Monday, 2 July 2012

गदिमांच्या पंचवटीत...

गदिमांच्या गाण्यांचं बोट धरून लहानाचं मोठं झालेल्या माझ्या सारख्या मुलीला त्यांचं वास्तव्य होतं, त्या पंचवटीत जायला मिळणं म्हणजे गुरुपुष्य, दुग्धशर्करा असे सगळे अपूर्व योग एकाच दिवशी आल्यासारखे...

आज गदिमांची सत्तावन्न बालगीतं, स्फूर्ती गीतं, संस्कार गीतं आणि अंगाई गीतं एकत्रित असलेला संग्रह प्रकाशित होतोय... त्याची बातमी करायची म्हणून प्रकाशक अनिल कुलकर्णीना परवा फोन केला. म्हटलं, ''मला भेटायचंय... बातमी संदर्भात. आणि  शक्य असेल तर श्रीधर आणि शीतल माडगुळकर यांनाही भेटता येईल का?'' कुलकर्णी काकांनी लगेच श्रीधर माडगुळकर यांचा नंबर दिला... त्यांनाही फोन करून ''भेटता येईल का..???'' असं जरा चाचपडतच विचारलं खरं तर...  तेही लगेच म्हणाले, ''हो, ये ना पंचवटीत...'' मी यायचंय...??? आणि तेही पंचवटीत? म्हणजे, गदिमांच्या पंचवटीत??? असं परत एकदा विचारून कन्फर्म करावं का, पण म्हटलं नको... उगाच वेडगळ पणा नको करायला...



मला गदिमा नक्की कधी भेटले हे आता आठवतही नाही... खरं तर गदिमा गेले एकोणीसशे सत्त्याहत्तर साली. म्हणजे माझ्या जन्माच्याही अकरा वर्ष आधी. त्या आधी लिहिलेली त्यांची गीतं... मात्र त्यांचे शब्द स्थल-कालाच्या पलीकडे आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा भाग झाले...  म्हणजे माझ्या गाणं ऐकण्याचा प्रवास  'नाच रे मोरा...' ते गीतरामायण असा कधी झाला... कसा झाला... आता काहीच आठवत नाही. पण तो झाला हे खरं... म्हणजे गीतरामायण डोक्यावरून जायच्या वयातही निदान त्यातलं एखादं गाणं वाजायला लागलं तर त्यातले शब्द अचूक गुणगुणता येतील इतकं गीतरामायण ओळखीचं होतं... पुढे त्या शब्दांचे अर्थ कळायला लागले. त्या रचणाऱ्या व्यक्तीच्या लेखणीची ताकद आणि आवाका कळायला लागला. पण त्याच्याही किती तरी आधीच त्या सगळ्या गीतांचं गारुड जे बसलं डोक्यावर ते बसलंच... आजी आजोबांकडे तेव्हा गीत रामायणाच्या कॅसेट होत्या... आठ भाग. साधारण माझ्या आवडीचं गाणं कुठल्या भागात आहे माहिती होतं. त्या कॅसेट्स ची किती पारायणं झाली राम जाणे... पुढे घरी सीडी प्लेयर आला. मग अर्थातच इतर सीडीज बरोबर गीत रामायणाची सीडीही आली. तिने तर पारायणं अजून सोपी केली... आणि फक्त गीत रामायण  नाही, पण गदिमांच्या प्रत्येक गाण्याची हीच खासियत... मग ते नाच रे मोरा आंब्याच्या वनात असो, किंवा झुक झुक झुक झुक आगीन गाडी... ही बालगीतं ऐकली, तशी अनेक असंख्य भावगीतं ऐकली... जिंकू किंवा मरू... हे राष्ट्र देवतांचे... ही गाणी शाळेत ऐकली... म्हटली सुद्धा. 

त्यात आणि परत गदिमा आणि बाबूजी अशी जोडगोळी असेल तर बाकी काही बोलायचीच गरज नाही... हे लिहिताना बाबूजी आणि गदिमांच्या केमिस्ट्री बद्दल ऐकलेला एक किस्सा आठवतोय... एका कुठल्याशा चित्रपटाची काही गीतं अण्णा (गदिमा) लिहित होते. काही कारणाने त्यातली तीन/चार गाणी लिहून झाल्यावर बाकीची एक/दोन गाणी लिहिणं त्यांच्या हातून राहून गेलं... त्याच दरम्यान एक नवीन गीतकार/कवी त्यांच्याकडे येत होते, काम मिळवण्यासाठी...  अण्णा सहज त्या नवोदित गीतकाराला म्हणाले, लिहा बरं हे गीत... त्यांनी गीत लिहिलं. अण्णांनी ते चाल लावायला बाबुजींकडे पाठवलं. बाबुजींनी ते गीत वाचलं. त्यात काही बदल सुचवले आणि परत लिहून आणायला सांगितलं. हे असंच अजून दोन/तीनदा झालं. त्या नवोदित गीतकार महाशयांच्या हे लक्षात आलं की बाबूजींना आपल्या गाण्याला चाल द्यायचं काही मनात नाही. मग त्यांनी ते गीत लिहिण्याचा नाद सोडून दिला. पुढे कधी तरी अण्णांच्या हातून ते गीत लिहून झालं, तेव्हा ते नवोदित गीतकार तिथे उपस्थित होते... अण्णांनी सहज ते गीत त्यांच्या हातात दिलं आणि ''जाता जाता जरा एवढं फडक्यांना द्या हो...'' असं म्हणाले. त्या गीतकाराने डोकं लढवत ते गीत आपल्या हस्ताक्षरात लिहून बाबुजींसमोर धरलं. म्हणाले, ''बाबूजी, आता जरा बघा बरं हे गीत...'' बाबुजींनी कागदावर एक नजर टाकली, आणि क्षणात विचारलं, ''माडगुळकरांचं का हो गीत?'' त्या नवोदित गीतकारावर अक्षरशः तोंडात बोट घालायची वेळ आली... कारण गदिमा आणि बाबूजी हे द्वैत होतंच असं और... 

असे अनेक किस्से आहेत, या दोन्ही अवलीयांचे... शिवाय गदिमांनी लिहिलेलं गीत रामायणचं पहिलं गाणं म्हणे चाल लावायला म्हणून बाबुजींकडे आलं आणि त्यांच्याकडून ते गाणं लिहिलेला कागद कुठेसा हरवला... आता हे गदिमांना सांगायला कुठल्या तोंडाने जायचं म्हणून बाबूजी ते टाळत होते. शेवटी अगदी रेकॉर्डिंग च्या दिवशी घाबरत घाबरत बाबुजींनी फोन केला, की अण्णा अहो, तो गाण्याचा कागद कुठे सापडत नाहीये... गदिमा प्रचंड चिडले... फोनवर अक्षरशः भांडणं झाली... तेव्हा बाबूजी म्हणाले, ''अहो हो, चुकलंय माझं. पण आता रेकॉर्डिंग करायचंय... तर त्याचं काय करूया ते आधी सांगा... नंतर पुन्हा मला बोला हवं तर...'' त्यावर, ''घ्या कागद पेन...'' असं सांगून अण्णांनी ते गाणं फोन वर पुन्हा जसंच्या तसं बाबूजींना उधृत केलं... बाबुजींनी ते लिहून घेतलं आणि मग चाल दिली, असाही एक प्रसंग ऐकलाय... तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना असं नातं होतं म्हणे दोघांचंही... अर्थात असणारच. त्यांच्या कामातही ते दिसतंच ना...

तर अश्या गदिमांच्या घरी, पंचवटीत जायचं म्हटल्यावर मी पुरती वेडावले होते. ठरल्या वेळी तिथे पोचले तर, अनिल कुलकर्णी वाटच पहात होते. त्यांच्याशी परिचय झाला... आम्ही पंचवटीच्या दारातून आत जाताच मला कुलकर्णी काकांनी ''ह्या खुर्चीवर बसून गदिमांनी गीतरामायण लिहिलं...'' असं म्हणत एक खुर्ची दाखवली. मला सुचलंच काही, क्षणभर... आणि दुसर्याच क्षणी मी त्या खुर्चीला हात लावून पाहिला. नमस्कार केला मनातल्या मनात... आणि मग आत गेले.

श्रीधर माडगुळकर आणि त्यांच्या पत्नी शीतल माडगुळकर, म्हणजे अर्थातच गदिमांचा मुलगा आणि सून भेटले... 'नाच रे मोरा...' हा जो संग्रह येतोय, त्याचं संकलन आणि संपादन करण्याची मोठ्ठी जबाबदारी शीतल काकूंनी निभावलीये. आणि नुसतं एखादं काम उरकायच्या भावनेने त्यांनी हे केलेलं नाहीये, तर त्यात आपला सगळा जीव ओतलाय... हे त्यांच्याशी बोलताना जाणवलं. आणि गदिमांच्या घरातल्या कुणाशी तरी मी बोलतीये याचं मलाही टेन्शन आलं नाही, कारण गेल्या क्षणी श्रीधर काका आणि काकू दोघांनीही अगदी जुनी ओळख असल्या सारखंच संभाषण सुरु केलं... 

गीतरामायण, गदिमांची असंख्य गाणी मला माहितीयेत हे त्यांच्या लक्षात आल्यावर तर त्यांनाही माझ्याशी किती बोलू आणि किती नको असं झालं. माझ्यासाठी हा खरंच अपूर्व अनुभव होता. श्रीधर काका आणि शीतल काकूंच्या तोंडून त्यांच्या पप्पांच्या काही आठवणी ऐकता आल्या. बोलता बोलता मी सहज आणि अत्यंत प्रामाणिकपणे म्हणून गेले की ''मला जे काही रामायण माहितीये ते गदिमांच्या गीत रामायणामुळे माहितीये... नाही तर मी स्वतःहून रामायण महाभारत वाचायला कधी जाईन असं वाटत नाही. टीव्ही वर प्रसारित झालेले रामायण- महाभारताचे भागही मी पाहिलेले नाहीत... पण गीत रामायण मला अतिशय आवडतं... माझ्या फोन मध्येही त्यातल्या गाण्यांच्या एमपीथ्री फाइल्स आहेत... अनेकदा मी त्या ऐकते.'' मी हे म्हणाले आणि श्रीधर काकांनी अतिशय मायेने मला सांगितलं, ''तुझा एवढा जीव आहे ना, गीत रामायणावर? मग तुला एक सांगू का?'' मी अर्थातच हो म्हटलं, तर त्यांनी सांगितलं, आत्ता आपण ज्या खोलीत बसलो आहोत, त्याच खोलीत बसून पप्पांनी संपूर्ण गीतरामायण लिहिलं... हे ऐकलं आणि खरंच अंगावर रोमांच उभे राहिले माझ्या... (हे वाक्य थोडं पुस्तकी झालंय... पण ते खरंच आहे...) 

नंतर मी काम संपवून निघताना प्रकाशक अनिल कुलकर्णी, आणि श्रीधर काका आणि शीतल काकूंना वाकून नमस्कार केला... तर त्यांनी गदिमांच्या 'नाच रे मोरा' या गीत संग्रहाची सुंदर (ते पुस्तक शब्दशः सुंदर आहे... नक्की बघावं आणि संग्रही असावं असं...) प्रत माझ्या हातात ठेवली... मी लहान असण्याचा अधिकार वापरून सही करून द्या असा हट्ट केला... त्यांनीही लगेच ''चि. भक्तीला, प्रेम आणि आशीर्वादपूर्वक...'' असं लिहित सही केली... (हल्ली बर्याच दिवसात हे शब्द लिहून कुणी काही दिलं नव्हतं... त्यामुळे ते वाचलं आणि परत एकदा मला भरून आलं...) आणि ते पुस्तक पुन्हा माझ्या हातात दिलं. वर श्रीधर काका म्हणालेही, ''गदिमांच्या पुस्तकाची बातमी करायचीये असा जेव्हा तू फोन केलास तेव्हा मला कुणीतरी पंचेचाळीस/पन्नाशी मधली स्त्री येणं अपेक्षित होतं... पण तू तर अगदीच लहान आहेस... तुला गदिमा माहितीयेत, त्यांचं साहित्य माहितीये हे बघून मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतंय... पंचवटीच्या या खोलीचा स्पर्श हा सुवर्ण स्पर्श आहे... तो लाभला तुला... आता तुही तुझ्या क्षेत्रात नक्की मोठी होशील...'' 

बापरे... त्यांनी दिलेली ती पुस्तकाची प्रत मी अक्षरशः मिरवून माझ्या जवळच्या माणसाना दाखवली... आनंदाने चिंब भिजून काही फोन केले, ''मी गदिमांच्या पंचवटीत जाऊन आले...'' हे सांगायला... योगायोग असा की माझ्या मागच्या ब्लॉग पोस्ट चा शेवट मी गदीमांच्या ओळींनी केला होता. ''ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे...'' या त्या ओळी... ती पोस्ट पूर्ण करताना हे माझ्या गावीही नव्हतं की लवकरच, 'ईश्वराचा अंश' लाभलेल्या याच 'आधुनिक वाल्मिकीच्या' पद स्पर्शाने पावन झालेल्या पंचवटीचं दर्शन माझ्या नशिबी आहे... माझ्या मराठी असण्याचा मला अभिमान वाटण्याचे जे क्षण आहेत, त्यातला हा अमूल्य क्षण आहे.