Wednesday, 17 August 2011

गुलजार...

गुलजार... ही चार अक्षरंच केवढी जादू करून जातात... गालावर फिरलेल्या मोरपिसाचा स्पर्श जसा सुखद असतो, तसं माझं ''गुलजार'' हे नाव ऐकलं की होतं! सिनेमाच्या फारशी कधी वार्तेला नं जाणारी मी गाणी ऐकण्यात मात्र नेहमीच रमत आलेय... रेडियो, टेप, एमपीथ्री, सीडीज, आणि आता मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतलेली गाणी हा माझ्या रोजच्या जगण्यातला एक अविभाज्य भाग आहे. याच गाणी ऐकण्याच्या वेडामुळे गुलजार साहेबांच्या शब्दांशी ओळख झाली आणि आता त्यांचे शब्द म्हणजे गळ्यातला ताईत बनलेत...   ''लकडी की काठी, काठी पे घोडा'' पासून मला मिळालेली त्यांच्या शब्दांची सोबत ही माझ्यासाठी नेहमीच बेस्ट 'कंपनी' आहे असं मला वाटतं! असंख्य वेळा ऐकूनही त्यांच्या शब्दांचा कंटाळा येत नाही. रिकामा वेळ मिळाला की इतर कशातही वेळ वाया घालवण्यापेक्षा कविताकोश वर जाऊन त्यांच्या कविता वाचण्यात वेळ जास्त छान जातो! आता हे मैत्र नक्की केव्हा जुळलं हे आठवणं तसं कठीण. पण कदाचित त्या शब्दांचे अर्थ कळतही नसण्याच्या वयापासून त्या शब्दांच्या आणि अर्थातच गुलजार साहेबांच्या प्रेमात पडले एवढं मात्र अगदी खरं...

'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' मधून विजय पाडळकर यांनी गुलजार साहेबांच्या कविता मराठीमध्ये आणल्या. त्याआधीही 'गंगा आये कहासे' आणि 'रावीपार' मधून गुलजार आणि पाडळकर हे समीकरण परिचयाचं झालेलं. शिवाय अरुण शेवतेंच्या ऋतुरंग मधून गुलजार अगदी नित्यनेमाने भेटलेले... त्यामुळे ते साहजिकच खूप जवळचे...  किशोर कदम, अर्थात कवी सौमित्रने 'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. न्यूयॉर्क मधला.  नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत त्यांना प्रश्न केला, '' आपको तैरना आता है?'' गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है...'' गुलजार या व्यक्तिमत्वाच्या कैफात आकंठ बुडालेल्या मला 'डूबना' ही कल्पना नव्याने उमगली ती इथेच!

गुलजार साहेबांनी त्यांच्या आईला पाहिलं नव्हतं. आई म्हणून त्यांना गावच्या बाजारात पाहिलेल्या एका वेगळ्याच स्त्रीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ''देख, ऐसी लगती थी तेरी मा...'' असं कुणी म्हणालं होतं... निमिषार्धाच्या नजरा नजरीमध्ये त्या स्त्रीचा सोन्याचा दात त्यांनी पाहिला... पुढे त्यांनी अनेक लोकांकडे चौकशी केली, ''माझ्या आईचा दात सोन्याचा होता का...?'' जगातल्या कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या या कलावंताच्या आयुष्यात ही केवढी मोठी पोकळी... का कुणास ठाऊक पण तेव्हा पासून सोन्याचा दात असलेली ती स्त्री गुलजार साहेबांइतकीच माझ्या मनाच्या एका कोपर्यात घर करून बसली ती बसलीच... अशी खोलवर रुतून बसलेली दुखणीच अशी संवेदनशीलता देतात का माणसाला? कदाचित...

ऋतुरंग मधल्या एका लेखामधून गुलजार आणि त्यांची लाडकी बोस्की अर्थात मेघना गुलजार यांच्यातलं बाप- लेकीचं नातं खूप छान उलगडून समोर आलं... एक व्यक्ती म्हणून माझं वय कितीही असलं तरी तिच्या जन्माबरोबरच माझ्यातल्या बापाचा जन्म झाला आणि तिच्या बरोबर तिच्याच वयाचा होत गेलो असं ते सांगतात! हे असं काही फक्त गुलजार साहेबांनाच सुचू शकतं ना?  सध्या माझ्या अनेक  नात्यांचं  वय मी गुलजार साहेबांच्या या हिशोबा प्रमाणे मोजते... आणि अनेक गोष्टी केवढ्या सोप्या होऊन जातात...

गुलजार साहेबांनी त्यांचा एक कविता संग्रह (बहुदा पुखराज) बोस्कीला अर्पण केलाय. त्या अर्पण पत्रिकेतल्या काही ओळी अशा-

नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए...

त्यांनी शब्दांच्या लिफाफ्यात बांधून दिलेले तजुर्बे आणि दुंवाए आपल्यालाही 'नसीब'  आहेत हेच केवढं मोठं आहे... ना??
गुलजार साहेब, वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम!!!!

23 comments:

  1. खूप सुंदर... आपल्या आवडत्या कलाकाराविषयी एवढी चांगली माहिती जमा करणं आजकाल फारस कुणी करत नाही. माणसं आवडीही बदलतात. गुलजार यांचं नाव भारतीय माणसाला अनोळखी नक्कीच नाही. त्यांच्या विषयीची एवढा तपशील मात्र सर्वांनाच माहिती असंल, असं वाटत नाही.

    ReplyDelete
  2. श्रीपाद सर, मनापासून धन्यवाद... आवड असली कि शोध घेतला जातो नवीन माहितीचा, तसं आहे माझं गुलजार साहेबांच्या बाबतीत. कुठेही भरकटले तरी त्यांच्या शब्दांच्यापाशीच परत येईन बहुदा...!!!

    ReplyDelete
  3. Khup Sundar lihlays!!! apan tyanna asankhya mediums ne aaiku shacto he bhagyach ahe apla.
    hya post che intro ani end perfect zalay.

    ReplyDelete
  4. @ Poorva... Thank you so much!!! Your feedback is always important... I remember the day when we had an opportunity to hear him live at University...

    ReplyDelete
  5. माझा मित्र संग्राम याने ही प्रतिक्रिया मला मेल वर पाठवली... "गुलजार यांचे छायाचित्र पाहिलं की आपोआप त्यांच्या रचनांमधून आपल्या मनात पडलेल्या त्यांच्या छापाची तथा त्यांच्या रचनांची, व्यक्तिमत्वाची लिंक लागते.. तू फेसबुकवर शेअर केलेली या 'लिंक'मध्ये शिरून मी हे वाचू लागलो.. (मुळातला आळशी वाचक असलेला मी असा काहीतरी शेलकं असेल तरच थोडे पुढे डोकावून वाचतो..). येता जाता ऐकलेली गाणी अन गप्पा-टप्पातून जेवढे कळतात तेवढेच गुलजार मला माहीत.. पण तरीही त्यांची एवढी 'छाप' माझ्यावर (!) असण्याचे श्रेय मी माझ्या संवेदान्शिलातेला देण्यापेक्षा त्यांच्याच सर्जनशीलतेला देणे उचित होईल. असो.
    'मोरपीस' वगैरे, आणि 'अमुक याच्या फारशी वार्तेलाही न जाणारी..' असे शब्दप्रयोग दिसायला लागल्यावर मला वाटले या लेखिकेची जरा तरी 'छाप' तुझ्यावर असणार! लगेच खाली जाऊन पहिले - 'पोस्ट बाय : सौमिती'. या नावाची लेखिका परिचयाची वाटली नाही. पण मीच कुठे एवढा 'जिज्ञासू' वाचक आहे तेव्हा मला ती माहीत असणार असे वाटले..
    'ठीक, ठीक' म्हणत अर्ध्याहून अधिक वाचल्यावर पेजच्या कडेला पहिले - सौमिती : 'अबाउट मी' आणि तुझे चित्र !
    मग वाटले हिच्यावर मराठीत 'गुलजारी' करणाऱ्या सौमित्र (अर्थात किशोर कदम) नावाच्या कवी-बाबाचीही चांगलीच छाप दिसतेय.. (म्हणजे त्या दोन अद्भुत 'बाबां'च्या रचनांनी ज्यांच्या मनात तरंग उमटत नाहीत अशा मंडळींनी ही प्रतिक्रियादेखील पुढे वाचण्याची तसदी घेऊ नये.. बाकी समजून घ्या!)
    त्यांच्या 'डुबण्याच्या' कल्पनेचं उमगणं.. आणि पुढील उल्लेख - मुलीबरोबर आपल्यातील बापाचा जन्म (भ्रूणहत्येच्या जमान्यात) झाल्याची जाणीव अन तिच्या वयाचे होणे' हा सुद्धा 'डुबण्याचाच' प्रकार नाही का.. आईचा चेहरा मनात रेखाटण्याची अन तो मनात साठवण्याची धडपड अन बोच खूपच स्पर्शी (touchy) आहे.. त्यातून जन्माला येणाऱ्या संवेदनशीलतेची सोनोग्राफी तू चोखपणे केली आहेस! प्रत्येक संवेदनशील माणसाच्या आयुष्यात असं काहीतरी घडत असावं किंबहुना त्यामुळेच माणूस संवेदनशील बनत असावा..
    अशा संवेदना माणसाला चालतं, बोलतं अन हालतं म्हणजेच जिवंत ठेवतात नाही का? अशा संवेदना इतरांची कदर करण्यासाठी, त्यांना सावरण्यासाठी तर कधी ताळ्यावर आणण्यासाठी नेहमीच आपल्या मदतीला धावून येतात.. पण आपणच आपल्याला सावरायचा विसरू शकतो कदाचित.. अशा जन्माला घातलेल्या वा जन्माला आलेल्या नात्याची त्या संबंधाने वयं जरूर मोजावीत. हवं तर त्या भावविश्वात डुबून जावं, हवे त्या वयाचं व्हावं.. पण संवेदनशीलतेचा बांध फुटला की आपल्याला टाळ्यावर आणणे सर्वांसाठीच अवघड होऊन बसते.. म्हणून भावविश्वात रमताना देखील संवेदनशीलता जपायलाच हवी.. (संवेदनशीलतेला ही अशी व्यावहारिक बाजू सुद्धा असते बरं!) ती जपली नाहीतर आपल्या ठ्ठेचकळण्याल्या सुरुवात होऊ शकते. 'तेव्हा इतरांनी आपल्याप्रती नेहमीच किती संवेदनशील असावा' याचे उपदेश आपण देणे त्यांच्या दृष्टीने अगदीच अनुचित अन चीड आणणारा ठरत असतं.. माझ्यासारख्या 'आळशी' व्यक्तीला वाटते, कशाला हे उपद्व्याप अथवा 'बेहिशेबी' धडपड वाढवून घ्यायची? त्यापेक्षा, आपणच आपल्याप्रती सजग राहत आपली संवेदनशीलता जपावी का..?
    अर्थात या सुचानेपुढे देखील प्रश्नचिन्ह! (एका आळशी माणसाने केलेल्या या 'सजग'पणाच्या गोष्टी!) असो. विषय कुठल्या कुठे गेला. तर हा तुझा ब्लॉग आहे, हे आता मला कळले. लिहित रहा... गुल्जारच्या प्रतिभेला 'चिरकाल' असेच अंकुर फुटत राहोत.. ही सदिच्छा!"

    ReplyDelete
  6. संग्राम, तुझ्यासारख्या 'आळशी' माणसाने एवढी आवर्जून प्रतिक्रिया लिहून पाठवली यातच मला सगळं समाधान आहे, खरं तर...!!! मनापासून आभार, आभार हा शब्द कोरडा वाटतो ना? पण माझ्या पहिल्या लेखापासून तू नेहमीच मला तुझी प्रतिक्रिया विस्तृत पणे कळवत आलायस... आणि ते तू कायम मनापासून केलंयस! मला कधीही त्यात औपचारिक पणाची झाक जाणवली नाही!! म्हणून त्या सगळ्या खरे पणासाठी हे आभार...!!!
    सौमिती या नावाचा अर्थ 'खरी मैत्रीण...' माझ्या प्रत्येक माणसाची खरी मैत्रीण होण्याचा माझा नेहमी प्रामाणिक प्रयत्न असतो. आणि म्हणून ब्लॉग लिहिण्यासाठी ते नाव मी घेतलंय... सौमित्र या नावाशी त्याचं साधर्म्य हा निव्वळ योगायोग!! बाकी, तू मांडलेली संवेदनशीलतेची व्यावहारिक बाजू पटली, आवडली... त्यावर आता नक्की विचार करेन!!

    ReplyDelete
  7. आशयसंपन्न शब्दांना हिंदी चित्रपटातल्या चपखल शब्दात बसवणारा गीतकार म्हणजेच गुलजार. फाळणी, लहाणपणी आई-वडिलांचा झालेला वियोग,पंजाब आणि मुंबईत सुरुवातीला झालेली आयुष्याची परवड इतकं सारं होऊनही त्यांची संवेदनशीलता बोथट झाली नाही. उलट वास्तवाचं टोकदार भान त्यांच्या गीतामध्ये तसेच त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये आढळते. अशा जबरदस्त व्यक्तीचा आलेख छान प्रकारे मांडलायस.

    'सध्या माझ्या अनेक नात्यांचं वय मी गुलजार साहेबांच्या या हिशोबा प्रमाणे मोजते... आणि अनेक गोष्टी केवढ्या सोप्या होऊन जातात..' हे वाक्य तर एकदमच खास आहे.

    ReplyDelete
  8. @ ओंकार, Thank you !!! फाळणी संदर्भातल्या त्यांच्या कविता तर लाजवाब आहेत, आणि रावीपार मधली ती कथा... नाव आत्ता आठवत नाही मला, पण दिल्ली मधलं एक कुटुंब त्यांना फाळणीच्या वेळी दुरावलेला स्वताचा मुलगा समजत असतं ती... त्या वेळच्या भयाण परिस्थितीची कल्पना येण्यासाठी ती आणि 'रावीपार' या दोन कथा 'मस्ट रीड' आहेत...!!! आणि तुझा शब्द परफेक्ट आहे... गुलजार जबरदस्त व्यक्ती आहेत!!!

    ReplyDelete
  9. Apratim lihilayes Bhakti. Sadhya n sopya bhashet ekhadya wyaktibaddal lihin jara awaghad jat; pan tu te uttam lihilayes eth. Gr8. Keep it up. Asch chan chan wachayala milude. I thnk fo such profiles, i can refer ur blog. Fine na?

    ReplyDelete
  10. मला काही या संवेदनशीलता वगैरे गोष्टीतील गम्य नाही. म्हणून गुलजार यांच्याबद्दल थोडी माहिती देऊन मोकळा होतो.
    गुलजार यांचे खरे नाव 'संपूर्ण सिंग' असे आहे. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात एका garage मध्ये मिस्त्री म्हणून केली.
    तिथेच त्यांना त्यांचे पहिले गीत सुचले. त्यांनी १९५६ मध्ये प्रथम चित्रपटासाठी गीतलेखन केले.

    ReplyDelete
  11. @ संकेत, गुलजार साहेबांवर प्रेम असणार्या लोकांना हे माहिती असणारच याची खात्री आहे मला...!!!

    ReplyDelete
  12. @ Yogesh, Thank you so much!! & yes, you are always wel-come!!!

    ReplyDelete
  13. उठ के जाते हुये पंछी ने बस इतना हि देखा था...
    देर तक हाथ हिलाती रही शाख फिझा में...
    अलविदा कहने के लिये या पास बुलाने के लिये....!!!
    इतक्या सुंदर ओळी अर्थातच गुलजार यांच्याच...!!
    गुलजार हा शब्दच संवेदनशिलातेचा समानार्थी असावा...!!
    खूप सुंदर लिहिले आहेस... जसे गुलजार च्या गीतांनी वेद लावले तसेच त्यांनी केलेले चित्रपट पहा.. न लिहित रहा... खूप सुंदर!!!

    ReplyDelete
  14. @ पराग सर, खरं आहे तुमचं, गुलजार साहेब आणि त्यांची संवेदनशीलता हे अफाट समीकरण आहे आणि आपल्या जगण्याचं उर्जास्थान सुद्धा... आता नक्की बघणार आहे त्यांचे चित्रपट... मनापासून धन्यवाद!!

    ReplyDelete
  15. छान लेख. गुलझार हे प्रतिभाशाली व्यक्तीमत्व फार सुंदर त-हेने रंगवले आहेस. पुढच्या लेखांची वाट बघत आहे.

    ReplyDelete
  16. Gulzarji is my favorite one. Whenever I get depressed, I read his poem. They are not just poetic words, but it is musical concurrence which fills my heart with extraordinary sensations... This writing of yours reminds me his legacy. Cheers...

    ReplyDelete
  17. That poem is mentioned in my blog-article which I have devoted to Gulzarji himself!

    ReplyDelete
  18. @ Ajit, Thank you... Me too have the same experience! Gulzar sahab & his words work as a healing touch to me whenever I feel low & depressed... & which of ur article are u talking about? Yaar Gulzar? or any other which I missed to read...??

    ReplyDelete
  19. खूप छान लिहील आहेस भक्ती. मी सुद्धा लहानपणापासून खूप गाणी ऐकत आलो आहे. तेव्हा मला गुलझार या व्यक्तीबद्दल काही माहित नव्हत, तरीपण त्यांची गाणी खूप वेगळी वाटायची. मुंबईत पृथ्वी थियेटर मध्ये त्याचं लकीरे हे नाटक पाहायला गेलो होतो तेव्हा त्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. नात्यामधली आणि भावनांची गुंतागुंत उलगडून दाखवणारा हा माणूस एवढा साधा असेल यावर विश्वासच बसत नाही. प्रत्येकाशी ते खूप आपुलकीने बोलतात. त्यांच्या पुनर्भेटीचा आनंद तुझ्या लेखातून मिळाला. keep writing ....

    ReplyDelete
  20. @ विकास, तू चक्क त्यांना प्रत्यक्ष भेटला आहेस.. किती लकी आहेस!! मला त्यांची प्रत्यक्ष भेट घेता येईल तो दिवस माझ्यासाठी आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल... तुझ्या प्रतिक्रियेसाठी मनापासून धन्यवाद...!!!

    ReplyDelete
  21. हो. मी खरच स्वतःला भाग्यवान समजतो. दीड वर्षांपूर्वी मी आमच्या सरांसोबत पृथ्वी थियेटरला नाटक पाहायला गेलो होतो तेव्हा ते तिथे भेटले. ते साध बोलले तरी त्यांच्या बोलण्यात विलक्षण खोली जाणवते. Times of India च्या वतीने जेव्हा मागच्या वर्षी अमन की आशा हा कार्यक्रम घेण्यात आला होता तेव्हा सुद्धा मी त्यांच्या कविता ऐकायला गेलो होतो. खूप गर्दी होती. पूर्ण एक तास उभा राहून त्यांच्या तोंडून त्यांच्या कविता ऐकल्या . तो एक अविस्मरणीय अनुभव होता. त्यांच्या कवितेतील वेदना ते एवढ्या सहजतेने आणि तरलतेने मांडतात की त्या कविता ऐकताना आपण नकळत अंतर्मूख होऊन जातो. 'र' ला 'र' आणि 'ट' ला 'ट' जोडून कविता करणारे पुष्कळ " कवी" आपण पाहतो पण प्रत्येक शब्दातून भावनांची अर्थपूर्ण परंतु सहज गुंफण करणारे खूप थोडे असतात. मला वाटत गुलझार हे आशा जमातीच प्रतिनिधित्व करतात. त्यांचा जाड भिंगांचा चष्मा हा नक्कीच जादूचा असला पाहिजे कारण त्यांची जादू हि त्यांच्या प्रत्येक कवितेतून जाणवते.
    "मैने देखी ही इन आंखोन कि मेहेकती खुशबू....." इथपासून ते "गोली मार भेजे में..." अस अविश्वसनीय वैविध्य असणारे गुलझार यांनी तमाम रसिकांच्या मनात कायमच घर केल आहे. त्यांनी पेरलेल्या शब्दांतून आनंदाचे मळे फुलतात आणि त्यातूनच आपल्या कानाची आणि मनाची बाग खर्या अर्थाने "गुलझार" होत राहते.
    देव त्यांना उदंड आयुष्य देवो.

    ReplyDelete
  22. >>गालावर फिरलेल्या मोरपिसाचा स्पर्श जसा सुखद असतो, तसं माझं ''गुलजार'' हे नाव ऐकलं की होतं!
    अगदी!!
    >>गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है...''
    __/\__

    प्रतिसादाला शब्द नाहीत. पण त्यांच्याच शब्दात सांगायच तर.
    "काश ऐसा हो के तेरे
    क़दमों से चुन के मंजिल चलें
    और कहीं दूर कहीं..
    तुम गर साथ हो
    मंजिलों की कमी तो नही.."

    ReplyDelete