेलं होतं... म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती... हा तो ड्रायव्हर म्हणजेच नुकती पुणे सत्र न्यायालयानं ज्याला फाशीची शिक्षा सुनावली, तो संतोष माने... 

त्या दिवशी मी प्रवासात असल्यामुळे मला न्यूज चॅनेलवर संतोष मानेची बातमी पहाता येत नव्हती... पण माझ्या फोन वर मला दिसलेले मिस्ड कॉल्स मला प्रसंगाचं गांभीर्य समजण्यासाठी पुरेसे होते... मग सगळ्यात आधी माझ्यासाठी हवालदिल झालेल्या सगळ्यांना मी अतिशय सुखरुप आहे हे कळवलं... संध्याकाळी घरी पोचल्यावर बातम्या बघताना किती भयंकर प्रकार घडलाय याचा अंदाज आला...

त्याच संतोष मानेला न्यायालयानं फाशी सुनावली आणि तो दिवस लख्ख आठवला... मानेला फाशी सुनावल्यानंतर रात्रीच्या बुलेटिन साठी संतोष मानेनं ज्यांचे जीव घेतले त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रीया घ्यायचं ठरलं... (अशा वेळी प्रतिक्रीयेसाठी भेटायला येऊ का असं विचारणं खरं तर मनापासून जीवावर येत असतं... पण तरी आपल्या कामाचा भाग म्हणून ते करणंही गरजेचं असतं...) त्याच अपरिहार्यतेतून काही फोन केले... (पलिकडनं काय उत्तरं येतील हे माहिती होतं, तरी केले...) एका वडिलांना फोन केला... त्यांचा सोळा सतरा वर्षांचा मुलगा संतोष माने प्रकरणात हे जग सोडून गेला... मी फोन केला तेव्हा बोलतानाही त्यांना भरुन आलेलं... काय प्रतिक्रीया देऊ... माझा मुलगा त्याच्या फाशीनं परत येईल का असं त्यांनी मला विचारलं तेव्हा मी नम्रपणे त्यांना सॉरी म्हणाले... अशा अडचणीच्या वेळी आपल्या तोंडून मनापासून सॉरी येतं, पण खरं तर सॉरी वगैरे शब्द एकूणच केवढे पोकळ असतात नं...

असाच अजून एक फोन केला... तेही एक वडील होते. आणि त्यांची जेमतेम वीस वर्षांची मुलगी संतोष मानेची शिकार ठरली होती... त्यांनी भेटायला परवानगी दिली. संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या घरी गेले. मुलीच्या जाण्याला एक वर्ष होऊन गेल्यावर त्याही क्षणी ते घर, तिथले चेहरे भकास आणि उदास वाटले मला... 

साधारण माझ्याच पप्पांच्या वयाचे असलेले ते सुद्धा एक पप्पा होते... संतोष मानेनं घातलेल्या थैमानामध्ये पूजा त्यांना सोडून गेली होती... त्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांनी तिला स्वारगेटला सोडलं तेव्हा त्यांना आणि तिलाही माहिती नसेल, की आपल्या समोर काय वाढून ठेवलंय... संतोष मानेच्याच धडकेत हे वडील स्वतः जखमी झाले... आणि दुसर्या बाजूला पूजानंही प्राण सोडला... अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर त्यांच्या मुलीनं सोडलेला प्राण त्यांना मात्र संध्याकाळी कधीतरी कळला... पूजा परत येणार नाही पण आमच्या मरणापर्यंत आम्हाला पुरुन उरेल असं दुःख ज्यानं पदरात घातलं त्या संतोष माने ला फाशी सुनावली... न्यायालयानं आम्हा सगळ्यांचं दुःख समजून घेतलं त्याबद्दल समाधान आहे, असं पूजाचे वडील म्हणाले... आपल्या पोटच्या पोरीचं अख्खं आयुष्य ज्या घरात गेलं, जिथं तिच्या जगण्या वाढण्याच्या असंख्य आठवणी आहेत, ते स्वतःच्या मालकीचं भलं मोठं घर कुलुपबंद करुन तिचे आई वडील आज शहराच्या दुसर्या टोकाला छोट्याश्या भाड्याच्या घरात राहतायेत... त्यांचं दुःख कळायला ही एकच गोष्ट पुरेशी आहे...

घरातल्या एखाद्या माणसाच्या मृत्यूने ते संपूर्ण नांदतं घरसुद्धा कसं मृत होऊन जातं असं वाटलं मला पूजाच्या घरी जाऊन आल्यावर... आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू पचवणं हे कधीही वाईटच... त्यात जर आई वडिलांना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं मरण पहायला लागलं तर त्यासारखं दुःख नाही... 

मृत्यू... जगण्यातलं एकमेव अंतिम सत्य म्हणजे मृत्यू... वैयक्तिक आयुष्यातही आपण या मृत्यूची भिषणता अनुभवतो... तसं आजुबाजूलाही बघतो... त्या माणसाच्या जाण्यातून सावरुन आपण जगायला तर सुरवात करतो... पण जखमा भरुन येत नाहीत... अगदी कुठल्याही क्षणी गेलेल्यांच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी दाटतं... गेले काही दिवस एका अतिशय जिव्हाळ्याच्या नात्याच्या तुटण्यानं मी अस्वस्थ आहे... क्षणोक्षणी जुन्या आठवणींनी डोळे भरुन येणं... जिवाची घालमेल होणं हे सगळं अनुभवते आहे... पण पूजाच्या आई बाबांसारखी मुळापासून उन्मळून पडलेली माणसं पाहिली की वाटतं, एखाद्या माणसानं हे जग सोडून जाणं यापेक्षा त्याने फक्त आपल्या आयुष्यातून निघून जाणं हे सोसायला खरंच किती सोप्पं आहे... दुसर्यांची दुःख पाहिली की आपली दुःख तुलनेनं किती छोटी आहेत हे असंच कळतं का आपल्याला...??? 

Wednesday, 6 February 2013

तू नहीं तो...
खरं तर एव्हाना सवय व्हायला हवी तुझ्या नसण्याची... पण तशी ती नाही झालेली अजून...

म्हणजे मला आठवतंय, माझी एमए ची स्टडी टूर होती अहमदाबादला... मी निघायच्या दोन दिवस आधी आपलं जोरदार भांडण झालेलं, अर्थातच फाल्तू कारणावरुन... बोलणं-चालणं बंद होतं आपलं... पण तुला साधं बाय सुद्धा न म्हणता एवढ्या लांब जायचं म्हणजे शिक्षाच होती मला. शिवाय थोडं नमतं घेऊन तुला फोन करायचा तर नाकावरचा राग मात करत होता त्यावर. आणि, मी रुमवरुन निघण्याच्या साधारण दीड तास आधी तु फोन केलास, खाली आलोय, पाच मिनिटं येऊन जा म्हणालास. मी अक्षरशः धावत पळत खाली आले... तू छान पॅक केलेलं एक बॉक्स माझ्या हातात दिलंस... हावरटासारखं मी ते उघडलं. आत माझ्या, खरं तर आपल्या आवडीची चॉकलेट ट्रफल पेस्ट्री होती... त्याक्षणी खरं तर तुला कडकडून मिठी मारायचा मोह झालेला मला, पण आपण फक्त बेस्ट फ्रेंडस् होतो... बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड नाही. हे उठता बसता तू एवढं ठसवलं होतंस माझ्या मनावर...!!! तर, ती चॉकलेट ट्रफल मी त्या क्षणी अर्धी-अधिक फस्त केली. नाही म्हणायला एखाद-दोन काऊ-चिऊचे घास तेवढे तुला... कारण तुझ्या भाषेत म्हणजे पेस्ट्रीज आणि आईसक्रीम साठी लंपट ना मी... पुढे नीट जा, असं कर, तसं करु नकोस, फोन कर, मेसेज कर, काळजी घे, मिस कर... अशी तुझी सूचनांची यादी ऐकली आणि मी वर गेले. बॅगवर अखेरचा हात फिरवून निघायचं होतं... मला स्टेशनला सोडायला चल या माझ्या हट्टाला मात्र तू गोड बोलून गुंडाळून ठेवलं होतंस, का तर म्हणे, माझ्या डोळ्यासमोर तू आठ दिवस निघून जाणार, कसं जमेल मला, तुला जाताना बघणं... शेवटी तू स्टेशनला आला नाहीसच, पण ट्रेन हलायला आणि तुझा मेसेज यायला, पिल्लू, लवकर ये...!!! मिस यू.

नंतर रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ तू माझी ख्यालीखुशाली विचारत होतास... मी परत पुण्यात पोचले त्या सकाळी तू मुद्दाम लवकर उठून, आवरुन, मला आवडणारा टी-शर्ट घालून मला न्यायला मात्र आलास... सीधी सी बात थी, तू खूप मिस केलं होतंस मला, मी आठ दिवस नव्हते तर...

जो मुलगा मला न भेटता आठ दिवस नव्हता राहू शकत, तो कसा राहतोय मग आता, महिनोनमहिने मला न भेटता... आणि मी तरी कशी राहतीये... म्हणजे कित्ती छोट्या छोट्या गोष्टी आठवतात. मी कधी कल्पनाही केली नव्हती, की एकाच हॉटेलमध्ये कमीत कमी आठवड्यातून एकदा (आणि जास्तीत जास्त कितीही वेळा...) मी जाईन आणि एकच ठरलेली डीश खाईन... तुझ्या आवडत्या इराण्याच्या हॉटेलमध्ये मात्र आपण असंख्य वेळा गेलोय. आणि कैकदा फक्त रुमाली रोटी आणि तवा पनीर हे आणि हेच खाल्लंय... त्यातही ती रुमाली रोटी आधी एकच मागवायची कारण मी अर्धीच खाणार... पुढे तुला हवी असेल तर प्लेन रोटी, तुझ्यापुरती... अशातच कधी तरी तिथल्या एका डेझर्टचा शोध लागला... आपल्या दोघांपुरतं बोलायचं तर ते जगातलं बेस्ट इन्व्हेन्शन...!!! ना...??? नंतर नंतर या हॉटेलचा एवढा ओव्हरडोस झाला, की आपण त्याच्या आसपास फिरकेनासे झालो...!!!

अशा अनेक हॉटेल्स मध्ये जाऊन आपण अनेक गोष्टी अगदी नकोशा होईपर्यंत खाल्ल्याएत... बरं, तुझ्या आजुबाजुला शौकीन आणि खादाड मित्रांची कमी होती का, की तू सगळीकडे मला घेऊन जावंस... तर तसंही नव्हतं... पण का कुणास ठाऊक, मला बरोबर नेऊन मला मस्का मारुन काही खिलवल्याशिवाय तुला चैन पडत नसे... तुझ्या या असल्या आग्रहांमुळे मी अनेकदा मला आवडत नसलेल्या अनेक गोष्टीही तुला आवडतात म्हणून घशाखाली उतरवल्याच्या कित्येक आठवणी आहेत... हे सगळं असं मध्येच का आठवतंय मला...?? माहित नाही. पण आठवतंय खरं... 

म्हणजे, तू नाहीयेस तर आता जाणं होत नाही का कुठल्या हॉटेलमध्ये... तर तसंही नाहीये. पण आता कुणी नाही जे तुझ्या इतक्या प्रेमाने मला खायला घालेल... माझ्या आवडी निवडींकडे लक्ष देईल... मला आवडतात म्हणून, एकाच वेळी सगळ्या फ्लेवरच्या बोर्नविल किंवा कॅडबरीज मला आणून देईल... त्यामुळे अक्षरशः पावलोपावली तुझी उणीव आहेच... आपला पिझ्झावाला... आपला शहाळंवाला... एखाद्या हॉटेलमधला आपला वेटर... आपल्यापुरतं वसवलेलं किती छान जग होतं आपलं... अजुनही ते जग आहे तिथेच आहे... फक्त त्या जगात आपण दोघं मात्र वेगवेगळे... 

आपण कित्तीदा अक्षरशः फाल्तू कारणांवरुन एकमेकांशी भांडलोय... बोलायचे बंद झालोय... एकमेकांना टाळलंय... आणि काय आणि काय... असंच एकदा कशावरुन तरी आपण बोलत नव्हतो... आणि कसं काय कुणास ठाऊक, तेव्हा पहिल्यांदाच असं झालं... की नाही ना बोलायचं?? ठरवलंयस ना तू...?? मग नाहीच बोलायचं... मी मुळीच माघार नाही घ्यायची हे ठरवलं. झुकले नाही. दोन दिवस नाही, तीन दिवस नाही... फूल टू शांतता, माझ्या बाजूने...!!! शेवटी तीच तुला नकोशी झाली, आणि तू फोन केलास. नेहमी प्रमाणे मधातलं बोलायला सुरवात केलीस... माझी हं...!! बरं...!! ठीके...!! हो...!! हरकत नाही...!! अॅज यू विश...!! असली उत्तरं ऐकून शेवटी सॉरी म्हटलंस... आणि जगातलं एक महान तत्वज्ञान मला ऐकवलंस... म्हणे, ''मांजराला कसं, दुर्लक्ष केलं की ते जवळ यायला बघतं... आणि जवळ जवळ घेत बसलो तर नखं लावतं... तेच माणसांचं आहे, जास्त मस्का मारायला गेलं तर उपयोग नाही होत, पण दुर्लक्ष केलं की आपोआप सुतासारखी सरळ येतात माणसं...'' व्वा, काय पण अक्कल ना तुझी...?!?! पण तुझ्या बाबतीत खरंच होतं ते... तुला सोडून दिलं की तु स्वतःहून आसपास रहायचास... हा तुझाच सिद्धांत मानून मी खरं तर तुला सोडून दिलं होतं मोकळं, पण नेमका यावेळी मात्र सगळा विचका झाला... दुर्दैव माझं, तुझं आणि आपल्या दोस्तीचंही... दुसरं काय...

खरं तर अशा कित्ती आठवणी आहेत... तुझ्या घराची, कपाटाची एकेक एक्स्ट्रा किल्ली होती माझ्याकडे... तुझ्याकडची हरवली की माझ्याकडची मी तुला सुपूर्द करायची एवढीच माझी ड्यूटी... हो, ड्यूटीच ती... आणि तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणून कर्तव्यच ते माझं... तू नाही तर कोण करणार असं तू मला विचारलंस की मी निरुत्तर... मी नाही करणार तर कोण अशा कॅटॅगरी मधल्या असंख्य गोष्टी... जसं की तू तुझ्या परिक्षेसाठी अभ्यासाला जागणार असशील तर मीही माझ्या घरी जागायचं... निदान अलर्ट झोपायचं... का, तर अभ्यासातून तुला ब्रेक हवा असेल तेव्हा तू मला नाही तर कुणाला फोन करणार... आणि अर्थातच तूही माझ्याबाबतीत ही काळजी घ्यायचास... परिक्षेला जाताना सगळ्यात शेवटी तू बेस्ट लक द्यायचास... म्हणजे ते जास्त उपयोगी पडेल अशी निरागस समज...  रिझल्ट लागला की तो तू सगळ्यात आधी मला कळवणार... मग आपण भेटणार... तू आल्या आल्या मी तुझ्यासाठी काय आणलंय हे शोधणार... अंदाज घेणार... आणि मी आणलेली अगदी छोटीशीही गोष्ट पुढे केली की लहान मुलासारखे तुझे तुझे डोळे लकाकणार... पुढे मग, पिल्ल्या, तूच गं... आहे का दुसरं कुणी, ज्याला असं काही सुचेल असं विचारणं... आणि मी लाडात येऊन, नक्की नाही ना? कुणीच नाही ना? हा पण नाही ना? तो पण नाही ना? अशी तुझ्या सगळ्या जवळच्या मित्रांची नावं घेऊन, मी त्या सगळ्यांच्याही आधी आहे याची खात्री करुन घेणं...!!! कसले भारी होते ते दिवस... 

आज पर्यंतच्या आयुष्यात आपण सगळ्यात जास्त सुखदुःख एकमेकांबरोबर वाटली... बराचसा वेळ घालवला... अनेक गोष्टींच्या बाबतीत आपल्या दोघांच्यात टोकाचे मतभेद होते... प्रसंगी हिरीरीने वाद घालून ते एकमेकांसमोर मांडलेही... पण या गोष्टींचा आपल्या मैत्रीवर कसलाच परिणाम नाही झाला हे महत्त्वाचं... तुझी देवावर श्रद्धा होती... माझी नव्हती... पण तुला हवं म्हणून तुझ्याबरोबर एखाद्या देवळात येणं मला गैर नाही वाटलं... तू देवळात दिलेल्या देणगीची पावती ठेवायला माझ्याकडे द्यायचास... खरं तर एकदा झालं ना देऊन मग पावत्या काय करायच्या, पण तु ठेव म्हटलंयस, म्हणून ठेवायची एवढंच... 

आपलं दोघांचं जग या बाहेर तुझं एक जग होतं... त्यात तुझी बाईक... तुझी जिम आणि तुझे असंख्य अगणित मित्र आणि काही छान, काही बोअरिंग मैत्रिणी... या सगळ्यांचे डिटेल्स ऐकणं हे एक माझं ठरलेलं काम... बाईकमध्ये कुठलं ऑईल असलं तर ती छान पळते... इथपासून ते तुझ्या जिममधल्या अमक्या मुलाचा तो तमका ट्रेनर... असल्या कित्ती निरस गोष्टी ऐकण्यात मी आणि ऐकवण्यात तू वेळ सत्कारणी लावलाय ते नुसतं आठवलं तरी हसायला येतं... 

तुझं पझेसिव्ह असणं... ते तर हवंसं आणि नकोसंही... कुठलीशी हिंदी मूव्ही पहायला तू गेला होतास... मध्यरात्री ती मूव्ही संपल्यावर तू मला फोन केला होतास... कारण त्यातल्या हिरॉईन ला क्रूरपणे मारलेलं पहाताना, तुला तिच्या जागी म्हणे मीच दिसत होते... आणि म्हणून तू कमालीचा अस्वस्थ झाला होतास...  कुणाचं काय आणि कुणाचं काय या विचाराने हसायलाच आलं होतं मला तेव्हा... पण मग मला कशी अक्कल नाहीये... मी कशी मंद आहे वगैरे आख्यान रात्री एक वाजता ऐकत बसायला लागलं असतं ते टाळायचं म्हणून मी गोड बोलून तुला समजावलं... तूही शहाण्या मुलासारखा झोपायला गेलास... दुसर्या दिवशी सकाळी तुझा लगेच भेट असा फोन आला मला... मी भेटले... तुझं आपलं एकच... ती मुलगी, आय मीन हिरॉईन... तिला मारलं त्या माणसाने, मग तुला माझीच आठवण आली वगैरे वगैरे... हे सांगतानाही तुझे डोळे भरलेले... अक्षरशः मनीमाऊ झालेलं तुझं... आठवतंय... नंतर तोच हिंदी सिनेमा पहायला तू मला नेलंस...  तयातला तोच तिच्या मरण्याचा सीन पहाताना मला तू का हवालदिल झालेलास याची जाणीव झाली... डोळे माझेही भरुन आले... पण, ते तीला मरताना बघून नाही... तुझ्यासाठी मी किती महत्त्वाची होते या जाणिवेतून... आणि हो, आय होप तुला हे ही आठवत असेल, की तुला एखाद्या थिएटर मधला सामोसा आवडतो म्हणून तु तिथल्या एखाद्या बंडल शो साठीही जाऊन बसायचास... आणि असल्या एखाद्या टुकार सिनेमाला कंपनी म्हणून तू मला घेऊन जायचास... आठवलं तरी आत्ताही चिडचिड होते माझी... पण, तुझ्याबाबतीत मला काहीच अवर्ज्य नव्हतं ना, त्यातून हे असं व्हायचं मला... बंडल पिक्चर... ओके... रोज एकच हॉटेल ओके... तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू, अगदी काहीपण... 

अशी थोडी थोडकी नाही तर चांगली सहा सात वर्ष... एकमेकांवर जीव ओवाळून टाकण्याची... बाकी कुणाचंही अस्तित्त्व विसरुन जगण्याची... आपण बरोबबर होतो तेव्हा लागलंच नाही ना आपल्याला इतर कुणी... तुला लिहायला बसते तेव्हा असं कुठलं कुठलं काय काय आठवतं... तुझ्या कुठल्याशा एका मामाचा अॅक्सीडेंट आठवतोय नं तुला... अक्षरशः जीवघेणा अॅक्सीडेंट... त्यानंतर तो मोजकेच तास जगला, तेही प्रचंड वेदना सोसत... तो गेला त्या रात्री तु घरी आणि मी पुण्यात, अख्खी रात्र जागून काढलेली... फोन कानाला लावून आपण फक्त अश्या सगळ्या दुखर्या क्षणांवर बोलत होतो... कैक तास... त्याक्षणी एकमेकांपासून काहीशे किलोमीटर लांब असूनही जवळ असलेले आपण... 

माझ्या बरोबर प्रवास करायचा म्हणून हातातलं रिझर्व्हेशन फाडून टाकून आयत्या वेळी माझ्या बसमध्ये येऊन बसलेला तू... मला साधं खरचटलं तरी अस्वस्थ होणारा तू... आपल्या गॅंगबरोबर गप्पा मारत बसल्यावर जर कुणी उगाचच मला टार्गेट करत असेल तर नेहमी माझी बाजू घेणारा तू... तुझ्याबरोबर तुझ्या पिझ्झा वाल्याकडे मी पिझ्झा खायला येणार असेन तर त्याला पिझ्झाची ऑर्डर देताना एक्स्ट्रा कॅप्सिकम हे न विसरता सांगणारा तू... रोज नवीन नवीन गोड गोड नावांनी मला हाका मारणारा तू... आणि दुसर्या बाजूला अक्षरशः आपली ओळख होण्याआधी पासून मी ऑब्झर्व्ह केलेला तुझ्या चेहर्यावर आणि डोळ्यात दिसणारा माज, जरा बर्या शब्दात सांगायचं तर अॅटीट्यूड... सतत नवीन नवीन टीशर्टस घ्यायची तुझी क्रेझ... एखादी वस्तु घरी आणली, नाही मनासारखी वाटली तर ती बदलून आणण्यासाठी जीवाचं रान करणारा तू... अगदी सहा महिन्यांपूर्वी घेतलेली जीन्स पुन्हा त्या शहरात गेल्यावर बदलून घ्यायची म्हणून त्या दुकानदाराशी मखलाशी करणारा तू... आणि हे सगळं यशस्वी पार पडल्यावर मला विजयी वीर असल्यासारखा फोन करुन आपला पराक्रम ऐकवणारा तू... बाईकचा नंबर घेण्याआधी मला फोन करुन स्वतःबरोबर मलाही कन्फ्यूज करणारा तू... नंबर प्लेट तयार करताना त्यातल्या फॉन्ट बद्दल कमालीचा चिकित्सक असलेला तू... अशी कित्ती कित्ती रुपं आहेत तुझी डोळ्यासमोर... आपण आता एकत्र नाहीयोत, पण या अशा असंख्य आठवणी माझी पाठ सोडत नाहीत... एखाद्या वीकेंडच्या संध्याकाळी अचानक ठरलेला बाहेर जेवायचा प्लॅन... तेही तुझ्या आवडीच्या एखाद्या टपरीवजा हॉटेलमध्ये... तिथे पोचल्यावर, तू इथे आणलंयस मला जेवायला... या माझ्या प्रश्नावर तू मला तिथल्या पदार्थांचं ऐकवलेलं कौतुक... आणि पुन्हा एकदा तुझ्या आनंदासाठी म्हणून माझं तिथे तुझ्याबरोबर जेवणं... तिथून बाहेर पडल्यावर माझा कॉफीचा हट्ट... तू मला सोडून मित्रांच्या अड्ड्यावर जायच्या घाईत... म्हणून तू चक्क आपल्या कॉफीवाल्याला मला बाईकवरच कॉफी आणून द्यायला सांगणं... आणि कॉफी पित पित मी रुमवर पोचणं... हे सगळं निव्वळ भन्नाट... असे क्रेझी मोमेंट्स मला तूच देऊ शकतोस फक्त... 

माझ्या प्रत्येक क्षणातला अर्धा भागीदार तू असतोस... मी उर्दू शिकायला सुरवात केली तो दिवस आठवतोय तुला... खरं तर तुझ्या मुळीच मनात नव्हतं मी असं काही करणं... तुझ्या मते, उर्दू शिकायला जाणार म्हणजे तिथे मदरसा टाईप, कट्टर इस्लामी वातावरण असेल... माझ्यासारख्या सदानकदा जीन्स आणि टीशर्ट मध्ये वावरणार्या मुलीचं काय होणार तिथे... वगैरे वगैरे हजार शंका तुझ्या डोक्यात... पण पहिल्या दिवशीचा क्लास संपवून जेव्हा मी तिथे माझे क्लासमेट्स असलेल्या काका काकूंबद्दल तुला सांगितलं तेव्हा हुश्श झालेलं तुला... आणि हो, मी काढलेली आलिफ, बे, पे ही अक्षरं सुद्धा सगळ्यात आधी मी तुलाच दाखवली होती, आठवतंय... कौतुक कुठल्या शब्दात करावं हे कळलं नाही, की तू नुसतं जवळ घेऊन केसातून हात फिरवायचास... त्या दिवशीही तू असंच केलं होतंस...  

मी वर्तमानपत्रात लेख लिहीला काय... किंवा न्यूज चॅनेलवर नोकरी केली काय... तुझ्यासाठी मी फक्त एक पिल्लूच... संदीप खरेने त्याच्या मुलीसाठी, रुमानी साठी लिहीलेली इल्लू इल्लू पिल्लू गं ही कविता, तुझ्या लेखी जणू फक्त माझ्यासाठीच असते... नाक छोटं तोरा मोठा गाल रुसून फुल्लू गं... हे संदीपने रुमानीलाही दाखवलं नसेल इतक्यांदा तू मला म्हणून दाखवलंयस... आणि माझ्याकडून म्हणून घेतलंयस सुद्धा... 

मी अशा आठवणी उगाळत बसते तेव्हा अक्षरशः या जगाचा भाग नसतेच मी... मी वेगळ्याच दुनियेचा हिस्सा असते, जिथे आता मला तुलाही येऊ द्यायचं नसतं, या क्षणी... मध्ये कुठेतरी मी एक उर्दू शेर वाचला होता... तोहमतें मुझपे आती रही है कई, एक से एक नई नई... खूबसुरत मगर जो एक इल्जाम था, वो तेरा नाम था... हे ज्या कुणी लिहीलंय, किती खरं लिहीलंय... मेरे लिये भी तुम सबसे खूबसुरत इल्जाम की तरहा थे... जो अब मिट गया है, मगर उसकी खूबसुरती अभी भी है... तुझ्या नसण्याची बोच अक्षरशः पदोपदी आहे... प्रत्येक हार जीत, प्रत्येक आनंद दुःख हे सगळं तुझ्याबरोबर वाटायची एवढी सवय होती... की आता दरवेळी प्रश्न पडतो, की पण आता हे सगळं सांगू कुणाला... मित्र मैत्रीणींची कमी कधीच नव्हती... पण त्यातलं कुणीच तुझी जागा नाही नं घेऊ शकत... आपण जसे पुढे जाणार, मोठे होणार तसे आपले मार्ग वेगळे होणार हे तर खूप पूर्वीच होतं मला माहिती... पण, मार्ग वेगळे झाले तरी धरलेलं बोट सुटणार नाही कधीच अशी खात्री होती मनाशी... नेहमी... परवा, म्हणजे अगदी आठ पंधरा दिवसांपूर्वी मला ऑफीस ला जाताना अॅक्सीडेंट झाला... कदाचित योगायोग पण त्या सकाळीच तुझा विचार करताना वाटलं, की समजा आपलं बरं वाईट काही झालं तर कोण येणार आता आपल्याकडे धावत... त्याच दिवशी एका बाईक वाल्याने रॉंग साईडने येऊन ठोकलं मला... पाय जाम दुखावला... म्हणजे मला तर वाटलं मोडलाच असणार... पण सुदैवाने फक्त मुका मार होता... दोन दिवस घरी बसल्यावर परत तिसर्या दिवशी ऑफीसला जाता आलं... माझे मित्र मैत्रिणी आले... सगळं झालं, डॉक्टर, औषधं... पण तुझं नसणं जाणवलं फार... खूप बेचैन आहे मी तू नसल्यापासून... फक्त आठवणी आहेत बरोबर... जपून ठेवलेल्या... तू दिलेल्या मोराच्या पिसांबरोबर त्याही ठेवल्याएत... पण फक्त एवढंच नाही... मोठ्ठी पोकळी आहे... कुठून तरी तुझ्या आवडीच्या ब्रूट चा वास येतो... मी पुन्हा हजारो क्षण मागे जाते... जाताना माझा वेग तुझ्या बाईकलाही मागे टाकणारा असतो... तुझ्याशिवाय मला बघणारे लोक मला सांगतात आता बास, तू पुढे जा... जो होता है अच्छे के लिए... पण, तुझं नसणं हे अच्छे के लिए कसं असू शकतं...???

या सगळ्या विचारात हरवताना मला चित्राची गझल आठवते... तू नहीं तो जिंदगी में और क्या रहे जाएगा... दूर तक तनहाईयोंका सिलसिला रहे जाएगा... अवधूत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्ते मधला मॅजिक कॉल हवाय मला...!!! हे सगळं सांगावंसं वाटतंय तुला... पण कसं सांगू...???

मिस यू...