Sunday 23 October 2011

मु. पो. कुसुमाग्रज आणि यादगार गुलजार

" मराठी मेरी मादरी जबान नही, लेकिन उस जमीन की बोली है जिसने पिछले पचास बरसोंसे मेरी परवरिश की है. पंजाब से निकली मेरी जडों को पनाह दी है. महाराष्ट्र की समन्द्री हवाओं का नमक खाया है. इस लिए उस जबान का मजा जानता हूँ... कर्जदार भी हूँ, कर्ज चुका रहा हूँ... '' अशी विनम्र कृतज्ञता मनात ठेवून गुलजारांनी कुसुमाग्रजांच्या कवितांचे हिंदी अनुवाद केले. गाणी आणि कवितांवर प्रेम असणाऱ्या रसिकांसाठी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि गुलजार ही दोन्ही नावं नवीन नाहीत. म्हणूनच "मु. पो. कुसुमाग्रज ः भाषांतराचे पक्षी' हा नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानने यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे आयोजित केलेला कार्यक्रम रसिकांना एक अपूर्व अनुभव देऊन गेला.

कुसुमाग्रजांची मूळ मराठी कविता वाचून नंतर तिचा हिंदी अनुवाद वाचणे असं या कार्यक्रमाच्या सादरीकरणाचं स्वरुप होतं. कुसुमाग्रजांची कविता सादर करायला गुलजारांच्या साथीला होता मराठीतला सिद्धहस्त कवी सौमित्र! ( जो कवितेतल्या शब्द, अर्थ, भावनांना न्याय देत कवितेचं अफलातून सादरीकरण करतो ) "सौमित्र, तुम कोई भी नज्म पढते हो, तो ऐसा लगता है, जैसे वो हर एक नज्म तुम्हारी खुदकीही है...'' असं म्हणत दस्तुरखुद्द गुलजार त्याला पसंतीची पावती देतात! सौमित्रच्या पाठोपाठ गुलजार, त्यांनी हिंदीमध्ये अनुवादित केलेली कुसुमाग्रजांची "नज्म' त्यांच्या उर्दू मिश्रित हिंदी जबान मध्ये सादर करतात तेव्हा डोळे मिटून शांतपणे त्यांना ऐकणं हा अनुभव शब्दांत मांडणं निव्वळ अशक्‍य!

कुसुमाग्रजांच्या कवितांची सौंदर्यस्थळं, त्यांच्या शब्दांची ताकद, त्या कवितांचे सामाजिक संदर्भ हे सगळं गुलजारांना भावलं. त्यातूनच कुसुमाग्रजांच्या (अधून मधून गुलजार त्यांचा ""तात्यासाहाब'' असा अस्सल मराठमोळा, आदरपूर्वक उल्लेख करतात! ) निवडक शंभर कवितांचा अनुवाद करण्याकडे ते वळले. मराठी बोलता येत नसलं तरी गुलजारांना मराठीची उत्तम समज आहे. शिवाय त्यांचे जवळचे स्नेही अरुण शेवते आणि मराठी अभिनेत्री अमृता सुभाष यांनी या कविता समजून घ्यायला मदत केली. "अरुण की तो मैं जान खाता था...'' असं ते अगदी मोकळेपणाने सांगतात.

हा कार्यक्रम म्हणजे नुसत्या मराठी आणि हिंदी कवितांचं वाचन एवढंच नाही. कवितांच्या मध्ये मध्ये सौमित्रने गुलजारांना विचारलेले प्रश्‍न आणि उत्तरादाखल कधी हलकीफुलकी टोलवाटोलवी तर कधी त्यांनी केलेलं "सिरियस लाऊड थिंकिंग' हा या कार्यक्रमाचा आणखी एक सुंदर पैलू!! या प्रश्‍नोत्तरांच्या निमित्ताने समोर सुरू असलेला संवाद म्हणजे गुलजार साहेबांच्या चाहत्यांसाठी एक आगळी वेगळी इंटलेक्‍चुअल ट्रीट होती! त्यांच्या "इजाजत' मधली गाजलेली गझल "मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा है' मधल्या "एकसों सोला चॉंद की राते' या ओळीचा दाखला देत "हे एकसो सोला चॉंद की राते काय प्रकरण आहे?'' या सौमित्रच्या प्रश्‍नावर "अरे भाई, वो असल में एकसो सतरा था, गिनती में गलती हो गई...'' असं मिस्कीलपणे ते उत्तरतात. मात्र what is death according to you? या प्रश्‍नाचं उत्तर म्हणून एक "नज्म' ते ऐकवतात. मृत्यू कसा यावा? हे ती नज्म सांगते. रुग्णशय्येवरचा मृत्यू नको. रस्त्यावर अपघात होऊन देहाला छिन्नविछिन्न करणारा मृत्यूही नको. "मुझे ऐसे मरना है, जैसे लिखते लिखते सियाही खतम हो जाएँ...'' हे म्हणताना त्यांचा स्वर किंचित ओला होतो, आपल्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्याशिवाय रहात नाहीत...

केकचा तुकडा, कलोजस, असाही एक सावता, अखेर कमाई, कणा, रद्दी यांसारख्या अनेक कवितांचे अनुवाद ऐकताना कुसुमाग्रजांच्या मूळ कवितेशी एकरूप झालेले गुलजार पहायला मिळतात. कवितांमागून कविता सादर होतात. लहानपणापासून ऐकलेल्या, वाचलेल्या कुसुमाग्रजांच्या कविता गुलजारांच्या उर्दू शब्दांचे लिबास लेवून येतात तेव्हा त्या दोघींत उजवं डावं करता येत नाही. अशातच कधीतरी कार्यक्रम संपतो. आपण गुलजार साहेबांना भेटायला बॅक स्टेज गाठतो. त्यांच्याशी बोलायला म्हणून घाबरत घाबरत पुढे जावं तर ते स्वतःहून मायेने आपली चौकशी करतात. आपल्या डोक्‍यावर त्यांचा वडिलधारा हात ठेवतात. आपलं सगळं जगणं सार्थकी लागल्याचं समाधान त्याक्षणी मिळतं. एक यादगार दिवस घेऊन आपण बाहेर पडतो... पण तिथला कैफ मात्र काही केल्या मनावरुन उतरत नाही...!!!

11 comments:

  1. भक्ती अगं कसली सुवर्णसंधी मिळाली होती तूला.... क्षणभर हेवा वाटला तुझ्या नशिबाचा!!! गुलजारांची भेट, त्यांच्याकडून आणि सौमित्रकडून कवितावाचन ऐकण्याची संधी... आहाहा!!!

    तू लिहीयलेस किती मनापासून आणि.... मानलं तूझ्या लेखणीला!!

    ReplyDelete
  2. तन्वी ताई, आभार! अगं, अनुभवच एवढा समृद्ध होता...!!! काय बिशाद असणार होती माझ्या लेखणीची कि तो अनुभव शब्दबद्ध करण्यात गल्लत होईल... प्रत्येक शब्द मनापासून लिहिलाय मी, म्हणून तुला आवडली असेल पोस्ट!

    ReplyDelete
  3. खरच, छान लिहिलं आहे. अभिनंदन. गीत आणि कविता ह्यात कविता भावते हे गुलजारांचे स्पष्टिकरण असेच रम्य होते.
    कवितांचा दरवळ असाच पसरो.
    माझा एक ब्लॉग : कविता म्हणजे ---अवश्य पहा:
    लिंक:http://kavitamhanaje.blogspot.com/
    ---अरूण अनंत भालेराव
    arunbhalerao67@gmail.com

    ReplyDelete
  4. भालेराव काका, मनापासून आभार...!!!

    ReplyDelete
  5. mast lihila aahe anubhav.....wachtana sabhagruhat basun aikto aahe ase watle....mastch

    ReplyDelete
  6. व्वा!!! खूप छान लिहिलं आहेस. अगदी त्या कार्यक्रमात उपस्थित असल्यासारख वाटलं बघ. मागे तुझ्या एका ब्लॉग मध्ये तू त्यांना भेटण्याची इच्छा प्रकट केली होतीस ते आठवलं. तुझी इच्छा पूर्ण झाल्याचा आनंद तुझ्या इतकाच मलापण झालाय. you are really lucky.

    ReplyDelete
  7. khupach sundar anubhav hota ha tuza bhakti... tuzya shabdatun tu chaan mandlays ha pan. and I am happy for u that u will get many more opportunities to meet Him.

    ReplyDelete
  8. ""मुझे ऐसे मरना है, जैसे लिखते लिखते सियाही खतम हो जाएँ...'' हे फक्त गुलजार साहेबांनाच सुचू शकते. जगणंच नव्हे तर मरण देखील इतके उन्नत आणि उदात्त मागणाऱ्या या कवीचे पुढच्या अनेक पिढ्यांवर कधीही न फिटणारे उपकार आहेत. " आपको हमारी उमर लाग जाये गुलजार साहब....!
    'जिवंत' अनुभव तितक्याच 'जिवंतपणे' मांडला आहेस भक्ती तू..!!

    ReplyDelete
  9. @ प्रसाद सर, विकास, पूर्वा, जोहार मायबाप, सगळ्यांचे मनापासून आभार...
    मी माझ्या मागच्या गुलजार पोस्ट मध्ये म्हणाल्या प्रमाणे, आपलं नशीब थोर, म्हणून गुलजार साहेबांसारखा माणूस आपल्या आयुष्यात आहे! वयाच्या प्रत्येक वळणावर, त्यांचे शब्द अगदी जिवलग मित्रासारखे सोबत करतात... जगणं समृद्ध करतात! त्यामुळे हा अनुभव असा इतक्या जिवंतपणे मांडणं मला साधलं त्याचं श्रेय अर्थातच त्यांनाच... आजच्या इतपत विचार करता येण्याजोगं समृद्ध पण देणारी जी माणसं आहेत, त्यात एक गुलजार साहेबही आहेत... त्यांच्या शब्दांचं बोट धरूनच तर लहानाचे मोठे झालो... त्यांच्या कविता आणि गाण्यांमधून कधी ते मित्र वाटले, कधी वडील, कधी गुरु, कधी अजून काही... म्हणून ही पोस्ट त्यांच्यातल्या गुरुसाठी...
    माझ्याकडून गुरुदक्षिणेची एक छोटीशी ओंजळ...

    ReplyDelete
  10. @ Poorva, Yes, I hope, I'll get that golden opportunity again...!!!

    ReplyDelete
  11. वाह सुंदर लेख. छान आहे वृतांत आवडला !

    ReplyDelete