Tuesday 22 May 2012

अ डे @ लवासा...


चोवीस एप्रिलपासून स्टार माझाच्या (हं... एक जून पासून एबीपी माझा होतोय आम्ही... बातम्या नाही बदलल्या, बदललंय फक्त नाव...) पुणे ब्युरोला रिपोर्टर म्हणून कामाला सुरुवात केली... इथे येताना खरं तर तसं थोडंसं टेन्शनच होतं. आधीच हातात अनुभव अगदीच तुटपुंजा, तोही वर्तमानपत्राचा. न्यूज चॅनेलचा आणि माझा संबंध चौथ्या सेमिस्टरला (हो ना, पूर्वा...??? मला ते पण आठवत नाहीये...) दिलेल्या टेलिव्हिजन न्यूज प्रोडक्शन या दोन क्रेडिटच्या पेपर पुरता आणि बातम्या पाहण्यापुरताच मर्यादित... त्यामुळे एकंदरच इथलं सेकंदांचं गणित, ब्रेकिंगची धावपळ, कॅमेराला सामोरं जाणं वगैरे जमणार का याबद्दल शंका होत्याच... पण पण एकदा करायचंय म्हटल्यावर आहे त्याला भिडणं गरजेचं होतं... तसं भिडायला सुरुवात केली आणि ते बर्यापैकी जमायलाही लागलंय... असो. तर, नवीन नोकरी बद्दल काही लिहिलं नव्हतं, म्हणून ही प्रस्तावना... आता, ज्यासाठी लिहायला घेतलंय, तो विषय...

त्या दिवशी एका शिबिराचं आमंत्रण आलं ऑफिसमध्ये... त्याच्यावरुन नजर टाकताना वाटलं, हे काहीतरी वेगळं आहे, जाऊन पहायला हवं... रविवार होता, माझी सुट्टी  होती, तरी जायचं ठरवलं... हे शिबिर होतं, लवासामधल्या एका खेडेगावात. लवासा बद्दल बरीच चर्चाचर्वणं कानावरुन आणि डोळ्यांखालून गेली होती. पण माझं लवासाला जाणं मात्र झालं नव्हतं... नेमका या शिबिराचा योग जुळून आला आणि मी जायचं ठरवलं. रविवारी आठ-सव्वाआठला मी आणि माझ्या कॅमेरामॅन सहकारी अमोलने पुणं सोडलं... अमोल याआधी कैकवेळा तिथे जाऊन आलाय... त्यामुळे तो सराईतासारखा गाडी चालवत होता. मी पहिल्यांदाच तिकडे येतेय हे माहिती असल्यामुळे वाटेत तो मला गावांचे, माणसांचे बरेचसे तपशील पुरवत  होता... जिथून लवासा सिटीचा पहिला व्ह्यू दिसतो, तिथे अमोलने गाडी थांबवली आणि मला व्ह्यू बघ असं सांगितलं... ते सुंदर आखीव रेखीव शहर बघून साहजिकच माझ्या तोंडून सुंदर... असे उद्गार आले... दोनेक मिनिटं तिथे थांबून सगळा नजारा बघून मी परत गाडीत बसले... आम्ही पुढे निघालो... मुगाव कडे. 



लवासा मधले चकाचक रस्ते संपतात आणि मुगावचा रस्ता सुरु होतो... खरं तर त्याला रस्ता म्हणायचा का हा प्रश्न आहेच. कारण वाट चुकलो तर विचारायला  वाटेत औषधालाही माणूस नाही... रस्ता म्हणजे डोंगराचा चढ चढून जायचं. गावात लांब लांब पसरलेली पाच-सहाशे घरं. गावात लाईट नाहीत. मोबाईलला नेटवर्क सुद्धा नाही. म्हणजे एकदा इथे आलो की बाहेरच्या जगापासून संपूर्ण तुटल्याचा अनुभव येतो... माझ्या सारख्या मोबाईलचं व्यसन असलेल्या मुलीला तिथे गेल्यावर अस्वस्थता येणं फारच स्वाभाविक... तशी ती आलीही. पण फार वेळ टिकली नाही हेही खरं. कारण मुळात रस्त्यावर दिसलेली विसंगती पुढे सातत्याने दिसत राहिली. अस्वस्थ करत राहिली... मोबाईल मेल्याची अस्वस्थता त्यापुढे अगदीच छाटछूट होती... 

लवासामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी बोटिंग आहे... बोटिंग साठी रस्त्याच्या एका बाजूला एखाद्या सुंदर चित्रातल्या सारखा जलाशय. आणि रस्त्याच्या दुसर्या बाजूला कोरडं रखरखीत वाळवंट वाटेल अशी पसरलेली जमीन... मध्ये म्हणायला नदी अशी वाहणारी एक शुष्क रेघ... हे सगळं चित्र बघत बघत मी मुगावात लीलाबाई मरगळे यांच्या घराजवळ पोचले. पुन्हा एकदा, त्या राहतात ती जागा फक्त 'म्हणायला घर...' चार पत्रे ठोकून उभी केलेली शेडच खरं तर... याच ठिकाणी असलेल्या एका मस्त डेरेदार पसरलेल्या फणसाच्या झाडाखाली महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातून आलेली शिबिरार्थी मुलं मला भेटली. शिबिराचे संयोजक असलेले प्रसाद बागवे आणि सुनीती सु. र. भेटल्या. शिबिराच्या कार्यक्रम पत्रिकेतून साधारण अंदाज आला होता त्याप्रमाणे हे शिबीर खरंच काहीसं वेगळं होतं. ग्रामीण भागातले लोक कसे राहतात आणि जगतात हे बाहेरच्या मुलांना माहिती नसतं. शेतीवाडी पहायची असते. नांगरणी, पेरणी हे शब्द फक्त भूगोलाच्या पुस्तकात डोळ्यांखालून गेलेले असतात. शेतकरी उन्हाळ्याच्या अखेरीस शेत जमिनी भाजून पेरणी साठी तयार करतात. ते नक्की का कशासाठी... इथली लोकं पाणी कुठून आणतात? काम-धंदे काय करतात? खातात काय? एकूणच नेमकं कसं जगतात या बद्दल अनेक प्रश्न या मुलाना होते. त्यांची उत्तर त्यांना स्वतःला शोधू द्यावीत म्हणून हे शिबीर... 

ही मुलं इथे आली. आणि जणू इथलीच होऊन गेली. माझ्या तिथल्या चार-पाच तासांच्या मुक्कामात मलाही ते दिसत होतं. आम्ही तिथे पोचलो तेव्हा एक-दोन छोट्या छोट्या मुलीनी पळसाच्या पानाच्या द्रोणातून खाऊ आणून दिला. पाठोपाठ करवंद आणून दिली. सुनीती ताई आणि प्रसाद दादाशी बोलत होते तसं मला या भागातल्या गरीब आदिवासी लोकांबद्दल कळत होतं. मग माझा मोर्चा मी त्याच लोकांकडे वळवला. त्यांच्याशीच बोलायला सुरुवात केली. लवासाच्या येण्याने त्यांचं आयुष्य बदललंय. ते विस्कळीत झालंय असंही म्हणायला हरकत नाही खरं तर. लवासा उभं रहाताना डोंगर दर्या फोडून रस्ते केले गेले. जमिनी सपाट केल्या गेल्या. त्यासाठी ब्लास्टिंग करण्यात आली. त्यात पाण्याचे प्रवाह बदलले. आज मुगाव मध्ये डोंगर कपारीतल्या एका छोट्याश्या झर्यातून झिरपत येणारं पाणी इथले हे आदिवासी लोक अक्षरशः वाटी वाटीने जमा करतात आणि रोजच्या गरजांसाठी वापरतात. मी तो झरा पाहिला आणि हा एवढास्सा झरा अख्ख्या गावाला पाणी पुरवतो हे बघून चकित झाले... 

शिबिराला आलेली मुलं पण इथे चांगलीच रमली. ती इथल्या स्थानिक लोकांना शेतीची कामं करायला मदत करत होती. झऱ्यावरून पाणी आणत होती... आणि भरपूर गोष्टी बघत होती. बोलत होती. खरं तर हे शिबीर घेण्या योग्य दुर्गम खेडी तर खूप आहेत आपल्या आजू-बाजूला... मग हे मुगाव का निवडलं असेल? कारण सरळ होतं. हे मुगाव लवासात आहे... लवासा वरून पास होताना चुक्कूनही मनात येत नाही की या एवढ्या देखण्या शहराच्या पुढे एक असं खेडेगाव वसलं असेल... पण मुलं बोलत होती. लवासा आणि मुगाव मधल्या विसंगती त्यांच्या नजरेतून सुटत नव्हत्या. लवासा मधले रस्ते एवढे चकचकीत आणि इथे हे असे खड्ड्यांनी भरलेले रस्ते. तिथे लाईट, तिथे मोबाईल ला नेटवर्क... मग इथे पण माणसं राहतात ना... इथे वीज कधी येणार? इथे डॉक्टर का नाही? या लोकांना काही झालं तर यांनी जायचं कुठे? करायचं काय? माझ्या मते, मुलांना हे प्रश्न पडणं, आणि मुलांच्या नजरेला या विसंगती ओळखू येणं हेही या शिबिराच्या आयोजन करण्याचं सार्थक होतं...

मुळात लवासा सारखी शहरं हवीत की नकोत हा विषय पुरेसा चर्चिला गेलाय. ती हवीत तर कुणाला हवीत आणि नकोत तर का नकोत हा प्रश्न आहेच... अशी शहरं वसली नाहीत तर आपल्याकडे परदेशी कंपन्या येणार का? त्यांचा पैसा आपल्या देशात गुंतवणार का? या एवढ्याच मुद्द्यांवर लवासाचं समर्थन होऊ शकतं का?   पण मग लवासा म्हणा किंवा असं अजून कुठलं शहर आलं तर इथल्या मातीतल्या लोकांनी कुठे जायचं? लवासा सारखी कंपनी या लोकांना रोजगार, घर-दार देण्याची हमी देते. पण परवाच्या शिबिराला साधा एक पाण्याचा टॅंकर मागवायचा होता, तर लवासाने गावकर्यांना लेखी परवानगी आणा वगैरे कटकटी केल्या... आमचं पाणी यांनी तोडलं म्हणून  टॅंकर मागवण्याची वेळ आली... नाही तर आमचं आम्हाला पुरेल एवढं पाणी नक्की होतं आम्हाला... असं म्हणत त्रासलेल्या गावकर्यांनी मग टॅंकरचा नाद सोडला... अश्या छोट्या छोट्या गोष्टी बघता इथल्या आदिवासींना लवासा खरंच सामावून घेणार का...? की शहर विस्तारत जाईल तसं या आदिवासींचा जगणं जास्त दुष्कर होत जाणार ते येणाऱ्या काळात बघण्याशिवाय माझ्या हातात दुसरं काहीच नाही... 

शिबिराचा रिपोर्ट पाहण्यासाठी लिंक -