Wednesday 25 November 2015

नॉट रियली #happytobleed !!!

शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत मी कोकणात राहिले. लहान असताना मला माझ्या आजोळी देवगडला जायची जेवढी ओढ असायची तेवढीच (कदाचित जास्तच) ओढ मला कोर्ल्याला, माझ्या मावशी कडे जाण्याची ही असायची. मावशीचं घर म्हणजे तिचं सासर... तिथे असलेले तिचे सासु-सासरे हे माझ्या आजी आजोबांइतकेच मला प्रिय... नातवंडांचे लाड-कौतुकं करण्याच्या बाबतीत तर त्या आजी आजोबांचा हात माझे (सख्खे) आजी आजोबा ही धरु शकणार नाहीत... मावशीचं कोर्ल्यातलं घर तेव्हा जुन्या धाटणीचं... अंगण, ओटी, पडवी, माजघर, स्वयपाकघर, देवघर, व्हरांडा, गोठा, परसदार अशा रुपातलं. अगदी लहान असताना पासुन अनेकदा शाळेला कसल्याही सुट्ट्या सुरु झाल्या की मी आणि भूषण कुणाही बरोबर कोर्ल्यात जायला तयार असायचो. 

अशाच एका सुट्टीत सकाळी जाग आल्या बरोबर डोळे चोळत बाहेर येऊन झोपाळ्यावर बसलेल्या मावशी जवळ जाताना कुणीतरी मला थांबवल्याचं आठवतं. का तर तिला कावळा शिवलाय. त्या क्षणी त्याचा अर्थ कळला नाही पण पुढचे तीन/चार दिवस मावशी बाहेर आणि लांब... मासिक पाळी/शिवाशीव न कळण्याच्या वयात माझा तिच्याशी हा पहिला परिचय! घर ऐसपैस होतं त्यामुळे मावशीला तिच्या खोलीत जाता यायचं पण स्वयपाकघर ओटीवर वगैरे नो एंट्री. त्या दिवसात तिनं स्वयपाक केला नाही की काही नाही. आजी आणि मदतीला येणार्या इतर बाया माणसं तिला सगळं हाताशी देत होती... पण मी/कुणीच तिला हात लावायचा नाही हे काही तरी मला खटकत होतं... नंतर चार दिवसांनी ती आंघोळ करुन (न्हाऊन) आली तेव्हा तिच्या जवळ जायला म्हणुन बाथरुमच्या दारातच बसलेली मी मलाच अजुन स्पष्ट आठवते...

आता ते घर नाही... नवीन घरात असलं बाहेरचं/शिवाशिव वगैरे काही नाही. माझ्या मम्मी पप्पांकडे तर यातलं काही नव्हतंच कधी... पण आता आमच्या आज्ज्या ही एवढ्या समंजस की पाळी आलेली असताना आम्ही कुठे जातो काय करतो याने त्याना काही फरक पडत नाही... मध्ये आजी कधी तरी इथे पुण्यात आलेली. पाळी जवळ आलेली आणि वारी/गणपती काहीतरी होतं कव्हर करायला जावं लागणार म्हणुन मी वैतागलेले. हे बघुन तुझ्या सारख्या मुलीने असलं काही मानायचं म्हणजे काय असा प्रश्न ही तिनं विचारला... पण गणपती/वारी हे देवाधर्माचं म्हणुन नाही तर त्या दरम्यान होणारा शारिरीक त्रास आणि दमछाक पहाता मी तिथं जाणं जीवावर आलंय म्हटलं आणि तिला ही ते पटलं. 



आज शबरीमाला मंदिराच्या निमित्तानं फेसबुक/ट्वीटर वर #happytobleed कँपेन सुरु झालंय... आणि त्याच निमित्तानं हा सगळा लेखनप्रपंच! मुळात सध्याची लाईफस्टाईल, कामाच्या वेळा, खाण्याच्या सवयी हे सगळं बघता पाळी हे काही फारसं happy प्रकरण आहे असं नाही... पाळीतली नियमितता ही एक आरोग्यदायी गोष्ट सोडली तर त्या दरम्यान होणारा शारिरीक त्रास आठवला की महिन्यातल्या अगदी कुठल्याही दिवशी अंगावर काटाच आधी येतो... पुण्यासारख्या शहरात असले तरी इथल्या रस्त्यांवर गाडी चालवत घर ते आॅफिस हे अंतर कापणं असेल किंवा स्वच्छतागृहांच्या अभावामुळे दिवसभर घराच्या/आॅफिसच्या बाहेर रहाणं असेल... मासिक पाळी हे हेल्द सायकल कमी आणि दुष्टचक्रच जास्त असं माझ्या सारख्या अनेक मुलींना वाटतं... अशा वेळी माझ्या मावशी सारख्या त्या चार दिवसात अगदी हक्काची रजा कधी काळी का होईना (अनेक घरांत आजही) पण उपभोगू शकलेल्या महिलांचा हेवाच वाटतो... वाटतं, आपल्या नशिबात ही चैन नाही. आॅफिस आणि घरातली कामं मुलींना चुकत नाहीत... बरं, अचानक त्रास व्हायला लागतो तेव्हा 'बरं नाही, घरी जाते' हे म्हणायची सोय असते पण तेव्हा ही आपल्या बरोबर काम करणार्या पुरुषांच्या चेहर्यावर 'आत्ता तर बरी होतीस' असे भाव दिसतात... कुणी 'अंगावर काढू नकोस डाॅक्टर कडे जा' असं काळजीने म्हटलं तरी 'डाॅक्टर काय करेल?' असं वाटतं आणि तीळपापड होतो... याच पाळीतुन पुढे एक नवा जीव जन्माला घालायचं सामर्थ्य मला निसर्गानं दिलंय हे कळत असलं तरी #happytobleed म्हणायची हिंमत माझी नाही... आणि माझीच कशाला? खेडेगावात रोजंदारी वर जाणार्या, रस्त्यावर भाजी विकणार्या, दारुडे नवरे प्रपंच करत नाहीत म्हणुन रोज किमान चार घरी स्वयपाक/धुणीभांडी/केरवारे करणार्या, कंस्ट्रक्शन साईट वर राबणार्या किंवा पाळी झेपत नाही म्हणुन गर्भाशय काढुन ऊस तोडणी सारख्या कामांवर जाणार्या अनेक असंख्य बायका #happytobleed म्हणतील का ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे! 

मागे एकदा माझी पत्रकार मैत्रीण एका बातमीच्या निमित्तानं एका घरी गेली असता तिथल्या पुरुषानं तिला 'पाळी नाही ना' असं विचारलं... हे ऐकुन मला त्या पुरुषाचा राग ही आला नाही! आणि कीव ही वाटली नाही... कारण पाळीच्या वेळी एका स्त्रीला शारिरीक आणि मानसिक पातळीवर कशा कशातुन जावं लागतं हे कळण्याएवढी कुवत त्याच्याकडे असेल असं वाटत नाही! पण एक गोष्ट नक्की, जिथे वयाची सत्तरी पार केलेली, आणि कितीही नाही म्हटलं तरी रुढी/परंपरा जपणारी माझी आजी मला पाळीतली शिवाशीव हे जुनं झालं आणि 'जुने जाऊ द्या मरणालागुनी' असं सांगते तेव्हा तिचं आणि तिच्या सारख्या प्रत्येकीचं मला कौतुकच वाटतं...

एका बाजूला आपण भले ही सुपरपाॅवर, स्मार्ट व्हायच्या गप्पा मारत असु... पण आज ही आपला समाज स्त्री ला तिच्या अतिशय नैसर्गिक असलेल्या मासिक पाळीसह स्विकारत नसेल तर आपण खुप खुप खोल पाण्यात आहोत हे आपल्यापैकी प्रत्येकाला समजायला हवं! 

2 comments: