Saturday, 10 September 2011

बोल...

(सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला चित्रपट परीक्षण वगैरे बिलकुल लिहिता येत नाही. आणि पडद्यावर जे दिसतं त्या व्यतिरिक्त मला सिनेमा फारसा कळतही नाही. गेले दोन आठवडे बघायचा राहिलेला एक सिनेमा फायनली आज सकाळी पाहून झाला, आणि वाटलं जे वाटतंय ते शब्दात मांडून पाहावं, म्हणून हा प्रयत्न...)
शोएब मन्सूर हे नाव रानडे मध्ये जर्नालिझम करत असताना नखाते सरांच्या तोंडून ऐकलं होतं. मन्सूर च्या 'खुदा के लिये' चं सरांनी भरपूर कौतुक केलं होतं. त्यामुळे त्याचं नाव विशेष लक्षात राहिलं. खुदा के लिये मिळवून पहायचा होता, पण कालांतराने विषय मागे पडला तसा तो बघायचाही राहून गेला. त्यानंतर `बोल` च्या जाहिरातीमधून पुन्हा एकदा शोएब मन्सूर हे नाव नजरेस पडलं. ३१ ऑगस्ट ला रमजान ईद च्या मुहूर्तावर हा सिनेमा भारतात रिलीज होणार होता. आणि यावेळी मला हा सिनेमा अजिबात चुकवायचा नव्हता. पण तरी आज उद्या करता करता शेवटी आज मला सोयीच्या वेळी आणि सोयीच्या ठिकाणी शो मिळाला. आणि सोबत हा विषय नक्की आवडेल अश्या संवेदनशील मैत्रिणीची कंपनी मिळाली. त्यामुळे आज `बोल` पाहून झाला.
एक हादरवून सोडणारा अनुभव होता. माझ्या इतर सिनेमा प्रेमी मित्र मंडळींत  मी अगदीच 'odd girl out ' आहे खरं म्हणजे. केवळ नाईलाज म्हणून मी त्यांच्या बरोबर काही सिनेमे पहातेही. पण सिनेमा हॉल मधून बाहेर पडल्यावर पाचव्या मिनिटाला मी त्या सिनेमातूनही बाहेर पडलेली असते. पण आज तसं झालं नाही. सिनेमा संपवून ऑफिस मध्ये पोचले, कामाला लागून हाताखालच्या काही गोष्टी संपवल्या. पण अजूनही 'बोल' मधले हुंकार, हुंदके आणि उसासे माझी पाठ सोडायला तयार नाहीत.
बोल ही जैनब ची गोष्ट आहे. ती फाशीच्या फन्द्यावरून आपली कहाणी प्रसार माध्यमांना ऐकवते आहे...
जैनब पाकिस्तानी मुस्लीम कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. आई-वडील आणि सात बहिणी हे तिचं कुटुंब. वडील हकीम. हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबात परंपरेने चालत आलेला... पण आता डॉक्टर चं प्रस्थ वाढल्यामुळे हकीम कडे फारसं कुणी येत नाही. त्यामुळे त्यांची कमाईसुद्धा बेतास बात... तेवढ्या कमाई वर अख्खं घर चालवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. पण तरी कुटुंबाचा पसारा उत्तरोत्तर वाढत चाललेला... अशातच जैनब ची आई एका मुलाला जन्म देते. तिचे वडील खुश होतात. पण लवकरच लक्षात येतं, मुलाचं शरीर आणि त्यात वाढतेय एक मुलगीच. हकीम साहेब त्या एवढ्याशा जीवाचा गळा घोटायला धावतात, पण बायकोच्या आकान्तामुळे त्यांचा नाईलाज होतो. ते मुल मोठं झाल्यावर जैनब आणि तिच्या बहिणी मुस्तफाच्या मदतीने त्याला आवडीचं पेंटिंग चं काम मिळवून देतात. पण तिथे त्याला अमानुष छळ सोसावा लागतो. एका रात्री हकीम साहेब आपल्या या मुलाचा जीव घेतातच... त्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी मस्जिद ट्रस्टने सांभाळायला दिलेली मोठी रक्कम ते लाच म्हणून देऊन टाकतात. या दरम्यान जैनबचं लग्न होतं, पण नवर्याची आर्थिक परिस्थिती बघता त्यातून मार्ग निघेपर्यंत मुल जन्माला न घालण्याचा निर्णय ती घेते. तिचा हा निर्णय न पटल्याने नवरा तिला माहेरी परत पाठवतो. वेळोवेळी हकीम साहेबांच्या निर्णयांवर ती आक्षेप घेते आणि त्यांच्या मनातली तिच्या विषयीची अढी वाढत जाते. मस्जिद ट्रस्टचे पैसे लाच द्यायला वापरून टाकल्यावर जेव्हा ते ट्रस्टला परत करायची वेळ येते तेव्हा एवढी मोठी रक्कम कुठून उभी करायची असा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा गावातल्या एका माणसाला तवायफ म्हणून नाच गाण्यात धंद्याला लावायला मुली हव्या असतात. तो त्याच्या कडे असणार्या मीना नावाच्या मुलीशी निकाह करून मुलीला जन्म देण्यासाठी हकीम साहेबाना तयार करतो. बदल्यात मस्जिद ट्रस्टला द्यायची सगळी रक्कम एकहाती द्यायचं कबूल करतो. हकीम साहेब तयार होतात. त्यातून हकीम साहेब आणि मीनाला मुलगीही होते. त्या मुलीला मीना जैनब च्या घरी आणून सोडते. जैनब, तिची आई आणि बहिणी यांना हे समजतं तेव्हा  धक्का बसतो. त्या दुसर्या दिवशी सकाळी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. या गोष्टीची बभ्रा नको म्हणून हकीम साहेब त्या छोट्या बाळाचा जीव घ्यायला जातात, तेव्हा संतापून जैनब त्यांच्या वर हल्ला करून त्यांचा जीव घेते.  आणि त्याबद्दल तिला सजा-ए-मौत फर्माव्लेली असते. आपल्याला मुल जन्माला घालून त्याला सुखकर आयुष्य देता येत नसेल तर ते जन्माला घालावं का? आणि जसं हत्या हा गुन्हा आहे, तसं असा जीव जन्माला घालून आयुष्य भर त्याला मरणप्राय जगायला लावणं हा गुन्हा नाही का असा प्रश्न अत्यंत आर्तपणे ती विचारते. जैनबची गोष्ट ऐकणारी वृत्तवाहिनीची एक रिपोर्टर हे ऐकून सुन्न होते. जैनब गुन्हेगार नाही, तिची फाशी थांबवून, हा खटला पुन्हा सुरु करावा यासाठी ती पाकिस्तानच्या पंतप्रधानांना संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. मात्र त्यांची झोपमोड नको म्हणून संबंधित अधिकारी तिला पंतप्रधानांपर्यंत पोचू देत नाहीत. अखेर जैनबला फाशी होतेच...
नंतर आपल्या आईला सांभाळून जैनबच्या बाकीच्या बहिणी जैनब्स कॅफे सुरु करतात. आयेशा या जैनबच्या बहिणीचा मुस्तफा म्हणजे आतिफ अस्लमशी निकाह झालेला असतो. तोही अत्यंत खंबीरपणे  आयेशा आणि तिच्या कुटुंबाला आधार देतो. मीनाने सोडलेली हकीम साहेबांची मुलगीपण या कुटुंबाची लाडकी होते. तिला सगळे प्रेमाने सांभाळतात... इथे सिनेमा संपतो!

हा सिनेमा पाकिस्तान मध्ये तयार झाला आणि तिथे लोकप्रियतेचे सगळे उच्चांक या सिनेमाने निव्वळ एक आठवड्यात मोडले. हे कळलं आणि मन थक्क झालं...
आपल्या शरीराची थरथर क्षणा क्षणाला वाढत जाते. हृदयाचे ठोके वाढतात. पोटात खड्डा पडतो. तृतीय पंथीयांची समाजाकडून होणारी परवड, लोकसंख्या वाढीची समस्या, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, मुलगी नको असल्याची भावना, मुलगी म्हणून तिला भेडसावणारे वेगळे प्रश्न हे सगळं एकत्रितपणे आणि तरीही इतकं स्पष्टपणे हाताळलं गेलंय या सिनेमात. जैनबच्या इच्छेप्रमाणे आता तिच्या आई-बहिणी मोकळा श्वास घेतं आणि नवीन आयुष्य सुरु करतात... एका बाजूला जैनबच्या लढ्यापुढे मान झुकते... डोळ्यातलं पाणी निकराने गालावरून ओघळत असतानाच गाण्याच्या सुरावटी कानावर पडतात... 'मुमकिन है, बहार मुमकिन है...' 

8 comments:

 1. Poorna cinema parat mazya dolyansamor ulgadla. chaan lihlays.
  P.S: mala sanvedanshil mhanlya baddal dhanyawad :)

  ReplyDelete
 2. Thanks Poorva... & yes, u DESERVE it...!!!

  ReplyDelete
 3. सिनेमा मी न बघताही डोळ्यासमोर उभा राहिला :) साधं आणि चांगलं लिहिलंयस. खुदा के लिए तू बघितलास तर कदाचित तुला असाच सुन्न झाल्याचा अनुभव येईल. मी तो विसरू शकत नाही.

  ReplyDelete
 4. छान लिहिलंयस... 'खूदा के लिए' माझाही पाहण्याचा राहून गेला होता. मात्र होल चूकवता कामा नये. एका चांगल्या चित्रपटाची माझी ओळख करुन दिलीस त्याबद्दल धन्यवाद

  ReplyDelete
 5. >>>पण सिनेमा हॉल मधून बाहेर पडल्यावर पाचव्या मिनिटाला मी त्या सिनेमातूनही बाहेर पडलेली असते.

  अगदी अगदी.... माझ्या घरातही मी ’बोअर’ मुव्हीज बघते असे मुलांचे मत आहे... अर्थात त्यांच्या वयाला साजेल असंच त्यांच मत आहे!!
  संपुर्ण सिनेमा न पहाता, त्याबद्दल यापुर्वी एक ओळही ऐकलेली नसताना, तू तो माझ्यासमोर व्यवस्थित उभा केलास.... मिळाला सिनेमा तर नक्की पाहिन मी!!!
  आभार तुझे.....

  ReplyDelete
 6. मनापासून आभार तन्वी.. प्रत्येकाने बघावा असाच आहे 'बोल'!

  ReplyDelete