खरं तर एव्हाना सवय व्हायला हवी तुझ्या नसण्याची... पण तशी ती नाही झालेली अजून...
म्हणजे मला आठवतंय, माझी एमए ची स्टडी टूर होती अहमदाबादला... मी निघायच्या दोन दिवस आधी आपलं जोरदार भांडण झालेलं, अर्थातच फाल्तू कारणावरुन... बोलणं-चालणं बंद होतं आपलं... पण तुला साधं बाय सुद्धा न म्हणता एवढ्या लांब जायचं म्हणजे शिक्षाच होती मला. शिवाय थोडं नमतं घेऊन तुला फोन करायचा तर नाकावरचा राग मात करत होता त्यावर. आणि, मी रुमवरुन निघण्याच्या साधारण दीड तास आधी तु फोन केलास, खाली आलोय, पाच मिनिटं येऊन जा म्हणालास. मी अक्षरशः धावत पळत खाली आले... तू छान पॅक केलेलं एक बॉक्स माझ्या हातात दिलंस... हावरटासारखं मी ते उघडलं. आत माझ्या, खरं तर आपल्या आवडीची चॉकलेट ट्रफल पेस्ट्री होती... त्याक्षणी खरं तर तुला कडकडून मिठी मारायचा मोह झालेला मला, पण आपण फक्त बेस्ट फ्रेंडस् होतो... बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड नाही. हे उठता बसता तू एवढं ठसवलं होतंस माझ्या मनावर...!!! तर, ती चॉकलेट ट्रफल मी त्या क्षणी अर्धी-अधिक फस्त केली. नाही म्हणायला एखाद-दोन काऊ-चिऊचे घास तेवढे तुला... कारण तुझ्या भाषेत म्हणजे पेस्ट्रीज आणि आईसक्रीम साठी लंपट ना मी... पुढे नीट जा, असं कर, तसं करु नकोस, फोन कर, मेसेज कर, काळजी घे, मिस कर... अशी तुझी सूचनांची यादी ऐकली आणि मी वर गेले. बॅगवर अखेरचा हात फिरवून निघायचं होतं... मला स्टेशनला सोडायला चल या माझ्या हट्टाला मात्र तू गोड बोलून गुंडाळून ठेवलं होतंस, का तर म्हणे, माझ्या डोळ्यासमोर तू आठ दिवस निघून जाणार, कसं जमेल मला, तुला जाताना बघणं... शेवटी तू स्टेशनला आला नाहीसच, पण ट्रेन हलायला आणि तुझा मेसेज यायला, पिल्लू, लवकर ये...!!! मिस यू.
नंतर रोज सकाळ-दुपार-संध्याकाळ तू माझी ख्यालीखुशाली विचारत होतास... मी परत पुण्यात पोचले त्या सकाळी तू मुद्दाम लवकर उठून, आवरुन, मला आवडणारा टी-शर्ट घालून मला न्यायला मात्र आलास... सीधी सी बात थी, तू खूप मिस केलं होतंस मला, मी आठ दिवस नव्हते तर...
जो मुलगा मला न भेटता आठ दिवस नव्हता राहू शकत, तो कसा राहतोय मग आता, महिनोनमहिने मला न भेटता... आणि मी तरी कशी राहतीये... म्हणजे कित्ती छोट्या छोट्या गोष्टी आठवतात. मी कधी कल्पनाही केली नव्हती, की एकाच हॉटेलमध्ये कमीत कमी आठवड्यातून एकदा (आणि जास्तीत जास्त कितीही वेळा...) मी जाईन आणि एकच ठरलेली डीश खाईन... तुझ्या आवडत्या इराण्याच्या हॉटेलमध्ये मात्र आपण असंख्य वेळा गेलोय. आणि कैकदा फक्त रुमाली रोटी आणि तवा पनीर हे आणि हेच खाल्लंय... त्यातही ती रुमाली रोटी आधी एकच मागवायची कारण मी अर्धीच खाणार... पुढे तुला हवी असेल तर प्लेन रोटी, तुझ्यापुरती... अशातच कधी तरी तिथल्या एका डेझर्टचा शोध लागला... आपल्या दोघांपुरतं बोलायचं तर ते जगातलं बेस्ट इन्व्हेन्शन...!!! ना...??? नंतर नंतर या हॉटेलचा एवढा ओव्हरडोस झाला, की आपण त्याच्या आसपास फिरकेनासे झालो...!!!
अशा अनेक हॉटेल्स मध्ये जाऊन आपण अनेक गोष्टी अगदी नकोशा होईपर्यंत खाल्ल्याएत... बरं, तुझ्या आजुबाजुला शौकीन आणि खादाड मित्रांची कमी होती का, की तू सगळीकडे मला घेऊन जावंस... तर तसंही नव्हतं... पण का कुणास ठाऊक, मला बरोबर नेऊन मला मस्का मारुन काही खिलवल्याशिवाय तुला चैन पडत नसे... तुझ्या या असल्या आग्रहांमुळे मी अनेकदा मला आवडत नसलेल्या अनेक गोष्टीही तुला आवडतात म्हणून घशाखाली उतरवल्याच्या कित्येक आठवणी आहेत... हे सगळं असं मध्येच का आठवतंय मला...?? माहित नाही. पण आठवतंय खरं...
म्हणजे, तू नाहीयेस तर आता जाणं होत नाही का कुठल्या हॉटेलमध्ये... तर तसंही नाहीये. पण आता कुणी नाही जे तुझ्या इतक्या प्रेमाने मला खायला घालेल... माझ्या आवडी निवडींकडे लक्ष देईल... मला आवडतात म्हणून, एकाच वेळी सगळ्या फ्लेवरच्या बोर्नविल किंवा कॅडबरीज मला आणून देईल... त्यामुळे अक्षरशः पावलोपावली तुझी उणीव आहेच... आपला पिझ्झावाला... आपला शहाळंवाला... एखाद्या हॉटेलमधला आपला वेटर... आपल्यापुरतं वसवलेलं किती छान जग होतं आपलं... अजुनही ते जग आहे तिथेच आहे... फक्त त्या जगात आपण दोघं मात्र वेगवेगळे...
आपण कित्तीदा अक्षरशः फाल्तू कारणांवरुन एकमेकांशी भांडलोय... बोलायचे बंद झालोय... एकमेकांना टाळलंय... आणि काय आणि काय... असंच एकदा कशावरुन तरी आपण बोलत नव्हतो... आणि कसं काय कुणास ठाऊक, तेव्हा पहिल्यांदाच असं झालं... की नाही ना बोलायचं?? ठरवलंयस ना तू...?? मग नाहीच बोलायचं... मी मुळीच माघार नाही घ्यायची हे ठरवलं. झुकले नाही. दोन दिवस नाही, तीन दिवस नाही... फूल टू शांतता, माझ्या बाजूने...!!! शेवटी तीच तुला नकोशी झाली, आणि तू फोन केलास. नेहमी प्रमाणे मधातलं बोलायला सुरवात केलीस... माझी हं...!! बरं...!! ठीके...!! हो...!! हरकत नाही...!! अॅज यू विश...!! असली उत्तरं ऐकून शेवटी सॉरी म्हटलंस... आणि जगातलं एक महान तत्वज्ञान मला ऐकवलंस... म्हणे, ''मांजराला कसं, दुर्लक्ष केलं की ते जवळ यायला बघतं... आणि जवळ जवळ घेत बसलो तर नखं लावतं... तेच माणसांचं आहे, जास्त मस्का मारायला गेलं तर उपयोग नाही होत, पण दुर्लक्ष केलं की आपोआप सुतासारखी सरळ येतात माणसं...'' व्वा, काय पण अक्कल ना तुझी...?!?! पण तुझ्या बाबतीत खरंच होतं ते... तुला सोडून दिलं की तु स्वतःहून आसपास रहायचास... हा तुझाच सिद्धांत मानून मी खरं तर तुला सोडून दिलं होतं मोकळं, पण नेमका यावेळी मात्र सगळा विचका झाला... दुर्दैव माझं, तुझं आणि आपल्या दोस्तीचंही... दुसरं काय...
खरं तर अशा कित्ती आठवणी आहेत... तुझ्या घराची, कपाटाची एकेक एक्स्ट्रा किल्ली होती माझ्याकडे... तुझ्याकडची हरवली की माझ्याकडची मी तुला सुपूर्द करायची एवढीच माझी ड्यूटी... हो, ड्यूटीच ती... आणि तुझी सगळ्यात जवळची मैत्रीण म्हणून कर्तव्यच ते माझं... तू नाही तर कोण करणार असं तू मला विचारलंस की मी निरुत्तर... मी नाही करणार तर कोण अशा कॅटॅगरी मधल्या असंख्य गोष्टी... जसं की तू तुझ्या परिक्षेसाठी अभ्यासाला जागणार असशील तर मीही माझ्या घरी जागायचं... निदान अलर्ट झोपायचं... का, तर अभ्यासातून तुला ब्रेक हवा असेल तेव्हा तू मला नाही तर कुणाला फोन करणार... आणि अर्थातच तूही माझ्याबाबतीत ही काळजी घ्यायचास... परिक्षेला जाताना सगळ्यात शेवटी तू बेस्ट लक द्यायचास... म्हणजे ते जास्त उपयोगी पडेल अशी निरागस समज... रिझल्ट लागला की तो तू सगळ्यात आधी मला कळवणार... मग आपण भेटणार... तू आल्या आल्या मी तुझ्यासाठी काय आणलंय हे शोधणार... अंदाज घेणार... आणि मी आणलेली अगदी छोटीशीही गोष्ट पुढे केली की लहान मुलासारखे तुझे तुझे डोळे लकाकणार... पुढे मग, पिल्ल्या, तूच गं... आहे का दुसरं कुणी, ज्याला असं काही सुचेल असं विचारणं... आणि मी लाडात येऊन, नक्की नाही ना? कुणीच नाही ना? हा पण नाही ना? तो पण नाही ना? अशी तुझ्या सगळ्या जवळच्या मित्रांची नावं घेऊन, मी त्या सगळ्यांच्याही आधी आहे याची खात्री करुन घेणं...!!! कसले भारी होते ते दिवस...
आज पर्यंतच्या आयुष्यात आपण सगळ्यात जास्त सुखदुःख एकमेकांबरोबर वाटली... बराचसा वेळ घालवला... अनेक गोष्टींच्या बाबतीत आपल्या दोघांच्यात टोकाचे मतभेद होते... प्रसंगी हिरीरीने वाद घालून ते एकमेकांसमोर मांडलेही... पण या गोष्टींचा आपल्या मैत्रीवर कसलाच परिणाम नाही झाला हे महत्त्वाचं... तुझी देवावर श्रद्धा होती... माझी नव्हती... पण तुला हवं म्हणून तुझ्याबरोबर एखाद्या देवळात येणं मला गैर नाही वाटलं... तू देवळात दिलेल्या देणगीची पावती ठेवायला माझ्याकडे द्यायचास... खरं तर एकदा झालं ना देऊन मग पावत्या काय करायच्या, पण तु ठेव म्हटलंयस, म्हणून ठेवायची एवढंच...
आपलं दोघांचं जग या बाहेर तुझं एक जग होतं... त्यात तुझी बाईक... तुझी जिम आणि तुझे असंख्य अगणित मित्र आणि काही छान, काही बोअरिंग मैत्रिणी... या सगळ्यांचे डिटेल्स ऐकणं हे एक माझं ठरलेलं काम... बाईकमध्ये कुठलं ऑईल असलं तर ती छान पळते... इथपासून ते तुझ्या जिममधल्या अमक्या मुलाचा तो तमका ट्रेनर... असल्या कित्ती निरस गोष्टी ऐकण्यात मी आणि ऐकवण्यात तू वेळ सत्कारणी लावलाय ते नुसतं आठवलं तरी हसायला येतं...
तुझं पझेसिव्ह असणं... ते तर हवंसं आणि नकोसंही... कुठलीशी हिंदी मूव्ही पहायला तू गेला होतास... मध्यरात्री ती मूव्ही संपल्यावर तू मला फोन केला होतास... कारण त्यातल्या हिरॉईन ला क्रूरपणे मारलेलं पहाताना, तुला तिच्या जागी म्हणे मीच दिसत होते... आणि म्हणून तू कमालीचा अस्वस्थ झाला होतास... कुणाचं काय आणि कुणाचं काय या विचाराने हसायलाच आलं होतं मला तेव्हा... पण मग मला कशी अक्कल नाहीये... मी कशी मंद आहे वगैरे आख्यान रात्री एक वाजता ऐकत बसायला लागलं असतं ते टाळायचं म्हणून मी गोड बोलून तुला समजावलं... तूही शहाण्या मुलासारखा झोपायला गेलास... दुसर्या दिवशी सकाळी तुझा लगेच भेट असा फोन आला मला... मी भेटले... तुझं आपलं एकच... ती मुलगी, आय मीन हिरॉईन... तिला मारलं त्या माणसाने, मग तुला माझीच आठवण आली वगैरे वगैरे... हे सांगतानाही तुझे डोळे भरलेले... अक्षरशः मनीमाऊ झालेलं तुझं... आठवतंय... नंतर तोच हिंदी सिनेमा पहायला तू मला नेलंस... तयातला तोच तिच्या मरण्याचा सीन पहाताना मला तू का हवालदिल झालेलास याची जाणीव झाली... डोळे माझेही भरुन आले... पण, ते तीला मरताना बघून नाही... तुझ्यासाठी मी किती महत्त्वाची होते या जाणिवेतून... आणि हो, आय होप तुला हे ही आठवत असेल, की तुला एखाद्या थिएटर मधला सामोसा आवडतो म्हणून तु तिथल्या एखाद्या बंडल शो साठीही जाऊन बसायचास... आणि असल्या एखाद्या टुकार सिनेमाला कंपनी म्हणून तू मला घेऊन जायचास... आठवलं तरी आत्ताही चिडचिड होते माझी... पण, तुझ्याबाबतीत मला काहीच अवर्ज्य नव्हतं ना, त्यातून हे असं व्हायचं मला... बंडल पिक्चर... ओके... रोज एकच हॉटेल ओके... तुझ्यासाठी मी आणि माझ्यासाठी तू, अगदी काहीपण...
अशी थोडी थोडकी नाही तर चांगली सहा सात वर्ष... एकमेकांवर जीव ओवाळून टाकण्याची... बाकी कुणाचंही अस्तित्त्व विसरुन जगण्याची... आपण बरोबबर होतो तेव्हा लागलंच नाही ना आपल्याला इतर कुणी... तुला लिहायला बसते तेव्हा असं कुठलं कुठलं काय काय आठवतं... तुझ्या कुठल्याशा एका मामाचा अॅक्सीडेंट आठवतोय नं तुला... अक्षरशः जीवघेणा अॅक्सीडेंट... त्यानंतर तो मोजकेच तास जगला, तेही प्रचंड वेदना सोसत... तो गेला त्या रात्री तु घरी आणि मी पुण्यात, अख्खी रात्र जागून काढलेली... फोन कानाला लावून आपण फक्त अश्या सगळ्या दुखर्या क्षणांवर बोलत होतो... कैक तास... त्याक्षणी एकमेकांपासून काहीशे किलोमीटर लांब असूनही जवळ असलेले आपण...
माझ्या बरोबर प्रवास करायचा म्हणून हातातलं रिझर्व्हेशन फाडून टाकून आयत्या वेळी माझ्या बसमध्ये येऊन बसलेला तू... मला साधं खरचटलं तरी अस्वस्थ होणारा तू... आपल्या गॅंगबरोबर गप्पा मारत बसल्यावर जर कुणी उगाचच मला टार्गेट करत असेल तर नेहमी माझी बाजू घेणारा तू... तुझ्याबरोबर तुझ्या पिझ्झा वाल्याकडे मी पिझ्झा खायला येणार असेन तर त्याला पिझ्झाची ऑर्डर देताना एक्स्ट्रा कॅप्सिकम हे न विसरता सांगणारा तू... रोज नवीन नवीन गोड गोड नावांनी मला हाका मारणारा तू... आणि दुसर्या बाजूला अक्षरशः आपली ओळख होण्याआधी पासून मी ऑब्झर्व्ह केलेला तुझ्या चेहर्यावर आणि डोळ्यात दिसणारा माज, जरा बर्या शब्दात सांगायचं तर अॅटीट्यूड... सतत नवीन नवीन टीशर्टस घ्यायची तुझी क्रेझ... एखादी वस्तु घरी आणली, नाही मनासारखी वाटली तर ती बदलून आणण्यासाठी जीवाचं रान करणारा तू... अगदी सहा महिन्यांपूर्वी घेतलेली जीन्स पुन्हा त्या शहरात गेल्यावर बदलून घ्यायची म्हणून त्या दुकानदाराशी मखलाशी करणारा तू... आणि हे सगळं यशस्वी पार पडल्यावर मला विजयी वीर असल्यासारखा फोन करुन आपला पराक्रम ऐकवणारा तू... बाईकचा नंबर घेण्याआधी मला फोन करुन स्वतःबरोबर मलाही कन्फ्यूज करणारा तू... नंबर प्लेट तयार करताना त्यातल्या फॉन्ट बद्दल कमालीचा चिकित्सक असलेला तू... अशी कित्ती कित्ती रुपं आहेत तुझी डोळ्यासमोर... आपण आता एकत्र नाहीयोत, पण या अशा असंख्य आठवणी माझी पाठ सोडत नाहीत... एखाद्या वीकेंडच्या संध्याकाळी अचानक ठरलेला बाहेर जेवायचा प्लॅन... तेही तुझ्या आवडीच्या एखाद्या टपरीवजा हॉटेलमध्ये... तिथे पोचल्यावर, तू इथे आणलंयस मला जेवायला... या माझ्या प्रश्नावर तू मला तिथल्या पदार्थांचं ऐकवलेलं कौतुक... आणि पुन्हा एकदा तुझ्या आनंदासाठी म्हणून माझं तिथे तुझ्याबरोबर जेवणं... तिथून बाहेर पडल्यावर माझा कॉफीचा हट्ट... तू मला सोडून मित्रांच्या अड्ड्यावर जायच्या घाईत... म्हणून तू चक्क आपल्या कॉफीवाल्याला मला बाईकवरच कॉफी आणून द्यायला सांगणं... आणि कॉफी पित पित मी रुमवर पोचणं... हे सगळं निव्वळ भन्नाट... असे क्रेझी मोमेंट्स मला तूच देऊ शकतोस फक्त...
माझ्या प्रत्येक क्षणातला अर्धा भागीदार तू असतोस... मी उर्दू शिकायला सुरवात केली तो दिवस आठवतोय तुला... खरं तर तुझ्या मुळीच मनात नव्हतं मी असं काही करणं... तुझ्या मते, उर्दू शिकायला जाणार म्हणजे तिथे मदरसा टाईप, कट्टर इस्लामी वातावरण असेल... माझ्यासारख्या सदानकदा जीन्स आणि टीशर्ट मध्ये वावरणार्या मुलीचं काय होणार तिथे... वगैरे वगैरे हजार शंका तुझ्या डोक्यात... पण पहिल्या दिवशीचा क्लास संपवून जेव्हा मी तिथे माझे क्लासमेट्स असलेल्या काका काकूंबद्दल तुला सांगितलं तेव्हा हुश्श झालेलं तुला... आणि हो, मी काढलेली आलिफ, बे, पे ही अक्षरं सुद्धा सगळ्यात आधी मी तुलाच दाखवली होती, आठवतंय... कौतुक कुठल्या शब्दात करावं हे कळलं नाही, की तू नुसतं जवळ घेऊन केसातून हात फिरवायचास... त्या दिवशीही तू असंच केलं होतंस...
मी वर्तमानपत्रात लेख लिहीला काय... किंवा न्यूज चॅनेलवर नोकरी केली काय... तुझ्यासाठी मी फक्त एक पिल्लूच... संदीप खरेने त्याच्या मुलीसाठी, रुमानी साठी लिहीलेली इल्लू इल्लू पिल्लू गं ही कविता, तुझ्या लेखी जणू फक्त माझ्यासाठीच असते... नाक छोटं तोरा मोठा गाल रुसून फुल्लू गं... हे संदीपने रुमानीलाही दाखवलं नसेल इतक्यांदा तू मला म्हणून दाखवलंयस... आणि माझ्याकडून म्हणून घेतलंयस सुद्धा...
मी अशा आठवणी उगाळत बसते तेव्हा अक्षरशः या जगाचा भाग नसतेच मी... मी वेगळ्याच दुनियेचा हिस्सा असते, जिथे आता मला तुलाही येऊ द्यायचं नसतं, या क्षणी... मध्ये कुठेतरी मी एक उर्दू शेर वाचला होता... तोहमतें मुझपे आती रही है कई, एक से एक नई नई... खूबसुरत मगर जो एक इल्जाम था, वो तेरा नाम था... हे ज्या कुणी लिहीलंय, किती खरं लिहीलंय... मेरे लिये भी तुम सबसे खूबसुरत इल्जाम की तरहा थे... जो अब मिट गया है, मगर उसकी खूबसुरती अभी भी है... तुझ्या नसण्याची बोच अक्षरशः पदोपदी आहे... प्रत्येक हार जीत, प्रत्येक आनंद दुःख हे सगळं तुझ्याबरोबर वाटायची एवढी सवय होती... की आता दरवेळी प्रश्न पडतो, की पण आता हे सगळं सांगू कुणाला... मित्र मैत्रीणींची कमी कधीच नव्हती... पण त्यातलं कुणीच तुझी जागा नाही नं घेऊ शकत... आपण जसे पुढे जाणार, मोठे होणार तसे आपले मार्ग वेगळे होणार हे तर खूप पूर्वीच होतं मला माहिती... पण, मार्ग वेगळे झाले तरी धरलेलं बोट सुटणार नाही कधीच अशी खात्री होती मनाशी... नेहमी... परवा, म्हणजे अगदी आठ पंधरा दिवसांपूर्वी मला ऑफीस ला जाताना अॅक्सीडेंट झाला... कदाचित योगायोग पण त्या सकाळीच तुझा विचार करताना वाटलं, की समजा आपलं बरं वाईट काही झालं तर कोण येणार आता आपल्याकडे धावत... त्याच दिवशी एका बाईक वाल्याने रॉंग साईडने येऊन ठोकलं मला... पाय जाम दुखावला... म्हणजे मला तर वाटलं मोडलाच असणार... पण सुदैवाने फक्त मुका मार होता... दोन दिवस घरी बसल्यावर परत तिसर्या दिवशी ऑफीसला जाता आलं... माझे मित्र मैत्रिणी आले... सगळं झालं, डॉक्टर, औषधं... पण तुझं नसणं जाणवलं फार... खूप बेचैन आहे मी तू नसल्यापासून... फक्त आठवणी आहेत बरोबर... जपून ठेवलेल्या... तू दिलेल्या मोराच्या पिसांबरोबर त्याही ठेवल्याएत... पण फक्त एवढंच नाही... मोठ्ठी पोकळी आहे... कुठून तरी तुझ्या आवडीच्या ब्रूट चा वास येतो... मी पुन्हा हजारो क्षण मागे जाते... जाताना माझा वेग तुझ्या बाईकलाही मागे टाकणारा असतो... तुझ्याशिवाय मला बघणारे लोक मला सांगतात आता बास, तू पुढे जा... जो होता है अच्छे के लिए... पण, तुझं नसणं हे अच्छे के लिए कसं असू शकतं...???
या सगळ्या विचारात हरवताना मला चित्राची गझल आठवते... तू नहीं तो जिंदगी में और क्या रहे जाएगा... दूर तक तनहाईयोंका सिलसिला रहे जाएगा... अवधूत गुप्तेच्या खुपते तिथे गुप्ते मधला मॅजिक कॉल हवाय मला...!!! हे सगळं सांगावंसं वाटतंय तुला... पण कसं सांगू...???
मिस यू...