Saturday, 10 September 2011

बोल...

(सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला चित्रपट परीक्षण वगैरे बिलकुल लिहिता येत नाही. आणि पडद्यावर जे दिसतं त्या व्यतिरिक्त मला सिनेमा फारसा कळतही नाही. गेले दोन आठवडे बघायचा राहिलेला एक सिनेमा फायनली आज सकाळी पाहून झाला, आणि वाटलं जे वाटतंय ते शब्दात मांडून पाहावं, म्हणून हा प्रयत्न...)
शोएब मन्सूर हे नाव रानडे मध्ये जर्नालिझम करत असताना नखाते सरांच्या तोंडून ऐकलं होतं. मन्सूर च्या 'खुदा के लिये' चं सरांनी भरपूर कौतुक केलं होतं. त्यामुळे त्याचं नाव विशेष लक्षात राहिलं. खुदा के लिये मिळवून पहायचा होता, पण कालांतराने विषय मागे पडला तसा तो बघायचाही राहून गेला. त्यानंतर `बोल` च्या जाहिरातीमधून पुन्हा एकदा शोएब मन्सूर हे नाव नजरेस पडलं. ३१ ऑगस्ट ला रमजान ईद च्या मुहूर्तावर हा सिनेमा भारतात रिलीज होणार होता. आणि यावेळी मला हा सिनेमा अजिबात चुकवायचा नव्हता. पण तरी आज उद्या करता करता शेवटी आज मला सोयीच्या वेळी आणि सोयीच्या ठिकाणी शो मिळाला. आणि सोबत हा विषय नक्की आवडेल अश्या संवेदनशील मैत्रिणीची कंपनी मिळाली. त्यामुळे आज `बोल` पाहून झाला.
एक हादरवून सोडणारा अनुभव होता. माझ्या इतर सिनेमा प्रेमी मित्र मंडळींत  मी अगदीच 'odd girl out ' आहे खरं म्हणजे. केवळ नाईलाज म्हणून मी त्यांच्या बरोबर काही सिनेमे पहातेही. पण सिनेमा हॉल मधून बाहेर पडल्यावर पाचव्या मिनिटाला मी त्या सिनेमातूनही बाहेर पडलेली असते. पण आज तसं झालं नाही. सिनेमा संपवून ऑफिस मध्ये पोचले, कामाला लागून हाताखालच्या काही गोष्टी संपवल्या. पण अजूनही 'बोल' मधले हुंकार, हुंदके आणि उसासे माझी पाठ सोडायला तयार नाहीत.
बोल ही जैनब ची गोष्ट आहे. ती फाशीच्या फन्द्यावरून आपली कहाणी प्रसार माध्यमांना ऐकवते आहे...
जैनब पाकिस्तानी मुस्लीम कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. आई-वडील आणि सात बहिणी हे तिचं कुटुंब. वडील हकीम. हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबात परंपरेने चालत आलेला... पण आता डॉक्टर चं प्रस्थ वाढल्यामुळे हकीम कडे फारसं कुणी येत नाही. त्यामुळे त्यांची कमाईसुद्धा बेतास बात... तेवढ्या कमाई वर अख्खं घर चालवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. पण तरी कुटुंबाचा पसारा उत्तरोत्तर वाढत चाललेला... अशातच जैनब ची आई एका मुलाला जन्म देते. तिचे वडील खुश होतात. पण लवकरच लक्षात येतं, मुलाचं शरीर आणि त्यात वाढतेय एक मुलगीच. हकीम साहेब त्या एवढ्याशा जीवाचा गळा घोटायला धावतात, पण बायकोच्या आकान्तामुळे त्यांचा नाईलाज होतो. ते मुल मोठं झाल्यावर जैनब आणि तिच्या बहिणी मुस्तफाच्या मदतीने त्याला आवडीचं पेंटिंग चं काम मिळवून देतात. पण तिथे त्याला अमानुष छळ सोसावा लागतो. एका रात्री हकीम साहेब आपल्या या मुलाचा जीव घेतातच... त्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी मस्जिद ट्रस्टने सांभाळायला दिलेली मोठी रक्कम ते लाच म्हणून देऊन टाकतात. या दरम्यान जैनबचं लग्न होतं, पण नवर्याची आर्थिक परिस्थिती बघता त्यातून मार्ग निघेपर्यंत मुल जन्माला न घालण्याचा निर्णय ती घेते. तिचा हा निर्णय न पटल्याने नवरा तिला माहेरी परत पाठवतो. वेळोवेळी हकीम साहेबांच्या निर्णयांवर ती आक्षेप घेते आणि त्यांच्या मनातली तिच्या विषयीची अढी वाढत जाते. मस्जिद ट्रस्टचे पैसे लाच द्यायला वापरून टाकल्यावर जेव्हा ते ट्रस्टला परत करायची वेळ येते तेव्हा एवढी मोठी रक्कम कुठून उभी करायची असा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा गावातल्या एका माणसाला तवायफ म्हणून नाच गाण्यात धंद्याला लावायला मुली हव्या असतात. तो त्याच्या कडे असणार्या मीना नावाच्या मुलीशी निकाह करून मुलीला जन्म देण्यासाठी हकीम साहेबाना तयार करतो. बदल्यात मस्जिद ट्रस्टला द्यायची सगळी रक्कम एकहाती द्यायचं कबूल करतो. हकीम साहेब तयार होतात. त्यातून हकीम साहेब आणि मीनाला मुलगीही होते. त्या मुलीला मीना जैनब च्या घरी आणून सोडते. जैनब, तिची आई आणि बहिणी यांना हे समजतं तेव्हा  धक्का बसतो. त्या दुसर्या दिवशी सकाळी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. या गोष्टीची बभ्रा नको म्हणून हकीम साहेब त्या छोट्या बाळाचा जीव घ्यायला जातात, तेव्हा संतापून जैनब त्यांच्या वर हल्ला करून त्यांचा जीव घेते.  आणि त्याबद्दल तिला सजा-ए-मौत फर्माव्लेली असते. आपल्याला मुल जन्माला घालून त्याला सुखकर आयुष्य देता येत नसेल तर ते जन्माला घालावं का? आणि जसं हत्या हा गुन्हा आहे, तसं असा जीव जन्माला घालून आयुष्य भर त्याला मरणप्राय जगायला लावणं हा गुन्हा नाही का असा प्रश्न अत्यंत आर्तपणे ती विचारते. जैनबची गोष्ट ऐकणारी वृत्तवाहिनीची एक रिपोर्टर हे ऐकून सुन्न होते. जैनब गुन्हेगार नाही, तिची फाशी थांबवून, हा खटला पुन्हा सुरु करावा यासाठी ती पाकिस्तानच्या पंतप्रधानांना संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. मात्र त्यांची झोपमोड नको म्हणून संबंधित अधिकारी तिला पंतप्रधानांपर्यंत पोचू देत नाहीत. अखेर जैनबला फाशी होतेच...
नंतर आपल्या आईला सांभाळून जैनबच्या बाकीच्या बहिणी जैनब्स कॅफे सुरु करतात. आयेशा या जैनबच्या बहिणीचा मुस्तफा म्हणजे आतिफ अस्लमशी निकाह झालेला असतो. तोही अत्यंत खंबीरपणे  आयेशा आणि तिच्या कुटुंबाला आधार देतो. मीनाने सोडलेली हकीम साहेबांची मुलगीपण या कुटुंबाची लाडकी होते. तिला सगळे प्रेमाने सांभाळतात... इथे सिनेमा संपतो!

हा सिनेमा पाकिस्तान मध्ये तयार झाला आणि तिथे लोकप्रियतेचे सगळे उच्चांक या सिनेमाने निव्वळ एक आठवड्यात मोडले. हे कळलं आणि मन थक्क झालं...
आपल्या शरीराची थरथर क्षणा क्षणाला वाढत जाते. हृदयाचे ठोके वाढतात. पोटात खड्डा पडतो. तृतीय पंथीयांची समाजाकडून होणारी परवड, लोकसंख्या वाढीची समस्या, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, मुलगी नको असल्याची भावना, मुलगी म्हणून तिला भेडसावणारे वेगळे प्रश्न हे सगळं एकत्रितपणे आणि तरीही इतकं स्पष्टपणे हाताळलं गेलंय या सिनेमात. जैनबच्या इच्छेप्रमाणे आता तिच्या आई-बहिणी मोकळा श्वास घेतं आणि नवीन आयुष्य सुरु करतात... एका बाजूला जैनबच्या लढ्यापुढे मान झुकते... डोळ्यातलं पाणी निकराने गालावरून ओघळत असतानाच गाण्याच्या सुरावटी कानावर पडतात... 'मुमकिन है, बहार मुमकिन है...' 

Monday, 5 September 2011

गुरु साक्षात परब्रह्म...!!!

आज शिक्षक दिन! मला आठवतंय, लहान असताना घरी आई आणि शाळेत बाई या दोघींनी आपलं अवघं जग व्यापलेलं असायचं! या दोन व्यक्तींना जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाही याची पक्की खात्री असायची. घरी जसं आपल्या गुणांचा पाढा बाकी कुणीही वाचला तरी आईकडून दाद मिळेपर्यंत आपण खुश नसतो, तसं शाळेत बाई छान म्हणेपर्यंत चैन नसायचं... नवीन फ्रॉक, छान अक्षर, वेळच्या वेळी पूर्ण केलेला गृहपाठ या सगळ्याला बाई जोपर्यंत खुशीची पावती देत नाहीत तोपर्यंत चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं! बाई म्हणजे केवढा भक्कम  आधार असायच्या!
नंतरच्या प्रवासात वेळोवेळी असे अनेक शिक्षक मिळाले. त्यांनी पुस्तकं वाचायला शिकवलीच, पण त्या सोबतच जगण्यासाठी आवश्यक असलेले इतरही अनेक अनिवार्य पाठ सुद्धा शिकवले. पुसाकातल्या अभ्यासावर परीक्षा होते, तेव्हा येत नसलेले प्रश्न ऑप्शन ला टाकता येतात. पण आयुष्याच्या परीक्षेत असे प्रश्न येतात तेव्हा त्या प्रश्नांना धैर्याने भिडणे हाच एकमेव ऑप्शन असतो! आणि त्यासाठी लागणारं साहस त्यांनी दिलं... ठेच लागली तेव्हा उठून उभं राहायला हात दिला... भीती वाटली तेव्हा पाठीवर आधाराचा हात ठेवला... प्रयत्न करण्यावरची इच्छा उडाली तेव्हा सोबत उभं राहून आपली बाजू बळकट  केली... अपयश पचवायला शिकवलं, तसे  यशाच्या आनंदात भरभरून सहभागी झाले... आणि कुठल्याही कठीण वाटणाऱ्या परीक्षेसाठी निघताना नमस्कारासाठी वाकल्यावर तोंड भरून आशीर्वाद दिले! त्या आशीर्वादाचं संचित  नेहमीच बाकी कशाहूनही मोठं आहे! आणि जोपर्यंत ते आशीर्वाद आहेत, तोपर्यंत कुठलीच वाट अवघड नाही याचं समाधान तर जन्मभर पुरून उरणारं...!!!
त्या सर्व आदरणीय आणि सन्माननीय गुरुजनांना मनापासून नमस्कार...!!!

Thursday, 1 September 2011

गणपती : एक आनंदनिधान

कोकणात गणपतीची धमाल वेगळीच. गणपती आले की शाळेला अगदी भरभक्कम आठ/दहा दिवस सुट्टी...  त्यामुळे सुट्टी सुरु झाली की उठून कोर्ल्याच्या घराची वाट धरायची हा नेम गेली कित्येक वर्ष चुकला नाही. कोर्ल्याला माझा मामा राहतो. भर पावसात गणपतीची मूर्ती घेऊन घरी पोचलो, की आजी दारातच पायावर दुध, पाणी घालून आणि औक्षण करून सगळ्यांना घरात घेते... तिथून सगळं घर गणपतीमय होऊन जातं... आणलेल्या मूर्तीला तात्पुरतं एखाद्या चौरंगावर ठेवायचं आणि मग पाहिला अर्धा पाउण  तास त्या मूर्तीला सगळीकडून न्याहाळून भरपूर कोडकौतुक करायचं.  की मग मोर्चा दुसर्या दिवशीच्या पूजेच्या तयारी कडे. ओटी, पडवी, माजघर असलेल्या जुन्या घराचं रंगरूप बदलून आता पोर्च, हॉल, किचन झालं तरी गणपतीचा उत्साह आणि रंगरूप मात्र तसंच आहे. पूर्वी ओटीवर असलेलं गणपतीचं डेकोरेशन आता हॉल मध्ये आलं.  पण अजूनही गणपतीच्या आदल्या दिवशी मध्य रात्रीपर्यंत मनासारखं डेकोरेशन पूर्ण होत नाही. किंवा त्यावर पोटभर उहापोह केल्याशिवाय ते पूर्ण झाल्यासारखं  वाटत नाही हे जास्त खरं आहे!! शिवाय ही तयारी फक्त डेकोरेशन पुरतीच नाही. पूजेचं ताट, त्यात गंध, अक्षता, गूळ खोबरं, कापूर, निरांजनं, अत्तर आणि काय आणि काय...  सकाळी लवकर उठून  फुलं, दुर्वा, पत्री काढणं... एक ना हजार गोष्टी करायच्या असतात. इतकी वर्ष आक्का होती, तोपर्यंत फुलं काढणं हे तिचं काम होतं. आक्का गेली कैक वर्ष आमच्याकडे कामाला यायची, पण ती घरातलीच! अगदी आजोबांपेक्षाही मोठी असल्यामुळे ती त्यांनाही बिनधास्त एखादं फर्मान सोडू शकायची! आणि मग आम्ही पोरं ''आक्का, तू ग्रेट गं!'' असं म्हणत तिला शाबासकी द्यायचो!तर काय सांगत होते, रोज सकाळी देवपूजेला फुलं काढायचा मान आक्काचा होता!  ती सकाळी सातला यायची आणि सगळ्यात आधी फुलं काढायला जायची. ताट भरून फुलं काढायची त्यात सुद्धा किती नजाकत होती! जास्वंद एका बाजूला, तगर, अनंत, दुर्वा, तुळशीच्या मंजिर्या असं सगळं बघूनच प्रसन्न व्हायचं मन! माझी मां  तर म्हणायची पण, आक्का सारखी शिस्तीत आणि सुंदर फुलं काढून दाखवा, मागाल ते बक्षीस देईन... आता आक्का नाही म्हणून फुलं काढायची राहत नाहीत. पण फुलांचं ताट पाहिलं की ही फुलं अक्काने काढलेली नाहीत हे लगेच जाणवतं!
स्वयंपाक घरात उकडीच्या मोदकांची तयारी सुरु होते.
एका बाजूला ही लगबग आणि आपल्याला दूरवरच्या एखाद्या वाडीत लाउड स्पीकर वर 'अशी चिक मोत्याची माळ होती गं, तीस तोळ्याची...' किंवा 'बंधू येईल माहेर न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला...' अशी गाणी ऐकू यायला लागतात. घराला उत्साहाचं उधाण येतं.

यावर्षी सुट्टी नाही म्हणून गणपतीला माझा मुक्काम पुण्यातच. गणपतीला घरी नाही अशी ही पहिलीच वेळ... त्यामुळे घरातल्या गणपतीची जबरदस्त  आठवण येतेय. गणपतीची पूजा सांगायला येणारा नेहमीचा काका, त्याला आजचा एकाच दिवस  आम्ही पोरं गुरुजी गुरुजी म्हणून चिडवतो! खरं तर त्याच्या अंगा- खांद्यावर खेळत लहानाचे मोठे झालो आम्ही. त्यामुळे पूजा, आरती झाली की नमस्कारासाठी वाकल्यावर पाठीवर एक थाप (की धपाटा?) मारून तोंड भरून आशीर्वाद देणारा हा आमचा एकटाच गुरुजी! पूजा झाली की मोदक... प्रत्येकाने एक तरी मोदक करायचाच हा जणू नियमच! त्यामुळे प्रत्येक जण आपलं कला कौशल्य त्या मोदकांवर अज्माव्णारच! दर वर्षी बसक्या नाकाचा, किंवा वेडा वाकडा झालेला पहिला मोदक, मग त्यावर झालेली चिडवा चिडवी... आणि मग ''यावर्षीचा पहिलाच आहे ना, आता दुसरा बघ मस्त करते की नाही...'' असं म्हणत मनासारखा मोदक जमला की आनंदाने माझं पण नाक त्या मोदका सारखंच वर होतं... दरम्यान ''नैवेद्य दाखवायला चला'' अशी आजोबाना order येईपर्यंत हॉल मध्ये कॅरम चे डाव रंगतात. चीटिंग होते, हाणामारी होते... शेवटी जिंकणार्याला एक जास्तीचा मोदक कबूल करून आजोबा उठतात. मग नैवेद्य... पंच पक्वानांनी भरलेलं हिरवं गार केळीचं पान, साजूक तुपाने माखलेला मोदक, त्यावरच्या दुर्वा गणपती बाप्पाला दाखवून झाल्या की हसत खेळत उठलेल्या पंगती... हे सगळं म्हणजे आनंदनिधान असतं!

लहान असताना काजू मोदकाच्या त्रिकोणी पाकिटातल्या आरती संग्रहाचं केवढं अप्रूप होतं... शिवाय संध्याकाळच्या आरत्यांसाठी शेजारी पाजारी जाताना पावसात निसरड्या झालेल्या पायवाटेवर घसरायला होऊ नये म्हणून मामा उचलून घ्यायचा ते सगळं विसरणं कदापीही शक्य नाही... तास दीड तास आरत्या म्हणून आणि टाळ्या वाजवून शेवटी हातांचे तळवे लालेलाल व्हायचे. हे असं अगदी आठ दिवस दणक्यात सुरु असायचं! तो गणपती सगळ्या गावाचा असायचा. इथे शेजारी कोण राहतात  हेही आपल्याला माहित नसतं, आणि तिथे मात्र तुम्ही वर्षातून एकदा गेलात तरी मी कोण हे सांगावं लागत नाही!

आत्ता मी ऑफिस मध्ये बसलीये. नुकताच  मला मामाचा फोन येऊन गेला. ''तुझी आठवण येतेय, गणपती पण विचारत होता, तू कुठेयस असं?'' माझ्या लाडक्या मामाचा आवाज ऐकून मला इथे क्षण भर काही सुचलं नाही. नकळत माझाही आवाज ओला झाला. मला तो अत्तराचा सुवास आणि केळीच्या पानावरचा नैवेद्य, प्राणप्रतिष्ठा केल्या नंतर अजूनच तेजाळलेली गणपतीची मूर्ती... जिवंत भासणारे त्याचे डोळे... हे सगळं इथे माझ्या समोर दिसतंय... आणि मी मनोभावे त्याला हात जोडलेत!