Saturday, 10 September 2011

बोल...

(सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मला चित्रपट परीक्षण वगैरे बिलकुल लिहिता येत नाही. आणि पडद्यावर जे दिसतं त्या व्यतिरिक्त मला सिनेमा फारसा कळतही नाही. गेले दोन आठवडे बघायचा राहिलेला एक सिनेमा फायनली आज सकाळी पाहून झाला, आणि वाटलं जे वाटतंय ते शब्दात मांडून पाहावं, म्हणून हा प्रयत्न...)
शोएब मन्सूर हे नाव रानडे मध्ये जर्नालिझम करत असताना नखाते सरांच्या तोंडून ऐकलं होतं. मन्सूर च्या 'खुदा के लिये' चं सरांनी भरपूर कौतुक केलं होतं. त्यामुळे त्याचं नाव विशेष लक्षात राहिलं. खुदा के लिये मिळवून पहायचा होता, पण कालांतराने विषय मागे पडला तसा तो बघायचाही राहून गेला. त्यानंतर `बोल` च्या जाहिरातीमधून पुन्हा एकदा शोएब मन्सूर हे नाव नजरेस पडलं. ३१ ऑगस्ट ला रमजान ईद च्या मुहूर्तावर हा सिनेमा भारतात रिलीज होणार होता. आणि यावेळी मला हा सिनेमा अजिबात चुकवायचा नव्हता. पण तरी आज उद्या करता करता शेवटी आज मला सोयीच्या वेळी आणि सोयीच्या ठिकाणी शो मिळाला. आणि सोबत हा विषय नक्की आवडेल अश्या संवेदनशील मैत्रिणीची कंपनी मिळाली. त्यामुळे आज `बोल` पाहून झाला.
एक हादरवून सोडणारा अनुभव होता. माझ्या इतर सिनेमा प्रेमी मित्र मंडळींत  मी अगदीच 'odd girl out ' आहे खरं म्हणजे. केवळ नाईलाज म्हणून मी त्यांच्या बरोबर काही सिनेमे पहातेही. पण सिनेमा हॉल मधून बाहेर पडल्यावर पाचव्या मिनिटाला मी त्या सिनेमातूनही बाहेर पडलेली असते. पण आज तसं झालं नाही. सिनेमा संपवून ऑफिस मध्ये पोचले, कामाला लागून हाताखालच्या काही गोष्टी संपवल्या. पण अजूनही 'बोल' मधले हुंकार, हुंदके आणि उसासे माझी पाठ सोडायला तयार नाहीत.
बोल ही जैनब ची गोष्ट आहे. ती फाशीच्या फन्द्यावरून आपली कहाणी प्रसार माध्यमांना ऐकवते आहे...
जैनब पाकिस्तानी मुस्लीम कुटुंबात वाढलेली मुलगी आहे. आई-वडील आणि सात बहिणी हे तिचं कुटुंब. वडील हकीम. हा व्यवसाय त्यांच्या कुटुंबात परंपरेने चालत आलेला... पण आता डॉक्टर चं प्रस्थ वाढल्यामुळे हकीम कडे फारसं कुणी येत नाही. त्यामुळे त्यांची कमाईसुद्धा बेतास बात... तेवढ्या कमाई वर अख्खं घर चालवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं. पण तरी कुटुंबाचा पसारा उत्तरोत्तर वाढत चाललेला... अशातच जैनब ची आई एका मुलाला जन्म देते. तिचे वडील खुश होतात. पण लवकरच लक्षात येतं, मुलाचं शरीर आणि त्यात वाढतेय एक मुलगीच. हकीम साहेब त्या एवढ्याशा जीवाचा गळा घोटायला धावतात, पण बायकोच्या आकान्तामुळे त्यांचा नाईलाज होतो. ते मुल मोठं झाल्यावर जैनब आणि तिच्या बहिणी मुस्तफाच्या मदतीने त्याला आवडीचं पेंटिंग चं काम मिळवून देतात. पण तिथे त्याला अमानुष छळ सोसावा लागतो. एका रात्री हकीम साहेब आपल्या या मुलाचा जीव घेतातच... त्या आरोपातून सुटका करून घेण्यासाठी मस्जिद ट्रस्टने सांभाळायला दिलेली मोठी रक्कम ते लाच म्हणून देऊन टाकतात. या दरम्यान जैनबचं लग्न होतं, पण नवर्याची आर्थिक परिस्थिती बघता त्यातून मार्ग निघेपर्यंत मुल जन्माला न घालण्याचा निर्णय ती घेते. तिचा हा निर्णय न पटल्याने नवरा तिला माहेरी परत पाठवतो. वेळोवेळी हकीम साहेबांच्या निर्णयांवर ती आक्षेप घेते आणि त्यांच्या मनातली तिच्या विषयीची अढी वाढत जाते. मस्जिद ट्रस्टचे पैसे लाच द्यायला वापरून टाकल्यावर जेव्हा ते ट्रस्टला परत करायची वेळ येते तेव्हा एवढी मोठी रक्कम कुठून उभी करायची असा प्रश्न त्यांना पडतो. तेव्हा गावातल्या एका माणसाला तवायफ म्हणून नाच गाण्यात धंद्याला लावायला मुली हव्या असतात. तो त्याच्या कडे असणार्या मीना नावाच्या मुलीशी निकाह करून मुलीला जन्म देण्यासाठी हकीम साहेबाना तयार करतो. बदल्यात मस्जिद ट्रस्टला द्यायची सगळी रक्कम एकहाती द्यायचं कबूल करतो. हकीम साहेब तयार होतात. त्यातून हकीम साहेब आणि मीनाला मुलगीही होते. त्या मुलीला मीना जैनब च्या घरी आणून सोडते. जैनब, तिची आई आणि बहिणी यांना हे समजतं तेव्हा  धक्का बसतो. त्या दुसर्या दिवशी सकाळी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतात. या गोष्टीची बभ्रा नको म्हणून हकीम साहेब त्या छोट्या बाळाचा जीव घ्यायला जातात, तेव्हा संतापून जैनब त्यांच्या वर हल्ला करून त्यांचा जीव घेते.  आणि त्याबद्दल तिला सजा-ए-मौत फर्माव्लेली असते. आपल्याला मुल जन्माला घालून त्याला सुखकर आयुष्य देता येत नसेल तर ते जन्माला घालावं का? आणि जसं हत्या हा गुन्हा आहे, तसं असा जीव जन्माला घालून आयुष्य भर त्याला मरणप्राय जगायला लावणं हा गुन्हा नाही का असा प्रश्न अत्यंत आर्तपणे ती विचारते. जैनबची गोष्ट ऐकणारी वृत्तवाहिनीची एक रिपोर्टर हे ऐकून सुन्न होते. जैनब गुन्हेगार नाही, तिची फाशी थांबवून, हा खटला पुन्हा सुरु करावा यासाठी ती पाकिस्तानच्या पंतप्रधानांना संपर्क करण्याचा आटोकाट प्रयत्न करते. मात्र त्यांची झोपमोड नको म्हणून संबंधित अधिकारी तिला पंतप्रधानांपर्यंत पोचू देत नाहीत. अखेर जैनबला फाशी होतेच...
नंतर आपल्या आईला सांभाळून जैनबच्या बाकीच्या बहिणी जैनब्स कॅफे सुरु करतात. आयेशा या जैनबच्या बहिणीचा मुस्तफा म्हणजे आतिफ अस्लमशी निकाह झालेला असतो. तोही अत्यंत खंबीरपणे  आयेशा आणि तिच्या कुटुंबाला आधार देतो. मीनाने सोडलेली हकीम साहेबांची मुलगीपण या कुटुंबाची लाडकी होते. तिला सगळे प्रेमाने सांभाळतात... इथे सिनेमा संपतो!

हा सिनेमा पाकिस्तान मध्ये तयार झाला आणि तिथे लोकप्रियतेचे सगळे उच्चांक या सिनेमाने निव्वळ एक आठवड्यात मोडले. हे कळलं आणि मन थक्क झालं...
आपल्या शरीराची थरथर क्षणा क्षणाला वाढत जाते. हृदयाचे ठोके वाढतात. पोटात खड्डा पडतो. तृतीय पंथीयांची समाजाकडून होणारी परवड, लोकसंख्या वाढीची समस्या, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, मुलगी नको असल्याची भावना, मुलगी म्हणून तिला भेडसावणारे वेगळे प्रश्न हे सगळं एकत्रितपणे आणि तरीही इतकं स्पष्टपणे हाताळलं गेलंय या सिनेमात. जैनबच्या इच्छेप्रमाणे आता तिच्या आई-बहिणी मोकळा श्वास घेतं आणि नवीन आयुष्य सुरु करतात... एका बाजूला जैनबच्या लढ्यापुढे मान झुकते... डोळ्यातलं पाणी निकराने गालावरून ओघळत असतानाच गाण्याच्या सुरावटी कानावर पडतात... 'मुमकिन है, बहार मुमकिन है...' 

Monday, 5 September 2011

गुरु साक्षात परब्रह्म...!!!

आज शिक्षक दिन! मला आठवतंय, लहान असताना घरी आई आणि शाळेत बाई या दोघींनी आपलं अवघं जग व्यापलेलं असायचं! या दोन व्यक्तींना जगातली कुठलीच गोष्ट अशक्य नाही याची पक्की खात्री असायची. घरी जसं आपल्या गुणांचा पाढा बाकी कुणीही वाचला तरी आईकडून दाद मिळेपर्यंत आपण खुश नसतो, तसं शाळेत बाई छान म्हणेपर्यंत चैन नसायचं... नवीन फ्रॉक, छान अक्षर, वेळच्या वेळी पूर्ण केलेला गृहपाठ या सगळ्याला बाई जोपर्यंत खुशीची पावती देत नाहीत तोपर्यंत चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं! बाई म्हणजे केवढा भक्कम  आधार असायच्या!
नंतरच्या प्रवासात वेळोवेळी असे अनेक शिक्षक मिळाले. त्यांनी पुस्तकं वाचायला शिकवलीच, पण त्या सोबतच जगण्यासाठी आवश्यक असलेले इतरही अनेक अनिवार्य पाठ सुद्धा शिकवले. पुसाकातल्या अभ्यासावर परीक्षा होते, तेव्हा येत नसलेले प्रश्न ऑप्शन ला टाकता येतात. पण आयुष्याच्या परीक्षेत असे प्रश्न येतात तेव्हा त्या प्रश्नांना धैर्याने भिडणे हाच एकमेव ऑप्शन असतो! आणि त्यासाठी लागणारं साहस त्यांनी दिलं... ठेच लागली तेव्हा उठून उभं राहायला हात दिला... भीती वाटली तेव्हा पाठीवर आधाराचा हात ठेवला... प्रयत्न करण्यावरची इच्छा उडाली तेव्हा सोबत उभं राहून आपली बाजू बळकट  केली... अपयश पचवायला शिकवलं, तसे  यशाच्या आनंदात भरभरून सहभागी झाले... आणि कुठल्याही कठीण वाटणाऱ्या परीक्षेसाठी निघताना नमस्कारासाठी वाकल्यावर तोंड भरून आशीर्वाद दिले! त्या आशीर्वादाचं संचित  नेहमीच बाकी कशाहूनही मोठं आहे! आणि जोपर्यंत ते आशीर्वाद आहेत, तोपर्यंत कुठलीच वाट अवघड नाही याचं समाधान तर जन्मभर पुरून उरणारं...!!!
त्या सर्व आदरणीय आणि सन्माननीय गुरुजनांना मनापासून नमस्कार...!!!

Thursday, 1 September 2011

गणपती : एक आनंदनिधान

कोकणात गणपतीची धमाल वेगळीच. गणपती आले की शाळेला अगदी भरभक्कम आठ/दहा दिवस सुट्टी...  त्यामुळे सुट्टी सुरु झाली की उठून कोर्ल्याच्या घराची वाट धरायची हा नेम गेली कित्येक वर्ष चुकला नाही. कोर्ल्याला माझा मामा राहतो. भर पावसात गणपतीची मूर्ती घेऊन घरी पोचलो, की आजी दारातच पायावर दुध, पाणी घालून आणि औक्षण करून सगळ्यांना घरात घेते... तिथून सगळं घर गणपतीमय होऊन जातं... आणलेल्या मूर्तीला तात्पुरतं एखाद्या चौरंगावर ठेवायचं आणि मग पाहिला अर्धा पाउण  तास त्या मूर्तीला सगळीकडून न्याहाळून भरपूर कोडकौतुक करायचं.  की मग मोर्चा दुसर्या दिवशीच्या पूजेच्या तयारी कडे. ओटी, पडवी, माजघर असलेल्या जुन्या घराचं रंगरूप बदलून आता पोर्च, हॉल, किचन झालं तरी गणपतीचा उत्साह आणि रंगरूप मात्र तसंच आहे. पूर्वी ओटीवर असलेलं गणपतीचं डेकोरेशन आता हॉल मध्ये आलं.  पण अजूनही गणपतीच्या आदल्या दिवशी मध्य रात्रीपर्यंत मनासारखं डेकोरेशन पूर्ण होत नाही. किंवा त्यावर पोटभर उहापोह केल्याशिवाय ते पूर्ण झाल्यासारखं  वाटत नाही हे जास्त खरं आहे!! शिवाय ही तयारी फक्त डेकोरेशन पुरतीच नाही. पूजेचं ताट, त्यात गंध, अक्षता, गूळ खोबरं, कापूर, निरांजनं, अत्तर आणि काय आणि काय...  सकाळी लवकर उठून  फुलं, दुर्वा, पत्री काढणं... एक ना हजार गोष्टी करायच्या असतात. इतकी वर्ष आक्का होती, तोपर्यंत फुलं काढणं हे तिचं काम होतं. आक्का गेली कैक वर्ष आमच्याकडे कामाला यायची, पण ती घरातलीच! अगदी आजोबांपेक्षाही मोठी असल्यामुळे ती त्यांनाही बिनधास्त एखादं फर्मान सोडू शकायची! आणि मग आम्ही पोरं ''आक्का, तू ग्रेट गं!'' असं म्हणत तिला शाबासकी द्यायचो!तर काय सांगत होते, रोज सकाळी देवपूजेला फुलं काढायचा मान आक्काचा होता!  ती सकाळी सातला यायची आणि सगळ्यात आधी फुलं काढायला जायची. ताट भरून फुलं काढायची त्यात सुद्धा किती नजाकत होती! जास्वंद एका बाजूला, तगर, अनंत, दुर्वा, तुळशीच्या मंजिर्या असं सगळं बघूनच प्रसन्न व्हायचं मन! माझी मां  तर म्हणायची पण, आक्का सारखी शिस्तीत आणि सुंदर फुलं काढून दाखवा, मागाल ते बक्षीस देईन... आता आक्का नाही म्हणून फुलं काढायची राहत नाहीत. पण फुलांचं ताट पाहिलं की ही फुलं अक्काने काढलेली नाहीत हे लगेच जाणवतं!
स्वयंपाक घरात उकडीच्या मोदकांची तयारी सुरु होते.
एका बाजूला ही लगबग आणि आपल्याला दूरवरच्या एखाद्या वाडीत लाउड स्पीकर वर 'अशी चिक मोत्याची माळ होती गं, तीस तोळ्याची...' किंवा 'बंधू येईल माहेर न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला...' अशी गाणी ऐकू यायला लागतात. घराला उत्साहाचं उधाण येतं.

यावर्षी सुट्टी नाही म्हणून गणपतीला माझा मुक्काम पुण्यातच. गणपतीला घरी नाही अशी ही पहिलीच वेळ... त्यामुळे घरातल्या गणपतीची जबरदस्त  आठवण येतेय. गणपतीची पूजा सांगायला येणारा नेहमीचा काका, त्याला आजचा एकाच दिवस  आम्ही पोरं गुरुजी गुरुजी म्हणून चिडवतो! खरं तर त्याच्या अंगा- खांद्यावर खेळत लहानाचे मोठे झालो आम्ही. त्यामुळे पूजा, आरती झाली की नमस्कारासाठी वाकल्यावर पाठीवर एक थाप (की धपाटा?) मारून तोंड भरून आशीर्वाद देणारा हा आमचा एकटाच गुरुजी! पूजा झाली की मोदक... प्रत्येकाने एक तरी मोदक करायचाच हा जणू नियमच! त्यामुळे प्रत्येक जण आपलं कला कौशल्य त्या मोदकांवर अज्माव्णारच! दर वर्षी बसक्या नाकाचा, किंवा वेडा वाकडा झालेला पहिला मोदक, मग त्यावर झालेली चिडवा चिडवी... आणि मग ''यावर्षीचा पहिलाच आहे ना, आता दुसरा बघ मस्त करते की नाही...'' असं म्हणत मनासारखा मोदक जमला की आनंदाने माझं पण नाक त्या मोदका सारखंच वर होतं... दरम्यान ''नैवेद्य दाखवायला चला'' अशी आजोबाना order येईपर्यंत हॉल मध्ये कॅरम चे डाव रंगतात. चीटिंग होते, हाणामारी होते... शेवटी जिंकणार्याला एक जास्तीचा मोदक कबूल करून आजोबा उठतात. मग नैवेद्य... पंच पक्वानांनी भरलेलं हिरवं गार केळीचं पान, साजूक तुपाने माखलेला मोदक, त्यावरच्या दुर्वा गणपती बाप्पाला दाखवून झाल्या की हसत खेळत उठलेल्या पंगती... हे सगळं म्हणजे आनंदनिधान असतं!

लहान असताना काजू मोदकाच्या त्रिकोणी पाकिटातल्या आरती संग्रहाचं केवढं अप्रूप होतं... शिवाय संध्याकाळच्या आरत्यांसाठी शेजारी पाजारी जाताना पावसात निसरड्या झालेल्या पायवाटेवर घसरायला होऊ नये म्हणून मामा उचलून घ्यायचा ते सगळं विसरणं कदापीही शक्य नाही... तास दीड तास आरत्या म्हणून आणि टाळ्या वाजवून शेवटी हातांचे तळवे लालेलाल व्हायचे. हे असं अगदी आठ दिवस दणक्यात सुरु असायचं! तो गणपती सगळ्या गावाचा असायचा. इथे शेजारी कोण राहतात  हेही आपल्याला माहित नसतं, आणि तिथे मात्र तुम्ही वर्षातून एकदा गेलात तरी मी कोण हे सांगावं लागत नाही!

आत्ता मी ऑफिस मध्ये बसलीये. नुकताच  मला मामाचा फोन येऊन गेला. ''तुझी आठवण येतेय, गणपती पण विचारत होता, तू कुठेयस असं?'' माझ्या लाडक्या मामाचा आवाज ऐकून मला इथे क्षण भर काही सुचलं नाही. नकळत माझाही आवाज ओला झाला. मला तो अत्तराचा सुवास आणि केळीच्या पानावरचा नैवेद्य, प्राणप्रतिष्ठा केल्या नंतर अजूनच तेजाळलेली गणपतीची मूर्ती... जिवंत भासणारे त्याचे डोळे... हे सगळं इथे माझ्या समोर दिसतंय... आणि मी मनोभावे त्याला हात जोडलेत!  

Monday, 29 August 2011

याद आएँगे ये पल..

तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना हे  आम्हाला दोघींना बघूनच लिहिलंय की काय असं  वाटावं इतकं ते आम्हाला लागू पडायचं! खरं तर ती माझ्याहून चार वर्षांनी मोठी. सी.ए. झालेली. एका मोठय़ा कंपनीत छानशी नोकरी करणारी आणि माझं कॉलेज नुकतंच सुरू झालेलं. ती कायम ऑडिट्स आणि फायलींच्या गठ्ठय़ात बुडालेली आणि माझी प्रत्येक असाईनमेंट तिच्या मदतीसाठी रेंगाळलेली. ‘लवकर निजे लवकर उठे’ हा तिचा दिनक्रम आणि ‘चहा झालाय, आता तरी उठ!’ असं म्हटल्यावर ‘काय गं तुझी कटकट’ हे उलटं तिलाच ऐकवत डोळे चोळत उठणारी मी...
मी लिहिलेल्या प्रत्येक वाक्याची वाचक आणि ‘क्रिटिक-सुद्धा ती! शनिवार-रविवार पुस्तक प्रदर्शनं, शॉपिंग स्ट्रीट, नवीनच ऐकलेल्या एखाद्या कॉफी जॉईंटला चक्कर यासाठी गावभर हुंदडायला आम्हा दोघींना फक्त आम्ही दोघीच! आणि सरतेशेवटी दिवसभर फिरून पुढच्या आठवडय़ाभरासाठी मॅगी आणि सूपची पॅकेट्स, कुठे नेसकॉफीचे पाऊच, उगाचच आवडला तर एखादा टी-शर्ट असा पसारा घेऊन आम्ही घरी... सकाळच्या चहापासून रात्री झोपतानाच्या कंपल्सरी दुधाच्या मगपर्यंत तिचं माझ्यावर लक्ष... तिच्या ‘लंचब्रेक’मध्ये तिने ‘जेवलीस का?’ विचारायला केलेला एसएमएस! कुणी आम्हाला विचारलं की, तुमच्या आयुष्यातले सर्वात धमाल दिवस कुठले? I'm sure, आम्हा दोघींसाठी- ‘आम्ही रुममेट्स होतो ते दिवस’ हे एकमेव उत्तर आहे...
शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने जेव्हा ‘आपलं घर’ सोडून बाहेर राहायची वेळ येते तेव्हा साहजिकच आपल्याबरोबर राहणारे लोक कसे असतील हा प्रश्न असतोच. हाताची पाचही बोटं सारखी नसतात. आपल्या स्वत:च्या घरातसुद्धा प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतोच. तिथे आपल्याच माणसांशीही आपले वादविवाद होतात. मग ‘रुम’वर तर दूर दूर तक संबंध नसलेल्या चार मुलींबरोबर एकत्र राहायचं म्हटल्यावर टेन्शन येणं स्वाभाविक आहे. एखाद्या रुममध्ये ऑलरेडी दोन-तीन मुली ‘रुममेट्स’ म्हणून मस्त सेटल झाल्या असतील तर कुणीही नवीन येणारी मुलगी त्यांना नको असते. आणि अर्थातच ते स्वाभाविक आहे! आपलं सगळं छान लागी लागलेलं असताना कुणीतरी चौथंच माणूस आपल्याबरोबर येऊन राहणार असेल तर आपण नाही का वैतागत? मग आपल्या सगळ्या सवयी, आपला दिनक्रम यात नाही म्हटलं तरी थोडा फरक पडतोच... पण एकदा का घराबाहेर राहायचं ठरलं की, अनेक ‘अ‍ॅडजस्टमेंट्स’ करायची  प्रत्येकीची तयारी असतेच.. त्यामुळे सुरुवातीची थोडीशी ‘नको’पणाची भावना, रुसवे-फुगवे मागे पडले की नवीन-जुन्या सगळ्याजणी एकमेकींत मस्त मिसळून जातात! आणि मग एक नवीन ‘रुटीन’ सेट होतं...
दिवसभर आपापले कॉलेज, क्लास, ऑफिसचं वेळापत्रक उरकून संध्याकाळी रुमवर आलं की ‘मेस’मध्ये जाणं... मेसमधून आल्यावर चहा किंवा कॉफी प्यायची लहर आली तर कुणा एकीच्या मागे लागून तिला ‘चहा कर ना गं..’ म्हणून मस्का मारणं.. कधी अचानक मनात आलं म्हणून आपल्या आपल्या गाडय़ा काढून आईस्क्रीम खायला जाणं.. ‘रुम’वर लाईट गेले असतील तर नेमक्या त्या दिवशी आपल्या स्वत:च्या गावात वर्षांनुवर्ष चर्चिला गेलेला भुता-खेतांचा किस्सा आठवणं.. आणि मग अंथरुणात पडल्या पडल्या मध्यरात्र उलटून जाईपर्यंत आजी-आजोबांकडून, आई-बाबा, काका-मामांनी ऐकवलेले ‘भूत एपिसोड’ डिस्कस करणे.. मग ‘आता उठून लाइट कोण बंद करणार?’ म्हणून एक दिवस ढळढळीत उजेडात झोपून जाण... कॅन यू इमॅजिन? शिवाय अजून एक धम्माल प्रोग्रॅम म्हणजे रोज झोपायला आडवं झाल्यावर दिवसभरात आपल्याला आलेले एसएमएस वाचून दाखवणं! जिला जो आवडेल तिला तो 'forward' करणं.. ‘रूम’वरचे वाढदिवस तर.. Very Very special! आयुष्यात पुढे जाऊन कितीही ‘exclusive’ वाढदिवस ‘सेलिब्रेट’ करण्याएवढे आपण मोठे झालो तरी रूमवर रात्री बाराच्या ठोक्याला रूममेटने कुठेतरी लपवलेला ‘ब्लॅकफॉरेस्ट’ समोर आणल्यावर होणारा आनंद.. त्यानंतर आरडा-ओरडा दंगा-मस्ती करून कापलेला केक.. चेरी आणि चॉकलेटसाठीची ‘तू-तू-मैं-मैं’ मग ‘विश’ करायला आलेल्या फोन्स, मेसेजेसना केक आणि क्रिमने माखलेल्या चेहेऱ्याने तसंच बसून ‘रिप्लाय’ करणं.. आणि मग ‘ब्लॅकफॉरेस्ट’च्या तुकडय़ांबरोबर आणि गरम कॉफीबरोबर पहाटेपर्यंत रंगलेल्या गप्पा.. वीक-एन्डला ‘ट्रीट’साठी कुठे जायचं यावर झालेल्या ‘चर्चा!’ या सगळ्या गोष्टी कायम मनाच्या तळाशी जपलेल्या.. आणि म्हणूनच मोबाईलवर ‘रूममेट्स’साठीची ‘असाईन्ड टय़ून’ म्हणून केकेचं गाणं- ‘हम रहें या ना रहे कल, कल याद आएँगे ये पल..’
घरी असताना कुणी कौतुकाने एखादा पदार्थ आपल्यासमोर ठेवला आणि आपण नाक मुरडलं की हमखास ऐकायला लागणारा शेरा म्हणजे- ‘‘तुम्हाला मिळतंय ना, म्हणून किंमत नाहीये. घराबाहेर पडाल आणि घरच्या अन्नाच्या आशेला याल तेव्हा कळेल..’’ खरंच जेव्हा रूमवरच्या हॉटप्लेटवर चहा, कॉफी आणि मॅगीशिवाय इतर काहीही जन्माला आणता येत नाही तेव्हा घरी मारलेले हे शेरे आठवतात!
संध्याकाळी काही तरी खाणं झालं असेल आणि रात्री जेवायची इच्छा नसेल तर मेसला जायचा आळस केला की, साडेदहा अकरानंतर हटकून भुकेची जाणीव होते. तेव्हा फक्त आणि फक्त ‘मॅगी’ आपल्या हाकेला धावून येते.. आणि आपल्या नशिबाने आपली ‘रूममेट’ फारच गोड असेल तर मॅगी करायचे ते ‘टू मिनिट एफर्ट्स’ पण आपल्याला घ्यावे लागत नाहीत.. मग आपल्यासमोर आयता आलेला मॅगीचा वाफाळता ‘बाऊल’ आपल्याला जास्तच ‘टेस्टी आणि हेल्दी’ वाटायला लागतो..
पण रूममेट्सच्या रिलेशन्सचे हे जसे ‘मीठे’ अनुभव असतात तसे काही ‘खट्टे’ अनुभवसुद्धा असतातच.. खाण्या-पिण्याच्या सवयी, घरात वावरतानाच्या सवयी, शिस्त यांच्यात जमीन-अस्मानाचं अंतर असतं. घरात वावरताना स्वयंपाकघरात बाहेरच्या सँडल्स घालणं वगैरे गोष्टी आपल्या सवयीच्या नसतात. पण आपली रूममेट तशीच वावरत असेल तर आपल्याला सवय करून घ्यावी लागते. माझी एक मैत्रिण पक्की शाकाहारी-प्युअर व्हेजिटेरियन आणि तिची रूममेट एक बंगाली मुलगी- प्युअर नॉनव्हेजिटेरियन.. एरवी एकमेकींशिवाय पान न हलणाऱ्या या दोघी खाण्याच्या बाबतीत मात्र एकमेकींच्या प्रांतात कधी नसतात.
एखाद दिवशी कॉलेजच्या सेमिनारसाठी किंवा ऑफिसच्या मीटिंगसाठी म्हणून आपण एखादा लाडका कुर्ता किंवा ड्रेस मस्त ड्रायक्लिन करून ठेवावा आणि आपली रूममेट आपल्याला न सांगताच तो घालून जावी.. मग फोन करून आपण तिला झरझरावणं असले प्रसंग येतात. तेव्हा मग एरवीचे सगळे गळ्यात गळे विसरून मनसोक्त भांडणंही होतात.. लेकीन उतना तो चलता है.. शेवटी आपलं हक्काचं रागवायचं माणूस म्हणजे आपला जवळचा मित्र किंवा मैत्रीण... सो, तेवढे खटके उडणं ही पण मजा असते...
पण हे रुसवे-फुगवे, किरकोळ मतभेद जरी असले तरी मी म्हणेन की, its one of the best relationships in the world... आपल्या रूममेटस्ना आपण त्यांच्या 'the best' आणि 'the worst रुपात पाहिलेलं आणि अनुभवलेलं असतं.. त्यामुळे कधी तुम्हाला एकमेकींची सगळ्यात जास्त गरज आहे हे माहिती असतं तसं कधी अजिबात वार्तेला जाण्यात अर्थ नाही हेसुद्धा माहिती असतं.. अशातच नेमका आपल्या रूममेटचा मेसेज मोबाईलवर फ्लॅश होतो-  If you can not handle me in my worst, you don't deserve me at my  best...
आणि मग आपल्याही नकळत आपण गुणगुणतो- तीच specially assigned tone!'

हम रहे या ना रहे कल,
कल याद आएँगे ये पल...

(प्रथम प्रकाशित : लोकसत्ता, ३ नोव्हेंबर २०१०) 

Wednesday, 17 August 2011

गुलजार...

गुलजार... ही चार अक्षरंच केवढी जादू करून जातात... गालावर फिरलेल्या मोरपिसाचा स्पर्श जसा सुखद असतो, तसं माझं ''गुलजार'' हे नाव ऐकलं की होतं! सिनेमाच्या फारशी कधी वार्तेला नं जाणारी मी गाणी ऐकण्यात मात्र नेहमीच रमत आलेय... रेडियो, टेप, एमपीथ्री, सीडीज, आणि आता मोबाईल मध्ये डाउनलोड करून घेतलेली गाणी हा माझ्या रोजच्या जगण्यातला एक अविभाज्य भाग आहे. याच गाणी ऐकण्याच्या वेडामुळे गुलजार साहेबांच्या शब्दांशी ओळख झाली आणि आता त्यांचे शब्द म्हणजे गळ्यातला ताईत बनलेत...   ''लकडी की काठी, काठी पे घोडा'' पासून मला मिळालेली त्यांच्या शब्दांची सोबत ही माझ्यासाठी नेहमीच बेस्ट 'कंपनी' आहे असं मला वाटतं! असंख्य वेळा ऐकूनही त्यांच्या शब्दांचा कंटाळा येत नाही. रिकामा वेळ मिळाला की इतर कशातही वेळ वाया घालवण्यापेक्षा कविताकोश वर जाऊन त्यांच्या कविता वाचण्यात वेळ जास्त छान जातो! आता हे मैत्र नक्की केव्हा जुळलं हे आठवणं तसं कठीण. पण कदाचित त्या शब्दांचे अर्थ कळतही नसण्याच्या वयापासून त्या शब्दांच्या आणि अर्थातच गुलजार साहेबांच्या प्रेमात पडले एवढं मात्र अगदी खरं...

'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' मधून विजय पाडळकर यांनी गुलजार साहेबांच्या कविता मराठीमध्ये आणल्या. त्याआधीही 'गंगा आये कहासे' आणि 'रावीपार' मधून गुलजार आणि पाडळकर हे समीकरण परिचयाचं झालेलं. शिवाय अरुण शेवतेंच्या ऋतुरंग मधून गुलजार अगदी नित्यनेमाने भेटलेले... त्यामुळे ते साहजिकच खूप जवळचे...  किशोर कदम, अर्थात कवी सौमित्रने 'एक स्वप्न पुन्हा पुन्हा' च्या प्रस्तावनेत एक प्रसंग सांगितलाय.. न्यूयॉर्क मधला.  नदी पार करण्यासाठी एकदा गुलजार साहेबांबरोबर नदीच्या काठावर थांबलो असताना पाण्याचा प्रवाह बघत त्यांना प्रश्न केला, '' आपको तैरना आता है?'' गुलजार साहेबांनी शांतपणे उत्तर दिलं, ''नही, सिर्फ डूबना आता है...'' गुलजार या व्यक्तिमत्वाच्या कैफात आकंठ बुडालेल्या मला 'डूबना' ही कल्पना नव्याने उमगली ती इथेच!

गुलजार साहेबांनी त्यांच्या आईला पाहिलं नव्हतं. आई म्हणून त्यांना गावच्या बाजारात पाहिलेल्या एका वेगळ्याच स्त्रीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. ''देख, ऐसी लगती थी तेरी मा...'' असं कुणी म्हणालं होतं... निमिषार्धाच्या नजरा नजरीमध्ये त्या स्त्रीचा सोन्याचा दात त्यांनी पाहिला... पुढे त्यांनी अनेक लोकांकडे चौकशी केली, ''माझ्या आईचा दात सोन्याचा होता का...?'' जगातल्या कोट्यावधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या या कलावंताच्या आयुष्यात ही केवढी मोठी पोकळी... का कुणास ठाऊक पण तेव्हा पासून सोन्याचा दात असलेली ती स्त्री गुलजार साहेबांइतकीच माझ्या मनाच्या एका कोपर्यात घर करून बसली ती बसलीच... अशी खोलवर रुतून बसलेली दुखणीच अशी संवेदनशीलता देतात का माणसाला? कदाचित...

ऋतुरंग मधल्या एका लेखामधून गुलजार आणि त्यांची लाडकी बोस्की अर्थात मेघना गुलजार यांच्यातलं बाप- लेकीचं नातं खूप छान उलगडून समोर आलं... एक व्यक्ती म्हणून माझं वय कितीही असलं तरी तिच्या जन्माबरोबरच माझ्यातल्या बापाचा जन्म झाला आणि तिच्या बरोबर तिच्याच वयाचा होत गेलो असं ते सांगतात! हे असं काही फक्त गुलजार साहेबांनाच सुचू शकतं ना?  सध्या माझ्या अनेक  नात्यांचं  वय मी गुलजार साहेबांच्या या हिशोबा प्रमाणे मोजते... आणि अनेक गोष्टी केवढ्या सोप्या होऊन जातात...

गुलजार साहेबांनी त्यांचा एक कविता संग्रह (बहुदा पुखराज) बोस्कीला अर्पण केलाय. त्या अर्पण पत्रिकेतल्या काही ओळी अशा-

नज्मोंके लिफाफोंमे कुछ मेरे तजुर्बे है,
कुछ मेरी दुंवाए है,
निकलोगे सफरपे जब, ये साथ रख लेना,
शायद कही काम आए...

त्यांनी शब्दांच्या लिफाफ्यात बांधून दिलेले तजुर्बे आणि दुंवाए आपल्यालाही 'नसीब'  आहेत हेच केवढं मोठं आहे... ना??
गुलजार साहेब, वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम!!!!

Sunday, 7 August 2011

मिस यू... लाईक यू... आणि हॅप्पी फ्रेंडशिप डे!!!

हाय... यावर्षी फ्रेंडशिप डे साजरा करायला आपण दोघं एकत्र नाही हे जेव्हा मी तुला सांगितलं तेव्हा तुझा चेहरा पडला आणि मला खरंच गम्मत वाटली. आता साताठ वर्ष झाली आपल्या मैत्रीला. एरवी मी भेटले नाही की, "वा, आज केवढा शांततेत गेला माझा दिवस!!'' हे मला फोन करुन ऐकवणारा तू आज चक्क चेहरा पाडून बसलायस!
तुला आठवतंय, माझं ज्युनियर कॉलेज संपत आलेलं असताना तू भेटून, लाल रंगाची रिबिन बांधून मैत्रीचा हात पुढे केला होतास. आणि एवढा समोर आलेल्या माणसाचा अपमान कसा करायचा म्हणून मी ती रिबीन बांधूनही घेतली होती.


पण नेहमी कपाळावर सौम्य आठ्या आणि "मी म्हणजे कुणीतरी ग्रेट' असा जन्मजात ऍटिट्यूड घेउन वावरणारा तू माझ्या डोक्‍यातच जायचास. त्यामुळे आपली मैत्री वगैरे होणं शक्‍यच नव्हतं. पण ती झाली आणि मला वाटतं तेवढा उर्मट आणि मग्रुर तू नाहीस हे माझ्या लक्षात आलं. आणि मग हळू हळू ट्‌वेंटी फोर बाय सेव्हन फोनवर बोलणे, एकमेकांशी मनसोक्त भांडणे आणि पुन्हा गळ्यात गळे घालणे हा सिलसिला सुरु झाला त्यात आपण आज पर्यंत फारसा खंड पडू दिलेला नाही. पण काही म्हण, आपली ओळख आणि पुढे आजच्या एवढी गुळपीठ मैत्री व्हायला फक्त तूच कारणीभूत आहेस... सॉरी, तुला आरोपी वगैरे असल्यासारखं वाटतंय का? मला तसं नव्हतं म्हणायचं... पण माझ्याशी स्वतःहून तू मैत्री केलीस. नंतर जरा संधी मिळाली की आई- बाबांना थापा मारुन इथे येउन मला भेटलास... एवढंच कशाला, इथल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी बाबांना मस्का मारलास! ऍडमिशन घेऊन कॉलेजमध्ये किती गेलास आणि माझ्या कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसण्यात किती वेळ "सार्थकी' लावलास तो भाग अलाहिदा... पण आज मला आपले सगळे वेडेपणाचे किस्से आठवून हसायला येतंय... आपल्या एका लाडक्‍या मैत्रिणीच्या भाषेत सांगायचं तर सिर्फ तूही मेरा दोस्त है, बाकी सब नालेका पानी...!!!एवढ्या वर्षात खूपशा गोष्टी बदलल्या. मित्र म्हणून आपण थोडे मॅच्युअर्ड झालो. पूर्वीसारखी भांडणं होत नाहीत आपली. पण पूर्वीसारखे भेटतही नाही आपण नियमित. आता तुलाही इथे येऊन तीन वर्ष होऊन गेली, त्यामुळे तुला तुझे भरपूर मित्र आहेत. तेव्हासारखं आता तुझं जग माझ्याभोवती सामावलेलं नाही. मात्र काहीवेळेला तुला फक्त मीच लागते. जसं की, पीसी बिघडला, गेमची सीडी सापडली नाही किंवा पिझ्झा खायला गेलास आणि बकवास पिझ्झा मिळाला की फोन करुन ""माझं नशिबच किती फाल्तू आहे'' हे ऐकवायला तुझ्या जगात दुसरं कुणीही नाही... जणू काही मला फोनवर "तीन-तेरा करुन दाखवले' की सगळं एकदम आलबेल होणार असतं!! जे असेल ते असेल, पण आपण एकमेकांचे मित्र आहोत तसे एकमेकांची सपोर्ट सिस्टिमसुद्धा आहोत हे तू मान्य करायलाच हवंस... आपल्या परिक्षा, नोकरीचे इंटरव्ह्यू, आई- बाबांशी झालेली भांडणं, आजारपणं, ऍक्‍सीडेंटस असे कुठलेही कसोटीचे क्षण आपण एकमेकांच्या जीवावर आरामात निभावून नेलेत. प्रसंगी टोकाची भांडणंही ""जाऊदेत, मरुदेत'' असं म्हणून सोडून देत एकमेकांच्या "सोबत' असण्याला प्रेफरन्स दिलाय. I think thats more than enough to describe how good friends we are!!
सो, फ्रेंडशिप डे ला आपण एकत्र नाही याचं वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण मित्र आहोत हे आपण नेहमी प्रमाणे फोन वर बोलून सेलिब्रेट करुया. आणि हो, गेल्या कित्येक महिन्यात तू मला चॉकलेट्‌स आणि कॅडबरीजचा माझा हक्काचा खुराक दिला नाहीयेस... तू आलास की तो मी दामदुपटीने वसूल करणार आहे हे लक्षात असुदे... बाय, मिस यू... लाईक यू... आणि हॅप्पी फ्रेंडशिप डे!!!

Tuesday, 2 August 2011

ती गेली तेव्हा...

आयुष्यात सगळीच माणसं  नाही उलगडत आपल्याला. काही माणसं खूप थोड्या सहवासात अगदी अंतर्बाह्य  कळतात. तर  काही मात्र इतकी आपली असतात तरी शेवट पर्यंत त्यांचा थांग लागत नाही. तिच्या बाबतीत असंच झालं. ती आमची होती.  पण तरी आम्हाला कुणालाच ती नीटशी समजलीच नाही कधी.. एखादं माणूस चटका लावून अचानक निघून जातं तशीच ती गेली. तिचं घर-दार, एकुलती एक मुलगी, नवरा यांना वार्यावर सोडून. आणि आम्हालाही...
अचानक असं निघून जाऊन तिनं तिच्या समोरचे प्रश्न चुटकी सरशी संपवून टाकले. आता का, कशासाठी वगैरे सगळे प्रश्न आयुष्यभर आमच्यासाठी निरुत्तरीत ठेऊन. शिवाय ''ज्या व्यक्तीचे सगळेच निर्णय आणि सगळीच गणितं आज पर्यंत चुकत आली त्या व्यक्तीचं हे एकमात्र गणित इतकं अचूक सुटावं? हे कुठलं दैव म्हणायचं?'' हा विचारही आमच्या बरोबरच संपणार...
आजही तो दिवस लख्ख आठवतो. आता विसरून जावसं वाटलं  तरी शक्य होणार नाही. सकाळी नेहमी प्रमाणे सगळं आवरून ऑफिस ला पोचतानाच तिच्या नवर्याचा ती 'गेल्याचा' फोन आला आणि सर्द झाले.  आता या नंतर आपण काय करायचंय हे मला सुचत नव्हतं. सुचणं शक्यच नव्ह्तं.  त्यामुळे नंतर  येणाऱ्या फोन वरून मला मिळणाऱ्या सूचना ऐकून बधीरपणे मी  हालचाली करत होते. नेहमीचा घरी यायचा रस्ता त्यादिवशी संपता संपत नव्हता. तातडीने तिच्या शहरात जाण्यासाठी निघालो. वाटेत अनेक आठवणीनी डोळे नुसते पाझरत होते.
नोकरीच्या आकर्षणापायी तिनं ते शहर स्विकारलं. पण तिथे आपलं म्हणून हक्काने जावं असंही कुणी नव्हतं. पंचवीसेक  वर्ष तिनं तिथे कशी काढली असतील हे तिचं तिलाच ठाऊक. अनेकदा आर्थिक चणचण आली. तिच्या नशिबाने तिचे आई-बाबा आणि भावंडं खमकी होती. त्यामुळे तिनं नं सांगता आणि नं मागताही तिला त्यांचा भक्कम आधार होता. पण तिचा नवरा मात्र कधीच तिचा मानसिक आधारही बनू शकला नाही. अनेकदा तिच्या मनात येई या लग्नाचं बंधन  तोडून  एकटीने सुखात राहावं... पण मग तीच म्हणायची, नको, कसाही असला तरी तो असल्यामुळे माझ्याकडे नजर वाकडी करून बघायची तरी कुणाची हिम्मत नाही इथे... हेही नसे थोडके! आणि म्हणून ती शेवट पर्यंत त्याच्याशी लग्नाच्या नात्याने बांधली राहिली. आज आत्ता हे सगळं आठवतानाही डोकं भणाणून जातं...
तशी ती आम्हाला  फार कमी भेटायची. दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत यायची तेव्हा घर कसं गजबजून जायचं. सगळ्यांचीच, खास करून आम्हा पोरांची ती विशेष लाडकी होती. मी खूप लहान असताना तिने माझ्यासाठी आणलेला स्वेटर मला अजूनही अंधुकसा आठवतोय. पुढेही आखूड झालेला तो स्वेटर मा ने जपून ठेवला  होता कित्येक दिवस... तिचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त... वाक्या-वाक्याला ती असे काही जोक पेरायची कि धमाल व्हायची. आणि मी ''काय गं, सारखी पीजे मारतेस?'' असं म्हणून तिच्या जोकला दाद द्यायचे. पण आता मनात येतं, इतकं वैराण आयुष्य जगून पण इतकी विनोदी आणि खेळकर जगायची उर्मी तिच्यात यायची कुठून?
एका उन्हाळ्याच्या सुट्टीत मा- पापांच्या मागे लागून तिच्याकडे राहायला गेल्याचं आठवतंय. ती येईलच, मग तुम्हाला का जायचंय, इकडे आली कि भेटेल नं... असं म्हणून त्यांनी जुजबी विरोध केला पण आम्हाला मात्र जायचंच होतं! त्याप्रमाणे पापा सोडून आले. तिचं यायचं तिकीट काढून तयार होतं, मग आम्ही दोन-तीन दिवस राहून तिच्याबरोबर परत आल्याचं आठवतंय... त्यानंतर एकदा तिने काडी काडी जमवून उभ्या केलेल्या छोट्याशा घराच्या वास्तुशांतीला गेलो होतो. नववीत असेन मी तेव्हा.  ते घर तिच्या मागून फिरून बघितल्यावर '' मस्त घर!!'' असं म्हणून तिच्या गळ्यात पडले तेव्हाचा तिचा तृप्त चेहरा आजही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. या दोन्ही भेटीत दूरवर वसलेल्या तिच्या जगातली अनेक गोष्टींची पोकळी जाणवलीच... वय लहान असूनही काही ठळक फरक नजरेतून सुटले नाहीत. त्यावरून ''कशी राहते गं ती तिथे?'' असं विचारून  मा ला हैराण केल्याचं आठवतंय... नाही म्हणायला एक दिवाळी आम्ही सगळ्यांनी तिच्याकडे जाऊन साजरी केली होती नुकतीच. तिनंच हौसेने बोलावलं होतं. पण त्यानंतर मात्र हे असं, तिच्या शेवटच्या दर्शनासाठीच जावं लागलं. आज पर्यंत कधीही दिसली नाही एवढी सुंदर ती त्या शेवटच्या दिवशी दिसत होती. आयुष्यभराचे कष्ट आणि यातायात संपल्याचं जणू समाधान विलसत होतं तिच्या चेहऱ्यावर... एके काळी शर्थीने आयुष्याशी झगडून आता तिचे दिवस बरेच पालटले होते. सोसायचे दिवस संपले होते खरं तर... आता सगळं छान होईल याची तिला आणि आम्हालाही खात्री होती. पण इतकं सरळ साधं असेल तर ते आयुष्य कसलं?
माझं शिक्षण पूर्ण होत आल्यावर ती मला एकदा म्हणाली  ''माझ्याकडे राहायला ये, तिथल्या एखाद्या पेपरमध्ये नोकरी शोधू तुला!!" तेव्हा मी तिला म्हणाले होते ''मी तिकडे येऊन राहू शकेन याची अजिबात शक्यता नाही, त्यापेक्षा मला नोकरी लागली कि तू नोकरी सोड आणि निवांत रहा आमच्या सगळ्यांच्या जीवावर, खूप यातायात केलीस... '' त्यावर ''मी फक्त रिटायर्ड होईपर्यंत राहीन गं, नंतर येईन सगळं विकून तिकडेच, तुम्हा सगळ्यांच्यात..'' म्हणायची. पण सगळं सोडायचं ठरवल्यावर तिने रिटायर्ड व्हायचीही वाट बघितली नाही, आणि गेली... सगळ्या कटकटी टाळून मार्ग काढायचा म्हणून तिनं स्वीकारलेला पर्याय अत्यंत चुकीचा होता... पण आता हे सांगायलाही ती या जगात नाही.
ती गेली तेव्हा मी अतोनात रडले... तिच्या आयुष्यात घडलेल्या चित्र- विचित्र गोष्टींमुळे तिची सगळ्यांनाच खूप काळजी होती. तिचं घर पाहिलं आणि चौथ्या दिवशी तिचे वडील गेले. जणू ते घर पाहायलाच  ते थांबले होते. तिच्या आईला  मात्र स्वताच्या लेकीचा हा असा मृत्यू पाहावा लागला आणि पचवावाही लागला... तिच्या जाण्याने मृत्यू या प्रखर सत्याशी माझी जवळून ओळख झाली. ज्या घरात तिने सकाळी शेवटचा श्वास घेतला, त्या घरात तिन्हीसांजेला आम्ही सगळे जमलो होतो. आम्ही पोचलो तेव्हा तिने स्वताला फास लावायला जवळ केलेली साडी पडली होती. आमचा आक्रोश आता तिला ऐकू जाणार नव्हता... ज्या हॉस्पिटलमध्ये तिनं गेली २५ वर्ष अनेक रुग्णांची सेवा केली, त्या हॉस्पिटलच्या शवागारात ठेवलेला तिचा देह आम्ही पोचल्यावर घरी आणला. तिच्या शेवटच्या प्रवासासाठी तिचा निरोप घ्यायला असंख्य माणसं जमली. तिथे एवढी माणसं तिनं जोडली होती हे आम्हाला आज कळलं, ती गेल्यावर... तिच्यावर अंत्यसंस्कार करून घरातले पुरुष परत आले तेव्हा रात्रीचे २ वाजले होते. आम्ही सगळे विमनस्कपणे बसलो होतो. आदल्या रात्री ती याच खोलीत, याच पंख्याखाली झोपली असेल... आज त्याच पंख्याने तिला तिच्या शेवटच्या एकमात्र यशस्वी मिशन साठी मदत केली होती... त्याच पंख्याकडे बघत मी  तिला आठवत बसले होते...  तिच्या आईचे  डोळे रडून रडून कोरडे झाले होते. त्या घरात स्मशान शांतता होती... एक अध्याय संपला होता.