Monday 2 July 2012

गदिमांच्या पंचवटीत...

गदिमांच्या गाण्यांचं बोट धरून लहानाचं मोठं झालेल्या माझ्या सारख्या मुलीला त्यांचं वास्तव्य होतं, त्या पंचवटीत जायला मिळणं म्हणजे गुरुपुष्य, दुग्धशर्करा असे सगळे अपूर्व योग एकाच दिवशी आल्यासारखे...

आज गदिमांची सत्तावन्न बालगीतं, स्फूर्ती गीतं, संस्कार गीतं आणि अंगाई गीतं एकत्रित असलेला संग्रह प्रकाशित होतोय... त्याची बातमी करायची म्हणून प्रकाशक अनिल कुलकर्णीना परवा फोन केला. म्हटलं, ''मला भेटायचंय... बातमी संदर्भात. आणि  शक्य असेल तर श्रीधर आणि शीतल माडगुळकर यांनाही भेटता येईल का?'' कुलकर्णी काकांनी लगेच श्रीधर माडगुळकर यांचा नंबर दिला... त्यांनाही फोन करून ''भेटता येईल का..???'' असं जरा चाचपडतच विचारलं खरं तर...  तेही लगेच म्हणाले, ''हो, ये ना पंचवटीत...'' मी यायचंय...??? आणि तेही पंचवटीत? म्हणजे, गदिमांच्या पंचवटीत??? असं परत एकदा विचारून कन्फर्म करावं का, पण म्हटलं नको... उगाच वेडगळ पणा नको करायला...मला गदिमा नक्की कधी भेटले हे आता आठवतही नाही... खरं तर गदिमा गेले एकोणीसशे सत्त्याहत्तर साली. म्हणजे माझ्या जन्माच्याही अकरा वर्ष आधी. त्या आधी लिहिलेली त्यांची गीतं... मात्र त्यांचे शब्द स्थल-कालाच्या पलीकडे आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा भाग झाले...  म्हणजे माझ्या गाणं ऐकण्याचा प्रवास  'नाच रे मोरा...' ते गीतरामायण असा कधी झाला... कसा झाला... आता काहीच आठवत नाही. पण तो झाला हे खरं... म्हणजे गीतरामायण डोक्यावरून जायच्या वयातही निदान त्यातलं एखादं गाणं वाजायला लागलं तर त्यातले शब्द अचूक गुणगुणता येतील इतकं गीतरामायण ओळखीचं होतं... पुढे त्या शब्दांचे अर्थ कळायला लागले. त्या रचणाऱ्या व्यक्तीच्या लेखणीची ताकद आणि आवाका कळायला लागला. पण त्याच्याही किती तरी आधीच त्या सगळ्या गीतांचं गारुड जे बसलं डोक्यावर ते बसलंच... आजी आजोबांकडे तेव्हा गीत रामायणाच्या कॅसेट होत्या... आठ भाग. साधारण माझ्या आवडीचं गाणं कुठल्या भागात आहे माहिती होतं. त्या कॅसेट्स ची किती पारायणं झाली राम जाणे... पुढे घरी सीडी प्लेयर आला. मग अर्थातच इतर सीडीज बरोबर गीत रामायणाची सीडीही आली. तिने तर पारायणं अजून सोपी केली... आणि फक्त गीत रामायण  नाही, पण गदिमांच्या प्रत्येक गाण्याची हीच खासियत... मग ते नाच रे मोरा आंब्याच्या वनात असो, किंवा झुक झुक झुक झुक आगीन गाडी... ही बालगीतं ऐकली, तशी अनेक असंख्य भावगीतं ऐकली... जिंकू किंवा मरू... हे राष्ट्र देवतांचे... ही गाणी शाळेत ऐकली... म्हटली सुद्धा. 

त्यात आणि परत गदिमा आणि बाबूजी अशी जोडगोळी असेल तर बाकी काही बोलायचीच गरज नाही... हे लिहिताना बाबूजी आणि गदिमांच्या केमिस्ट्री बद्दल ऐकलेला एक किस्सा आठवतोय... एका कुठल्याशा चित्रपटाची काही गीतं अण्णा (गदिमा) लिहित होते. काही कारणाने त्यातली तीन/चार गाणी लिहून झाल्यावर बाकीची एक/दोन गाणी लिहिणं त्यांच्या हातून राहून गेलं... त्याच दरम्यान एक नवीन गीतकार/कवी त्यांच्याकडे येत होते, काम मिळवण्यासाठी...  अण्णा सहज त्या नवोदित गीतकाराला म्हणाले, लिहा बरं हे गीत... त्यांनी गीत लिहिलं. अण्णांनी ते चाल लावायला बाबुजींकडे पाठवलं. बाबुजींनी ते गीत वाचलं. त्यात काही बदल सुचवले आणि परत लिहून आणायला सांगितलं. हे असंच अजून दोन/तीनदा झालं. त्या नवोदित गीतकार महाशयांच्या हे लक्षात आलं की बाबूजींना आपल्या गाण्याला चाल द्यायचं काही मनात नाही. मग त्यांनी ते गीत लिहिण्याचा नाद सोडून दिला. पुढे कधी तरी अण्णांच्या हातून ते गीत लिहून झालं, तेव्हा ते नवोदित गीतकार तिथे उपस्थित होते... अण्णांनी सहज ते गीत त्यांच्या हातात दिलं आणि ''जाता जाता जरा एवढं फडक्यांना द्या हो...'' असं म्हणाले. त्या गीतकाराने डोकं लढवत ते गीत आपल्या हस्ताक्षरात लिहून बाबुजींसमोर धरलं. म्हणाले, ''बाबूजी, आता जरा बघा बरं हे गीत...'' बाबुजींनी कागदावर एक नजर टाकली, आणि क्षणात विचारलं, ''माडगुळकरांचं का हो गीत?'' त्या नवोदित गीतकारावर अक्षरशः तोंडात बोट घालायची वेळ आली... कारण गदिमा आणि बाबूजी हे द्वैत होतंच असं और... 

असे अनेक किस्से आहेत, या दोन्ही अवलीयांचे... शिवाय गदिमांनी लिहिलेलं गीत रामायणचं पहिलं गाणं म्हणे चाल लावायला म्हणून बाबुजींकडे आलं आणि त्यांच्याकडून ते गाणं लिहिलेला कागद कुठेसा हरवला... आता हे गदिमांना सांगायला कुठल्या तोंडाने जायचं म्हणून बाबूजी ते टाळत होते. शेवटी अगदी रेकॉर्डिंग च्या दिवशी घाबरत घाबरत बाबुजींनी फोन केला, की अण्णा अहो, तो गाण्याचा कागद कुठे सापडत नाहीये... गदिमा प्रचंड चिडले... फोनवर अक्षरशः भांडणं झाली... तेव्हा बाबूजी म्हणाले, ''अहो हो, चुकलंय माझं. पण आता रेकॉर्डिंग करायचंय... तर त्याचं काय करूया ते आधी सांगा... नंतर पुन्हा मला बोला हवं तर...'' त्यावर, ''घ्या कागद पेन...'' असं सांगून अण्णांनी ते गाणं फोन वर पुन्हा जसंच्या तसं बाबूजींना उधृत केलं... बाबुजींनी ते लिहून घेतलं आणि मग चाल दिली, असाही एक प्रसंग ऐकलाय... तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना असं नातं होतं म्हणे दोघांचंही... अर्थात असणारच. त्यांच्या कामातही ते दिसतंच ना...

तर अश्या गदिमांच्या घरी, पंचवटीत जायचं म्हटल्यावर मी पुरती वेडावले होते. ठरल्या वेळी तिथे पोचले तर, अनिल कुलकर्णी वाटच पहात होते. त्यांच्याशी परिचय झाला... आम्ही पंचवटीच्या दारातून आत जाताच मला कुलकर्णी काकांनी ''ह्या खुर्चीवर बसून गदिमांनी गीतरामायण लिहिलं...'' असं म्हणत एक खुर्ची दाखवली. मला सुचलंच काही, क्षणभर... आणि दुसर्याच क्षणी मी त्या खुर्चीला हात लावून पाहिला. नमस्कार केला मनातल्या मनात... आणि मग आत गेले.

श्रीधर माडगुळकर आणि त्यांच्या पत्नी शीतल माडगुळकर, म्हणजे अर्थातच गदिमांचा मुलगा आणि सून भेटले... 'नाच रे मोरा...' हा जो संग्रह येतोय, त्याचं संकलन आणि संपादन करण्याची मोठ्ठी जबाबदारी शीतल काकूंनी निभावलीये. आणि नुसतं एखादं काम उरकायच्या भावनेने त्यांनी हे केलेलं नाहीये, तर त्यात आपला सगळा जीव ओतलाय... हे त्यांच्याशी बोलताना जाणवलं. आणि गदिमांच्या घरातल्या कुणाशी तरी मी बोलतीये याचं मलाही टेन्शन आलं नाही, कारण गेल्या क्षणी श्रीधर काका आणि काकू दोघांनीही अगदी जुनी ओळख असल्या सारखंच संभाषण सुरु केलं... 

गीतरामायण, गदिमांची असंख्य गाणी मला माहितीयेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर तर त्यांनाही माझ्याशी किती बोलू आणि किती नको असं झालं. माझ्यासाठी हा खरंच अपूर्व अनुभव होता. श्रीधर काका आणि शीतल काकूंच्या तोंडून त्यांच्या पप्पांच्या काही आठवणी ऐकता आल्या. बोलता बोलता मी सहज आणि अत्यंत प्रामाणिकपणे म्हणून गेले की ''मला जे काही रामायण माहितीये ते गदिमांच्या गीत रामायणामुळे माहितीये... नाही तर मी स्वतःहून रामायण महाभारत वाचायला कधी जाईन असं वाटत नाही. टीव्ही वर प्रसारित झालेले रामायण- महाभारताचे भागही मी पाहिलेले नाहीत... पण गीत रामायण मला अतिशय आवडतं... माझ्या फोन मध्येही त्यातल्या गाण्यांच्या एमपीथ्री फाइल्स आहेत... अनेकदा मी त्या ऐकते.'' मी हे म्हणाले आणि श्रीधर काकांनी अतिशय मायेने मला सांगितलं, ''तुझा एवढा जीव आहे ना, गीत रामायणावर? मग तुला एक सांगू का?'' मी अर्थातच हो म्हटलं, तर त्यांनी सांगितलं, आत्ता आपण ज्या खोलीत बसलो आहोत, त्याच खोलीत बसून पप्पांनी संपूर्ण गीतरामायण लिहिलं... हे ऐकलं आणि खरंच अंगावर रोमांच उभे राहिले माझ्या... (हे वाक्य थोडं पुस्तकी झालंय... पण ते खरंच आहे...) 

नंतर मी काम संपवून निघताना प्रकाशक अनिल कुलकर्णी, आणि श्रीधर काका आणि शीतल काकूंना वाकून नमस्कार केला... तर त्यांनी गदिमांच्या 'नाच रे मोरा' या गीत संग्रहाची सुंदर (ते पुस्तक शब्दशः सुंदर आहे... नक्की बघावं आणि संग्रही असावं असं...) प्रत माझ्या हातात ठेवली... मी लहान असण्याचा अधिकार वापरून सही करून द्या असा हट्ट केला... त्यांनीही लगेच ''चि. भक्तीला, प्रेम आणि आशीर्वादपूर्वक...'' असं लिहित सही केली... (हल्ली बर्याच दिवसात हे शब्द लिहून कुणी काही दिलं नव्हतं... त्यामुळे ते वाचलं आणि परत एकदा मला भरून आलं...) आणि ते पुस्तक पुन्हा माझ्या हातात दिलं. वर श्रीधर काका म्हणालेही, ''गदिमांच्या पुस्तकाची बातमी करायचीये असा जेव्हा तू फोन केलास तेव्हा मला कुणीतरी पंचेचाळीस/पन्नाशी मधली स्त्री येणं अपेक्षित होतं... पण तू तर अगदीच लहान आहेस... तुला गदिमा माहितीयेत, त्यांचं साहित्य माहितीये हे बघून मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय... पंचवटीच्या या खोलीचा स्पर्श हा सुवर्ण स्पर्श आहे... तो लाभला तुला... आता तुही तुझ्या क्षेत्रात नक्की मोठी होशील...'' 

बापरे... त्यांनी दिलेली ती पुस्तकाची प्रत मी अक्षरशः मिरवून माझ्या जवळच्या माणसाना दाखवली... आनंदाने चिंब भिजून काही फोन केले, ''मी गदिमांच्या पंचवटीत जाऊन आले...'' हे सांगायला... योगायोग असा की माझ्या मागच्या ब्लॉग पोस्ट चा शेवट मी गदीमांच्या ओळींनी केला होता. ''ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...'' या त्या ओळी... ती पोस्ट पूर्ण करताना हे माझ्या गावीही नव्हतं की लवकरच, 'ईश्वराचा अंश' लाभलेल्या याच 'आधुनिक वाल्मिकीच्या' पद स्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीचं दर्शन माझ्या नशिबी आहे... माझ्या मराठी असण्याचा मला अभिमान वाटण्याचे जे क्षण आहेत, त्यातला हा अमूल्य क्षण आहे.

Wednesday 20 June 2012

मी अनुभवलेली वारी...


महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पु. ल. देशपांडेंनी असं म्हटलंय की मोटारीतून जाऊन पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेणं कधीही शक्य आहे... पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने जेव्हा लाखो वारकरी उरीपोटी धावत पंढरपूरला जातात, भक्तीभावाने एकमेकांना गळामिठी घालतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये होणारं विठ्ठलाचं दर्शन हे निव्वळ अलौकिक आहे...

खरंच आहे ते... पंढरपूरला मी अजून गेले नाही... त्यामुळे विटेवर उभा असलेला विठ्ठल मी अजून पाहिला नाही... पण या वर्षी एबीपी माझा साठी देहू आळंदीतून होणारं पालखीचं प्रस्थान ते मुक्काम पुणे या टप्प्यातली वारी कव्हर करण्याची संधी मला मिळाली... आणि त्यातून मला पु. लं. म्हणतात, ते विठ्ठलाचं अलौकिक दर्शन मात्र घ्यायला मिळालं... रुढार्थाने म्हटलं तर मी भाविक नाही... कधीतरी आठवण आली, तर घरातल्या देवांसमोर उभं राहून त्यांना हाय हॅलो करणं इतकाच माझा देवांशी संबंध... देवापेक्षा माणसावर विश्वास अधिक असलेल्या पंथातली मी... आणि त्याचं मला कोणतंही अपराधीपण नाही...तर, देहू मधून तुकोबांची पालखी निघाली की दुसर्या दिवशी आळंदीहून माऊलींची पालखी निघते... (वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख आवर्जून माऊली असाच करतात...) आज शेकडो वर्षं झाली... हा नेम चुकलेला नाही... आधी तुकोबा निघणार आणि मग माऊली ही परंपरा आहे...

तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवण्याच्या आदल्या दिवशी माझी एक देहू आळंदी वारी झाली... पालख्यांच्या प्रस्थानांची तयारी कुठपर्यंत आली ते पहाण्यासाठी... मागे एकदा पुण्याहून देहू आळंदी तुळापूर अशी ट्रिप झाली होती... पण या वेळचं जाणं वेगळं होतं... देहूत पोचले. तिथे तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष आणि पालखी सोहळा प्रमुख यांची भेट घेतली, त्यांनी जातीने पुढे होऊन काय काय तयारी झालीये... काय व्हायचीये हे सगळं सांगितलं... तुकाराम महाराज शिळा मंदीर, विठ्ठल रखुमाई मंदीर फिरुन बघितलं... वारकरी हळूहळू जमत होते... दर्शनासाठी रांगा लावत होते. पोलिस फौजाही तैनात होत्या. दुसर्या दिवशी तुकोबांची पालखी प्रस्थान ठेवणार होती. संस्थानची सगळी तयारी पूर्ण झाली होती.

नंतर आळंदी गाठली... इंद्रायणी काठी असलेली देवाची आळंदी एव्हाना वारकर्यांची आळंदी झाली होती... देहूच्या तुलनेत इथली गर्दीही जास्त होती... इंद्रायणीच्या काठावर वारकर्यांनी आपला मुक्काम ठोकला होता. जवळजवळ चार-पाच दिवस आधी पासून महाराष्ट्र भरातून येणार्या दिंड्या दाखल झाल्या होत्या... इंद्रायणीच्या पाण्यात पवित्र स्नानाची लगबग सुरु होती... अर्थात, भाविकांच्या पवित्र स्नानासाठी त्या इंद्रायणीने काय काय अमंगळ रिचवलं ते माऊलींनाच ठाऊक... असो.

तर, तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या प्रस्थानासाठी सज्ज... हजारो वैष्णवांचा मेळा देहू आळंदीत दाखल अशा आशयाची हेडलाईन... भरपूर व्हिज्यूअल्स आणि या सगळ्याच्या पलिकडे जाऊन एकूणच वारी या प्रकाराबद्दल प्रचंड उत्सुकता घेऊन पुण्याच्या वाटेला लागले... त्यानंतर आलेली, पुणं सोडेपर्यंतच्या पालख्यांच्या कव्हरेजची संधीही आनंदाने स्विकारली... कारण वारी मधून कधी न पाहिलेलं एक वेगळं जग पहायला मिळणार हे पहिल्या दिवशीच्या अनुभवातूनच लक्षात आलेलं...

दुसर्या दिवशी पहाटेच उठून देहूत दाखल झालो... आदल्या दिवशीच्या निवांतपणाची जागा आज लगबगीने घेतली होती. गर्दीही वाढली होती... सगळीकडे भरुन राहिलेला उत्साह... माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं... सकाळी तिथे पोचल्या पोचल्या तिथल्या गर्दीत एक walk through केला... कॅमेरा, ओबी व्हॅन वगैरे जय्यत तयारी झाली तसे सगळे माध्यममित्र नाश्ता करायला गेलो... तिथून परत येताना पाहिलं तर वारकर्यांसाठी जेवणावळी सुरु झाल्या होत्या. पोलिस बंदोबस्त वाढला होता. हेच चित्र दुसर्या दिवशी आळंदीत... आळंदीतलं प्रस्थान देहूपेक्षा जास्त आखीव रेखीव... थोडं शिस्तीचं... म्हणजे अमक्या वेळी अमूक एवढ्याच मानाच्या दिंड्यांना प्रवेश... वगैरे... वगैरे... मात्र, आम्हाला, म्हणजे न्यूज चॅनेलचा बूम हातात असलेल्या बातमीदाराला आणि तिच्या-त्याच्या कॅमेरामनला मात्र वाट्टेल तिथे शिरायला वाव होता... टीव्हीवाले आहेत ओ, जाऊ द्या... असं म्हणून जो तो सहकार्य करत होता... म्हणजे देहूत तुकोबांची आणि आळंदीत माऊलींची पालखीही याला अपवाद नाही. जितक्या सहज त्या पालखीतल्या पादुकांना आम्ही हात लावून नमस्कार करु शकलो, तितक्या सहज एकाही वारकर्याला ते भाग्य लाभलं असतं तर कदाचित त्याच्या आयुष्यात आता मरण आलं तरी हरकत नाही असं समाधान निर्माण झालं असतं... आणि अगदी मनापासून सांगायचं तर मला स्वतःला फार अपराधीही वाटत होतं... कारण या वारकर्यांच्या श्रद्धेच्या पासंगालाही पुरणारी आमची श्रद्धा नाही... ही जाणीव कुठेतरी पोखरत राहिली  मनाला...

पालखी प्रस्थान हा सोहळा पहाताना नेत्रदीपक या शब्दाचा अर्थ कळला... इंद्रायणीचा फुललेला काठ पहाताना समर्पण काय असतं हे कळलं... पाऊसपाणी झालेलं नसताना, शेतीच्या कामांचा पत्ताही नसताना हे वारकरी सगळं मागे सोडून पंढरपूरी जायला म्हणून घरदार सोडून देहू- आळंदीत आले... सुमारे अडीचशे ते तीनशे किलोमीटर चालत हे आता पुढचे पंधरा दिवस विठूरायाचा जयघोष करताना थकणार नाहीत... यांचे पाय वळणार नाहीत... उन्हा-पावसातही यांना सुखाची झोप लागेल... चतकोरभर भाकरी आणि घासभर झुणक्यानेही त्यांना तृप्तीची ढेकर येईल... हे सगळं असं कसं होतं... इतकी श्रद्धा नेमकी येते कुठून... मला खरंच काही कळेनासं झालंय... म्हणजे मी लहानपणापासून लागलेली सवय म्हणून अधुमधुन जोडते देवाला हात... सवयीचाच भाग म्हणून क्वचित शुभंकरोती किंवा अथर्वशीर्ष येतं माझ्याही ओठांवर... पण फक्त तेवढंच... माझं इतर सगळं आयुष्य सोडून मी या वारकर्यांसारखी जाऊ नाही शकत त्या भगवंताच्या वाटेवर... माझ्या श्रद्धेच्या या मर्यादा म्हणायच्या की माझ्या साक्षर किंवा सुशिक्षीत असण्याचा परिणाम... प्रश्न पाठ सोडत नाहीत...

एव्हाना पालख्या पुणे मुक्कामी येतात... माझी जबाबदारी संपत आलेली असते... पण थकवा आलेला नसतो अजूनही... पुण्याच्या वाटेवर असताना माऊलींचा रथ वाहणारा एक बैल दगावतो... लोकं पटकन उद्गारतात, तो बैल नशिबवान... माऊलींच्या सेवेत असताना मरण आलं... मला हे पटत नाही... त्याचा जीव गेल्याची रुखरुख लागून रहाते... पालख्या पुढे एक दिवस पुण्यात मुक्काम करतात... पुणेकर पालखीचं दर्शन घ्यायला गर्दी करतात... वारकर्यांसाठी जेवणावळी झडतात. वारकरी पुणं बघतात... पर्वतीचं दर्शन घेतात. पुढे तुकोबा आणि माऊली दोन दिशांनी मार्गस्थ होतात...

आज, आत्ता मी ह्या पोस्टचा रखडलेला शेवट पूर्ण करायला बसलिये...

दरम्यानच्या काळात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये वारकरी मृत्युमुखी पडलेत. तरी वारी सुरुच आहे... गेली शेकडो वर्ष ती सुरु आहे... आणि या नंतरही कदाचित शेकडो वर्ष ती सुरुच रहाणार... गदीमा म्हणतात, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे... माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे... ईश्वराच्या अंशाबद्दल तर माहिती नाही... पण ज्ञानियाचा वा तुक्याचा वंश मात्र आपण आहोत... आणि राहू...

Tuesday 5 June 2012

पाऊस

सकाळ पासून नुसतं भरून आलं होतं इथे...


आत्ता कोसळतोय... पण लढाईला सुरुवात करण्या आधी सैन्याची जमवाजमव करत असल्या सारखं करत  होता दिवसभर...

आधी नुसतं मळभ आलं. मग वारा पडला. मग अगदी काळाकुट्ट अंधार... मग किती तरी वेळ तशीच शांतता. आणि नंतर हळू हळू रिमझिम रिमझिम...


आता तो शांतपणे बरसतोय बाहेर... भिजवतोय सगळ्यांना... सावकाशीने वर्दी देतोय, ''मी आलोय... कळलं का, मी आलोय फायनली...''


हं, तो आलाय... मी ऑफिस च्या खिडकीतून बघतीये त्याला... खूप मोह होतोय खरं तर, पटकन धावत धावत जावं आणि बाहे फैलाके त्याला घट्ट बिलगावं... कोंडलेली आणि साचलेली सगळी तगमग शांत होऊ द्यावी त्याच्या जवळ...


पण पावसाला असं एकटीनं जाऊन भिडायची सवय कुठेय मला... दरवर्षी पाऊस येतो तेव्हा कुणी ना कुणी तरी असतंच बरोबर, त्याच्या स्वागताला सामोरं जायला... आत्ता तसं कुणीच नाहीये... तो आलाय म्हणजे त्या  सगळ्यांचा पत्ता तर विचारणारच  तो... मग आत्ता त्याला उत्तरं देत बसण्यापेक्षा असं त्याच्या पासून लांब राहिलेलंच जास्त चांगलंय... बचावात्मक पवित्रा घेऊन... कारण आता तो सगळं जुनं उकरून काढणार... आणि त्यामागे धावताना माझी त्रेधा तिरपीट उडणार...

एकदा एका मित्रासाठी घर शोधायला आम्ही चार दोस्त बाईक वर हुंदड हुंदड हुंदडत होतो... म्हणजे दोन दोस्तांच्या दोन बाईक आणि त्या दोघांच्या मागे आम्ही दोघी. एकदा असंच भरून आलेलं असताना शहराच्या एका टोकाला असलेली एक साईट बघायला आम्ही दौडत गेलो. परत येताना नेमकं पावसाने गाठलं. ''छे... आत्ता कसा येईल पाऊस?'' असं म्हणून शहाणपणाने निघालेलो. परतीच्या वाटेवर त्याने बरोब्बर आमची जीरवलेली... तसं एखाद्याला खिंडीत कसं गाठायचं ते पावसाला नकोच सांगायला... कुठल्याही आडोश्याला न जुमानता त्याने अक्षरशः सगळीकडून झोडपून काढलेलं त्या दिवशी. एका टपरीवर नंतर प्यायलेला कटिंग चहा हा आयुष्यातला सगळ्यात संस्मरणीय चहा... तसा योग पुन्हा कधीच आला नाही!


नंतर एकदा तू इथे कायमचा आल्या नंतरचा एक  पाऊस  असाच  आत्ता आठवतोय... आणि अर्थात तेव्हा गुलजार साहेबांच्या गाण्यातलं 'एक अकेली छत्री में जब आधे आधे भिग  रहे थे हम...' सुद्धा !!! कारण  छत्री, रेनकोट, जर्किन वगैरे घेऊन काय ना फिरायचं... ते किती ऑड वाटायचं आपल्याला... (हे आपल्याला आदरार्थी बहुवचनी आहे, तुझ्यासाठी... हं ?) मग  पावसाने गाठलं  तर आहेच मी तुझ्या डोक्यावर छत्र धरायला... हे किती गृहीत  होतं  तेव्हा? आणि मग मी पण माझी जबाबदारी आणि कर्तव्य न  चुकता पार पाडायचे... हो, तसे तर आपण  फक्त  बेस्टेस्ट  फ्रेंड्स  होतो. पण मला नेहमी माझी जबाबदारीच  वाटत आलास तू... तेव्हा पाऊस  पडला कि तुझा मला फोन किंवा मेसेज  ठरलेला... ''गाडी जपून  चालव. पहिला पाऊस  झालाय... आय  नीड यु & केअर फॉर यु...'' किंवा रात्री अपरात्री मुसळधार पावसात अडकलास  कि एखाद्या बसच्या शेड ला आसऱ्याला थांबून तुझा फोन  यायचा... ''अगं, मी अडकलोय. काय  तुफ्फान पाऊस  आहे, बोल ना पाऊस  थांबेपर्यंत...'' मग तो पाऊस  पूर्ण  थांबून  तू रूम वर जायला निघेपर्यंत  आपण  बोलायचो. ते दिवस  आता गेलेच...


आता बाहेर पाऊस आलाय आणि माझ्या मनात हे सगळं असं भरून आलेलं... जुनं काय काय आठवत असताना पावसाने माझे डोळेही ओले केलेत. असं वाटतंय की समोरचं काहीच दिसत नाहीये... सगळं जग जे कधी काळी आपलं होतं ते लांब गेलंय... आपल्याला एकट्याला सोडून... आणि अशातच एक मेसेज माझ्या फोन वर झळकलाय... ''निघालीस की फोन कर... निदान चहा प्यायला भेटूया, पाऊस आलाय... मिसिंग यु...'' अचानक माझ्या चेहऱ्यावर स्मित आलंय... दाटून आलेलं मळभ पाऊस कोसळून गेल्यावर उडून गेलंय. आभाळ स्वच्छ झालंय... पडलेला वाराही पुन्हा वाहायच्या तयारीत आहे... पाऊस येतो तो चैतन्य घेऊन... माझ्या साठीही त्याने ते आणलंय... मी एकटी नाहीये... :) पहिला पाऊस... आठवणींचा... डोळे ओलाव्णाऱ्या आठवणींचा... आणि फिरून चैतन्य शिम्पडणारा पाऊस... आय लव्ह यु रेन!!!


Tuesday 22 May 2012

अ डे @ लवासा...


चोवीस एप्रिलपासून स्टार माझाच्या (हं... एक जून पासून एबीपी माझा होतोय आम्ही... बातम्या नाही बदलल्या, बदललंय फक्त नाव...) पुणे ब्युरोला रिपोर्टर म्हणून कामाला सुरुवात केली... इथे येताना खरं तर तसं थोडंसं टेन्शनच होतं. आधीच हातात अनुभव अगदीच तुटपुंजा, तोही वर्तमानपत्राचा. न्यूज चॅनेलचा आणि माझा संबंध चौथ्या सेमिस्टरला (हो ना, पूर्वा...??? मला ते पण आठवत नाहीये...) दिलेल्या टेलिव्हिजन न्यूज प्रोडक्शन या दोन क्रेडिटच्या पेपर पुरता आणि बातम्या पाहण्यापुरताच मर्यादित... त्यामुळे एकंदरच इथलं सेकंदांचं गणित, ब्रेकिंगची धावपळ, कॅमेराला सामोरं जाणं वगैरे जमणार का याबद्दल शंका होत्याच... पण पण एकदा करायचंय म्हटल्यावर आहे त्याला भिडणं गरजेचं होतं... तसं भिडायला सुरुवात केली आणि ते बर्यापैकी जमायलाही लागलंय... असो. तर, नवीन नोकरी बद्दल काही लिहिलं नव्हतं, म्हणून ही प्रस्तावना... आता, ज्यासाठी लिहायला घेतलंय, तो विषय...

त्या दिवशी एका शिबिराचं आमंत्रण आलं ऑफिसमध्ये... त्याच्यावरुन नजर टाकताना वाटलं, हे काहीतरी वेगळं आहे, जाऊन पहायला हवं... रविवार होता, माझी सुट्टी  होती, तरी जायचं ठरवलं... हे शिबिर होतं, लवासामधल्या एका खेडेगावात. लवासा बद्दल बरीच चर्चाचर्वणं कानावरुन आणि डोळ्यांखालून गेली होती. पण माझं लवासाला जाणं मात्र झालं नव्हतं... नेमका या शिबिराचा योग जुळून आला आणि मी जायचं ठरवलं. रविवारी आठ-सव्वाआठला मी आणि माझ्या कॅमेरामॅन सहकारी अमोलने पुणं सोडलं... अमोल याआधी कैकवेळा तिथे जाऊन आलाय... त्यामुळे तो सराईतासारखा गाडी चालवत होता. मी पहिल्यांदाच तिकडे येतेय हे माहिती असल्यामुळे वाटेत तो मला गावांचे, माणसांचे बरेचसे तपशील पुरवत  होता... जिथून लवासा सिटीचा पहिला व्ह्यू दिसतो, तिथे अमोलने गाडी थांबवली आणि मला व्ह्यू बघ असं सांगितलं... ते सुंदर आखीव रेखीव शहर बघून साहजिकच माझ्या तोंडून सुंदर... असे उद्गार आले... दोनेक मिनिटं तिथे थांबून सगळा नजारा बघून मी परत गाडीत बसले... आम्ही पुढे निघालो... मुगाव कडे. लवासा मधले चकाचक रस्ते संपतात आणि मुगावचा रस्ता सुरु होतो... खरं तर त्याला रस्ता म्हणायचा का हा प्रश्न आहेच. कारण वाट चुकलो तर विचारायला  वाटेत औषधालाही माणूस नाही... रस्ता म्हणजे डोंगराचा चढ चढून जायचं. गावात लांब लांब पसरलेली पाच-सहाशे घरं. गावात लाईट नाहीत. मोबाईलला नेटवर्क सुद्धा नाही. म्हणजे एकदा इथे आलो की बाहेरच्या जगापासून संपूर्ण तुटल्याचा अनुभव येतो... माझ्या सारख्या मोबाईलचं व्यसन असलेल्या मुलीला तिथे गेल्यावर अस्वस्थता येणं फारच स्वाभाविक... तशी ती आलीही. पण फार वेळ टिकली नाही हेही खरं. कारण मुळात रस्त्यावर दिसलेली विसंगती पुढे सातत्याने दिसत राहिली. अस्वस्थ करत राहिली... मोबाईल मेल्याची अस्वस्थता त्यापुढे अगदीच छाटछूट होती... 

लवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी बोटिंग आहे... बोटिंग साठी रस्त्याच्या एका बाजूला एखाद्या सुंदर चित्रातल्या सारखा जलाशय. आणि रस्त्याच्या दुसर्या बाजूला कोरडं रखरखीत वाळवंट वाटेल अशी पसरलेली जमीन... मध्ये म्हणायला नदी अशी वाहणारी एक शुष्क रेघ... हे सगळं चित्र बघत बघत मी मुगावात लीलाबाई मरगळे यांच्या घराजवळ पोचले. पुन्हा एकदा, त्या राहतात ती जागा फक्त 'म्हणायला घर...' चार पत्रे ठोकून उभी केलेली शेडच खरं तर... याच ठिकाणी असलेल्या एका मस्त डेरेदार पसरलेल्या फणसाच्या झाडाखाली महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातून आलेली शिबिरार्थी मुलं मला भेटली. शिबिराचे संयोजक असलेले प्रसाद बागवे आणि सुनीती सु. र. भेटल्या. शिबिराच्या कार्यक्रम पत्रिकेतून साधारण अंदाज आला होता त्याप्रमाणे हे शिबीर खरंच काहीसं वेगळं होतं. ग्रामीण भागातले लोक कसे राहतात आणि जगतात हे बाहेरच्या मुलांना माहिती नसतं. शेतीवाडी पहायची असते. नांगरणी, पेरणी हे शब्द फक्त भूगोलाच्या पुस्तकात डोळ्यांखालून गेलेले असतात. शेतकरी उन्हाळ्याच्या अखेरीस शेत जमिनी भाजून पेरणी साठी तयार करतात. ते नक्की का कशासाठी... इथली लोकं पाणी कुठून आणतात? काम-धंदे काय करतात? खातात काय? एकूणच नेमकं कसं जगतात या बद्दल अनेक प्रश्न या मुलाना होते. त्यांची उत्तर त्यांना स्वतःला शोधू द्यावीत म्हणून हे शिबीर... 

ही मुलं इथे आली. आणि जणू इथलीच होऊन गेली. माझ्या तिथल्या चार-पाच तासांच्या मुक्कामात मलाही ते दिसत होतं. आम्ही तिथे पोचलो तेव्हा एक-दोन छोट्या छोट्या मुलीनी पळसाच्या पानाच्या द्रोणातून खाऊ आणून दिला. पाठोपाठ करवंद आणून दिली. सुनीती ताई आणि प्रसाद दादाशी बोलत होते तसं मला या भागातल्या गरीब आदिवासी लोकांबद्दल कळत होतं. मग माझा मोर्चा मी त्याच लोकांकडे वळवला. त्यांच्याशीच बोलायला सुरुवात केली. लवासाच्या येण्याने त्यांचं आयुष्य बदललंय. ते विस्कळीत झालंय असंही म्हणायला हरकत नाही खरं तर. लवासा उभं रहाताना डोंगर दर्या फोडून रस्ते केले गेले. जमिनी सपाट केल्या गेल्या. त्यासाठी ब्लास्टिंग करण्यात आली. त्यात पाण्याचे प्रवाह बदलले. आज मुगाव मध्ये डोंगर कपारीतल्या एका छोट्याश्या झर्यातून झिरपत येणारं पाणी इथले हे आदिवासी लोक अक्षरशः वाटी वाटीने जमा करतात आणि रोजच्या गरजांसाठी वापरतात. मी तो झरा पाहिला आणि हा एवढास्सा झरा अख्ख्या गावाला पाणी पुरवतो हे बघून चकित झाले... 

शिबिराला आलेली मुलं पण इथे चांगलीच रमली. ती इथल्या स्थानिक लोकांना शेतीची कामं करायला मदत करत होती. झऱ्यावरून पाणी आणत होती... आणि भरपूर गोष्टी बघत होती. बोलत होती. खरं तर हे शिबीर घेण्या योग्य दुर्गम खेडी तर खूप आहेत आपल्या आजू-बाजूला... मग हे मुगाव का निवडलं असेल? कारण सरळ होतं. हे मुगाव लवासात आहे... लवासा वरून पास होताना चुक्कूनही मनात येत नाही की या एवढ्या देखण्या शहराच्या पुढे एक असं खेडेगाव वसलं असेल... पण मुलं बोलत होती. लवासा आणि मुगाव मधल्या विसंगती त्यांच्या नजरेतून सुटत नव्हत्या. लवासा मधले रस्ते एवढे चकचकीत आणि इथे हे असे खड्ड्यांनी भरलेले रस्ते. तिथे लाईट, तिथे मोबाईल ला नेटवर्क... मग इथे पण माणसं राहतात ना... इथे वीज कधी येणार? इथे डॉक्टर का नाही? या लोकांना काही झालं तर यांनी जायचं कुठे? करायचं काय? माझ्या मते, मुलांना हे प्रश्न पडणं, आणि मुलांच्या नजरेला या विसंगती ओळखू येणं हेही या शिबिराच्या आयोजन करण्याचं सार्थक होतं...

मुळात लवासा सारखी शहरं हवीत की नकोत हा विषय पुरेसा चर्चिला गेलाय. ती हवीत तर कुणाला हवीत आणि नकोत तर का नकोत हा प्रश्न आहेच... अशी शहरं वसली नाहीत तर आपल्याकडे परदेशी कंपन्या येणार का? त्यांचा पैसा आपल्या देशात गुंतवणार का? या एवढ्याच मुद्द्यांवर लवासाचं समर्थन होऊ शकतं का?   पण मग लवासा म्हणा किंवा असं अजून कुठलं शहर आलं तर इथल्या मातीतल्या लोकांनी कुठे जायचं? लवासा सारखी कंपनी या लोकांना रोजगार, घर-दार देण्याची हमी देते. पण परवाच्या शिबिराला साधा एक पाण्याचा टॅंकर मागवायचा होता, तर लवासाने गावकर्यांना लेखी परवानगी आणा वगैरे कटकटी केल्या... आमचं पाणी यांनी तोडलं म्हणून  टॅंकर मागवण्याची वेळ आली... नाही तर आमचं आम्हाला पुरेल एवढं पाणी नक्की होतं आम्हाला... असं म्हणत त्रासलेल्या गावकर्यांनी मग टॅंकरचा नाद सोडला... अश्या छोट्या छोट्या गोष्टी बघता इथल्या आदिवासींना लवासा खरंच सामावून घेणार का...? की शहर विस्तारत जाईल तसं या आदिवासींचा जगणं जास्त दुष्कर होत जाणार ते येणाऱ्या काळात बघण्याशिवाय माझ्या हातात दुसरं काहीच नाही... 

शिबिराचा रिपोर्ट पाहण्यासाठी लिंक -


Wednesday 14 March 2012

भिंतींवरून...मागचे काही महिने मी ब्लॉग वर किती आळशीपणा करतेय हे तर सगळेच बघतायेत. पण हा आळस झटकून मला लिहितं करायला कारणीभूत ठरली ती एक भिंत...  हं, म्हणजे ''भिंत कशी काय कुणाला लिहितं करेल?'' हे पटकन कुणाच्याही मनात येईल आणि ते स्वाभाविक आहे...पण हो... एक भिंतच निमित्त ठरली माझ्या या लिहिण्याला...

झालं असं, की एका रविवारी निखील बरोबर त्याच्या एका मित्राच्या घरी गेले होते, काही कामासाठी... खरं तर ओळख पाळख नसताना असं अचानक उठून कुणाच्या तरी घरी जाण्याचा माझा स्वभाव नाही. पण काम तेवढं महत्वाचं होतं आणि निखीलने 'दहा मिनिटात जाऊन येऊ...' म्हटल्यामुळे मी नाईलाजाने गेले. मनातून तशी थोडी वैतागलेच होते. पण त्या घरात पाय टाकला आणि जणू माझा नूरच बदलला...मित्र, त्याची बायको आणि त्यांची दोन छोटी पिल्लं, अर्णव आणि अक्षता... (वय अंदाजे ५ आणि ३ वर्ष) असं ते एक छान चौकोनी कुटुंब होतं. टू बीएचके, मस्त वेल फर्निश्ड घर... पण त्या घराचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भिंती... त्याच भिंती, ज्यांनी क्षणात माझा नूर बदलला...

अगदी खरं सांगायचं तर ज्या सोसायटी मध्ये आम्ही गेलो होतो ती सोसायटी बघता तिथल्या एखाद्या घरात पाय टाकल्यावर असा एखादा सुखद आश्चर्याचा धक्का मला मिळेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण तो मिळाला आणि मला तो मनापासून आवडला...


आज काल झालंय असं की एखाद्या हायक्लास सोसायटीत घर म्हटलं की त्याचं इंटिरियर, थीम पेंटिंग वगैरे वर अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला जातो. इतका, की अनेकदा आपण घरात आलोय की एखाद्या सिरीयलच्या सेट वर हेच कळत नाही... (म्हणजे इंटिरियर वगैरे गोष्टीना माझा आक्षेप नाहीये, भविष्यात माझं घर पण मला छान, सुंदर सजवायला आवडेलच... पण ते चित्रातल्या सारखं नसेल, आल्या-गेल्याला वावरायला ओक्वर्ड वाटेल असं नसेल... एवढी काळजी मी आवर्जून घेईन... ) तर सांगायचा मुद्दा काय की अशा चित्रातल्या सारख्या घरात राहणाऱ्या लहान मुलांची मला खुपदा काळजी वाटते... कशी राहत असतील बिचारी? वगैरे वगैरे अनेक विचार त्या सोसायटीतल्या 'त्या' घरी जाताना माझ्या डोक्यात होते.

मात्र त्या घरातली लहान मुलं किती नशीबवान आहेत हे ओळखायला मला त्या मुलांना भेटायला किंवा त्यांच्या आई-बाबांशी बोलायलाही लागलं नाही.
कारण त्या आधीच मला दिसल्या भिंती...  त्या भिंतींवर मला छोटा भीम, राजू, जग्गू, छुटकी आणि कार्टून फिल्म्स मधले अजून कुणी-कुणी दोस्त भेटले... (thank you आदित्य, तुझ्यामुळे मी या सगळ्यांना नावानिशी ओळखू शकले... :) त्यांच्या अवती भवती असंख्य रंगीबेरंगी रेघोट्या, आणि काय आणि काय...  आई आणि बाबा ने पेंट वर आपलं कितीसं बजेट खर्ची पडलंय याचा किंचितही बाऊ न करता बच्चे कंपनीला त्यांचे रंग उधळण्यासाठी आपल्या भिंतींचा कॅनव्हास असा अगदी खुला करून दिला होता... एवढं कमी म्हणून ते सगळे दोस्त बाबा ने स्वतः भिंतीवर रेखाटले होते...

त्या भिंती बघितल्या आणि मला माझं लहानपण आठवलं... मी भिंती कितपत रंगवल्या होत्या आठवत नाही आता... पण माझ्याकडे असलेला कॅरम बोर्ड मात्र मागच्या बाजूने मी आई-बाबा, त्यांचे मित्र मैत्रिणी, मामा, मावश्या, काका, आजी, आजोबा वगैरेंच्या नावाने भरून टाकला होता... तेव्हा नुकतं कुठे मी लिहायला शिकले असेन... त्यामुळे मी नावं ती काय लिहिली असणार? पण तरी तो कॅरम आणि माझी ती बाळबोध अक्षरं हा आजही अनेकांच्या आठवणीतला आणि कौतुकाचा विषय आहेत...   

या भिंतींच्या आणि कॅरमच्या निमित्ताने मला गुलजार साहेबांची 'पुखराज' मधली एक कविता आठवली. कवितेचं नाव आहे Drawing , ती कविता अशी...

न-न, रहेने दो, मत मिटाओ इन्हें...
इन लकीरोंको यूँही रहेने दो...
नन्हे नन्हे गुलाबी हाथोंसे
मेरे मासूम नन्हे बच्चे ने
टेढ़ी-मेढ़ी लकीरें खींची है...
क्या हुआ 'शक्ल' बन सकी न अगर...
मेरे बच्चे के हाथ है इनमे,
मेरी पहेचान है लकीरों में... 

आपल्या मुलाने ओढलेल्या रेघोट्या बघताना त्यात स्वतःची 'पहेचान' अशी प्रत्येक आई-बापाला दिसते... नाही का?
अर्णव-अक्षता च्या आई-बाबांना भिंतींवरच्या चित्रकलेत ती दिसली... माझ्या आई-बाबांना माझ्या कॅरम बोर्डवरच्या बाळबोध अक्षरांत ती दिसली...


बाल मानसशास्त्र वगैरे मला कळत नाही... पण एक कळतं. आपल्या मुलांना असा मुक्त मोकळं जगण्याचा अवकाश देणारे आई-बाबा खूप ग्रेट असतात... त्यांच्या मुलांना ते धाकात ठेवतात, पण तेव्हाच दुसर्या बाजूला ते मुलांना व्यक्त व्हायला शिकवतात आणि तशी संधीही देतात... आज कालच्या जगात व्यक्त व्हायला शिकवणं या पेक्षा महत्वाचं दुसरं काय असणार न?

उप्स, त्या भिंतींनी मला खूप वहावत नेलं का...???

असो...