Thursday 1 September 2011

गणपती : एक आनंदनिधान

कोकणात गणपतीची धमाल वेगळीच. गणपती आले की शाळेला अगदी भरभक्कम आठ/दहा दिवस सुट्टी...  त्यामुळे सुट्टी सुरु झाली की उठून कोर्ल्याच्या घराची वाट धरायची हा नेम गेली कित्येक वर्ष चुकला नाही. कोर्ल्याला माझा मामा राहतो. भर पावसात गणपतीची मूर्ती घेऊन घरी पोचलो, की आजी दारातच पायावर दुध, पाणी घालून आणि औक्षण करून सगळ्यांना घरात घेते... तिथून सगळं घर गणपतीमय होऊन जातं... आणलेल्या मूर्तीला तात्पुरतं एखाद्या चौरंगावर ठेवायचं आणि मग पाहिला अर्धा पाउण  तास त्या मूर्तीला सगळीकडून न्याहाळून भरपूर कोडकौतुक करायचं.  की मग मोर्चा दुसर्या दिवशीच्या पूजेच्या तयारी कडे. ओटी, पडवी, माजघर असलेल्या जुन्या घराचं रंगरूप बदलून आता पोर्च, हॉल, किचन झालं तरी गणपतीचा उत्साह आणि रंगरूप मात्र तसंच आहे. पूर्वी ओटीवर असलेलं गणपतीचं डेकोरेशन आता हॉल मध्ये आलं.  पण अजूनही गणपतीच्या आदल्या दिवशी मध्य रात्रीपर्यंत मनासारखं डेकोरेशन पूर्ण होत नाही. किंवा त्यावर पोटभर उहापोह केल्याशिवाय ते पूर्ण झाल्यासारखं  वाटत नाही हे जास्त खरं आहे!! शिवाय ही तयारी फक्त डेकोरेशन पुरतीच नाही. पूजेचं ताट, त्यात गंध, अक्षता, गूळ खोबरं, कापूर, निरांजनं, अत्तर आणि काय आणि काय...  सकाळी लवकर उठून  फुलं, दुर्वा, पत्री काढणं... एक ना हजार गोष्टी करायच्या असतात. इतकी वर्ष आक्का होती, तोपर्यंत फुलं काढणं हे तिचं काम होतं. आक्का गेली कैक वर्ष आमच्याकडे कामाला यायची, पण ती घरातलीच! अगदी आजोबांपेक्षाही मोठी असल्यामुळे ती त्यांनाही बिनधास्त एखादं फर्मान सोडू शकायची! आणि मग आम्ही पोरं ''आक्का, तू ग्रेट गं!'' असं म्हणत तिला शाबासकी द्यायचो!तर काय सांगत होते, रोज सकाळी देवपूजेला फुलं काढायचा मान आक्काचा होता!  ती सकाळी सातला यायची आणि सगळ्यात आधी फुलं काढायला जायची. ताट भरून फुलं काढायची त्यात सुद्धा किती नजाकत होती! जास्वंद एका बाजूला, तगर, अनंत, दुर्वा, तुळशीच्या मंजिर्या असं सगळं बघूनच प्रसन्न व्हायचं मन! माझी मां  तर म्हणायची पण, आक्का सारखी शिस्तीत आणि सुंदर फुलं काढून दाखवा, मागाल ते बक्षीस देईन... आता आक्का नाही म्हणून फुलं काढायची राहत नाहीत. पण फुलांचं ताट पाहिलं की ही फुलं अक्काने काढलेली नाहीत हे लगेच जाणवतं!
स्वयंपाक घरात उकडीच्या मोदकांची तयारी सुरु होते.
एका बाजूला ही लगबग आणि आपल्याला दूरवरच्या एखाद्या वाडीत लाउड स्पीकर वर 'अशी चिक मोत्याची माळ होती गं, तीस तोळ्याची...' किंवा 'बंधू येईल माहेर न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला...' अशी गाणी ऐकू यायला लागतात. घराला उत्साहाचं उधाण येतं.

यावर्षी सुट्टी नाही म्हणून गणपतीला माझा मुक्काम पुण्यातच. गणपतीला घरी नाही अशी ही पहिलीच वेळ... त्यामुळे घरातल्या गणपतीची जबरदस्त  आठवण येतेय. गणपतीची पूजा सांगायला येणारा नेहमीचा काका, त्याला आजचा एकाच दिवस  आम्ही पोरं गुरुजी गुरुजी म्हणून चिडवतो! खरं तर त्याच्या अंगा- खांद्यावर खेळत लहानाचे मोठे झालो आम्ही. त्यामुळे पूजा, आरती झाली की नमस्कारासाठी वाकल्यावर पाठीवर एक थाप (की धपाटा?) मारून तोंड भरून आशीर्वाद देणारा हा आमचा एकटाच गुरुजी! पूजा झाली की मोदक... प्रत्येकाने एक तरी मोदक करायचाच हा जणू नियमच! त्यामुळे प्रत्येक जण आपलं कला कौशल्य त्या मोदकांवर अज्माव्णारच! दर वर्षी बसक्या नाकाचा, किंवा वेडा वाकडा झालेला पहिला मोदक, मग त्यावर झालेली चिडवा चिडवी... आणि मग ''यावर्षीचा पहिलाच आहे ना, आता दुसरा बघ मस्त करते की नाही...'' असं म्हणत मनासारखा मोदक जमला की आनंदाने माझं पण नाक त्या मोदका सारखंच वर होतं... दरम्यान ''नैवेद्य दाखवायला चला'' अशी आजोबाना order येईपर्यंत हॉल मध्ये कॅरम चे डाव रंगतात. चीटिंग होते, हाणामारी होते... शेवटी जिंकणार्याला एक जास्तीचा मोदक कबूल करून आजोबा उठतात. मग नैवेद्य... पंच पक्वानांनी भरलेलं हिरवं गार केळीचं पान, साजूक तुपाने माखलेला मोदक, त्यावरच्या दुर्वा गणपती बाप्पाला दाखवून झाल्या की हसत खेळत उठलेल्या पंगती... हे सगळं म्हणजे आनंदनिधान असतं!

लहान असताना काजू मोदकाच्या त्रिकोणी पाकिटातल्या आरती संग्रहाचं केवढं अप्रूप होतं... शिवाय संध्याकाळच्या आरत्यांसाठी शेजारी पाजारी जाताना पावसात निसरड्या झालेल्या पायवाटेवर घसरायला होऊ नये म्हणून मामा उचलून घ्यायचा ते सगळं विसरणं कदापीही शक्य नाही... तास दीड तास आरत्या म्हणून आणि टाळ्या वाजवून शेवटी हातांचे तळवे लालेलाल व्हायचे. हे असं अगदी आठ दिवस दणक्यात सुरु असायचं! तो गणपती सगळ्या गावाचा असायचा. इथे शेजारी कोण राहतात  हेही आपल्याला माहित नसतं, आणि तिथे मात्र तुम्ही वर्षातून एकदा गेलात तरी मी कोण हे सांगावं लागत नाही!

आत्ता मी ऑफिस मध्ये बसलीये. नुकताच  मला मामाचा फोन येऊन गेला. ''तुझी आठवण येतेय, गणपती पण विचारत होता, तू कुठेयस असं?'' माझ्या लाडक्या मामाचा आवाज ऐकून मला इथे क्षण भर काही सुचलं नाही. नकळत माझाही आवाज ओला झाला. मला तो अत्तराचा सुवास आणि केळीच्या पानावरचा नैवेद्य, प्राणप्रतिष्ठा केल्या नंतर अजूनच तेजाळलेली गणपतीची मूर्ती... जिवंत भासणारे त्याचे डोळे... हे सगळं इथे माझ्या समोर दिसतंय... आणि मी मनोभावे त्याला हात जोडलेत!  

11 comments:

  1. mala punha koknat, govyat nelas tu....

    ReplyDelete
  2. मस्त लिहिलंय. एकदम आटोपशीर. मी तर क्षणभर गोव्यातच पोहोचलो. गोवा म्हणजे फेनी, हुर्राक, मासे, समुद्र एवढाच नाही..तर शिमगा आणि गणेश चतुर्थीच....बाकी भक्तीनेच लिहिलंय..

    ReplyDelete
  3. आपण स्वतःला उत्सवप्रिय वगैरे म्हणवून घेतो. माणूस समाजप्रिय प्राणी आहे वगैरे कोणीही न विचारता सांगत रहातो. पण या उत्सवांमधला, एकत्र येण्यामधला ओलावा, नात्यांची निरपेक्ष ओढ; आपण किती जपतो कोण जाणे. हा मुद्दा आजचाच आहे असं नाही, कदाचित कालची परिस्थितीही हीच असेल. कारणं कदाचित वेगवेगळी असतील; पण हा ओलावा टिकवायला हवा. आपल्याच पुढच्या पिढ्यांकरिता...

    ReplyDelete
  4. @ माधव सर, खरं आहे, तो ओलावा आपल्यासाठी कुणीतरी टिकवला, तसा आपण तो थोडासा जरी आपल्या पुढच्या पिढी कडे सोपवला तर हे सण, उत्सव आणि नाती, संस्कृती सगळंच चिरंतन राहील... ना?

    ReplyDelete
  5. @ टेकचंद, दिल्लीत कंटाळा आला की सुट्टी घे आणि ये, आपण जाऊ कोकणात... येवा, कोकण आपलाच आसा!!! :)

    ReplyDelete
  6. कोकणातल्या गणेशोत्सावाविषयी ऐकून होतो, पण ही माहिती सार्वजनिक उत्सवाची असायची. घराघरांत श्रीगणेशाचा उत्सव कसा असतो, हे कुठं वाचायला मिळालं नव्हतं. या निमित्तानं ते मिळालं. यानिमित्तानं लहानपणीच्या आठवणींनी साद घातली. सर्वांच्या घरी गणेशोत्सव, पण महत्व सार्वजनिक उत्सवाला. आमची सरकारी कॉलनी. महिनाभर आधी तयारी सुरू व्हायची. सुरवात वर्गणीपासून. पावती पुस्तक छापा. मग घरोघर फिरा. काकांना जास्तीत जास्त वर्गणीसाठी साकडं घाला... हा पंधरा-वीस दिवसांचा उद्योग. त्याच्या जोडीला तयारी सुरू असायची ती मेळ्याची. गाणी बसवली जायची. कुणी नृत्यात भाग घ्यायचे. एखादी छोटी नाटिका सादर व्हायची. मेळ्याच्या स्टेजसाठी घरोघर फिरून टेबलं जमा करायची. एखाद्या दिवशी व्हीडीओवर एखादा चित्रपटही व्हायचा. त्याकाळी व्हीडीओ प्रकार नवा होता. कॉलनीत कोणता सिनेमा आहे, त्याची नोटिस फळ्यावर लिहिली जायची. हाच सिनेमा का? तो का नाही? अशीही चर्चा व्हायची. कॉलनीत एक मद्रासी कुटुंब होतं. नायर त्यांचं आडनाव. मराठी मातीत ते सारे सरमिसळून गेलेले. नायरकाका जिल्हा महिती कार्यालयात होते. सिनेमा दाखवायचं काम त्यांच्याकडं असायचं. ते दरवर्षी कॉलनीत प्रोजेक्‍टर आणायचे. उपकार, ओवाळिते भाऊराया हे चित्रपट एकवर्षाआड दाखवायचे. (परवा झी क्‍लासीकवर उपकार दाखवला, त्यावेळी त्यांची आठवण आली.) रोज एका घराची आरती ठरलेली. सकाळी शाळा, ऑफीस म्हणून आरतीला गर्दी नसायची. सायंकाळी मात्र कॉलनीतले बहुतांश मंडळी आरतीला यायचे. विसर्जन मिरवणूक म्हणजे एक भव्य सोहळा. गाडीला गुलमोहराच्या, नारळाच्या फांद्या बांधून मिरवणूक निघे. ढोल, ताशा, हालगीच्या तालावर सारी कॉलनी गणरायाला निरोप देण्यासाठी निघायची.... कोकणातल्या गणपतीमुळं हे सारं आठवलं...

    ReplyDelete
  7. फार फार बोलकं, अगदी मनातले. गणपतीबाप्पा त्या आठ - दहा दिवसात इतका घरातला होतो की विसर्जनाच्या दिवशी रडू येते. घर सुनेसुने वाटायला लागते.

    वातावरण सौमिती तू अगदी छान रंगवले आहेस. खूप मोठी लेखिका होशील बघ.

    ReplyDelete
  8. Thank you Shripad Sir, Ranjit Sir...!!!

    ReplyDelete
  9. छान आहे. शेवट जास्त रिलेट करवतो.

    ReplyDelete