Monday 15 April 2013

संतोष मानेच्या निमित्तानं...


दोन हजार बाराच्या जानेवारीतली एक सकाळ... मी पुण्याहून घरी जायला निघाले होते. सकाळी सव्वाआठच्या दरम्यान स्वारगेट वरुन विजयदूर्ग गाडी निघते... त्या गाडीनं निघायचं होतं... मी स्वारगेटला पोचले, गाडी वेळेत आली आणि सुटलीही... स्वारगेट सोडलं की माझं आवडीचं काम म्हणजे मोबाईलवर हेडफोन लावून गाणी ऐकत निवांत खिडकीच्या बाहेर बघत बसणं... किंवा मस्तपैकी झोपून देणं... त्यादिवशी झोपायचा मूड होता... कंडक्टर कडून तिकीट घेईपर्यंत वेळ काढला. तो येऊन तिकीट काढून चार ख्यालीखुशालीच्या गप्पा मारुन झाल्या तसं मी मस्त झोपून गेले... बरं गाडीत बसल्या बसल्या पुण्यातल्या घरी मावशीला आणि तिकडे मम्मी पप्पांना सांगून झालं होतं, की गाडीत जागा मिळालीये, दहा मिनिटांत पुणं सोडेन... शिवाय आता पाच सहा वर्ष झाली पुणे ते घर असा जवळजवळ तीनेकशे किलोमीटर प्रवास अगदी मध्यरात्रीही एकटीनं करायची सवय... त्यामुळे कुणी दर अर्ध्या तासानं काळजीचा फोन करेल अशी शक्यताही नव्हती, त्यामुळे फोन सायलेंट ला करुन मी निवांत झोपले...

बहुदा सातार्यात पोचले आणि स्टँडवरच्या कलकलाटानं जाग आली... उठले. तोंड हलवायला म्हणून वेफर्सचं पाकिट घेतलं. आणि सहज फोन काढला... तर फोन वर पंधरा वीस तरी मिस्ड कॉल्स. मी एखादा फोन नाही उचलला तर काळजी वाटून मला अर्ध्या तासात सत्तर ऐंशी फोन करणारा एक अवलिया मित्र होता, त्यामुळे हे फोन त्यानेच केले असतील असं वाटलं... प्रत्यक्षात मात्र एकाच वेळी पप्पा, मामा, काका आणि काही मित्र मैत्रिणींचे फोन पाहिले आणि डोकंच चालेना... घरी कुणाचं काही बरं वाईट झालं असेल का अशी एक शंका आली... पण मग तसं काही असेल तर मित्र मैत्रणी का फोन करतील या विचारानं थोडं हलकंही वाटलं... अशा परिस्थितीत ज्या माणसाशी काहीही बोलू शकेन आणि काहीही ऐकू शकेन असा माणूस म्हणजे मामा... मामाला फोन केला आणि काय झालंय एवढा एकच प्रश्न विचारला... माझा आवाज ऐकून त्याला वाटलेलं हुश्शपण मी त्याच्या आवाजातून सहज ओळखू शकले... पुढे त्याने मला सगळा प्रकार सांगितला...

सकाळी सव्वाआठच्या दरम्यान स्वारगेट एसटी स्टँडवर एका ड्रायव्हरने अक्षरशः धुमाकूळ घातला होता... स्वारगेट मधून काढलेली गाडी आजुबाजूच्या परिसरात वाट्टेल तशी अंदाधूंद चालवून त्याने मध्ये आलेल्या वाहनांना, माणसांना धडक दिली होती... त्यात काही माणसं गेली होती... गंभीर जखमीही झाली होती... मी बराच वेळ फोन न उचलल्यामुळे मी सकाळी स्वारगेटवरुन निघणार आहे हे माहिती असलेली घरातली माणसं आणि मित्र मैत्रिणी यांच्या मनात माझ्याबद्दल सगळं वाईट ते येऊन गेलं होतं... म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती... हा तो ड्रायव्हर म्हणजेच नुकती पुणे सत्र न्यायालयानं ज्याला फाशीची शिक्षा सुनावली, तो संतोष माने... 

त्या दिवशी मी प्रवासात असल्यामुळे मला न्यूज चॅनेलवर संतोष मानेची बातमी पहाता येत नव्हती... पण माझ्या फोन वर मला दिसलेले मिस्ड कॉल्स मला प्रसंगाचं गांभीर्य समजण्यासाठी पुरेसे होते... मग सगळ्यात आधी माझ्यासाठी हवालदिल झालेल्या सगळ्यांना मी अतिशय सुखरुप आहे हे कळवलं... संध्याकाळी घरी पोचल्यावर बातम्या बघताना किती भयंकर प्रकार घडलाय याचा अंदाज आला...

त्याच संतोष मानेला न्यायालयानं फाशी सुनावली आणि तो दिवस लख्ख आठवला... मानेला फाशी सुनावल्यानंतर रात्रीच्या बुलेटिन साठी संतोष मानेनं ज्यांचे जीव घेतले त्यांच्या जवळच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रीया घ्यायचं ठरलं... (अशा वेळी प्रतिक्रीयेसाठी भेटायला येऊ का असं विचारणं खरं तर मनापासून जीवावर येत असतं... पण तरी आपल्या कामाचा भाग म्हणून ते करणंही गरजेचं असतं...) त्याच अपरिहार्यतेतून काही फोन केले... (पलिकडनं काय उत्तरं येतील हे माहिती होतं, तरी केले...) एका वडिलांना फोन केला... त्यांचा सोळा सतरा वर्षांचा मुलगा संतोष माने प्रकरणात हे जग सोडून गेला... मी फोन केला तेव्हा बोलतानाही त्यांना भरुन आलेलं... काय प्रतिक्रीया देऊ... माझा मुलगा त्याच्या फाशीनं परत येईल का असं त्यांनी मला विचारलं तेव्हा मी नम्रपणे त्यांना सॉरी म्हणाले... अशा अडचणीच्या वेळी आपल्या तोंडून मनापासून सॉरी येतं, पण खरं तर सॉरी वगैरे शब्द एकूणच केवढे पोकळ असतात नं...

असाच अजून एक फोन केला... तेही एक वडील होते. आणि त्यांची जेमतेम वीस वर्षांची मुलगी संतोष मानेची शिकार ठरली होती... त्यांनी भेटायला परवानगी दिली. संध्याकाळी पाच वाजता त्यांच्या घरी गेले. मुलीच्या जाण्याला एक वर्ष होऊन गेल्यावर त्याही क्षणी ते घर, तिथले चेहरे भकास आणि उदास वाटले मला... 

साधारण माझ्याच पप्पांच्या वयाचे असलेले ते सुद्धा एक पप्पा होते... संतोष मानेनं घातलेल्या थैमानामध्ये पूजा त्यांना सोडून गेली होती... त्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांनी तिला स्वारगेटला सोडलं तेव्हा त्यांना आणि तिलाही माहिती नसेल, की आपल्या समोर काय वाढून ठेवलंय... संतोष मानेच्याच धडकेत हे वडील स्वतः जखमी झाले... आणि दुसर्या बाजूला पूजानंही प्राण सोडला... अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर त्यांच्या मुलीनं सोडलेला प्राण त्यांना मात्र संध्याकाळी कधीतरी कळला... पूजा परत येणार नाही पण आमच्या मरणापर्यंत आम्हाला पुरुन उरेल असं दुःख ज्यानं पदरात घातलं त्या संतोष माने ला फाशी सुनावली... न्यायालयानं आम्हा सगळ्यांचं दुःख समजून घेतलं त्याबद्दल समाधान आहे, असं पूजाचे वडील म्हणाले... आपल्या पोटच्या पोरीचं अख्खं आयुष्य ज्या घरात गेलं, जिथं तिच्या जगण्या वाढण्याच्या असंख्य आठवणी आहेत, ते स्वतःच्या मालकीचं भलं मोठं घर कुलुपबंद करुन तिचे आई वडील आज शहराच्या दुसर्या टोकाला छोट्याश्या भाड्याच्या घरात राहतायेत... त्यांचं दुःख कळायला ही एकच गोष्ट पुरेशी आहे...

घरातल्या एखाद्या माणसाच्या मृत्यूने ते संपूर्ण नांदतं घरसुद्धा कसं मृत होऊन जातं असं वाटलं मला पूजाच्या घरी जाऊन आल्यावर... आपल्या जवळच्या माणसाचा मृत्यू पचवणं हे कधीही वाईटच... त्यात जर आई वडिलांना आपल्या मुलाचं किंवा मुलीचं मरण पहायला लागलं तर त्यासारखं दुःख नाही... 

मृत्यू... जगण्यातलं एकमेव अंतिम सत्य म्हणजे मृत्यू... वैयक्तिक आयुष्यातही आपण या मृत्यूची भिषणता अनुभवतो... तसं आजुबाजूलाही बघतो... त्या माणसाच्या जाण्यातून सावरुन आपण जगायला तर सुरवात करतो... पण जखमा भरुन येत नाहीत... अगदी कुठल्याही क्षणी गेलेल्यांच्या आठवणींनी डोळ्यांत पाणी दाटतं... गेले काही दिवस एका अतिशय जिव्हाळ्याच्या नात्याच्या तुटण्यानं मी अस्वस्थ आहे... क्षणोक्षणी जुन्या आठवणींनी डोळे भरुन येणं... जिवाची घालमेल होणं हे सगळं अनुभवते आहे... पण पूजाच्या आई बाबांसारखी मुळापासून उन्मळून पडलेली माणसं पाहिली की वाटतं, एखाद्या माणसानं हे जग सोडून जाणं यापेक्षा त्याने फक्त आपल्या आयुष्यातून निघून जाणं हे सोसायला खरंच किती सोप्पं आहे... दुसर्यांची दुःख पाहिली की आपली दुःख तुलनेनं किती छोटी आहेत हे असंच कळतं का आपल्याला...???