माशाच्या चपळतेनं स्विमिंग टॅंक मध्ये पोहणारी गौरी येलो बघून थिएटर मधुन बाहेर पडलो तरी डोक्यात आणि मनात घोळत रहाते... आणि म्हणूनच वयम् च्या दिवाळी अंकाच्या निमित्तानं जेव्हा गौरी शी गप्पा मारायची संधी चालून येते तेव्हा कधी एकदा गौरीला भेटू असं होऊन जातं... पण गौरी ची भेट ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. कारण सकाळी जिम मध्ये जाऊन भरपूर व्यायाम करणं... त्यानंतर कॉलेज, तिथला अभ्यास... संध्याकाळी स्विमिंग साठी टॅंक वर जाणं आणि शिवाय भरतनाट्यम... असा गौरीचा दिवस अक्षरशः भरगच्च असतो... त्यात आता येलो नंतर गौरी कुणी साधीसुधी मुलगी राहिलेली नाही, तर सगळ्यांची आवडती स्टार झालीये... त्यामुळे या ना त्या कारणानं अनेकदा ती आपल्याला टीव्ही वरही दिसते, मग त्या त्या कार्यक्रमांना हजेरी लावायची तर त्यातही तिचा अगदी भरपूर वेळ तिला द्यावा लागतो... आणि म्हणूनच हो नाही करता करता शेवटी एकदाची जेव्हा गौरी भेटते तेव्हा तिच्याशी किती बोलू आणि किती नको असं होऊन जातं... जेव्हा गौरी आपल्याला भेटते, तेव्हा डाऊन सिंड्रोम हा तिचा आजार... त्या आजारावर तिनं केलेली मात... तिच्या आई, बाबा, बहीण आणि कोच या सगळ्यांचा तिला असलेला सपोर्ट आणि त्या सगळ्यातून स्विमिंग चॅंपियन आणि आता फिल्मस्टार हा गौरीचा प्रवास नक्की कसा झाला या आणि अशा अनेक विषयांवर गौरीशी गप्पा मारणं हा एक प्रेरणादायी अनुभव होऊन जातो... गौरीशी मारलेल्या याच सगळ्या गप्पा खास तुम्हा सगळ्यांसाठी मी घेऊन आलीये...
- यलो नंतर गौरी गाडगीळ ला सगळे ओळखतात... पण यलो च्या आधीची गौरी कशी आहे ते मला जाणून घ्यायचंय...
यलो च्या आधीची गौरी स्विमिंग चॅंपियन... घरी आई बाबांची लाडकी मुलगी... आणि धाकट्या बहीणीची, पल्लवीची लाडकी ताई आहे... मला डाऊन सिंड्रोम झाला तरी माझ्या आई बाबांनी त्याचा अवास्तव बाऊ कधीही केला नाही... उलटं माझ्या मर्यादांवर मात करत मला मोठं व्हायला शिकवलं... बाबांचा फ्रूट प्रोसेसिंग चा व्यवसाय... आईचं त्यात पूर्णवेळ लक्ष घालणं या बरोबरच मला वेळ द्यायची कसरत त्या दोघांनीही केली म्हणून आज मला माझी ओळख मिळाली... स्पेशल मुलांच्या शाळेत मी गेले पण माझ्या आईने माझा अभ्यासही करवून घेतला... आणि म्हणूनच पोहणं आणि भरतनाट्यम च्या बरोबरीनं मी आज माझा अभ्यासही करु शकते... पुण्यातल्या एस पी कॉलेज मध्ये सोशॉलॉजी म्हणजेच समाजशास्त्र या विषयाची पदवी मी सध्या घेते आहे...
- यलो मुळे सगळे आता तुला ओळखतात... पण तू सिनेमात काम करशील असं कधी वाटलं होतं का...
अगदी खरं सांगायचं तर, नाही... मी सिनेमात काम करेन असं कधी वाटलं नव्हतं... यलो च्या स्टोरी चं काम सुरु झालं तेव्हा एका स्पेशल मुलीच्या आयुष्यावर सिनेमा करायचाय आणि म्हणून त्यांना माझ्या वर सिनेमा करायचाय एवढंच मला माहिती होतं... आणि म्हणून माझे आई बाबा लेखक, दिग्दर्शक वगैरे सगळ्यांना माझी माहिती सांगत होते... पण म्हणून मी स्वतःच यलो मध्ये दिसणार आहे हे माहिती नव्हतं... ते कळलं तेव्हा मीच या सिमेमाची हिरॉईन असेन या गोष्टीचीच मला गंमत वाटली...
- सिनेमाचं शूटींग हा अनुभव कसा होता...
सिनेमात काम करायचं म्हणजे खरं तर जास्तीत जास्त काम हे माझ्या आवडीचंच होतं... आणि ते म्हणजे पोहणं... आणि म्हणून मला खूप मजा आली... कॅमेरा, लाईट्स, सेट्स या सगळ्या गोष्टी सुरवातीला खूप नवीन होत्या... पण एकदा त्याची सवय झाली आणि मग फक्त धमाल केली...
- स्विमिंग सोप्प आहे की सिनेमा...
स्विमिंग... कारण मला स्विमिंग येत होतं म्हणून मी सिनेमा करु शकले... सिनेमा करताना खूप मजा आली असली तरी स्विमिंग हीच माझ्या सगळ्यात आवडीची गोष्ट आहे...
- यलो च्या नंतर तू अनेक सेलेब्रिटीज ना भेटलीस... कसा होता तो अनुभव...
यलो केला नव्हता आणि स्टार अशी ओळख नव्हती तेव्हाही मी दोन सेलेब्रिटीज ना भेटले होते... एक म्हणजे राहुल द्रविड ला त्याच्या बंगलोर मधल्या घरी... आणि तिथंच एका मॅच साठी स्टेडियम वर असलेल्या सचिन तेंडूलकर ला... त्या नंतर सचिन त्याची पत्नी अजंली सह यलो पहायला आला होता... सिनेमा संपला आणि सचिन मला भेटायला आला... गौरी, आपण बंगलोर ला भेटलो होतो... तू मला ओळखलंस का असं म्हणत सचिननं माझ्याशी शेकहॅंड केलं... हे मी कधीही विसरणार नाही... यलो सचिन ला खूप आवडला आणि मला सचिन खूप आवडतो...
सुपरस्टार सलमान खान सुद्धा यलो पहायला आला होता... पण फारसा वेळ नसल्यामुळे तो संपूर्ण सिनेमा पहाणार नव्हता... पण जसा त्यानं तो पहायला सुरवात केली तसा त्याला तो खूप आवडला... सिनेमा सुरु असताना मध्येच येऊन तो मला घेऊन गेला... आणि मला तुझ्याबरोबर सिनेमा पहायचाय असं म्हणाला... माझ्या साठी तो खूप छान अनुभव होता...
यलो चा निर्माता असलेला रितेश देशमुख मला भेटला तेव्हा गौरी, तुम्ही काय वंडरफुल आहात असं म्हणाला... मी त्याच्या पेक्षा एवढी लहान असून ही तो मला अहो गौरी म्हणाला याची मलाच खूप गंमत वाटली...
- यलो मुळे तुझ्या आजुबाजुचेही भरपूर लोक तुला ओळखत असतील, कसं वाटतं सगळे कौतुक करतात तेव्हा
यलो नंतर आता मी जिथं जाईन तिथं लोक मला ओळखतातच... कुणी यलो म्हणून तर कुणी गौरी म्हणून मला हाक मारतं... भेटायला येतं... माझी ऑटोग्राफ हवी असते त्यांना... माझ्या बरोबर फोटो काढायचा असतो... असं सगळं फक्त मी सिनेमा किंवा टीव्ही वरच पाहिलं होतं या आधी... आणि म्हणून मला या सगळ्या गोष्टींची खूप गंमत वाटते... मी एंजॉय करते हे सगळं... नुकतंच झी मराठी च्या उंच माझा झोका पुरस्कारामध्ये मला नाना पाटेकर भेटले... ते मला म्हणाले, गौरी मला तुझ्या बरोबर काम करायचंय... आता मला आणखी मोठं बक्षीस कुठलं हवं अजून...
- आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पोहण्याच्या स्पर्धांमधअयेही तू अनेकदा भाग घेतलास... त्याबद्दल काय सांगशील...
आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये उतरायला मिळणं आणि तिथँ बक्षिसं जिंकणं ही माझ्यासाठी आणि विशेष म्हणजे माझे आई बाबा आणि कोच यांच्या साठी खूप आनंदाची गोष्ट होती... चीन, ऑस्ट्रेलिया, तैवान अशा देशांमध्ये जाऊन तिथल्या स्पर्धांमध्ये सहभागी होणं ही माझ्यासाठी प्रेरणादायी गोष्ट होती... विशेषतः स्विमिंग या क्रीडा प्रकाराला परदेशात जेवढं गांभीर्यानं घेतलं जातं तेवढं आपल्याकडे घेतलं गेलं तर आणखी किती तरी मुलांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतं... (गौरीच्या या म्हणण्याला तिची आई ही दुजोरा देते)
- तू स्विमिंग चॅंपियन म्हणून अवघं जग तुला ओळखतं... आता तर तू फिल्म स्टार ही आहेस... पण तुला तुझं करिअर नक्की कशात करायचंय...
मला कोच व्हायचंय... कारण मी आधी म्हणाले तसं मला स्विमिंग प्रचंड आवडतं... मला स्विमिंग येतं म्हणूनच मी सिनेमा करु शकले... पण हे सगळं असलं तरी मला मात्र लहान मुलांची स्विमिंग कोच व्हायचंय... कारण लहान मुलांना त्यांच्या कलानं... प्रेमानं शिकवायला लागतं... त्यांना तसं शिकवलं तर ते पटकन कळतं... आणि म्हणून लहान आणि त्यातही स्पेशल मुलांना शिकवणं हे चॅलेंज मला नक्की आवडेल...
- अनेक लहान मुलांची आणि त्यांच्या आई बाबांचीही तू आता लाडकी आहेस... तुझ्याकडे रोल मॉडेल म्हणून पहाणार्या अशा अनेकांना तू काय सांगशील...
ज्या यलो सिनेमा मुळे मला आज सगळे ओळखायला लागले त्याच यलो सिनेमानं मला आणि माझ्या मित्र मैत्रिणींना एक मंत्र दिला... तो म्हणजे... यू कॅन डू ईट... आपण ठरवलं आणि आपली मनापासून इच्छा असेल आणि त्यासाठी भरपूर भरपूर भरपूर मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही कुणीही असा... आणि कसेही असा... अशक्य काहीच नाही. माझ्या सगळ्या मित्र मैत्रिणींना, मग ते नॉर्मल असोत किंवा स्पेशल... मला हेच सांगायचंय... आणि त्यांच्या आई बाबांनीही हे लक्षात ठेवावं असं मला वाटतं... मी इतर लहान मुलांपेक्षा वेगळी आहे हे कळलं तसं माझ्या आई बाबांनीही मला घडवण्यासाठी स्पेशल मेहनत घेतली आणि म्हणूनच आज मी सगळ्यांची लाडकी गौरी गाडगीळ होऊ शकले...
- पुन्हा एकदा यलो बद्दल... मृणाल कुलकर्णी, ऋशिकेष जोशी, उपेंद्र लिमये आणि सिनेमॅटोग्राफर महेश लिमये... अशा सगळ्या उत्तम कलाकारांबरोबर तू यलो केलास... या सगळ्यांबद्दल तू काय सांगशील...
मृणाल मावशी असेल... माझा मामा असलेला ऋशिकेष दादा असेल किंवा उपेंद्र दादा... या सगळ्यांशी सेट वर माझी दोस्ती झाली... आणि म्हणून मी छान काम करु शकले... माझा कोच असलेल्या उपेंद्र दादा बरोबर ही सेट वर अगदी भरपूर धम्माल केली... महेश दादाच्या मुलीचं नाव गौरांगी आहे... सेट वर ाल्यावर मला गौरी म्हणायचं सोडून तो सतत गौरांगी म्हणायचा आणि मग त्याला ओरडून सांगायला लागायचं की अरे बाबा माझं नाव गौरांगी नाही गौरी आहे... मृणाल मावशी तर काय माझी आईच होती... त्यामुळे घरी आई जशी ओऱडते, लाड करते, तसं सगळं ती ही करायची... अजूनही अध्ये मध्ये तिचा फोन येतो... गौरी... काय चाललंय... कशी आहेस... आई ला त्रास देऊ नकोस हं... आणि मग आम्ही खूप गप्पा मारतो...
- दिवाळी बद्दल काय सांगशील...
दिवाळी मला खूप आवडते... फटाके, नवीन कपडे हे सगळंही आवडतं... फराळ मात्र अजिबात आवडत नाही... फार फार तर एखादा रव्याचा लाडू, पण बाकी नाहीच... रोजच्या जेवणातही मला फक्त पोळी भाजी आमटी भात असा घरचा स्वयंपाक आवडतो... परदेशातल्या स्पर्धांना गेले तर नूडल्स किंवा जे मिळेल ते खाते... पण आवडतं काय तर हेच... लहान असताना पासून चहा प्यायले तर मी काळी होईन असं वाटायचं म्हणून मी चहाही पित नाही... दूध मात्र आवडीने पिते... दिवाळीत कॉलेजला सुट्टी असते हे ही दिवाळी आवडायचं एक कारण आहेच...
- वयम् मित्र परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा...
मला स्वतःला अभ्यासाची पुस्तकं सोडली तर फारसं वाचायला आवडत नाही... त्यामुळे पुस्तकं जमवून मी वाचत नाही... दिवाळी अंक मात्र आवडतात...वयम् चा रंगीबेरंगी अंक आणि लहान मुलांसाठी चं त्यातलं खाद्य मला आवडतं... आणि म्हणून माझ्या सगळ्या छोट्या दोस्ताना अॉल द बेस्ट म्हणून मी दिवाळीच्या शुभेच्छा देते... विश यु अ व्हेरी हॅप्पी दिवाळी... आणि लक्षात ठेवा, यू कॅन डू ईट... एनिथिंग अॅण्ड एव्हरीथिंग...
गौरी... सतत हसणारी आणि प्रसन्न गौरी... तिच्या आनंदाच्या आड आलेल्या डाऊन सिंड्रोम ला तिनं तिचा मित्र करुन टाकलाय आणि म्हणूनच ती आज तुमची आणि माझीही आवडती गौरी गाडगीळ झालीये... अनेक छोट्या मोठ्या गोष्टींनी हरुन जाणार्या, हिंमत हरणार्या आणि निराश होणार्या आपल्या सगळ्यांसाठीच गौरी म्हणजे एक जबरदस्त इन्स्पिरेशन आहे... हो ना??
(पूर्व प्रकाशित, वयम् दिवाळी २०१४)
आवडला ब्लाॅग !!! सलाम त्या गौरी ला आणि तिच्या आई-वडीलांना
ReplyDeleteगौरीच्या celebrities च्या आठवणी आवडल्या ...
ReplyDelete