महाराष्ट्राचं लाडकं दैवत असलेल्या पु. ल. देशपांडेंनी असं म्हटलंय की मोटारीतून जाऊन पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेणं कधीही शक्य आहे... पण आषाढी एकादशीच्या निमित्ताने जेव्हा लाखो वारकरी उरीपोटी धावत पंढरपूरला जातात, भक्तीभावाने एकमेकांना गळामिठी घालतात तेव्हा त्यांच्या डोळ्यांमध्ये होणारं विठ्ठलाचं दर्शन हे निव्वळ अलौकिक आहे...
खरंच आहे ते... पंढरपूरला मी अजून गेले नाही... त्यामुळे विटेवर उभा असलेला विठ्ठल मी अजून पाहिला नाही... पण या वर्षी एबीपी माझा साठी देहू आळंदीतून होणारं पालखीचं प्रस्थान ते मुक्काम पुणे या टप्प्यातली वारी कव्हर करण्याची संधी मला मिळाली... आणि त्यातून मला पु. लं. म्हणतात, ते विठ्ठलाचं अलौकिक दर्शन मात्र घ्यायला मिळालं... रुढार्थाने म्हटलं तर मी भाविक नाही... कधीतरी आठवण आली, तर घरातल्या देवांसमोर उभं राहून त्यांना हाय हॅलो करणं इतकाच माझा देवांशी संबंध... देवापेक्षा माणसावर विश्वास अधिक असलेल्या पंथातली मी... आणि त्याचं मला कोणतंही अपराधीपण नाही...
तर, देहू मधून तुकोबांची पालखी निघाली की दुसर्या दिवशी आळंदीहून माऊलींची पालखी निघते... (वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख आवर्जून माऊली असाच करतात...) आज शेकडो वर्षं झाली... हा नेम चुकलेला नाही... आधी तुकोबा निघणार आणि मग माऊली ही परंपरा आहे...
तुकोबांची पालखी देहूतून प्रस्थान ठेवण्याच्या आदल्या दिवशी माझी एक देहू आळंदी वारी झाली... पालख्यांच्या प्रस्थानांची तयारी कुठपर्यंत आली ते पहाण्यासाठी... मागे एकदा पुण्याहून देहू आळंदी तुळापूर अशी ट्रिप झाली होती... पण या वेळचं जाणं वेगळं होतं... देहूत पोचले. तिथे तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष आणि पालखी सोहळा प्रमुख यांची भेट घेतली, त्यांनी जातीने पुढे होऊन काय काय तयारी झालीये... काय व्हायचीये हे सगळं सांगितलं... तुकाराम महाराज शिळा मंदीर, विठ्ठल रखुमाई मंदीर फिरुन बघितलं... वारकरी हळूहळू जमत होते... दर्शनासाठी रांगा लावत होते. पोलिस फौजाही तैनात होत्या. दुसर्या दिवशी तुकोबांची पालखी प्रस्थान ठेवणार होती. संस्थानची सगळी तयारी पूर्ण झाली होती.
नंतर आळंदी गाठली... इंद्रायणी काठी असलेली देवाची आळंदी एव्हाना वारकर्यांची आळंदी झाली होती... देहूच्या तुलनेत इथली गर्दीही जास्त होती... इंद्रायणीच्या काठावर वारकर्यांनी आपला मुक्काम ठोकला होता. जवळजवळ चार-पाच दिवस आधी पासून महाराष्ट्र भरातून येणार्या दिंड्या दाखल झाल्या होत्या... इंद्रायणीच्या पाण्यात पवित्र स्नानाची लगबग सुरु होती... अर्थात, भाविकांच्या पवित्र स्नानासाठी त्या इंद्रायणीने काय काय अमंगळ रिचवलं ते माऊलींनाच ठाऊक... असो.
तर, तुकोबा आणि माऊलींच्या पालख्या प्रस्थानासाठी सज्ज... हजारो वैष्णवांचा मेळा देहू आळंदीत दाखल अशा आशयाची हेडलाईन... भरपूर व्हिज्यूअल्स आणि या सगळ्याच्या पलिकडे जाऊन एकूणच वारी या प्रकाराबद्दल प्रचंड उत्सुकता घेऊन पुण्याच्या वाटेला लागले... त्यानंतर आलेली, पुणं सोडेपर्यंतच्या पालख्यांच्या कव्हरेजची संधीही आनंदाने स्विकारली... कारण वारी मधून कधी न पाहिलेलं एक वेगळं जग पहायला मिळणार हे पहिल्या दिवशीच्या अनुभवातूनच लक्षात आलेलं...
दुसर्या दिवशी पहाटेच उठून देहूत दाखल झालो... आदल्या दिवशीच्या निवांतपणाची जागा आज लगबगीने घेतली होती. गर्दीही वाढली होती... सगळीकडे भरुन राहिलेला उत्साह... माझ्यासाठी हे सगळंच नवीन होतं... सकाळी तिथे पोचल्या पोचल्या तिथल्या गर्दीत एक walk through केला... कॅमेरा, ओबी व्हॅन वगैरे जय्यत तयारी झाली तसे सगळे माध्यममित्र नाश्ता करायला गेलो... तिथून परत येताना पाहिलं तर वारकर्यांसाठी जेवणावळी सुरु झाल्या होत्या. पोलिस बंदोबस्त वाढला होता. हेच चित्र दुसर्या दिवशी आळंदीत... आळंदीतलं प्रस्थान देहूपेक्षा जास्त आखीव रेखीव... थोडं शिस्तीचं... म्हणजे अमक्या वेळी अमूक एवढ्याच मानाच्या दिंड्यांना प्रवेश... वगैरे... वगैरे... मात्र, आम्हाला, म्हणजे न्यूज चॅनेलचा बूम हातात असलेल्या बातमीदाराला आणि तिच्या-त्याच्या कॅमेरामनला मात्र वाट्टेल तिथे शिरायला वाव होता... टीव्हीवाले आहेत ओ, जाऊ द्या... असं म्हणून जो तो सहकार्य करत होता... म्हणजे देहूत तुकोबांची आणि आळंदीत माऊलींची पालखीही याला अपवाद नाही. जितक्या सहज त्या पालखीतल्या पादुकांना आम्ही हात लावून नमस्कार करु शकलो, तितक्या सहज एकाही वारकर्याला ते भाग्य लाभलं असतं तर कदाचित त्याच्या आयुष्यात आता मरण आलं तरी हरकत नाही असं समाधान निर्माण झालं असतं... आणि अगदी मनापासून सांगायचं तर मला स्वतःला फार अपराधीही वाटत होतं... कारण या वारकर्यांच्या श्रद्धेच्या पासंगालाही पुरणारी आमची श्रद्धा नाही... ही जाणीव कुठेतरी पोखरत राहिली मनाला...
पालखी प्रस्थान हा सोहळा पहाताना नेत्रदीपक या शब्दाचा अर्थ कळला... इंद्रायणीचा फुललेला काठ पहाताना समर्पण काय असतं हे कळलं... पाऊसपाणी झालेलं नसताना, शेतीच्या कामांचा पत्ताही नसताना हे वारकरी सगळं मागे सोडून पंढरपूरी जायला म्हणून घरदार सोडून देहू- आळंदीत आले... सुमारे अडीचशे ते तीनशे किलोमीटर चालत हे आता पुढचे पंधरा दिवस विठूरायाचा जयघोष करताना थकणार नाहीत... यांचे पाय वळणार नाहीत... उन्हा-पावसातही यांना सुखाची झोप लागेल... चतकोरभर भाकरी आणि घासभर झुणक्यानेही त्यांना तृप्तीची ढेकर येईल... हे सगळं असं कसं होतं... इतकी श्रद्धा नेमकी येते कुठून... मला खरंच काही कळेनासं झालंय... म्हणजे मी लहानपणापासून लागलेली सवय म्हणून अधुमधुन जोडते देवाला हात... सवयीचाच भाग म्हणून क्वचित शुभंकरोती किंवा अथर्वशीर्ष येतं माझ्याही ओठांवर... पण फक्त तेवढंच... माझं इतर सगळं आयुष्य सोडून मी या वारकर्यांसारखी जाऊ नाही शकत त्या भगवंताच्या वाटेवर... माझ्या श्रद्धेच्या या मर्यादा म्हणायच्या की माझ्या साक्षर किंवा सुशिक्षीत असण्याचा परिणाम... प्रश्न पाठ सोडत नाहीत...
एव्हाना पालख्या पुणे मुक्कामी येतात... माझी जबाबदारी संपत आलेली असते... पण थकवा आलेला नसतो अजूनही... पुण्याच्या वाटेवर असताना माऊलींचा रथ वाहणारा एक बैल दगावतो... लोकं पटकन उद्गारतात, तो बैल नशिबवान... माऊलींच्या सेवेत असताना मरण आलं... मला हे पटत नाही... त्याचा जीव गेल्याची रुखरुख लागून रहाते... पालख्या पुढे एक दिवस पुण्यात मुक्काम करतात... पुणेकर पालखीचं दर्शन घ्यायला गर्दी करतात... वारकर्यांसाठी जेवणावळी झडतात. वारकरी पुणं बघतात... पर्वतीचं दर्शन घेतात. पुढे तुकोबा आणि माऊली दोन दिशांनी मार्गस्थ होतात...
आज, आत्ता मी ह्या पोस्टचा रखडलेला शेवट पूर्ण करायला बसलिये...
दरम्यानच्या काळात तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये वारकरी मृत्युमुखी पडलेत. तरी वारी सुरुच आहे... गेली शेकडो वर्ष ती सुरु आहे... आणि या नंतरही कदाचित शेकडो वर्ष ती सुरुच रहाणार... गदीमा म्हणतात, ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे... माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे... ईश्वराच्या अंशाबद्दल तर माहिती नाही... पण ज्ञानियाचा वा तुक्याचा वंश मात्र आपण आहोत... आणि राहू...
वर्णन छान आहे (नेहमीप्रमाणे). पण आशय नी विषयवार चर्चा होऊ शकते..या पोस्टमध्ये फारसे नाविन्य नाही..श्रद्धा नी निष्क्रियता याचा संबंध जोडता आला तर पहा (!) अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे.
ReplyDeleteहं, खरंय... पण मी सगळंच पहिल्यांदा अनुभवल्यामुळे माझ्यासाठी सगळंच नवीन आहे... आणि मी आधीच म्हटलं तसं, खूप विस्कळीत झाली पोस्ट... पण ती सावरायला गेले नाही. नाही तर मग रखडली असती...
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteसुंदर लिहिले आहे .
ReplyDeleteगदिमा ह्यांच्या ओळीने लेखाचा शेवट करून लेख एका वेगळ्या उंचीवर नेला आहे.
Viskalit etc kashala mhanave.. tu manapasun lihile te aatun umtaly.. baki charcha nishphal..
ReplyDelete