Sunday, 23 October 2011

मु. पो. कुसुमाग्रज आणि यादगार गुलजार

" मराठी मेरी मादरी जबान नही, लेकिन उस जमीन की बोली है जिसने पिछले पचास बरसोंसे मेरी परवरिश की है. पंजाब से निकली मेरी जडों को पनाह दी है. महाराष्ट्र की समन्द्री हवाओं का नमक खाया है. इस लिए उस जबान का मजा जानता हूँ... कर्जदार भी हूँ, कर्ज चुका रहा हूँ... '' अशी विनम्र कृतज्ञता मनात ठेवून गुलजारांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे हिंदी अनुवाद केले. गाणी आणि कवितांवर प्रेम असणाऱ्या रसिकांसाठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि गुलजार ही दोन्ही नावं नवीन नाहीत. म्हणूनच "मु. पो. कुसुमाग्रज ः भाषांतराचे पक्षी' हा नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेला कार्यक्रम रसिकांना एक अपूर्व अनुभव देऊन गेला.

कुसुमाग्रजांची मूळ मराठी कविता वाचून नंतर तिचा हिंदी अनुवाद वाचणे असं या कार्यक्रमाच्या सादरीकरणाचं स्वरुप होतं. कुसुमाग्रजांची कविता सादर करायला गुलजारांच्या साथीला होता मराठीतला सिद्धहस्त कवी सौमित्र! ( जो कवितेतल्या शब्द, अर्थ, भावनांना न्याय देत कवितेचं अफलातून सादरीकरण करतो ) "सौमित्र, तुम कोई भी नज्म पढते हो, तो ऐसा लगता है, जैसे वो हर एक नज्म तुम्हारी खुदकीही है...'' असं म्हणत दस्तुरखुद्द गुलजार त्याला पसंतीची पावती देतात! सौमित्रच्या पाठोपाठ गुलजार, त्यांनी हिंदीमध्ये अनुवादित केलेली कुसुमाग्रजांची "नज्म' त्यांच्या उर्दू मिश्रित हिंदी जबान मध्ये सादर करतात तेव्हा डोळे मिटून शांतपणे त्यांना ऐकणं हा अनुभव शब्दांत मांडणं निव्वळ अशक्‍य!

कुसुमाग्रजांच्या कवितांची सौंदर्यस्थळं, त्यांच्या शब्दांची ताकद, त्या कवितांचे सामाजिक संदर्भ हे सगळं गुलजारांना भावलं. त्यातूनच कुसुमाग्रजांच्या (अधून मधून गुलजार त्यांचा ""तात्यासाहाब'' असा अस्सल मराठमोळा, आदरपूर्वक उल्लेख करतात! ) निवडक शंभर कवितांचा अनुवाद करण्याकडे ते वळले. मराठी बोलता येत नसलं तरी गुलजारांना मराठीची उत्तम समज आहे. शिवाय त्यांचे जवळचे स्नेही अरुण शेवते आणि मराठी अभिनेत्री अमृता सुभाष यांनी या कविता समजून घ्यायला मदत केली. "अरुण की तो मैं जान खाता था...'' असं ते अगदी मोकळेपणाने सांगतात.

हा कार्यक्रम म्हणजे नुसत्या मराठी आणि हिंदी कवितांचं वाचन एवढंच नाही. कवितांच्या मध्ये मध्ये सौमित्रने गुलजारांना विचारलेले प्रश्‍न आणि उत्तरादाखल कधी हलकीफुलकी टोलवाटोलवी तर कधी त्यांनी केलेलं "सिरियस लाऊड थिंकिंग' हा या कार्यक्रमाचा आणखी एक सुंदर पैलू!! या प्रश्‍नोत्तरांच्या निमित्ताने समोर सुरू असलेला संवाद म्हणजे गुलजार साहेबांच्या चाहत्यांसाठी एक आगळी वेगळी इंटलेक्‍चुअल ट्रीट होती! त्यांच्या "इजाजत' मधली गाजलेली गझल "मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है' मधल्या "एकसों सोला चॉंद की राते' या ओळीचा दाखला देत "हे एकसो सोला चॉंद की राते काय प्रकरण आहे?'' या सौमित्रच्या प्रश्‍नावर "अरे भाई, वो असल में एकसो सतरा था, गिनती में गलती हो गई...'' असं मिस्कीलपणे ते उत्तरतात. मात्र what is death according to you? या प्रश्‍नाचं उत्तर म्हणून एक "नज्म' ते ऐकवतात. मृत्यू कसा यावा? हे ती नज्म सांगते. रुग्णशय्येवरचा मृत्यू नको. रस्त्यावर अपघात होऊन देहाला छिन्नविछिन्न करणारा मृत्यूही नको. "मुझे ऐसे मरना है, जैसे लिखते लिखते सियाही खतम हो जाएँ...'' हे म्हणताना त्यांचा स्वर किंचित ओला होतो, आपल्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाहीत...

केकचा तुकडा, कलोजस, असाही एक सावता, अखेर कमाई, कणा, रद्दी यांसारख्या अनेक कवितांचे अनुवाद ऐकताना कुसुमाग्रजांच्या मूळ कवितेशी एकरूप झालेले गुलजार पहायला मिळतात. कवितांमागून कविता सादर होतात. लहानपणापासून ऐकलेल्या, वाचलेल्या कुसुमाग्रजांच्या कविता गुलजारांच्या उर्दू शब्दांचे लिबास लेवून येतात तेव्हा त्या दोघींत उजवं डावं करता येत नाही. अशातच कधीतरी कार्यक्रम संपतो. आपण गुलजार साहेबांना भेटायला बॅक स्टेज गाठतो. त्यांच्याशी बोलायला म्हणून घाबरत घाबरत पुढे जावं तर ते स्वतःहून मायेने आपली चौकशी करतात. आपल्या डोक्‍यावर त्यांचा वडिलधारा हात ठेवतात. आपलं सगळं जगणं सार्थकी लागल्याचं समाधान त्याक्षणी मिळतं. एक यादगार दिवस घेऊन आपण बाहेर पडतो... पण तिथला कैफ मात्र काही केल्या मनावरुन उतरत नाही...!!!

Wednesday, 12 October 2011

क्या खोया क्या पाया जग में...

जानेवारीच्या १७ तारखेला माझी मोठी मावशी गेली. त्या धक्क्यातून बाहेर येतोय न येतोय तोपर्यंत एप्रिलच्या १३ तारखेला आजोबा गेले. आजोबांना कॅन्सर होता. त्यातल्या त्यात समाधान एकच की कॅन्सर असूनही त्यांना वेदना फारश्या झाल्या नाहीत आणि अतिशय शांत, सुसह्य मृत्यू आला...
आजोबांच्या मृत्यूने सगळ्यात मोठी हानी जर कुणाची झाली तर आदित्यची. तो त्यांना 'आबा' म्हणायचा. आबा गेले तेव्हा तो साधारण सव्वादोन/अडीच वर्षांचा होता. पण त्याला माणसं ओळखता यायला लागली तेव्हापासून त्याचे 'आबा' त्याच्यासाठी सर्वस्व होते. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी लुटू लुटू चालत 'आबांकडे' जाणे हा त्याचा नेम होता. आबा जवळ असले की त्याला तासंतास अगदी आई सुद्धा भेटली नाही तरी चालत असे. शिवाय कमालीचे शिस्तप्रिय असलेल्या आबांच्या सगळ्या नियमांना धाब्यावर बसवणं हे फक्त आदित्यच करू जाणे. सकाळी ८ चं ऑफिस म्हणून वर्षानुवर्ष पहाटे उठायची त्यांची सवय. त्यामुळे अर्थातच रात्री ९/९.३० ला ते झोपायला जात. त्यानंतर आम्ही सगळे घरात दबक्या पावलांनी आणि खालच्या आवाजात  वावरत असू, न जाणो चुकून त्यांची झोप मोड झाली तर... पण आदित्य रात्री ११/११.३० ला सुद्धा आबांकडे जायचंय म्हणून हटून बसे.  सुरुवातीला आम्ही तो रडला तरी त्याला रमवून आबांकडे जाण्यापासून रोखत असू, पण दुसर्या दिवशी त्यांना कळलं की ते उलट आमच्यावरच चिडायचे, त्याला का नाही पाठवलं?
पुढे पुढे आम्हाला न जुमानता त्याला वाटलं की तो जाऊन त्यांना उठवायचा आणि मग आबा त्याला गोष्ट सांगत किंवा चित्रांची पुस्तकं दाखवत बसायचे, त्याला झोप येईपर्यंत... दर गुरुवारी आबा बाहेर गेले की त्याला बुंदीचा लाडू आणायचे. पण पठ्ठ्या त्यांच्या शिवाय कुणाहीकडून लाडू भरवून घ्यायचा नाही. रोज सकाळी पेपर आले की त्यातल्या गाड्यांच्या जाहिराती बघणे या कार्यक्रमात आबा जायच्या दिवसापर्यंत खंड पडला नाही.
आणि अखेर १३ एप्रिल ला आजोबा गेले. उत्तरक्रीयेसाठी निघण्यापूर्वी आदित्यला त्याच्या बाबाने ''आबांना बाउ झालाय, म्हणून झोपलेत, डॉक्टर कडे नेतोय, तू एकदा नमस्कार कर'' असं सांगितलं. त्याप्रमाणे त्याने नमस्कार केला. शहाण्या मुलासारखं पहिले एक दोन दिवस त्याने आबांची चौकशी केली नाही. पण नंतर मात्र त्याने ''आबा कुठेत?'' हे विचारायला सुरुवात केली. ''डॉक्टर काकांकडे आहेत, बरं वाटलं की येतील'' किंवा ''तू शहाण्यासारखा वाग, मग येतील..'' ह्या उत्तरांनी थोडा वेळ त्याचं समाधान झालं. पण थोडाच वेळ...
पुढे आबांच्या दहाव्या दिवशी त्यांचा फोटो फ्रेम करून आणला. तो नजरेला पडताच त्या फोटोला पोटाशी धरून हा एवढासा मुलगा हर्षवायू झाल्यासारखं आरडा ओरडा करून नाचला. खाली लिहिलेलं त्यांचं नाव आम्हाला दाखवून, ''आदूचे आबा डॉक्टरांकडे आहेत'' असं लिहिलंय म्हणाला. तेव्हाचं त्याचं रूप बघून सगळ्यांचे डोळे पाणावले.. त्या दरम्यान घरी भेटायला येणाऱ्या  माणसांचा महापूर लोटला होता. त्याला सतत प्रश्न पडे, एवढी लोकं येतात, तरी आबा का येत नाहीत? पण त्याच्या प्रश्नाला कुठल्याही भल्या माणसाकडे उत्तर आहे का?
मध्ये एकदा त्याची आई (माझी मावशी) त्याला माझ्याकडे ठेवून कुठेशी बाहेर गेली होती. आता काही झालं तरी त्याला रडू न देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. म्हणून त्याला जमेल त्या पद्धतीने रमवत होते. आणि अचानक जवळ येऊन तो मला म्हणाला, ''दीदी, आबा कधी येनाल गं?  आता ते आले नाही तल मी ललेन हां...'' मी निरुत्तर झाले. असं त्याने आम्हाला सगळ्यांना अनेकदा निरुत्तर केलंय... परवा एकदा कशावरून तरी त्याचं डोकं फिरलं होतं, हमसून हमसून रडत होता. मावशीने जवळ घेऊन शांत केलं, तर हा म्हणाला, ''मला माहितीये, माजे आबा आता येनालच नैत, तुमी त्यांना आनायला पन नाई जात...''
तसं आबा येणार नाहीत हे त्याने मनोमन केव्हाच जाणलंय हे आम्हीही ओळखलं होतंच. पण शेवटी एकदाचं त्याने स्वतःच हे आम्हाला स्पष्ट सांगून टाकलं.
आता रोज सकाळी उठल्यावर पेपर मधल्या गाड्या तो स्वतःच बघतो. बुंदीच्या लाडवाची आठवण आली की आम्हाला कुणाला तरी फर्मान सोडतो, ''घेऊन या'' म्हणून. अगदीच आबांची आठवण असह्य झाली की त्यांचा फोटो घेऊन बसतो. त्या फोटोशी गप्पा मारत... ''आबा मला आवडतात'' असं सांगतो. कुणी डॉक्टर कडे जायला निघालं की मात्र त्याचं तोंड अगदी एवढंसं होतं. डॉक्टर कडे जाणे या गोष्टीचा त्याने धसका घेतलाय. वयाच्या  अवघ्या तिसर्या वर्षी त्याने त्याच्या सगळ्यात लाडक्या माणसाला गमावलंय. मृत्यू या एकमेव सत्याशी एवढ्या लहान वयात अशी जवळून ओळख होणं चांगलं की वाईट ते मला माहित नाही...
गेल्या वर्षभरात अशी खूप माणसं गमावली. मोठी मावशी आणि आबा तर गेलेच. पण पंडित भीमसेन जोशी गेले, जगदीश खेबुडकर, खळे काका गेले. पाठोपाठ गौतम राजाध्यक्ष मग नवाब पतौडी, Apple चा  स्टीव्ह जॉब्ज आणि अगदी परवा जगजीत सिंग...
या सगळ्यांची आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक खास जागा होती. ही माणसं जरी गेली, तरी ती जागा राहणार... तशीच. या नंतरही आपण जगतोच आहोत. ही माणसं जातानाच आपल्याला त्यांच्याशिवाय जगायचं बळ देऊन जातात. कणखर बनवून जातात.
जगजीत गेले. जाताना त्यांच्या गझलांची पुंजी आपल्यासाठी मागे ठेवून गेले. ते सगळं संचित घेऊन पुढे जायचंय... कुणास ठाऊक अजून काय काय गमवायचंय... कागज की कश्ती, बारीश का पानी नुसतं आठवत मोठं व्हायचंय. आत्ता वाजपेयींची जगजीत साहेबांनी गायलेली ती कविता सतत ओठांवर येतेय... ''जनम मरण का अविरत फेरा, जीवन बंजारोन्का डेरा.. आज यहाँ कल कहाँ कूच है, कौन जानता किधर सवेरा... क्या खोया क्या पाया जग में, जीवन एक अनंत कहानी... ''

Thursday, 6 October 2011

ही कनेक्टेड द लास्ट डॉट... :(


स्टीव्ह जॉब्स गेल्याचं सकाळी एका मित्राने फोनवरून कळवलं. त्याक्षणीच महिन्या दीड महिन्यापूर्वी लोकसत्ताच्या शनिवारच्या  अंकात गिरीश कुबेरानी स्टीव्ह वर 'अन्यथा' मधून लिहिलेला लेख आठवला.  तो लेख म्हणजे स्टीव्ह ने स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभ प्रसंगी केलेल्या भाषणाचा अनुवाद होता.
आपलं महाविद्यालयीन शिक्षण 'मन रमत नाही' या कारणासाठी सोडून दिलेला हा माणूस... पुढे स्टॅनफोर्ड सारख्या जगद्विख्यात विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहिला. त्याने तिथल्या विद्यार्थ्यांना सांगितलेल्या तीन गोष्टी विद्यार्थीदशेतल्या प्रत्येकानेच आवर्जून लक्षात ठेवाव्यात अशा आहेत...
त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, त्याचं महाविद्यालयीन शिक्षण कधीच पूर्ण झाले नाही. रीड कॉलेजमध्ये स्टीव्हने प्रवेश घेतला. हे स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या तोडीचं कॉलेज. मात्र, तिथल्या शिक्षणात मन न रमल्यामुळे लवकरच त्याने तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्याने  तिथून कॅलिग्राफीचे धडे गिरवले होते. त्या धड्यांचा उपयोग पुढे कॉम्प्युटर बनवताना त्याला झाला. "रीड कॉलेजमधील शिक्षणाला कंटाळलोच नसतो तर कॅलिग्राफीकडे वळलोच नसतो,'' हे स्टीव्हचं  म्हणणं महत्वाचं आहे.
दुसरी गोष्ट त्याच्या उद्योगाची. वयाच्या विसाव्या वर्षी वॉझ नावाच्या एका मित्राच्या मदतीने  स्टीव्हने पहिला  कॉम्प्युटर तयार केला. त्याला नाव दिलं "ऍपल'. पुढे या वॉझबरोबरच त्याने "ऍपल' ही कंपनी सुरू केली. पुढच्या दहा वर्षांत "ऍपल' ने चार हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. कंपनीचा पसारा 200 कोटी डॉलरचा झाला. त्यांनी पहिला मोठा कॉम्प्युटर "मॅकिंतॉश' तयार केला. पुढे याच कंपनीतून स्टीव्ह ला काढून टाकलं. स्वतःच सुरू केलेल्या कंपनीतून काढून टाकणं हा खरं तर केवढा मोठा अपमान. पण त्याचा सल बाजूला ठेवून त्यांनी काहीतरी नवीन करायचं ठरवलं आणि "नेक्‍स्ट' ही कंपनी सुरू केली. पाठोपाठ "पिक्‍सर' नावाची कंपनी सुरू केली. "टॉय स्टोरी' ही जगातली पहिली ऍनिमेटेड फिल्म स्टीव्हने तयार केली. या कंपन्यांचं काम एवढं मोठं झालं  की पुढे "ऍपल'ने "नेक्‍स्ट' आणि "पिक्‍सर' या कंपन्या विकत घेतल्या. आणि स्टीव्ह पुन्हा "ऍपल'मध्ये आला. या दोन कंपन्यांच्या जोरावर "ऍपल'चा आताचा विस्तार झाला. "ऍपल'मधून हकालपट्टी झाली नसती, तर "नेक्‍स्ट' आणि "पिक्‍सर' या कंपन्या सुरू झाल्या असत्या का, आणि आज "ऍपल' जिथे आहे तिथे असती का असा प्रश्‍न तेव्हा स्टीव्हला  पडला.
तिसरी गोष्ट मृत्यूविषयी. येणारा प्रत्येक दिवस हा आपला शेवटचा दिवस म्हणून जगलो, तर एक दिवस त्या सगळ्या जगण्याचा अर्थ कळतो, असं त्याने  कुठेतरी वाचलं होतं. कर्करोगाचं निदान झालं तेव्हा डॉक्‍टरांनी फक्त तीन महिने शिल्लक आहेत असं सांगितलं होतं. मात्र, शस्त्रक्रिया झाली आणि पुढे तो आज पर्यंत जगला...
''मृत्यूचा तो स्पर्श खूप काही शिकवून गेला. आपल्या हातातला बहुमूल्य वेळ आपण वाया घालवतो. पण आपल्या मनाचा कौल ऐकला तर त्यापेक्षा मोठं जगात काहीही नसतं... स्टे हंग्री, स्टे फूलीश!!'' असा साधा सोपा कानमंत्र त्याने  स्टॅनफोर्ड च्या विद्यार्थ्यांना दिला...
स्टीव्ह जॉब्स गेला आणि जगभर त्याचे चाहते हळहळले. सगळ्या वृत्तपत्र आणि वृत्त वाहिन्यांनी त्याच्या कर्तृत्वाचा आढावा घेत त्याला श्रद्धांजली अर्पण केली.
शिक्षणावर माणसाचं मोठेपण ठरत नाही हे दाखवून द्यायला स्टीव्हचं एकमेव उदाहरण किती पुरेसं आहे ना? निव्वळ कॉलेज मध्ये मन रमत नाही म्हणून तो शिक्षण सोडू शकला. शिवाय त्यासाठी त्याला कुणाला उत्तरंही द्यावी लागली नाहीत. कदाचित म्हणूनच तो त्याला जे हवं ते करू शकला...
जगभरातल्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनीही यातून बोध घ्यायला हवा. समस्त पालक आपल्या मुलांना 'खूप शिकून मोठे व्हा' असं सांगतात. स्टीव्ह च्या पालकांची पण तशी इच्छा होतीच...
तो खूप शिकला नाही, पण खूप मोठा मात्र झाला!!

Steve, we will miss you... Rest In Peace.

Saturday, 1 October 2011

मोबाईल सॅव्ही किड्स

सकाळी जाग आली की बहुतांशी माझा हात उशाशी असलेल्या माझ्या  मोबाईलकडे जातो. जगाच्या पाठीवर माझ्या आधी उठून कामाला लागलेल्या प्रियजनांपैकी कुणाचा तरी एखादा ‘गुड मॉर्निग’ मेसेज आलेला असतो. अशाच एखाद्या मेसेजला रिप्लाय करण्यानं माझा दिवस सुरू होतो. खरं तर सकाळी उठल्यापासून सगळेच आपापल्या व्यापात.. पण ‘गुड मॉर्निग’ या दोन साध्या शब्दांनी का होईना, कुणीतरी आपल्याला ‘नोटीस’ केलंय हे फिलिंग खरंच छान असतं. कदाचित त्या छान फिलिंगमधूनच आपला आजचा दिवससुद्धा छान जाणार अशी खात्री वाटते.
छोटय़ा-छोटय़ा गोष्टी असतात. एखादी लाडकी मैत्रिण जीवघेण्या आजारातून उठलेली असते. रोज तिच्याशी एक तरी फोन व्हावा असं वाटत असतं. पण प्रत्यक्षात मात्र राहून जातं. अशावेळी मग तिचाच मेसेज येतो, जाब विचारायला.. आणि मग छान संवाद रंगतो. आम्हा दोघींना जोडायला तेवढाही पुरेसा, असा तो संवाद! परीक्षेच्या मोसमात आपण सगळेच आपली संपर्क यंत्रणा तात्पुरती  थांबवून स्वत:ला अभ्यासाला जुंपून घेतो. सात-आठ तासांच्या 'break‘' नंतर सहज मोबाईल पाहिला तर कुणीतरी मेसेज केलेला असतोच- 'work hard, study well, but Take care!' मी लांबच्या प्रवासात असेन आणि वाटेत २/३ तास नेटवर्क नसेल तर मी अस्वस्थ होते. पण मग नेटवर्क आल्यावर तिकडनं कुणाचा तरी मेसेज मिळतो- ‘कुठे पोचलीस? लवकर ये, वाट बघतोय..’ हा असा मेसेज मला मनापासून सुखावतो.

कॉलेजमधला जुना ग्रुप अख्खाच्या अख्खा भेटणं आजकाल दुरापास्तच झालंय. पण क्वचित कधी तरी योग येतो. सगळे मिळून भेटणं, गप्पा- दंगा-मस्ती आणि मग अलविदा.. घरी पोहोचण्याच्या आधीच कुणीतरी मेसेज केलेला असतो 'Had a great time...' अनेकदा तासनतास गप्पा मारूनही सांगता येत नाही इतकं काही हा एक छोटासा मेसेज बोलून जातो!! म्हणूनच मोबाईल मला जीवापाड प्रिय आहे.
नुकतेच फेसबुकवर काही फोटोज अपलोड केले. त्यापैकी एका फोटोमध्ये मी तल्लीन होऊन मोबाईलवर काही ‘चाळे’ करत होते. आणि कुणीतरी ते नेमकं ‘क्लिक’ केलं होतं.. ते फोटोज पाहून एका मित्राचा मेसेज आला- 'Hi, Mobile savvy Kid छान आलेत फोटो..!’ त्यातला ‘मोबाईल सॅव्ही किड’ हा उल्लेख खरं तर सुरुवातीला नाकाला मिरच्या झोंबल्यासारखा मला झोंबला होता. पण नंतर तोच मला खूप मागे घेऊन गेला...
कोकणात जिथे मी लहानाची मोठी झाले तिथे साधा लँडलाईन फोनसुद्धा एकेकाळी  इतकी दुर्लभ गोष्ट होती की घरी फोन आला तेव्हा काही तरी आश्चर्य पाहिल्यासारखी माझी परिस्थिती होती. त्या परिसरात तो एकुलता एक फोन असल्यामुळे आजूबाजूच्या चार लोकांसाठीसुद्धा आमच्याकडे फोन येई. फोनची रिंग वाजली की तो कुणी उचलायचा यावरून माझी आणि माझ्या भावाची वादावादी व्हायची. पुण्या-मुंबईत कुणाला फोन करायचा झाला तर एक तर ‘ट्रंककॉल’ बुक करायचा किंवा मग त्यापेक्षा सोयीस्कर म्हणून बाहेरच्या लांबच्या ‘एसटीडी बुथवर’ जाऊन फोन करायचे..! त्यामुळे तेव्हा जर कुणी म्हणालं असतं की तू कॉलेजला जाशील तेव्हा तुझ्याकडे तुझा एकटीचा स्वतंत्र फोन असेल तर विश्वास ठेवणं शक्यत नव्हतं.. आणि आता तर काय, माणशी दोन मोबाईल असणंसुद्धा 'used to' झालंय..
मोबाईलमुळे जग जवळ आलंय हे खरं.. मी शिक्षणासाठी घर सोडलं आणि मग मोबाईल असणं ‘अपरिहार्य’ म्हणून मोबाईल मिळाला. पण घरच्या लँडलाईनचा ‘फील’ मोबाईलला नाहीच! लँडलाईनवर फोन आला की, सगळं घर त्या फोनभोवती कोंडाळं करायचं.. मी-मी करत सगळ्यांना एकमेकांशी बोलायचं असायचं. आईची मैत्रीण, बाबांचा मित्र यांच्याशीही ‘ए मावशी’, ‘ए काका’ असं म्हणून गप्पा चालायच्या! ‘आज जेवायला काय केलंयस’, असं विचारायला म्हणूनसुद्धा आई-मावशीचे फोन व्हायचे आणि ते तासन्तास चालायचे! बरं, आत्ता लागलेला फोन कट झाला तर तो पुन्हा लागेलच याची शाश्वती नसे! त्यामुळे माझ्या बाबांच्या भाषेत एकदा फोन लागला की यांना ‘गावगप्पा’ मारायच्या असतात!

आजकाल या गावगप्पा खरंच हरवत चालल्या आहेत.. फक्त लँडलाईन हा एकमेव ऑप्शन असताना सगळ्या मित्र-मैत्रिणींचे फोन पण तिथेच यायचे. त्यामुळे कुणाचा फोन, काय बोलतायत हे सगळ्यांना माहिती असायचं.. त्यामुळे तो फोन म्हणजे अख्ख्या घराशी संवाद असायचा.
हे चित्र आता इतकं बदलत चाललंय की कुणाचाही फोन आला की आपण पटकन उठून गॅलरीत जाऊन बोलतो.. आणि मग दोन्हीकडे शेजारच्यांच्या भुवया उंचावतात.. खरं तर लँडलाईनवर जे बोलायचो तेच आपण मोबाईलवर बोलतो, पण तरी आपण काय बोलत असू ही शंका सगळ्यांच्या मनात येतेच!
मोबाईल ‘परवडणं’ हासुद्धा एक भाग असतो. मोबाईल अगदी नवीन असताना, ‘नाईट पॅक’, ‘फ्रेंड्स प्लॅन’, असलं काहीही हाताशी नसताना एका साध्या मिस्ड कॉलमधूनही जोडलं राहाणं व्हायचं! माझा एक जिवलग  मित्र दुपारी आई झोपली की तिच्या फोनवरून मला फोन करायचा आणि मग आमच्या गावगप्पा चालायच्या. अशावेळी आमच्या मोबाईल मॅनियावर समस्त घराने केलेल्या टीका हा एक नवीन आणि स्वतंत्र चर्चेचा विषय... पण माझी आई जेव्हा तिच्या मैत्रिणींशी, बहिणींशी तासन्तास बोलते तेव्हा मी फक्त तिच्याकडे बघून हसते, तिला समजायचं ते समजतं..

आजच्या धकाधकीत, प्रत्येकाच्या ‘बिझी’ टाईमटेबलमध्ये, आपल्याला कुणाशीच बोलायला आणि कुणालाच भेटायला वेळ नसतो.. डेडलाईन्स, प्रेझेंटेशन्स, सेमिनार आणि मीटिंग्सच्या भाऊगर्दीत नात्यांवरचा मुलामा कमी होऊ नये यासाठी असा एखादा तासनतास चालणारा फोन, एखाद्या वीकएंडला  झाला किंवा रोज कुणालातरी एखादा मेसेज करायला काही सेकंद दिले तर  त्यात मला काहीच गैर वाटत नाही.. जिव्हाळ्याचा आणि मायेचा तो मुलामा जपला जाणार असेल तर ‘मोबाईल सॅव्ही’ म्हणवून घ्यायला माझी काहीच हरकत नाहीये..!

(प्रथम प्रकाशित : लोकसत्ता)