रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी ऑफिसला परत येताना एक मस्त फ्रेशनेस असतो नेहमी. पण मागच्या संपूर्ण आठवड्यातल्या एकापेक्षा एक धक्कादायक घटनांचा परिणाम म्हणून की काय कुणास ठाऊक, यावेळी अजिबात ताजंतवानं वाटत नाहीये... आधी दिवसाढवळ्या पुण्यातल्या शनिवार पेठेत झालेला डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून आणि त्या बातमीवर विश्वास ठेवण्याइतपत आपण सावरतोय म्हणेपर्यंत मुंबईत एका फोटोजर्नलिस्ट मुलीवर झालेला गॅंगरेप... पत्रकारितेत काम करत असुन, रोजच्या वर्तमानपत्रात आणि बुलेटिनच्या हेडलाईन्स मध्ये खून आणि बलात्कारांच्या बातम्या वाचून आणि पाहून सुद्धा, खून आणि बलात्कार हे शब्द लिहिताना आज मात्र माझ्या हाताला सुटलेला कंप जात नाहीये... आणि बधीर झालेलं डोकं ताळ्यावर यायला तयार नाहीये.
काही महिन्यांपूर्वी दिल्लीत निर्भया वर असाच सामुहिक बलात्कार झाला. देश संतापला, आंदोलनं, कॅंडल मार्च, काळ्या फिती लावून मूक मोर्चे सगळं झालं... पण पाशवी निघृणपणाचं सत्र काही थांबलं नाही. आणि परवा तर जवळजवळ माझ्याच सारखं काम करणार्या मुलीवर बलात्कार झाला, मुंबईत... म्हणजे, तसे तर भारताच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात अगदी रोजच होतायेत बलात्कार आणि खून... पण तरीही परवाच्या घटनेनंतर हादरायला झालंय हे नक्की. मी मुलगी असले म्हणून काय झालं, मी सेफ आहे आणि माझ्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही अशी खात्री वाटत होती मला, काल परवा पर्यंत... पण आता मात्र, ती खात्री किती पोकळ आहे असं वाटायला लागलंय...
खरं सांगू, तर पुरुष आपल्या आसपासच्या मुलींशी असे वागू शकतात, यावर विश्वास ठेवणं जड जातंय मला. ती अॅड आठवते...?? आयसीआयसीआय ची, बंदे अच्छे है वाली...??? पहाता क्षणी त्या जाहिरातीच्या प्रेमात पडले होते मी. रात्रभर प्रवास करुन मी घरी जाणार असेन तर रात्रीत दोन तीनदा फोन करुन मी ठीक आहे याचीखात्री करुन घेणारे बाबा, मित्र-मैत्रिणींच्या कट्ट्यावर रंगलेल्या गप्पा आवरुन घरी निघायला साडेनऊचे पावणेदहा झाले तर गाडी जपून चालवा, पोचल्यावर एसेमेस टाका असं आम्हा मुलींना बजावून सांगणारे किंवा अगदी वाट वाकडी करुन आम्हाला आपापल्या बाईक्स वर फॉलो करणारे मित्र... अर्थात आमची काळजी हेच या गोष्टींचं कारण. आताही रिपोर्टिंगच्या निमित्तानं आम्ही फिरतो. अजून तरी भिती वाटतीये असं कधी झालं नाही... पण एखाद्या गर्दी किंवा जमावाच्या ठिकाणी जाताना अलर्ट रहा, जपून जा अशा खबरदारीच्या सूचना देणारे सहकारी... हे सगळे अच्छे बंदे आठवले मला तेव्हा आणि आताही... असे सगळे जेंटलमेन आजूबाजूला असताना पुरुष वाईट असतात असा ग्रह करुन घ्यावा असं वाटलंच नाही कधी.
पण मग या नाण्याची दुसरी बाजू दिसायला लागली. किंवा खरं तर अनेकदा दिसलेली ती बाजू कधी नव्हे ती ठळकपणे जाणवायला लागली... मी मुलगी आहे म्हणून माझी काळजी करणारे बंदे आहेत तसे मी मुलगी आहे म्हणूनच माझ्यावर नजरा रोखणारे ही आहेत... मी नीटनेटके, डिसेंट आणि छान कपडे घातले काय आणि मळखाऊ जीन्स आणि तसलाच मळखाऊ टीशर्ट घातला काय... केसांचा छानसा लेयर कट असो नाहीतर बेफिकिर टॉमबॉईश मशरुम कट... रस्त्यावरुन चालताना एकाच वेळी असंख्य त्रासिक नजरा माझ्यावर खिळलेल्या मला जाणवतात... साधं रोजचं घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर हे टू व्हिलर वरुन कापायचं अंतर असेल, मी मुलगी आहे म्हणून माझं ओव्हरटेक करणं ही अनेकांच्या पचनी पडत नाही... मुलगी असून ओव्हरटेक करते...??? गाडी चालवणार्या 'त्याच्या' नजरेतला विखार सहज वाचता येणारा असतो... रस्त्यावरच्या गर्दीत हात लावायला, घाणेरड्या नजरेचे कटाक्ष टाकायला या सगळ्यांना सापडते, फक्त मीच... कारण, मी एक मुलगी असते.
माझ्या अपार्टमेंट मध्ये रहाणारी, आयटी सेक्टरमध्ये काम करणारी, गॅझेट्स सॅव्ही मॉडर्न मावशी आहे. जाता येता कधीतरी लिफ्ट मध्ये ती भेटते. तिला एकच खंत आणि ती म्हणजे, तिला मुलगी नाही... मुलाला लहानाचं मोठं करताना त्याची हौसमौज पुरवणं एंजॉय करता येत नाही ही तिची नेहमीची कंप्लेंट... पण आता म्हणते, बरंय मला मुलगी नाहीये... असल्या जगात मुलगी सांभाळायची म्हणजे जीवाला घोर. मी फक्त एक हताश सुस्कारा सोडते. मी, माझ्या अनेक मैत्रिणी आम्ही एकेकट्या फिरतो. शॉपिंग ला जातो, प्रवास करतो, मूव्हीज ना जातो... आम्हाला नाही लागत कुणाची सिक्युरिटी. पण आता भिती वाटायला लागलीये. अस्वस्थ आणि अगतिक व्हायला झालंय... मारुतीच्या शेपटासारखे प्रश्न वाढत चाललेत. पण, उत्तर मात्र दृष्टीपथात नाही...
दोनच दिवसांपूर्वी मिशेल क्रॉस नावाच्या अमेरिकन मुलीचा एक ब्लॉग वाचण्यात आला. ट्रॅव्हलर्स हेवन म्हणून ओळखल्या जाणार्या भारतात यायला मिळणं हे म्हणजे तिच्यासाठी ड्रीम कम ट्रू... पण इथल्या वास्तव्यात एक मुलगी, त्यात आणि परत गोरी अमेरिकन मुलगी म्हणून तिनं जे जे सोसलं त्यानंतर या ट्रॅव्हलर्स हेवन ला ती वुमेन्स हेल म्हणते... पुण्यातल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्यावर ढोल ताशांच्या तालावर नाचायचा मोह आवरला नाही तेव्हा विसर्जन वगैरे विसरुन नाचणार्या गोर्या अमेरिकन मुलीभोवती कोंडाळं करुन आपल्या मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ आणि फोटो घ्यायला टपलेले पुरुष तिला आठवतात... भारत भरात फिरतानाचे रेप, सेक्शुअल हरॅसमेंट आणि शोषणाचे असे असंख्य अनुभव ती लिहिते. तीन महिन्यांचं इथलं वास्तव्य संपवून परत गेल्यावर तिला पोस्ट ट्राऊमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर वर उपचार घ्यायला लागतायेत... हे सगळं वाचताना पुन्हा तीच चीड, संताप, असहाय्यता, हताशपण दाटून येतं... एरवी सारे जहॉं से अच्छा म्हणताना जे काही भरुन बिरुन येतं, ते सगळं क्षणात उडून जातं अशा वेळी.
एक मुलगी म्हणून माझ्या बाबतीत थोडी जास्त काळजी करणं या व्यतिरिक्त इतर कुठल्याही गोष्टींची सवय मला ना माझ्या कुटुंबानं लावलीये, ना माझ्या समाजानं... एका बाजूला शाळेत मूल्यशिक्षण शिकवणं, स्त्री पुरुष समानतेचे गोडवे गाणं किंवा महिलांना पन्नास टक्के आरक्षणं देणं बिणं हे सगळं ठीक आहे, पण त्या पेक्षा जर थोडीफार आमच्या सुरक्षिततेची हमी घेऊ शकलात तर बघा हे सगळ्यांना जीवाच्या आकांतानं ओरडून सांगावंसं वाटतंय मला, एक मुलगी म्हणून... दॅट्स इट.
- 'ती' मुलगी तिथं गेलीच कशाला? - मुंबई गँगरेपबद्दल किंवा अशाप्रकारच्या इतर अत्याचारानंतर सर्वात जास्त वेळा ऐकलेली प्रतिक्रिया. तसं वाटणारात बोलणारात फक्त पुरुष नव्हते,यातूनच आपली मानसिकता दिसते. मुलीला जबाबदार धरलं की सगळे प्रश्न सुटतात. हे बदलायला बराच वेळ लागेल. पुरुषाचं बाईकडे बघणं किती विविध पातळीवरचं असतं आणि ते किती खुपणारं असू शकतं याची मी कल्पना करु शकतो. पण बाकी मिशेल क्रॉस/रोजचास्मने लिहिलंय त्यात बरीच अतिशयोक्ती आहेत. त्याचं खंडन तिच्यासारख्याच काही इतर मुलींनी केलंय. Same India-Different Story (http://ireport.cnn.com/docs/DOC-1023426) किंवा Dear RoseChasm: India, the Untold Story (http://ireport.cnn.com/docs/DOC-1025474)
ReplyDeleteएवढं सगळं अवतीभवती घडत असूनही तू पुरुषांकडे सुरक्षिततेची हमी
मागतेयस, विश्वास दाखवतेयस हे पुरुष जमातीचं भाग्य
good written... रेपनंतर मला फक्त शाहरुखची प्रतिक्रिया बरी वाटली. कारण त्यानं त्यात आपली मानसिकता बदलायला पाहिजे असं लिहिलं होतं. विशेष म्हणजे आपल्या
ReplyDeleteसगळ्या मुलांना मुलींशी decently वागण्याचं शिक्षण घरातून मिळायला हवं
संदीप सर, हं...!!!
ReplyDeleteअभिजित, exactly!!!
शोभा डेंच्या एका लेखाची आठवण आली, भक्ती.
ReplyDeleteखूप विचारपूर्वक आणि संवेदनशील लिहिलेय.
महत्त्वाचे मुद्दे, पण नेमकेपणा नसल्याने एकूण लेख प्रभावहीन वाटतोय ...!
पण, लेख महत्त्वाचा आहे, एवढे खरे
- संजय आवटे
aawdla
ReplyDeleteछान उतरलय लेखनितून त्याला अनुभवाचीही किणार आहे पण प्रश्न कायम आहे , सोडवणुकिसाठी सर्वाकडून प्रामानिक प्रयत्नाची गरज आहे.
ReplyDeleteजन्मताच मुलगी म्हणून तिला वेगळी न मुलाला वेगळी वागणूक न देता समान वगनुकिचा परिपाठ घरातूनच गिरवला गेला तर माझ्यामते बरया अंशी प्रश्न सुटेल
ReplyDeleteखूप छान माहिती आहे.अतिशय मार्मिक शब्दांत माहिती पुरविण्यात आली आहे.
ReplyDeleteनमस्कार ,
'१०० पुस्तकांपेक्षा १ उच्च प्रतिचे माहिती देणारे पुस्तक नेहमीच चांगले' या तत्वांला अनुसरून आम्ही VISION UPSC MPSC PO ह्या संपूर्ण मराठीमोळ्या YouTube चॅनेलची निर्मिती केली आहे.
गरजू व हुशार विद्यार्थी मित्रांना व मैत्रिणींना Private Classes च्या जाळ्यातून मुक्त करून Quality Free Education देण्याच्या उद्देश्याने तसेच त्यांच्या मूल्यवान वेळात अतिशय महत्वाची माहिती एकत्रितपणे देणे हेच आमचे ध्येय आहे.
माझ्या चॅनेलच्या काही विडीओची लिंक खाली दिली आहे , एकदा आपण video पाहून स्वतः विडीओमधील माहिती आपणांस किती उपयुक्त ठरणारी आहे हे ठरवावे.
Telegram Channel name : @visionump
Youyube channel name : VISION UPSC MPSC PO
Website : www.learnsubject.in (लवकरच माहिती upload केली जाईल)
प्राचीन भारताचा इतिहास - कालक्रम https://youtu.be/ozUiFABdydA
मध्ययुगीन भारताचा इतिहास - कालक्रम : भाग १ https://youtu.be/a67cdfA3Svk
मध्ययुगीन भारताचा इतिहास- कालक्रम : भाग २ https://youtu.be/wl9Vg5KhvIA
आधुनिक भारताचा इतिहास- कालक्रम (इ.स.१६००-१८५७) https://youtu.be/h_0syxLPsbw
आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१८५७–१९४७) https://youtu.be/ee79-cm1_C0
आधुनिक भारताचा इतिहास - कालक्रम (इ.स.१९४७-२०००) https://youtu.be/rbMQzjLJSIU
तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.