Thursday, 14 July 2011

संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले...

काल पुन्हा एकदा मुंबईत  बॉम्ब स्फोट झाला.  नेहमी प्रमाणे बातम्या वाचून आणि बघून आज डोकं आणि मन सुन्न झालं... वाईट वाटलं... हं, फक्त वाईट वाटलं इतकंच... कारण कितीही वाईट वाटलं तरी मूग गिळून गप्प बसण्याशिवाय आपण काय करणार आहोत? बॉम्ब स्फोटाचे धक्के याआधी काय कमी वेळा पचवलेत मुंबईने? किंवा तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी? १२ मार्च १९९३ पासून हे चालू आहेच... आज कुठे मुंबईत... उद्या कुठे हैदराबादेत... परवा काय तर बेंगलोर... जयपूर... दिल्ली... अहमदाबाद... स्फोट होतात. आपण हादरतो. गांगरून जातो. पावलं अडखळतात. पण नाईलाजाने परत उठून चालायला लागतो... कारण पर्याय नसतो... हे असंच चाललंय गेली कैक वर्ष... मंत्री येतात. घटना स्थळाची पाहणी करतात. जखमींची, मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस करतात... पत्रकार परिषद घेतात. ''आम्ही या कृत्याचा तीव्र निषेध करतो. या प्रकरणाची तातडीने चौकशी केली जाईल. हल्लेखोरांना ताब्यात घेऊन कारवाई करू... यापेक्षा अधिक आत्ताच सांगणं शक्य नाही...'' अशी ठरीव साच्यातली statement करतात. आणि आल्या वाटेने परत जातात. माध्यमांना खुराक  दिला आणि जखमी, मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली की बहुदा त्यांची कर्तव्य संपत असावीत.
आता आपणही कोडगे झालोय, नाही? काही फरकच नाही पडत आपल्याला. मुंबईत झाला ना स्फोट? मी पुण्यात आहे ना? मग झालं तर...  माझे जे कोणी चार लोक आहेत मुंबईत, त्यांना Hope you all are fine असा एक एसेमेस केला आणि त्यावर त्यांचा Yes , Thanks ! असा रिप्लाय आला की आपण पुन्हा आपल्या उद्योगांना लागतो... कारण बाकीचे गेलेले किंवा दुखावलेले आपले कुणी नसतात ना... मुंबई पुणेच कशाला? स्फोट दादर ला झाला, मी बोरिवलीत राहते... मग मला कशाला फरक पडला पाहिजे? मग तसं तर कुणीच आपलं नसतं. नुकत्याच जन्मलेल्या बाळाला मागे टाकून आई गेली तरी ते बाळ होतंच की लहानाचं मोठं...
अजून एक नेहमीचा अनुभव... काल स्फोट होऊन गेला, त्याक्षणी तातडीच्या असलेल्या बातम्या संपल्या की दुसर्या दिवशी सलामीचा ससेमिरा मागे लागतो. मुंबईकरांच्या धैर्याला सलाम. हिमतीला सलाम. etc etc ... अरे कसला डोंबलाचा सलाम करताय? धैर्य? कसलं आणि कुठलं धैर्य? बरं धैर्य तरी कितीदा आणतील एकवटून? दर सहा महिन्यांनी आणि वर्षभराने कुठून आणतील धैर्य? त्यांच्या असहाय्य अगतिक पणाला धैर्य असं गोंडस नाव दिलं की झालं. पण दुसर्या दिवशी घरातून बाहेर पडताना पोटात भीती असतेच... काल तो अमका गेला, परवा तो तमका गेला... आज कदाचित मी??? छे छे... कल्पना नाही करवत... पण रिकामपणी हेच येतं डोक्यात... म्हणून मग नाईलाज म्हणून हे विचारांचं काहूर बाजूला सारून निघायचं आपापल्या उद्योगाला हेच बरं... काय माहित अजून किती वेळा हे असं घडणार? किती जीव मरणार? आणि आपल्यासारखे किती नं मरताही कणा-कणाने मरणारच?
anyways ... तसं मी स्वताला सावरलंय, पण तरी हे सगळं थांबावं असं मनापासून वाटतं खरं...

3 comments:

 1. पहिली पोस्ट बॉम्ब स्फोटावर लिहायची इच्छा नव्हती खरं तर... पण कधीतरी अस्वस्थपणातून एखादी चांगली गोष्ट सुरु होते... कैक दिवस रखडलेल्या ब्लॉग लिहायच्या माझ्या इच्छेला सुद्धा कदाचित हाच मुहूर्त लाभला असावा...

  ReplyDelete
 2. स्वागतार्ह!!
  पुढील अस्वस्थातेसाठी शुभेच्छा!

  ReplyDelete
 3. धन्यवाद, शंभरातला शंभरावा...!!!

  ReplyDelete