Tuesday, 2 August 2011

ती गेली तेव्हा...

आयुष्यात सगळीच माणसं  नाही उलगडत आपल्याला. काही माणसं खूप थोड्या सहवासात अगदी अंतर्बाह्य  कळतात. तर  काही मात्र इतकी आपली असतात तरी शेवट पर्यंत त्यांचा थांग लागत नाही. तिच्या बाबतीत असंच झालं. ती आमची होती.  पण तरी आम्हाला कुणालाच ती नीटशी समजलीच नाही कधी.. एखादं माणूस चटका लावून अचानक निघून जातं तशीच ती गेली. तिचं घर-दार, एकुलती एक मुलगी, नवरा यांना वार्यावर सोडून. आणि आम्हालाही...
अचानक असं निघून जाऊन तिनं तिच्या समोरचे प्रश्न चुटकी सरशी संपवून टाकले. आता का, कशासाठी वगैरे सगळे प्रश्न आयुष्यभर आमच्यासाठी निरुत्तरीत ठेऊन. शिवाय ''ज्या व्यक्तीचे सगळेच निर्णय आणि सगळीच गणितं आज पर्यंत चुकत आली त्या व्यक्तीचं हे एकमात्र गणित इतकं अचूक सुटावं? हे कुठलं दैव म्हणायचं?'' हा विचारही आमच्या बरोबरच संपणार...
आजही तो दिवस लख्ख आठवतो. आता विसरून जावसं वाटलं  तरी शक्य होणार नाही. सकाळी नेहमी प्रमाणे सगळं आवरून ऑफिस ला पोचतानाच तिच्या नवर्याचा ती 'गेल्याचा' फोन आला आणि सर्द झाले.  आता या नंतर आपण काय करायचंय हे मला सुचत नव्हतं. सुचणं शक्यच नव्ह्तं.  त्यामुळे नंतर  येणाऱ्या फोन वरून मला मिळणाऱ्या सूचना ऐकून बधीरपणे मी  हालचाली करत होते. नेहमीचा घरी यायचा रस्ता त्यादिवशी संपता संपत नव्हता. तातडीने तिच्या शहरात जाण्यासाठी निघालो. वाटेत अनेक आठवणीनी डोळे नुसते पाझरत होते.
नोकरीच्या आकर्षणापायी तिनं ते शहर स्विकारलं. पण तिथे आपलं म्हणून हक्काने जावं असंही कुणी नव्हतं. पंचवीसेक  वर्ष तिनं तिथे कशी काढली असतील हे तिचं तिलाच ठाऊक. अनेकदा आर्थिक चणचण आली. तिच्या नशिबाने तिचे आई-बाबा आणि भावंडं खमकी होती. त्यामुळे तिनं नं सांगता आणि नं मागताही तिला त्यांचा भक्कम आधार होता. पण तिचा नवरा मात्र कधीच तिचा मानसिक आधारही बनू शकला नाही. अनेकदा तिच्या मनात येई या लग्नाचं बंधन  तोडून  एकटीने सुखात राहावं... पण मग तीच म्हणायची, नको, कसाही असला तरी तो असल्यामुळे माझ्याकडे नजर वाकडी करून बघायची तरी कुणाची हिम्मत नाही इथे... हेही नसे थोडके! आणि म्हणून ती शेवट पर्यंत त्याच्याशी लग्नाच्या नात्याने बांधली राहिली. आज आत्ता हे सगळं आठवतानाही डोकं भणाणून जातं...
तशी ती आम्हाला  फार कमी भेटायची. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत यायची तेव्हा घर कसं गजबजून जायचं. सगळ्यांचीच, खास करून आम्हा पोरांची ती विशेष लाडकी होती. मी खूप लहान असताना तिने माझ्यासाठी आणलेला स्वेटर मला अजूनही अंधुकसा आठवतोय. पुढेही आखूड झालेला तो स्वेटर मा ने जपून ठेवला  होता कित्येक दिवस... तिचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त... वाक्या-वाक्याला ती असे काही जोक पेरायची कि धमाल व्हायची. आणि मी ''काय गं, सारखी पीजे मारतेस?'' असं म्हणून तिच्या जोकला दाद द्यायचे. पण आता मनात येतं, इतकं वैराण आयुष्य जगून पण इतकी विनोदी आणि खेळकर जगायची उर्मी तिच्यात यायची कुठून?
एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मा- पापांच्या मागे लागून तिच्याकडे राहायला गेल्याचं आठवतंय. ती येईलच, मग तुम्हाला का जायचंय, इकडे आली कि भेटेल नं... असं म्हणून त्यांनी जुजबी विरोध केला पण आम्हाला मात्र जायचंच होतं! त्याप्रमाणे पापा सोडून आले. तिचं यायचं तिकीट काढून तयार होतं, मग आम्ही दोन-तीन दिवस राहून तिच्याबरोबर परत आल्याचं आठवतंय... त्यानंतर एकदा तिने काडी काडी जमवून उभ्या केलेल्या छोट्याशा घराच्या वास्तुशांतीला गेलो होतो. नववीत असेन मी तेव्हा.  ते घर तिच्या मागून फिरून बघितल्यावर '' मस्त घर!!'' असं म्हणून तिच्या गळ्यात पडले तेव्हाचा तिचा तृप्त चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. या दोन्ही भेटीत दूरवर वसलेल्या तिच्या जगातली अनेक गोष्टींची पोकळी जाणवलीच... वय लहान असूनही काही ठळक फरक नजरेतून सुटले नाहीत. त्यावरून ''कशी राहते गं ती तिथे?'' असं विचारून  मा ला हैराण केल्याचं आठवतंय... नाही म्हणायला एक दिवाळी आम्ही सगळ्यांनी तिच्याकडे जाऊन साजरी केली होती नुकतीच. तिनंच हौसेने बोलावलं होतं. पण त्यानंतर मात्र हे असं, तिच्या शेवटच्या दर्शनासाठीच जावं लागलं. आज पर्यंत कधीही दिसली नाही एवढी सुंदर ती त्या शेवटच्या दिवशी दिसत होती. आयुष्यभराचे कष्ट आणि यातायात संपल्याचं जणू समाधान विलसत होतं तिच्या चेहऱ्यावर... एके काळी शर्थीने आयुष्याशी झगडून आता तिचे दिवस बरेच पालटले होते. सोसायचे दिवस संपले होते खरं तर... आता सगळं छान होईल याची तिला आणि आम्हालाही खात्री होती. पण इतकं सरळ साधं असेल तर ते आयुष्य कसलं?
माझं शिक्षण पूर्ण होत आल्यावर ती मला एकदा म्हणाली  ''माझ्याकडे राहायला ये, तिथल्या एखाद्या पेपरमध्ये नोकरी शोधू तुला!!" तेव्हा मी तिला म्हणाले होते ''मी तिकडे येऊन राहू शकेन याची अजिबात शक्यता नाही, त्यापेक्षा मला नोकरी लागली कि तू नोकरी सोड आणि निवांत रहा आमच्या सगळ्यांच्या जीवावर, खूप यातायात केलीस... '' त्यावर ''मी फक्त रिटायर्ड होईपर्यंत राहीन गं, नंतर येईन सगळं विकून तिकडेच, तुम्हा सगळ्यांच्यात..'' म्हणायची. पण सगळं सोडायचं ठरवल्यावर तिने रिटायर्ड व्हायचीही वाट बघितली नाही, आणि गेली... सगळ्या कटकटी टाळून मार्ग काढायचा म्हणून तिनं स्वीकारलेला पर्याय अत्यंत चुकीचा होता... पण आता हे सांगायलाही ती या जगात नाही.
ती गेली तेव्हा मी अतोनात रडले... तिच्या आयुष्यात घडलेल्या चित्र- विचित्र गोष्टींमुळे तिची सगळ्यांनाच खूप काळजी होती. तिचं घर पाहिलं आणि चौथ्या दिवशी तिचे वडील गेले. जणू ते घर पाहायलाच  ते थांबले होते. तिच्या आईला  मात्र स्वताच्या लेकीचा हा असा मृत्यू पाहावा लागला आणि पचवावाही लागला... तिच्या जाण्याने मृत्यू या प्रखर सत्याशी माझी जवळून ओळख झाली. ज्या घरात तिने सकाळी शेवटचा श्वास घेतला, त्या घरात तिन्हीसांजेला आम्ही सगळे जमलो होतो. आम्ही पोचलो तेव्हा तिने स्वताला फास लावायला जवळ केलेली साडी पडली होती. आमचा आक्रोश आता तिला ऐकू जाणार नव्हता... ज्या हॉस्पिटलमध्ये तिनं गेली २५ वर्ष अनेक रुग्णांची सेवा केली, त्या हॉस्पिटलच्या शवागारात ठेवलेला तिचा देह आम्ही पोचल्यावर घरी आणला. तिच्या शेवटच्या प्रवासासाठी तिचा निरोप घ्यायला असंख्य माणसं जमली. तिथे एवढी माणसं तिनं जोडली होती हे आम्हाला आज कळलं, ती गेल्यावर... तिच्यावर अंत्यसंस्कार करून घरातले पुरुष परत आले तेव्हा रात्रीचे २ वाजले होते. आम्ही सगळे विमनस्कपणे बसलो होतो. आदल्या रात्री ती याच खोलीत, याच पंख्याखाली झोपली असेल... आज त्याच पंख्याने तिला तिच्या शेवटच्या एकमात्र यशस्वी मिशन साठी मदत केली होती... त्याच पंख्याकडे बघत मी  तिला आठवत बसले होते...  तिच्या आईचे  डोळे रडून रडून कोरडे झाले होते. त्या घरात स्मशान शांतता होती... एक अध्याय संपला होता.

2 comments: