Wednesday 14 March 2012

भिंतींवरून...मागचे काही महिने मी ब्लॉग वर किती आळशीपणा करतेय हे तर सगळेच बघतायेत. पण हा आळस झटकून मला लिहितं करायला कारणीभूत ठरली ती एक भिंत...  हं, म्हणजे ''भिंत कशी काय कुणाला लिहितं करेल?'' हे पटकन कुणाच्याही मनात येईल आणि ते स्वाभाविक आहे...पण हो... एक भिंतच निमित्त ठरली माझ्या या लिहिण्याला...

झालं असं, की एका रविवारी निखील बरोबर त्याच्या एका मित्राच्या घरी गेले होते, काही कामासाठी... खरं तर ओळख पाळख नसताना असं अचानक उठून कुणाच्या तरी घरी जाण्याचा माझा स्वभाव नाही. पण काम तेवढं महत्वाचं होतं आणि निखीलने 'दहा मिनिटात जाऊन येऊ...' म्हटल्यामुळे मी नाईलाजाने गेले. मनातून तशी थोडी वैतागलेच होते. पण त्या घरात पाय टाकला आणि जणू माझा नूरच बदलला...मित्र, त्याची बायको आणि त्यांची दोन छोटी पिल्लं, अर्णव आणि अक्षता... (वय अंदाजे ५ आणि ३ वर्ष) असं ते एक छान चौकोनी कुटुंब होतं. टू बीएचके, मस्त वेल फर्निश्ड घर... पण त्या घराचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या भिंती... त्याच भिंती, ज्यांनी क्षणात माझा नूर बदलला...

अगदी खरं सांगायचं तर ज्या सोसायटी मध्ये आम्ही गेलो होतो ती सोसायटी बघता तिथल्या एखाद्या घरात पाय टाकल्यावर असा एखादा सुखद आश्चर्याचा धक्का मला मिळेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण तो मिळाला आणि मला तो मनापासून आवडला...


आज काल झालंय असं की एखाद्या हायक्लास सोसायटीत घर म्हटलं की त्याचं इंटिरियर, थीम पेंटिंग वगैरे वर अक्षरशः पाण्यासारखा पैसा ओतला जातो. इतका, की अनेकदा आपण घरात आलोय की एखाद्या सिरीयलच्या सेट वर हेच कळत नाही... (म्हणजे इंटिरियर वगैरे गोष्टीना माझा आक्षेप नाहीये, भविष्यात माझं घर पण मला छान, सुंदर सजवायला आवडेलच... पण ते चित्रातल्या सारखं नसेल, आल्या-गेल्याला वावरायला ओक्वर्ड वाटेल असं नसेल... एवढी काळजी मी आवर्जून घेईन... ) तर सांगायचा मुद्दा काय की अशा चित्रातल्या सारख्या घरात राहणाऱ्या लहान मुलांची मला खुपदा काळजी वाटते... कशी राहत असतील बिचारी? वगैरे वगैरे अनेक विचार त्या सोसायटीतल्या 'त्या' घरी जाताना माझ्या डोक्यात होते.

मात्र त्या घरातली लहान मुलं किती नशीबवान आहेत हे ओळखायला मला त्या मुलांना भेटायला किंवा त्यांच्या आई-बाबांशी बोलायलाही लागलं नाही.
कारण त्या आधीच मला दिसल्या भिंती...  त्या भिंतींवर मला छोटा भीम, राजू, जग्गू, छुटकी आणि कार्टून फिल्म्स मधले अजून कुणी-कुणी दोस्त भेटले... (thank you आदित्य, तुझ्यामुळे मी या सगळ्यांना नावानिशी ओळखू शकले... :) त्यांच्या अवती भवती असंख्य रंगीबेरंगी रेघोट्या, आणि काय आणि काय...  आई आणि बाबा ने पेंट वर आपलं कितीसं बजेट खर्ची पडलंय याचा किंचितही बाऊ न करता बच्चे कंपनीला त्यांचे रंग उधळण्यासाठी आपल्या भिंतींचा कॅनव्हास असा अगदी खुला करून दिला होता... एवढं कमी म्हणून ते सगळे दोस्त बाबा ने स्वतः भिंतीवर रेखाटले होते...

त्या भिंती बघितल्या आणि मला माझं लहानपण आठवलं... मी भिंती कितपत रंगवल्या होत्या आठवत नाही आता... पण माझ्याकडे असलेला कॅरम बोर्ड मात्र मागच्या बाजूने मी आई-बाबा, त्यांचे मित्र मैत्रिणी, मामा, मावश्या, काका, आजी, आजोबा वगैरेंच्या नावाने भरून टाकला होता... तेव्हा नुकतं कुठे मी लिहायला शिकले असेन... त्यामुळे मी नावं ती काय लिहिली असणार? पण तरी तो कॅरम आणि माझी ती बाळबोध अक्षरं हा आजही अनेकांच्या आठवणीतला आणि कौतुकाचा विषय आहेत...   

या भिंतींच्या आणि कॅरमच्या निमित्ताने मला गुलजार साहेबांची 'पुखराज' मधली एक कविता आठवली. कवितेचं नाव आहे Drawing , ती कविता अशी...

न-न, रहेने दो, मत मिटाओ इन्हें...
इन लकीरोंको यूँही रहेने दो...
नन्हे नन्हे गुलाबी हाथोंसे
मेरे मासूम नन्हे बच्चे ने
टेढ़ी-मेढ़ी लकीरें खींची है...
क्या हुआ 'शक्ल' बन सकी न अगर...
मेरे बच्चे के हाथ है इनमे,
मेरी पहेचान है लकीरों में... 

आपल्या मुलाने ओढलेल्या रेघोट्या बघताना त्यात स्वतःची 'पहेचान' अशी प्रत्येक आई-बापाला दिसते... नाही का?
अर्णव-अक्षता च्या आई-बाबांना भिंतींवरच्या चित्रकलेत ती दिसली... माझ्या आई-बाबांना माझ्या कॅरम बोर्डवरच्या बाळबोध अक्षरांत ती दिसली...


बाल मानसशास्त्र वगैरे मला कळत नाही... पण एक कळतं. आपल्या मुलांना असा मुक्त मोकळं जगण्याचा अवकाश देणारे आई-बाबा खूप ग्रेट असतात... त्यांच्या मुलांना ते धाकात ठेवतात, पण तेव्हाच दुसर्या बाजूला ते मुलांना व्यक्त व्हायला शिकवतात आणि तशी संधीही देतात... आज कालच्या जगात व्यक्त व्हायला शिकवणं या पेक्षा महत्वाचं दुसरं काय असणार न?

उप्स, त्या भिंतींनी मला खूप वहावत नेलं का...???

असो...