Wednesday, 12 October 2011

क्या खोया क्या पाया जग में...

जानेवारीच्या १७ तारखेला माझी मोठी मावशी गेली. त्या धक्क्यातून बाहेर येतोय न येतोय तोपर्यंत एप्रिलच्या १३ तारखेला आजोबा गेले. आजोबांना कॅन्सर होता. त्यातल्या त्यात समाधान एकच की कॅन्सर असूनही त्यांना वेदना फारश्या झाल्या नाहीत आणि अतिशय शांत, सुसह्य मृत्यू आला...
आजोबांच्या मृत्यूने सगळ्यात मोठी हानी जर कुणाची झाली तर आदित्यची. तो त्यांना 'आबा' म्हणायचा. आबा गेले तेव्हा तो साधारण सव्वादोन/अडीच वर्षांचा होता. पण त्याला माणसं ओळखता यायला लागली तेव्हापासून त्याचे 'आबा' त्याच्यासाठी सर्वस्व होते. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी लुटू लुटू चालत 'आबांकडे' जाणे हा त्याचा नेम होता. आबा जवळ असले की त्याला तासंतास अगदी आई सुद्धा भेटली नाही तरी चालत असे. शिवाय कमालीचे शिस्तप्रिय असलेल्या आबांच्या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवणं हे फक्त आदित्यच करू जाणे. सकाळी ८ चं ऑफिस म्हणून वर्षानुवर्ष पहाटे उठायची त्यांची सवय. त्यामुळे अर्थातच रात्री ९/९.३० ला ते झोपायला जात. त्यानंतर आम्ही सगळे घरात दबक्या पावलांनी आणि खालच्या आवाजात  वावरत असू, न जाणो चुकून त्यांची झोप मोड झाली तर... पण आदित्य रात्री ११/११.३० ला सुद्धा आबांकडे जायचंय म्हणून हटून बसे.  सुरुवातीला आम्ही तो रडला तरी त्याला रमवून आबांकडे जाण्यापासून रोखत असू, पण दुसर्या दिवशी त्यांना कळलं की ते उलट आमच्यावरच चिडायचे, त्याला का नाही पाठवलं?
पुढे पुढे आम्हाला न जुमानता त्याला वाटलं की तो जाऊन त्यांना उठवायचा आणि मग आबा त्याला गोष्ट सांगत किंवा चित्रांची पुस्तकं दाखवत बसायचे, त्याला झोप येईपर्यंत... दर गुरुवारी आबा बाहेर गेले की त्याला बुंदीचा लाडू आणायचे. पण पठ्ठ्या त्यांच्या शिवाय कुणाहीकडून लाडू भरवून घ्यायचा नाही. रोज सकाळी पेपर आले की त्यातल्या गाड्यांच्या जाहिराती बघणे या कार्यक्रमात आबा जायच्या दिवसापर्यंत खंड पडला नाही.
आणि अखेर १३ एप्रिल ला आजोबा गेले. उत्तरक्रीयेसाठी निघण्यापूर्वी आदित्यला त्याच्या बाबाने ''आबांना बाउ झालाय, म्हणून झोपलेत, डॉक्टर कडे नेतोय, तू एकदा नमस्कार कर'' असं सांगितलं. त्याप्रमाणे त्याने नमस्कार केला. शहाण्या मुलासारखं पहिले एक दोन दिवस त्याने आबांची चौकशी केली नाही. पण नंतर मात्र त्याने ''आबा कुठेत?'' हे विचारायला सुरुवात केली. ''डॉक्टर काकांकडे आहेत, बरं वाटलं की येतील'' किंवा ''तू शहाण्यासारखा वाग, मग येतील..'' ह्या उत्तरांनी थोडा वेळ त्याचं समाधान झालं. पण थोडाच वेळ...
पुढे आबांच्या दहाव्या दिवशी त्यांचा फोटो फ्रेम करून आणला. तो नजरेला पडताच त्या फोटोला पोटाशी धरून हा एवढासा मुलगा हर्षवायू झाल्यासारखं आरडा ओरडा करून नाचला. खाली लिहिलेलं त्यांचं नाव आम्हाला दाखवून, ''आदूचे आबा डॉक्टरांकडे आहेत'' असं लिहिलंय म्हणाला. तेव्हाचं त्याचं रूप बघून सगळ्यांचे डोळे पाणावले.. त्या दरम्यान घरी भेटायला येणाऱ्या  माणसांचा महापूर लोटला होता. त्याला सतत प्रश्न पडे, एवढी लोकं येतात, तरी आबा का येत नाहीत? पण त्याच्या प्रश्नाला कुठल्याही भल्या माणसाकडे उत्तर आहे का?
मध्ये एकदा त्याची आई (माझी मावशी) त्याला माझ्याकडे ठेवून कुठेशी बाहेर गेली होती. आता काही झालं तरी त्याला रडू न देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. म्हणून त्याला जमेल त्या पद्धतीने रमवत होते. आणि अचानक जवळ येऊन तो मला म्हणाला, ''दीदी, आबा कधी येनाल गं?  आता ते आले नाही तल मी ललेन हां...'' मी निरुत्तर झाले. असं त्याने आम्हाला सगळ्यांना अनेकदा निरुत्तर केलंय... परवा एकदा कशावरून तरी त्याचं डोकं फिरलं होतं, हमसून हमसून रडत होता. मावशीने जवळ घेऊन शांत केलं, तर हा म्हणाला, ''मला माहितीये, माजे आबा आता येनालच नैत, तुमी त्यांना आनायला पन नाई जात...''
तसं आबा येणार नाहीत हे त्याने मनोमन केव्हाच जाणलंय हे आम्हीही ओळखलं होतंच. पण शेवटी एकदाचं त्याने स्वतःच हे आम्हाला स्पष्ट सांगून टाकलं.
आता रोज सकाळी उठल्यावर पेपर मधल्या गाड्या तो स्वतःच बघतो. बुंदीच्या लाडवाची आठवण आली की आम्हाला कुणाला तरी फर्मान सोडतो, ''घेऊन या'' म्हणून. अगदीच आबांची आठवण असह्य झाली की त्यांचा फोटो घेऊन बसतो. त्या फोटोशी गप्पा मारत... ''आबा मला आवडतात'' असं सांगतो. कुणी डॉक्टर कडे जायला निघालं की मात्र त्याचं तोंड अगदी एवढंसं होतं. डॉक्टर कडे जाणे या गोष्टीचा त्याने धसका घेतलाय. वयाच्या  अवघ्या तिसर्या वर्षी त्याने त्याच्या सगळ्यात लाडक्या माणसाला गमावलंय. मृत्यू या एकमेव सत्याशी एवढ्या लहान वयात अशी जवळून ओळख होणं चांगलं की वाईट ते मला माहित नाही...
गेल्या वर्षभरात अशी खूप माणसं गमावली. मोठी मावशी आणि आबा तर गेलेच. पण पंडित भीमसेन जोशी गेले, जगदीश खेबुडकर, खळे काका गेले. पाठोपाठ गौतम राजाध्यक्ष मग नवाब पतौडी, Apple चा  स्टीव्ह जॉब्ज आणि अगदी परवा जगजीत सिंग...
या सगळ्यांची आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास जागा होती. ही माणसं जरी गेली, तरी ती जागा राहणार... तशीच. या नंतरही आपण जगतोच आहोत. ही माणसं जातानाच आपल्याला त्यांच्याशिवाय जगायचं बळ देऊन जातात. कणखर बनवून जातात.
जगजीत गेले. जाताना त्यांच्या गझलांची पुंजी आपल्यासाठी मागे ठेवून गेले. ते सगळं संचित घेऊन पुढे जायचंय... कुणास ठाऊक अजून काय काय गमवायचंय... कागज की कश्ती, बारीश का पानी नुसतं आठवत मोठं व्हायचंय. आत्ता वाजपेयींची जगजीत साहेबांनी गायलेली ती कविता सतत ओठांवर येतेय... ''जनम मरण का अविरत फेरा, जीवन बंजारोन्का डेरा.. आज यहाँ कल कहाँ कूच है, कौन जानता किधर सवेरा... क्या खोया क्या पाया जग में, जीवन एक अनंत कहानी... ''

4 comments:

 1. Kahi bolayla nahiye mazyakade...i would just say that you have written an excellent piece. As the read progressed, i visualised little Aditya and his struggle to find his Abba...it made me cry..Really, losing a dear one is the worst happening.

  ReplyDelete
 2. Poorva, Thank you! ur right...

  ReplyDelete
 3. khupach chan....papnya olawlya....

  ReplyDelete
 4. Thank you Prajkta... manapasun abhar!

  ReplyDelete